अहमद पटेल 'काँग्रेस समिती’चे चालतेबोलते प्रतीक होते. पक्षाच्या राजकीय हिताहून आणि पर्यायाने राष्ट्राच्या हिताहून कोणताही हितसंबंध किंवा कल्पना मोठी नाही यावर त्यांचा गाढ विश्वास होता.
अहमद पटेल यांचे निधन झाले. त्यांच्या निधनासोबतच काँग्रेसमधील सोनिया गांधी युगाचा अंत झाला आहे.
कारण, अहमदभाई हे अत्यंत सुक्ष्म स्तरावर काम करण्यात पारंगत होते. त्यांनी काँग्रेसमधील व्यवस्था सोनिया गांधी यांच्यासाठी अनुकूल केली आणि सोनिया यांनाही या अवस्थेत चपखल बसवण्याचे काम केले.
पटेल ‘काँग्रेस समिती’चे चालतेबोलते प्रतीक होते. पक्षाच्या राजकीय हिताहून आणि पर्यायाने राष्ट्राच्या हिताहून कोणताही हितसंबंध किंवा कल्पना मोठी नाही यावर त्यांचा गाढ विश्वास होता.
राजकारणात कायमचा शत्रू कोणीही नसतो हे त्यांच्यासाठी स्वयंसिद्ध सत्य होते. त्यांचा कोणालाच बांधून ठेवण्यावर विश्वास नव्हता. त्यांच्या दृष्टीने या वैविध्य आणि भेदाने समृद्ध भूमीमध्ये परस्परविरुद्ध दाव्यांमध्ये आणि वादविवादामध्ये सौहार्द निर्माण करणारी काँग्रेस सर्वोत्तम होती. त्यात विरोधाभास म्हणजे, काँग्रेसमधील अखंड चाललेल्या षड्यंत्रांचे साक्षीदार आणि बळी ठरल्यानंतरच पटेल या शहाणपणाच्या भूमिकेवर ठाम झाले होते. दुफळीतून निर्माण झालेल्या कडवटपणापुढे किंवा सर्व काही व्यापून टाकणाऱ्या वैयक्तिक हेव्यादाव्यांपुढे हात न टेकता, आल्या परिस्थितीला तोंड देत कार्यात्मक उतरंडीत वर वर जात राहण्याची कला त्यांनी सहज आत्मसात केली होती.
१९८४ सालच्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय प्राप्त केल्यानंतर राजीव गांधी यांनी संसदीय सचिवांच्या टीमला घेऊन अनेक प्रयोग केले. ही टीम म्हणजे अरुण सिंग, अहमद पटेल आणि ऑस्कर फर्नांडिस. राजकीय पटलावरील तरुणांचे आवाज नवीन पंतप्रधान कान देऊन ऐकत आहेत हे सांगण्याची ती एक पद्धत होती. ही टीम लवकरच राजीव गांधी यांचे “अमर, अकबर, अँथनी” म्हणून ओळखली जाऊ लागली.
राजीव गांधी यांना जुन्याजाणत्यांनी पुकारलेल्या बंडाला तोंड द्यावे लागले आणि हा प्रयोग कोसळून पडला. मात्र, पटेल यांच्या राजकीय व्यवस्थापनविषयक प्रेरणांनी राजीव गांधी यांचा विश्वास जिंकला होता. गुजरात काँग्रेसमध्ये महादेवसिंग सोळंकी, जिन्हाभाई दारजी, सनत मेहता, अमरसिंग चौधरी आणि प्रबोध रावल यांसारख्या ज्येष्ठांची मोठी फौज होती त्या काळात भडोचवासी अहमद पटेल यांची लवकरच गुजरात प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. या दिग्गजांनी पटेल यांची नियुक्ती खपवून घेतली पण त्यांना कधीच आदर दिला नाही. गुजरातमधील काँग्रेस नेत्यांतील गटबाजीची किती बेसुमार किंमत काँग्रेसला मोजावी लागली हे बघताना पटेल यांची त्रेधा उडाली. या लर्निंग कर्व्हची चढण नक्कीच दमछाक करणारी होती.
गुजरातमधील या पाशवी दुफळीने पटेल यांना स्वत:चे असे कार्यतत्त्वज्ञान घडवण्यास मात्र मदत केली. हे तत्त्वज्ञान म्हणजे काँग्रेसला दुबळ्या करण्याला प्रत्येक व्यक्तीला व प्रत्येक घटकाला दूर ठेवले पाहिजे. या तत्त्वाचे पालन त्यांनी अखेरपर्यंत केले.
बाबरी मशिदीच्या उद्ध्वस्तीकरणानंतर निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीत पटेल यांनी उत्तम काम केले. अर्जुन सिंग, नटवर सिंग, एम. एल. फोतेदार, शिवशंकर आणि शीला दीक्षित या काँग्रेस नेत्यांच्या समूहाने तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना पदच्युत करण्याची मागणी केली, तेव्हा पटेल यांची भूमिका ठाम होती. देशावर धार्मिक शक्तींचा हल्ला झालेला असताना काँग्रेसमधील गोंधळ निस्तरण्याची ही वेळच नव्हे अशी भूमिका पटेल यांनी घेतली. अर्जुन सिंग यांचा गट गांधी कुटुंबाचा हवाला देऊन दावे करत असताना, पटेल यांनी रावविरोधी गटात सहभागी होण्यास दिलेल्या नकारामुळे त्यांना पक्षात आणि पक्षापलीकडे नव्यानेच आदर प्राप्त झाला. शिवाय सोनिया गांधीही कधीच उघडपणे रावविरोधी कंपूत सहभागी होणार नाहीत याची काळजीही कदाचित पटेल यांनीच घेतली. अर्थात वेळ आली तेव्हा ‘२४, अकबर रोड‘मधून आधी राव व नंतर सीताराम केसरी यांचा गाशा गुंडाळण्यातही पटेल यांचीच भूमिका निर्णायक होती.
पटेल यांची स्वत:साठी कधीच काही महत्त्वाकांक्षा नव्हती म्हणूनच कदाचित त्यांना काँग्रेसमध्ये एवढे महत्त्व मिळाले असावे. अर्थात याबाबत दुमत असू शकेल. मात्र, प्रणव मुखर्जी यांच्यासारख्या नेत्यांची जशी स्वत:साठी महत्त्वाकांक्षा होती तशी पटेल यांची नव्हती. ते नेहमीच पडद्यामागून काम करत राहिले. राष्ट्रपती भवनाताली स्टेट बँक्वेटमध्ये किंवा हैदराबाद हाउसमधील भोजन समारंभात ते कधीच दिसले नाहीत. केंद्रीय कॅबिनेट्सच्या जुळवाजुळवीत त्यांचा मोठा सहभाग असला, तरी शपथविधी सोहळ्यांना उपस्थिती लावण्याचा मोह त्यांनी कधीच बाळगला नाही. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा रेस कोर्स रोडवर डिनरसाठी आले, तेव्हा निमंत्रितांमध्ये आपणही असावे अशी इच्छा त्यांनी कधीच ठेवली नाही.
जाणूनबुजून अंगी बाणवलेला मितभाषीपणा आणि वागणुकीतील सखोल दक्षता यांमुळे ते तर संबंधांचे विस्तृत जाळे कामाला लावण्यात सक्षम झालेच पण इतरांमध्येही त्यांच्याबद्दल तसा विश्वास निर्माण झाला. ते कोणासाठीही उपलब्ध होते. अगदी सामान्य माणसापासून ते उद्योजक, धार्मिक पंथांचे नेते आणि पक्ष कार्यकर्त्यांपर्यंत कोणीही त्यांना भेटू शकत होते. कारण, ते व्यक्तिगत स्तरावर कोणत्याही मोहाच्या पलीकडे होते. ते नेत्यांमध्ये आणि सर्व राजकीय पक्षांमध्ये संवाद साधण्यासाठी सर्वांत विश्वासार्ह, सर्वांत विश्वसनीय आणि प्रभावी ठरले ते त्यांच्या याच गुणामुळे. म्हणूनच ते पक्षाच्या आतील गोटातील अमूल्य सदस्य होते आणि यूपीएच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात राष्ट्रीय स्तरावरील सर्व प्रकरणे हाताळत होते.
सध्याच्या निराशावादी काळात माझा मुद्दा कदाचित विचित्र वाटेल पण लोकप्रिय संस्कृतीत रेखाटल्या जाणाऱ्या ‘कुरूप राजकारण्या’च्या प्रतिमेच्या अगदी उलट पटेल होते. ते अकबर रोडवर एखादा राजवाड्यासारखा बंगला सहज मागू शकले असते पण तरीही ३० वर्षे ते तुलनेने साध्या अशा २३ विलिंग्टन क्रिसेंटमध्ये (आताचे नाव मदर तेरेसा क्रिसेंट) राहिले. समृद्धी किंवा डामडौलाचा मोह त्यांना पडला नाही.
असे पटेल सोनिया गांधी यांचे परिपूर्ण ‘राजकीय सहकारी’ होणे अपरिहार्यच होते. सुरुवातीच्या सावध संबंधानंतर सोनिया यांनी त्यांच्या सुज्ञतेचे, सल्ल्याचे आणि चातुर्याचे मोल ओळखले. काँग्रेससारख्या जुन्या पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सोनिया यांनी सर्वाधिक काळ सांभाळली ती केवळ एकाच कारणामुळे- त्यांच्या बाजूला कायम पटेल होते. त्यांच्या हितावरही लक्ष ठेवून होते आणि काँग्रेससाठी सर्वोत्तम काय आहे हेही जाणून होते.
आणि जर काँग्रेसचा ऱ्हास अपरिहार्य असेल तर त्याचे कारण गांधींच्या तरुण पिढीने- राहुल आणि प्रियंका यांनी- पटेल यांचा आदर कधीच ठेवला नाही हे असेल. आता सोनिया यांचे वय झाले आहे, प्रकृतीही बरी नाही आणि काँग्रेसला दिशा देण्यासाठी पटेलही राहिले नाहीत. काँग्रेसच्या इतिहासातील एक प्रकरण अखेर संपुष्टात आले.
COMMENTS