प्रजासत्ताक दिनाला अयोध्येत मशिदीचे काम सुरू

प्रजासत्ताक दिनाला अयोध्येत मशिदीचे काम सुरू

अयोध्याः १९९२साली उध्वस्त केलेल्या बाबरी मशिदीच्या नव्या बांधकामाची सुरुवात येत्या प्रजासत्ताक दिनापासून केली जाणार आहे. प्रस्तावित मशिदीचा आराखडा येत्या उद्या, शनिवारी १९ डिसेंबरला प्रसिद्ध केला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मशीद बांधण्यास ५ एकर जमीन दिली आहे, तेथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बांधकामास सुरूवात केली जाईल असे इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनचे सचिव अथार हुसैन यांनी सांगितले. ही संस्था सुन्नी वक्फ बोर्डने ६ महिन्यांपूर्वी स्थापन केली होती. या संस्थेच्या माध्यमातून अयोध्येत मशीद बांधली जाणार आहे.

सात दशकांपूर्वी भारत या प्रजासत्ताकाचा पाया रचला गेला होता. बहुविविधता व बहुसांस्कृतिकता असा आपल्या प्रजासत्ताकाचा पाया आहे. या धर्तीवर मशीद बांधली जाईल, असे हुसैन यांनी सांगितले.

मशिदीची ब्लूप्रिंट तयार

नव्या बाबरी मशिदीच्या आवारात ३०० खाटांचे सुसज्ज मल्टी स्पेशॅलिटी हॉस्पिटल, कम्युनिटी किचन व ग्रंथालय असेल व या नवा वास्तूचा आराखडा प्रमुख रचनाकार प्रा. एस.एम. अख्तर यांनी मंजूर केल्याचे हुसैन यांनी सांगितले. या मशिदीत एकाच वेळी २ हजार मुस्लिम नमाजाला उपस्थित राहू शकतात. ही इमारत गोलाकार असेल. हिचा आकार पूर्वीच्या बाबरी मशिदीपेक्षा मोठा असेल पण त्याची रचना पूर्णतः भिन्न आहे. मशिदीवर इस्लामी प्रतीक व अक्षरलेखन असेल. या मशिदीच्या परिसरात हॉस्पिटल बांधण्यात येणार असून मानवतेची सेवा हा इस्लामचा संदेश यातून दिसावा, अशी ट्रस्टची इच्छा आहे, अशी माहिती अख्तर यांनी दिली.

नवी मशीद सौर ऊर्जेने परिपूर्ण असेल व मशिदीत सामान्य तापमान राहिल अशी सुविधा असेल. या मशिदीत येणार्या भाविकांसाठी कम्युनिटी किचन असेल व तेथे रोज दोन वेळचे अन्न मिळेल अशी व्यवस्था केली जाणार आहे. मशिदीच्या परिसरात नर्सिंग व पॅरामेडिक महाविद्यालयही सुरू करण्याचे ट्रस्टचे प्रयत्न असतील. नजीकच्या फैजाबादमधील डॉक्टरांकडून तेथे अध्यापन केले जाईल. या मशिदीच्या बांधकामासाठी कॉर्पोरेट फंडिंगचे प्रयत्न केले जातील. परदेशी मदतीचेही प्रयत्न केले जातील. सरकारकडे आम्ही तसे प्रस्ताव ठेवणार असल्याचे हुसैन यांनी सांगितले.

मूळ बातमी  

COMMENTS