प्रतिमेला गोळ्या घालाल, विचारांचे काय?

प्रतिमेला गोळ्या घालाल, विचारांचे काय?

३० जानेवारी २०१९ला, बरोब्बर सत्तर वर्षांनी अलिगढ मध्ये हिंदू महासभेच्या सदस्यांनी गांधीजींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडून गांधीहत्येचा तो प्रसंग पुन्हा रंगवण्याचा विकृत प्रयत्न केला.

बिर्ला हाउसच्या मैदानावर ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधींच्या दिशेने नथुराम गोडसे चालत गेला आणि त्याने गांधीजींवर पिस्तुल रोखून तीन गोळ्या झाडल्या. देवाचे नाव घेत तो नि:शस्त्र वृद्ध माणूस मेला. ३० जानेवारी २०१९ला, बरोब्बर सत्तर वर्षांनी अलिगढ मध्ये हिंदू महासभेच्या सदस्यांनी गांधीजींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडून गांधीहत्येचा तो प्रसंग पुन्हा रंगवण्याचा विकृत प्रयत्न केला. इतकच नाही तर प्रतिमेतून खोट्या रक्ताच्या चिळकांड्या उडाव्यात यासाठी पूर्वतयारीही करण्यात आली होती.
या अत्यंत विकृत आणि भयंकर कृत्याचा देशभरातून निषेध करण्यात आला. हा गलिच्छ प्रकार करणाऱ्या महासभेच्या नेत्या पूजा शकून पांडे यांच्यासह १३ जणांच्या विरोधात पोलिसात तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. शांतताप्रिय लोकांना ही रक्तपिपासू वृत्ती आणि हिंसेचे खुले समर्थन बघून किळस आली. मेलेल्या माणसाला पुन्हा कशाला मारायचे या प्रश्ना बरोबरच पुढील काही प्रश्न मनात येतात.
‘सर्वसामान्य भारतीय माणसाच्या तनामनात गांधीजी अजूनही जिवंत आहेत हे हिंदुत्ववादी शक्तींना कुठेतरी आत खोलवर ठाऊक आहे, म्हणूनच त्यांनी गांधीजींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडल्या का? द्वेष पसरवण्याचा आणि सांप्रदायिकतेचा कर्कश्य कलकलाट सामन्य माणसांच्या कानावर पडावा यासाठी त्यांनी कितीही प्रयत्न केले, तरीही गांधीजींचा करुणा आणि अहिंसेचा संदेश सामान्य माणसांच्या हृदयात शिल्लक आहे म्हणून हे वागणे आहे का? इतक्या सगळ्या प्रयत्नांचा काहीही परिणाम होत नाही म्हटल्यावर ते घाबरून गेले आहेत का, ज्यामुळे त्यांना गांधीजींविषयी वाटणारा द्वेष निराळ्या पातळीवर गेला आहे?’
सद्यस्थितीत ज्यांना हिंदुत्वाचे शत्रू मानले जाते त्यांच्यावर हल्ले चढवण्याची खुली संमती आहे. उदाहरणार्थ, गेल्या काही दशकांपासूनच्या धुमसत्या मुस्लीम द्वेषाला संमती मिळत आहे. या द्वेषाच्या ज्वाळांनी अनेकांचे जीव घेतले आहेत. कितीतरी जणांची नावे सांगता येतील. दादरी मध्ये मोहम्मद अखलाखला निव्वळ गोमांस बाळगल्याच्या संशयावरून मरेस्तोवर मारण्यात आले, अलवार मधील पेहलू खान याला जमावाने ठेवून मारले, निव्वळ मुसलमान आहे म्हणून जुनेद नावाच्या तरुणाला भर रेल्वेत इतके भोसकण्यात आले की त्यात जुनेदचा मृत्यू झाला. मोहम्मद अफ्राझून ज्यांच्यावर शुम्भूलाल रेगर याने आधी प्रचंड वार केले आणि मग त्यांना जाळून टाकले.
हे सगळे इथेच थांबले नाही. खुन्यांना पाठीशी घालून या बळी पडलेल्या माणसांच्या कुटुंबियांना मात्र पोलीस चौकशीला सामोरे जावे लागले. या वाढत्या द्वेषाच्या लाटेविषयी ज्या पत्रकारांनी, कार्यकर्त्यांनी आणि सेवाभावी संस्थांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला त्यांचाही निरनिराळ्या पद्धतीने छळ झाला. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली. इतकच नाही काही जणांच्या वाट्याला तुरुंगवासही आला.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि बीजेपी नेते शिवराज सिंह चौहान यांच्या समवेत पांडे: फाईल फोटो

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि बीजेपी नेते शिवराज सिंह चौहान यांच्या समवेत पांडे: फाईल फोटो

स्वातंत्र्यापूर्वी पासून असलेला हिंदुत्वाचा अजेंडा १९९२ मध्ये बाबरी मश्जीद तोडण्याच्या निमित्ताने पुढे रेटला गेला.  आणि २०१४ला ‘हिंदू हृदय सम्राटा’च्या राज्याभिषेकानंतर तर या हिंदुत्वाचा जणू सुवर्ण(की भगवा)काळच सुरु झाला आहे.
हा हिंदुत्वाच्या ऐन बहराचा आणि अत्यंत भरभराटीला काळ आहे. आरएसएस सर्वोच्च बनले आहे. गांधीजींचे अस्तित्व, चष्मा आणि झाडू पुरते मर्यादित करण्याचे अधिकृत प्रयत्न सुरु आहेत. असे असताना मग मेलेल्या आणि सर्वार्थाने राजकारणातून बाहेर पडलेल्या या माणसाबद्दल इतका द्वेष का?
हे सारे द्वेषासारखे दिसत असले तरी प्रत्यक्षात ‘गांधी अजून असण्याची’  भीती आहे का?
वर्तणूक मानसोपचारतज्ञ तुम्हाला सांगतील की द्वेष आणि भीती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संध्याकाळ पाठोपाठ रात्र घेऊन येते, त्याचप्रमाणे द्वेष आणि भीती एकमेकांचा सतत पाठलाग करत असतात. महात्माजींचा आत्मा आजही या देशातल्या गल्लीबोळातून फिरत असतो का? आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की सत्य आणि अहिंसा या दोन शस्त्रांनी गांधीजींनी त्यांचे युद्ध लढले. गेल्या पाच वर्षात जेव्हा केव्हा हिंदुत्ववादी संघटना आणि नेत्यांना गांधीजींच्या या दोन प्रबळ शस्त्रांचा सामना करावा लागला आहे, त्या संघर्षात त्यांना गांधीजींचा आत्मा दिसला असण्याची शक्यता आहे का?

  • ज्यावेळी मार्च २०१८ मध्ये पन्नास हजार शेतकरी स्वतःच्या हक्कांसाठी मुंबईच्या दिशेने निघाले होते तेव्हा दुसऱ्या दिवशी बोर्डाच्या परीक्षा असल्याने मुलांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी त्यांनी रात्रीचा प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. त्या हजारो शेतकऱ्यांच्या रूपाने गांधीजीच तर भेटले नाहीत ना यांना?
  • ज्यावेळी ईदच्या निमित्ताने खरेदी करून घरी परतत असलेल्या जुनेदला निव्वळ मुसलमान आहे म्हणून मारले गेले, त्या घटनेच्या निषेधार्थ जेव्हा हजारोंच्या संख्येने भारतीय “नॉट इन माय नेम” म्हणत रस्त्यावर उतरले होते, तेव्हाही आरएसएस आणि इतर धर्मांध संस्थांना गांधीजींचा आभास झाला असेल का?
  • रोहिथ वेमुला आत्महत्या करीत असताना आणि जेव्हा नजीब जेएनयूमधून गायब झाला तेव्हाही हिंदुत्वाच्या अनुयायांनी गांधींना रडताना पाहिले असेल का?
  • अंकित सक्सेनाचा खून झाला तेव्हा त्याच्या वडिलांनी, यशपाल सक्सेनांनी, त्या प्रकरणाला सांप्रदायिक रंग येऊ दिला नाही. तेव्हा या हिंदुत्ववादी अनुयायींना गांधीजींच्या हृदयाचे ठोके जाणवले असतील का?

लेखक आणि कार्यकर्ते हर्ष मंदेर याविषयी लिहितात, “यशपाल सक्सेनांच्या मुलाचा त्याच्या मुस्लिम प्रेयसीच्या कुटुंबाने खून केला, तेव्हा त्यांनी झालेल्या घटनेबद्दल संपूर्ण मुस्लीम समुदायाला दोषी धरत त्यांच्याबद्दल वाईट विचार केला नाही. इतिहासात वा आत्ताही दिसून येते तसे, समुदायातील एखाद्या सदस्याकडून घडलेल्या, कथित वा खर्‍या  गुन्ह्याचा दोष संपूर्ण समुदायावर थोपला जातो ज्याला मी ‘दुसऱ्याच्या अपराधासाठी तिसर्‍याला दोषी  धरणे’ म्हणतो, ते यशपाल सक्सेना यांनी नाकारले.” हेच तर महात्माने शिकवले.
जेव्हा केव्हा हिंदुत्ववादी संघटनांना ‘गांधीगिरी’ला सामोरे जावे लागते तेव्हा तेव्हा द्वेष पसरवण्याचा त्यांचा सांप्रदायिक कार्यक्रम अपयशी ठरतो का? हिंदूमहासभा गांधीजींच्या प्रतिमेला किती का गोळ्या घालेनात, गांधीजींच्या शब्दांशी त्यांना लढता येणार नाही. “जेव्हा मी निराश होतो तेव्हा इतिहास मला दाखवून देतो की सत्य आणि प्रेम यांचाच मार्ग नेहमी विजयी झाला आहे. जुलूम करणारे, खुनी लोक असतातच; काही काळासाठी ते अजेय वाटू शकतात, परंतु शेवटी ते नेहमीच कोसळतात. याचा कायम विचार करा!”

रोहित कुमार, शाळेत समवयीन विद्यार्थ्यांमधील गुंडगिरी कमी व्हावी यासाठी किशोरवयीन मुलांबरोबर काम करतात.

मूळ इंग्रजी लेख

अनुवाद: पी. कमला 

COMMENTS