२०१९-२० जीडीपी ५ टक्केच, १० वर्षातला नीचांक

२०१९-२० जीडीपी ५ टक्केच, १० वर्षातला नीचांक

नवी दिल्ली : २०१९-२० या आर्थिक वर्षातला देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) ५ टक्क्याच्या आसपास असेल आणि हा पहिला अंदाज आहे, असे मंगळवारी केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केले. बरोबर १० वर्षांपूर्वी २००८-०९ या आर्थिक वर्षांत भारताचा जीडीपी ५ टक्केच होता. याचा अर्थ भारताची अर्थव्यवस्था २००८-०९वेळी ज्या वेगाने विस्तारत होती तोच वेग १० वर्षांनी परत आला आहे.

हे सकल राष्ट्रीय उत्पन्न खासगी क्षेत्रातील खालावलेली गुंतवणूक व कमी असलेली मागणी यामुळे ५ टक्क्यांपर्यंत आले आहे हे स्पष्ट करणारे आहे.

रिझर्व्ह बँकेने २०१९-२०मध्ये जीडीपी ६.१ टक्क्यांपर्यंत जाईल असे भाकीत केले होते पण नंतर त्यांनी हा आकडा ५ टक्क्यांपर्यंत आणला होता.

पण केंद्रीय सांख्यिकी खात्याने वर्तवलेले असे अंदाज बदलूही शकतात. गेल्या १० वर्षांतल्या देशाच्या एकूण जीडीपीच्या अंदाजावर व प्रत्यक्षातल्या टक्केवारीवर नजर टाकल्यास चित्र स्पष्ट होईल.

आर्थिक वर्ष अंदाजित टक्केवारी प्रत्यक्ष टक्केवारी
२०११-१२ ६.९ ६.५
२०१२-१३ ५.० ५.०
२०१३-१४ ४.९ ४.७
२०१४-१५ ७.४ ७.३
२०१५-१६ ७.६ ७.६
२०१६-१७ ७.१ ७.१
२०१७-१८ ६.१ ६.६
२०१८-१९ ७.२ ६.८
२०१९-२० ?

 

जीडीपीमध्ये देशांतर्गत उत्पादन आणि सेवा यांचा विचार केला जातो. कृषी, उद्योग, सेवा या तीनही क्षेत्रातील उत्पादनाच्या घट अथवा वाढीच्या सरासरीवर जीडीपीचा दर ठरतो. जीडीपीचा संबंध आर्थिक विकासाशी लावला जातो. जीडीपी वाढल्याचा अर्थ आर्थिक विकासदर वाढला. घटल्यास आर्थिक परिस्थिती खालावली, असे समजले जाते.

सध्या देशाला आर्थिक मंदीने ग्रासल्याने वित्तीय तूटीचा सामना सरकारला करावा लागत आहे. गेल्या आठवड्यात सरकारने आगामी अर्थसंकल्पात दोन लाख कोटी रु.चा खर्च कमी करणार असल्याचे सांगितले होते.

मूळ बातमी

COMMENTS