सरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव

सरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव

सरसंघचालक मोहन भागवत ज्यांचा उल्लेख करतात ती झुंडबळी देशात २०१४ सालापासून सुरू झाली. याचबरोबर मुस्लिम समाजाबद्दल द्वेषभावना व्यक्त करणारी जाहीर विधानेदेखील येऊ लागली. पण संघाने कधीही या गोष्टींचा धिक्कार करणे तर सोडाच पण साधी नापसंतीदेखील केलेली दिसत नाही.

नुपूर शर्मा, नवीन जिंदालमुळे परराष्ट्र खाते अडचणीत
प्रेषित पैगंबरांवर टिप्पण्णीः भाजपच्या आमदाराला अटक
मला चीड आली आहे – नसिरुद्दीन शाह

सरसंघचालक मोहन भागवतांनी काही दिवसांपूर्वी म्हटले की, जमाव हत्येचे समर्थन करणारे आणि मुस्लिमांना देश सोडून जायला सांगणारे हिंदू असू शकत नाहीत. असे करणे हिंदुत्वाच्या व्याख्येत बसू शकत नाही.

भागवतांचे हे विधान आश्वासक मानायचे का? त्याबद्दल आनंद, समाधान व्यक्त करायचे का? पण असे करण्यामध्ये अनेक अस्वस्थ करणाऱ्या सत्यांचा अडथळा आहे.

भागवत ज्यांचा उल्लेख करतात ते झुंडबळी देशात २०१४ सालापासून सुरू झाले. याचबरोबर मुस्लिम समाजाबद्दल द्वेषभावना व्यक्त करणारी जाहीर विधानेदेखील येऊ लागली. पण संघाने कधीही या गोष्टींचा धिक्कार करणे तर सोडाच पण साधी नापसंतीदेखील केलेली दिसत नाही.

हिंदू आणि मुस्लिम समाजाचे एकमेकांशी असलेले नाते खूप गुंतागुंतीचे राहिले आहे. या नात्यात सांस्कृतिक मिलाफाची जशी सुंदर उदाहरणे आहेत तशीच ताणाची आणि संघर्षाची आहेत. टोकाचे पूर्वग्रह आहेत. पण २०१४ साली सत्तांतर झाल्यानंतर या सर्व पूर्वग्रहांचे अत्यंत असभ्य प्रकटीकरण करण्यात काहीच चुकीचे नाही असा संदेश संघ भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांनी दिला आणि मग सभ्यतेचे, नैतिकतेचे सर्व निर्बंध ओलांडले गेले. मानसिक हिंसेच्या या लाटेनंतर शारीरिक हिंसा अपरिहार्य होती.

जेव्हा एका केंद्रीय मंत्र्याने जमाव हत्याप्रकरणी दोषी ठरलेल्या एका माणसाचा सत्कार केला आणि आपले पंतप्रधान त्यावर शांत राहिले तेव्हा संघाने कोणतीही नापसंती व्यक्त केली नाही. पहिल्या जमावहत्येनंतर दुसऱ्या एका केंद्रीय मंत्र्याने केलेल्या अत्यंत असभ्य विधानाबद्दलदेखील संघाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. कोणत्या तरी हिंदू धर्मग्रंथाचा संदर्भ देऊन जेव्हा गोहत्या करणाऱ्याला ठार करणे कसे समर्थनीय आहे असे संघाच्या मुखपत्रातून, ‘ऑर्गनायझर’मधून लिहिले गेले, तेव्हादेखील संघाने काही प्रतिक्रिया नाही दिली. सोशल मीडियावर अत्यंत असभ्य लेखन करणाऱ्या व्यक्तींना पंतप्रधानाचे ट्विटर अकौंट ‘फॉलो’ करते हेदेखील भागवतांना कधी आक्षेपार्ह वाटलेले नाही. त्यामुळे दुर्दैवाने असाच निष्कर्ष काढावा लागतो की भागवतांचे हे विधान ही केवळ रणनीती आहे. संघाची प्रतिमा फार डागाळू  नये म्हणून ‘हे बघा तेव्हा आम्ही असे म्हटले होते’, असे सांगण्यासाठीची रणनीती. यात मुस्लिमद्वेष थांबावा अशी प्रामाणिक इच्छा अजिबातच नाही.

पण हे सरसंघचालक किंवा इतर संघ-भाजपा नेत्यांबद्दल. ज्या लाखो, कदाचित (कोटी) लोकांचे मोहन भागवत प्रतिनिधित्व करतात त्या लोकांची जमाव हत्या (झुंडबळी) आणि मुस्लिमद्वेष या भागवतांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबद्दल काय भूमिका असते याचा विचार करू.

संघाच्या शाखा जरी पूर्वीसारख्या लोकप्रिय राहिल्या नसल्या तरी संघाच्या कार्याकडे हजारो लोक आकर्षित होत असतात. अनेक जण आपल्या आयुष्याचा मोठा काळ संघकार्यासाठी देतात. काही जण ईशान्य भारतात जाऊन कार्य करतात. ही सगळी कार्ये ज्यांना सेवा म्हणता येईल अशा स्वरूपाची असतात. इतर विचारसरणीच्या कार्यकर्त्यांप्रमाणेच संघाच्या कार्यकर्त्यांनादेखील त्यांच्या कार्यामुळे उन्नत, अर्थपूर्ण जीवन जगल्याचे समाधान अर्थातच मिळत असणार. हे असे संघाचे कार्यकर्ते आणि संघ विचाराचे समर्थक यांना भागवतांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबद्दल काय वाटते? या लोकांशी प्रत्यक्ष संवाद साधला तर असे लक्षात येईल यापैकी बहुतेकजण हिंसेचे समर्थन करणार नाहीत. झुंडबळी त्यांना आक्षेपार्ह वाटतील. अनेकजण संघ -भाजपातील नेते अनेकदा जी कम्युनल विधाने करतात त्याबद्दल नापसंती व्यक्त करतील. पण हे सर्व प्रत्यक्ष समोरासमोर होणाऱ्या चर्चेत. पण यापैकी कोणीही कधीही अशा हिंसक घटनांचा, त्या घटनांच्या समर्थनार्थ होणाऱ्या विषारी विधानांचा जाहीर निषेध कधीही करताना दिसणार नाहीत. संगणक युगात जाहीर निषेध करण्याची संधी आता सर्वानाच आहे. कारण या लाखो संघ कार्यकर्त्यांपैकी किंवा समर्थकांपैकी अनेकजण सोशल मीडियावर असतात. पण कोणीही कधीही अशा हिंसक घटनांचा, विधानांचा निषेध करताना दिसत नाहीत. एखादा दुसरा तुरळक अपवाद असू शकतो. ही या लाखो जणांची शांतता भयसूचक आहे.

समोरासमोर बोलताना अशा घटनांबद्दल नापसंती व्यक्त करणारे मग अशा घटनांचा जाहीर निषेध का नाही करत? याचे उत्तर त्यांच्या राजकीय विचारसरणीमध्ये आहे. संघाची सांस्कृतिक राष्ट्रवादाची विचारसरणी त्यांना अशा घटनांचा जाहीर निषेध करण्याची अनुमती देत नाहीत. एकदा का धर्म किंवा संस्कृती हा राष्ट्रवादाचा आधार मानला की आपल्यापेक्षा अन्यधर्मिय किंवा वेगळ्या संस्कृतीच्या लोकांनादेखील आपल्या इतकीच समान प्रतिष्ठा असते हे मूल्य स्वीकारणे हे अशक्यच बनते. जगात ज्या ज्या देशांनी धर्म आणि संस्कृती यांच्या आधारावर देश उभा करण्याचे ठरवले त्या त्या सर्व देशात असेच घडताना दिसते. सौदी अरेबिया, पाकिस्तान, ज्यूंचा इस्त्रायल, नाझी राजवटीखालील जर्मनी ही याची काही उदाहरणे.

अनेक धर्म, अनेक संस्कृती एकत्र नांदत असलेले राष्ट्र ही कल्पनाच सांस्कृतिक राष्ट्रवादात बसत नाही. भारताने असे सांस्कृतिक, धार्मिक, भाषिक वैविध्य असलेला देश बनायचे स्वप्न पहिले होते जिथे सर्व धर्माच्या लोकांना समान प्रतिष्ठा असेल. हा एक धाडसी प्रयोग होता. एक अनोखे स्वप्न होते. आणि आता त्या स्वप्नाला मोठा तडा गेला आहे.

संघाची निर्मितीच मुळात हिंदू संस्कृतीच्या आणि फक्त हिंदू संस्कृतीच्या आधारावर राष्ट्र निर्माण करण्याच्या उद्देशाने झाली आहे. आणि हेच संघाचे ‘अपील’ आहे.

त्यामुळे देशभरच्या लाखो संघ समर्थकांचे सद्सद्विवेकबुद्धी जमाव हत्यांच्या घटनांमुळे हलत नाही. अशा घटनांमुळे विचलित होणे हे संघाच्या विचारसरणीत बसत नाही. आणि मध्ययुगात ‘बाहेरून’ आलेल्या लोकांनी केलेल्या हिंसेपुढे या हिंसा तर किरकोळ आहेत अशी भावना असतेच. ही मानसिकता घटनेतील मूल्यांशी सुसंगत नाही याची त्यांना पर्वा नसते.

थोडक्यात मोहन भागवतांच्या विधानांना किती गांभीर्याने घायचे हे त्यांना माहीत असते.

आपल्या देशाचे हे मोठे दुर्दैव आहे की, भारतीय राजकारणावर सर्वात मोठा प्रभाव गाजवणारा एक मोठा पक्ष, त्याची बलाढ्य मातृसंस्था किमान सभ्यतेच्या आणि मानवी प्रतिष्ठेच्या मूल्यांचा निःसंदिग्धपणे उद्घोष करू शकत नाहीत. संघाचे इतर क्षेत्रातील कितीही मोठे सेवाकार्य या दुर्दैवाची भरपाई करू शकत नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0