नवी दिल्ली : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालानुसार २०१८मध्ये देशभरात १०,३४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून महाराष्ट्रात ही आकडेवार
नवी दिल्ली : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालानुसार २०१८मध्ये देशभरात १०,३४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून महाराष्ट्रात ही आकडेवारी सर्वाधिक म्हणजे ३,७०१ एवढी आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागील कारणे कर्ज, दुष्काळ ही आहेत पण शेतकऱ्यांचे प्रश्न योग्यरित्या न सोडवल्याने हे प्रमाण कमी झालेले नाही असाही यातून निष्कर्ष काढता येतो.
त्याचबरोबर एनसीआरबीच्या अहवालात देशातल्या सर्वाधिक आत्महत्याही महाराष्ट्रात १७,९७२ इतक्या झाल्याची नोंद आहे.
शेतीच्या संदर्भात या अगोदर महाराष्ट्रात २०१७मध्ये ३,७०१, २०१६मध्ये ३,६६१, २०१५मध्ये ४,२९१, २०१४मध्ये ४,००४ इतक्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद झालेली आहे. ही पार्श्वभूमी पाहता सद्यपरिस्थिती अधिक चिंताजनक असल्याचे एनसीआरबीच्या अहवालानुसार लक्षात येते.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारीत महाराष्ट्रानंतर कर्नाटक (२१६०), मध्यप्रदेश (९५५), तेलंगण (८५१), आंध्र प्रदेश (८१६) व छत्तीसगडमध्ये (५०२) अशा राज्यांची अनुक्रमे नावे येतात.
एनसीआरबीच्या अहवालात नमूद करण्यात आलेल्या १०,३४९ आत्महत्यांमध्ये शेतकऱ्यांची संख्या ५,७६३ त्यात पुरुषांची संख्या ५,४५७ तर महिला ३०६ असून शेतात मजुरी करणाऱ्यांची संख्या ४,५८६ इतकी आहे. त्यात पुरुषांची संख्या ४,०७१ व महिलांची संख्या ५१५ इतकी आहे.
एनसीआरबीच्या अहवालात प. बंगाल, बिहार, ओदिशा, उत्तराखंड, मेघालय, गोवा, चंदिगड, दमन व दीव, दिल्ली, लक्षद्विप व पुद्दूचेरीमध्ये एकाही शेतकऱ्याच्या आत्महत्येची नोंद नाही.
देशात एकूण आत्महत्यांची संख्या १,३४,५१६ त्यातही महाराष्ट्र आघाडीवर
या अहवालात देशातल्या एकूण आत्महत्यांची आकडेवारी १,३४,५१६ इतकी देण्यात आली आहे. (या आकडेवारीशी तुलना करता शेतकऱ्यांच्या आत्महत्या सात टक्के इतक्या होतात.) त्यात देशातल्या सर्वाधिक आत्महत्याही महाराष्ट्रात १७,९७२ (यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा समावेश आहे) इतक्या झाल्याची नोंद आहे. महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू (१३,८९६), प. बंगाल (१३,२५५), मध्य प्रदेश (११,७७५), कर्नाटक (११,५६१) राज्यात इतक्या आत्महत्यांची नोंद आहे.
देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी १६.९ टक्के लोकसंख्या असलेल्या उ. प्रदेशात आत्महत्येचे प्रमाण केवळ ३.६ टक्के असून केंद्रशासित प्रदेशांच्या यादीत दिल्लीत सर्वाधिक २,५२६ आत्महत्या व पुद्दूचेरीत ५०० आत्महत्यांची नोंद झालेली आहे.
मूळ बातमी
COMMENTS