गतवैभव या शब्दाचा अर्थ मोदींना आणि त्यांना दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसविणाऱ्या त्यांच्या पाठीराख्यांना काय अपेक्षित आहे, यावर मंथन झाले पाहिजे.
देशाला गतवैभव मिळवून देण्याचे वचन नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये शनिवारी दिले. त्याआधी शुक्रवारी दिल्लीत संसदीय पक्षाच्या बैठकीतील भाषणात त्यांनी अल्पसंख्यांकांना विश्वास वाटेल अशी पावले उचलू, असे म्हटले होते. सबका साथ, सबका विकास या घोषणेला त्यांनी सबका विश्वास या शब्दांची जोड दिली. ज्यांनी आम्हाला मते दिली नाहीत, तेही आमच्यासाठी तेवढेच महत्वाचे आहेत, असे ते म्हणाले. लोकांशी सौजन्याने वागा वगैरे बरेच काही त्यांनी निवडून आलेल्या एनडीएच्या प्रतिनिधींना सांगितले.
एवढ्या प्रचंड मताधिक्याने आणि संख्येने निवडून आल्यावर, जबाबदारीचे नवे भान आले असेल आणि त्यामुळे पक्षीय भूमिकेच्या पुढे जाऊन, आजवरच्या संकुचित वैचारिक चौकटीला रजा देण्याची भारतीय जनता पक्षाची आणि त्याच्या नेत्यांची मानसिकता तयार झाली असेल तर उत्तमच आहे. परंतु गतवैभव या शब्दाचा अर्थ मोदींना काय अभिप्रेत आहे आणि त्यांना दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसविणाऱ्या त्यांच्या पाठीराख्यांना काय अपेक्षित आहे, यावरही मंथन झाले पाहिजे.
देश महान झाला पाहिजे, अवघ्या जगाने आपल्या देशाकडे आशेने पाहिले पाहिजे, जगात भारताचा मान-सन्मान वाढला पाहिजे याबद्दल दुमत असण्याचे काही कारणच नाही. परंतु गौरवशाली गतकाळाकडे जाताना, आपण गतकाळात जे टाकून दिले ते सगळेच पुन्हा उचलून डोक्यावर घेणार की काय? जे टाकून दिले ते सगळेच महान नव्हते, जे गमावले ते सगळेच आवश्यक नव्हते याचा विचार न करता सररसकट सगळेच परत आणणार की काय?
अजून सरकारने सूत्रे हाती घेतलीही नाहीत तर तुमच्यातला शंकासूर जागा झाला असा प्रश्न एखाद्याच्या मनात येऊ शकतो. परंतु शंकासुराला जागे करणा-यांनी २३ तारखेच्या विजयानंतर ज्या पद्धतीने आपला आनंद, आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या त्या पाहिल्या की या शंकेचे कारण कळेल. स्वतःच्या नावाआधी चौकीदार हा शब्द लावून, मोदींच्या काँग्रेसविरोधाला धार मिळवून देणारे अनेक पाठीराखे गेल्या दोन महिन्यात ट्विटरवर जन्माला आले आहेत. त्यापैकी तिघांची व्टिट्स ‘बोलकी’ आहेत, जी वाऱ्याच्या वेगाने गेले चार-पाच दिवस सगळीकडे पसरवली गेली.
या तीन पैकी पहिले ट्विट होते ते हिंदी चित्रपट सृष्टीतील आजचा आघाडीचा आणि प्रयोगशील दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्या मुलीला उद्देशून एका स्वघोषित चौकीदाराने लिहिलेले. त्यात त्याने या मुलीला म्हटले होते की ‘तू तुझ्या बापाला जरा समजावून सांग, तो काय वाट्टेल ते लिहित असतो. आणि तू जर हे केले नाहीस तर मग तुझ्याशी असा संभोग करीन जसा कुणी कधीच केला नसेल.’ पुढे त्याने तिला रंडी वगैरे शिवी घातली आहे. हे सर्व लिहिण्याआधी तो श्रीरामाचे नाव घ्यायलाही विसरला नाही. तर अशा पुरुषांची संख्या खूप मोठी आहे, ज्यांना सेक्स हे शिक्षा देण्याचं, धडा शिकवण्याचं साधन वाटतं. गेली अनेक शतके स्त्रीवर ज्या भूमिकेतून सत्ता गाजवली जात आहे, ती वृत्ती अधिक योग्य होती, तिनं शिक्षण घेऊ नये, समाजात पुढे पुढे करू नये असं त्यांना वाटतं. त्यांच्यासाठी देशाला गतवैभव मिळवून देण्याचा अर्थ या प्रतिगामी धारणांना पुन्हा समाजमान्यता मिळावी, असाच असू शकतो.
या पाठोपाठ दुसऱ्याच दिवशी पायल रोहतगी या भाजप समर्थक अभिनेत्रीनेही ट्विट केले. त्यात तिने सतीप्रथा बंद व्हावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या राजा राममोहन राय यांना ब्रिटिश धार्जिणे ठरवले आहे. ती पुढे म्हणते, ‘ब्रिटिशांनी सतीप्रथेला बदनाम करण्यासाठी राय यांचा वापर करून घेतला. सती जाण्याची प्रथा ही काही बळजबरी नव्हती. हिंदू विधवांना वेश्याव्यवसायाकडे ढकलण्याचे मुगल आक्रमकांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी उचललेले ते पाऊल होते आणि स्त्रिया स्वखुशीनेच सती जात होत्या.’ पायलबाईंची चित्रपटांतील प्रतिमा काय होती किंवा अभिनेत्री म्हणून त्यांची काय कुवत होती, हे आपण बाजूला ठेवू. परंतु एक स्त्री जेव्हा अशा प्रकारे मत व्यक्त करते तेंव्हा स्त्रीला समजून घेण्याची तिची क्षमता किती आणि मानसिकता काय असावी असा प्रश्न पडतो. देशाला गतवैभव मिळवून देण्यासाठी ऐच्छिक पातळीवर सतीप्रथा पुन्हा सुरु करावी, असेही उद्या ती म्हणू शकते. कारण आता मुगल आक्रमक जरी नसले तरी एखादी स्त्री ‘भरकटण्याची’ शक्यता तर कायमच असते.
तिसरे ट्विट आहे, अवनीश मणी त्रिपाठी नामक विचारवंताचे! हे महाशयसुध्दा स्वतःच्या नावाआधी चौकीदार असा शब्द (अर्थात गर्वाने, म्हणजे आपल्या मराठीत अभिमानाने) लिहायला विसरत नाहीत. तर, कुणाला तरी उद्देशून लिहिलेल्या ट्विटमध्ये ते म्हणतात की ‘आमच्या गावात तर अस्पृश्यांच्या मुलींचा प्रथम भोग नेहमी पंडित आणि ठाकुरच घेत असतात. त्यांना विरोध करण्याची कोणाचीही पात्रता (हिंमत?) नाही.’
देशाला गतवैभवाकडे घेऊन जाण्याची यांची कल्पनाही आधीच्या दोघांच्या वैचारिक पठडीतच बसणारी आहे. स्त्री ही या तिघांच्याही वैचारिक मागासलेपणाचा, रोषाचा एक समान धागा आहे, हे विसरुन चालणार नाही. प्रतिगामी विचाराच्या लोकांना, पुरुषांच्या श्रेष्ठत्वाची भांग पिऊन समाजात वावरणा-यांना स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सात दशकात स्त्रीने घेतलेली भरारी, साधलेली बरोबरी पाहावत नाही. त्यांना अजूनही लैंगिकता, पावित्र्य यांची पडलेली गाठ सोडवत नाही. सूड घेण्याचा सर्वोत्तम मार्ग त्यांना स्त्रीशी बळजबरी, संभोग करण्यातच दिसतो. हे सगळे उघडपणे बोलण्याचे बळ त्यांना आताच का आले, याचा विचार केला पाहिजे.
वर दिलेली तीन उदाहरणे अजिबात प्रातिनिधिक नाहीत. ती अपवादच असतील. परंतु विजयाच्या उन्मादात पुढे आलेला हा विकृत चेहरा पाहून भाजपच्या पाठीराख्यांना चीड आली, त्यांनी यांचा निषेध केला असेही दिसले नाही. त्यांच्यावर काही कायदेशीर कारवाई झाली, चौकशीचे आदेश दिले गेले असेही काही झाले नाही. या तीन व्यक्ती क्षुल्लक असतील, खरे तर आहेतच. परंतु अशा क्षुल्लक अस्तित्व असलेल्यांचाही भाजपच्या मोठ्या विजयाला हातभार लागलेला आहे. त्यापैकी केवळ काहींनी उघडपणे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, असे म्हणायला जागा आहे.
अनकेदा भारताच्या गतवैभवाविषयी लिहिलं जाताना, ‘ एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता आणि काठीला सोने बांधून निर्धास्तपणे कुठेही जाता येत असे’, असे म्हटले जाते. तर, सोन्याचा धूर निघावाच, जगणेही सुरक्षित व्हावे, परंतु काळाच्या ओघात शेकडो योजने पुढे गेलेल्या माणसाला माणूस म्हणून सन्मानानं जगण्याचा हक्क मिळवून देणारा गाडा मागे ओढला जाऊ नये.
अगस्ती चापेकर, घरंदाज राजकीय विश्लेषक असून, लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.
COMMENTS