जरंडेश्वरच्या ‘स्क्रिप्ट’मधून..

जरंडेश्वरच्या ‘स्क्रिप्ट’मधून..

महाराष्ट्र राज्य को-ऑप बँक घोटाळा प्रकरणात ईडीने मोठी कारवाई करत जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जागा, इमारत आणि इतर बांधकाम जप्त केले. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असून या सहकारी साखर करखान्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संबंध असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

नियमांची कडक अंमलबजावणी करावी – उपमुख्यमंत्री
फडणवीस-अजित पवार शपथविधीबाबत प्रसार भारती अंधारात
‘एमपीएससी’च्या सदस्यांची पदे ३१ जुलैपर्यंत भरणार

एखादे वक्तव्य खूपच सूचक असते. तीन दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या ईडी आणि सीबीआय चौकशीवर वक्तव्य केले होते. अर्थात त्या वक्तव्याची स्क्रिप्ट ही कुठे लिहिली गेली हे सांगायला नको. कारण त्याच सुमारास भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन गुफ्तगू केले होते, अशी चर्चा राजधानीत खमंग होती. शिखर बँकेचा तीर नेमका न बसल्याने यावेळी हा तीर साखर कारखान्याच्या पैसारुपी गाळपातून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी हे ठिकाण आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना.

या स्क्रिप्टनुसार महाराष्ट्र राज्य को-ऑप बँक घोटाळा प्रकरणात ईडीने मोठी कारवाई करत जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जागा, इमारत आणि इतर बांधकाम जप्त केले. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असून या सहकारी साखर करखान्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार  यांचा संबंध असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. याबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २२ ऑगस्ट २०१९ रोजी हा गुन्हा दाखल केला होता. त्याच प्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या १३(१)(ब), १३(१)(क) कलमही लावण्यात आली होतीत. याच गुन्ह्याच्या आधारावर ईडीने आपला गुन्हा दाखल केला करून तपास सुरू केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

आता थोडे या कारखान्याच्या पूर्व इतिहासात डोकावले तर हे लक्षात येते की हा कारखाना आधी शालिनीताई पाटील यांच्याकडे होता. शालिनीताई पाटील या दिवंगत काँग्रेस नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आहेत. शालिनीताई पाटील आणि अजित पवार यांचे वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे अजित पवार हे राज्य सहकारी बँकेचे संचालक असताना त्यांनी हा कारखाना अवसायानात काढला. ज्याचा लिलाव केला आणि अत्यंत कमी किंमतीत या कारखान्याचा लिलाव केला. सध्या हा कारखाना राजेंद्र कुमार घाडगे यांच्या ताब्यात आहे. राजेंद्र कुमार घाडगे हे अजित पवार यांचे सख्खे मामा आहेत हे या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या कारखान्यावर टाकलेली ही धाड आहे. राज्य सहकारी बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे ज्यातून त्यांना क्लीनचिट देण्यात आली असली तरीही अद्याप ईडीकडून क्लीनचीट मिळालेली नाही. त्याच बँकेत असलेले पैसे कारखान्याच्या कर्जासाठी ट्रान्सफर करा असा आग्रह शालिनीताई पाटील यांनी धरला होता. मात्र तो आग्रह मोडीत काढत कारखान्याचा लिलाव करण्यात आला आणि तो कारखाना राजेंद्र कुमार घाडगे यांनी घेतला. मात्र या सगळ्या प्रकरणात प्रचंड आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप शालिनीताईंनी केला होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी नि:पक्षपणे चौकशी केली नसल्याचा आरोप करत तक्रारदार शालिनीताई पाटील यांच्यासह इतर तीन जणांनी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्ट विरोधात विशेष न्यायालयात याचिका याआधीच दाखल केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार सध्याच्या मालकांनी हा कारखाना २०१०  सालात ६५ कोटी ७५ लाख रुपयांना खरेदी केला होता.

हा कारखाना सध्या मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस प्रा. लि. यांच्या मालकीचा आहे. एक वर्ष कारखाना बीव्हीजी कंपनीने चालवण्यास घेतला होता पण तोटा आल्याने त्यांनी त्यामधून अंग काढून घेतले. बीव्हीजीचे मालक हणमंतराव गायकवाड हे असून ते अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. आता हा कारखाना मेसर्स जरंडेश्वर शुगर मिल प्रा. लिमिटेडला भाड्याने देण्यात आला आहे. मेसर्स जरंडेश्वर प्रा. लिमिटेड कंपनीमध्ये मेसर्स स्पार्कलिंग सॉईल प्रा. लिमिटेड कंपनी ही भागीदार कंपनी आहे. ईडीने केलेल्या तपासात मेसर्स स्पार्कलिंग कंपनी ही अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची २०१० मध्ये विक्री करण्यात आली होती. त्या वेळी तो मूळ किमतीच्या कमी किंमतीत विकण्यात आला होता. त्याचप्रमाणे त्याची योग्य कार्यपद्धतीने पाळण्यात आली नव्हती. याच काळात अजित पवार हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर होते. याच काळात हा कारखाना मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस प्रा.लिमिटेडला विकण्यात आला. नंतर तात्काळ हा कारखाना जरंडेश्वर शुगर मिल प्रा. लि. ला भाडे तत्वावर देण्यात आला. जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. मध्ये मोठ्या प्रमाणात स्पार्कलिंग सोईल प्रा. लि. कंपनीचा हिस्सा आहे. ही कंपनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या मालकीची आहे, असा दावा करण्यात येत आहे.

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा प्रथम मेसर्स गुरू कमोडीटी प्रा ली कंपनीने विकत घेतला होता. मात्र, ही गुरू कमोडिटी कंपनी बनावट असल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. जरंडेश्वर शुगर मिल प्रा. लि.ने पुणे जिल्हा कॉ.ऑप बँकेकडून सुमारे ७०० कोटी रुपये कर्ज घेतले आहे. हे कर्ज २०१० पासून पुढील काळात घेतले आहे. राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर असताना जरंडेश्वर आणि कन्नड साखर कारखान्यांचा लिलाव अल्प दरात करण्याचा आणि ते आपल्याच नातेवाईकांनाच विकल्याचा आरोप अजित पवार यांच्यावर याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने दिलेले कर्ज थकीत केलेल्या साखर कारखान्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अत्यंत अल्प दरात या कारखान्यांची विक्री केली गेली आणि यातले काही कारखाने बँकेवर संचालकपदी असलेल्या नेत्यांच्या नातेवाईकांनी विकत घेतल्याचा आरोपही करण्यात येत आहे.

राज्य सहकारी बँकेच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ६९ जणांना क्लीन चीट देत विशेष न्यायालयात नुकताच क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. पण अजित पवारांवर आरोप झालेल्या काही मुद्यांवर पुन्हा एकदा चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती.

या सगळ्या आरोपांना अजित पवार यांनी उत्तरे दिली आहेत. ‘हा कारखाना माझ्या नातेवाईकांचा आहे. त्याच्याशी माझा संबंध नाही. माझ्या माहितीनुसार कायदेशीर प्रक्रियेनुसारच या कारखान्याची विक्री करण्यात आली आहे. कर्ज थकविणाऱ्या कारखान्यांच्या विक्रीचा निर्णय कोर्टाचा होता. संचालक मंडळाने हा कारखाना विकलेला नाही. कोर्टाने विक्रीला काढलेला कारखाना कोणी बळकावू शकते का?,’ असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी केला आहे.

‘जरंडेश्वर कारखाना खरेदीसाठी १२ ते १५ कंपन्याचे टेंडर आले होते. गुरू कमोडिटीनं सर्वात जास्त बोली लावली होती. हा कारखाना सर्वाधिक किंमतीला विकला गेला होता. या उलट राज्यातील इतर कारखाने खूप कमी किंमतीला विकले गेले आहेत. मराठवाड्यातील एका कारखान्याची क्षमता जरंडेश्वर कारखान्याइतकी असतानाही तो कारखाना अवघ्या चार कोटी रु.मध्ये विकला गेला. शिवाय, कारखाना विकत घेणारे सर्व पक्षांचे लोक आहेत. काही खासगी व्यक्तीही आहेत. त्यामुळे विक्रीमध्ये घोटाळा झाला असे कोणी म्हणत असेल तर तो घोटाळा नेमका काय आहे हे सांगावे,’ असे थेट आव्हान अजित पवारांनी दिले आहे.

राज्याच्या राजकारणात सहकार चळवळीचा कणा असलेल्या साखर कारखान्याच्या जप्तीच्या माध्यमातून सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला धक्का देण्याचा भाजपचा हा प्रयत्न असून त्याला कितपत यश येणार ही आगामी काही दिवसातच समजेल. तो पर्यंत हा तमाशा सुरूच राहणार आहे.

अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0