रावत तिन्ही दलाचे नवे प्रमुख, नरवणे नवे लष्करप्रमुख

रावत तिन्ही दलाचे नवे प्रमुख, नरवणे नवे लष्करप्रमुख

नवी दिल्ली : भारताचे २८ वे लष्करप्रमुख म्हणून लेफ्ट. जनरल मनोज नरवणे यांनी तर तिन्ही दलाचे पहिले प्रमुख म्हणून मावळते लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी कार्यभार स्वीकारला.

पाकपुरस्कृत दहशतवाद व चीनच्या घुसखोरीचा सामना करण्याचे आव्हान या दोन प्रमुखांवर असणार आहे.

लष्करप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर लष्कराबाबत अनेक वर्षे प्रलंबित असलेले सुधारणा योजनांना वेग देणे, पाकपुरस्कृत दहशतवादावर सडेतोड उत्तर देणे व सीमारेषेवर असलेल्या विशेषत: चीनला लागून असलेल्या सीमारेषेवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या क्षमतांमध्ये अधिक वाढ करणे ही आव्हाने नरवणे यांच्यापुढे आहेत.

लष्करप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतात नरवणे यांनी पाकपुरस्कृत दहशतवाद न थांबल्यास त्याला कठोर उत्तर दिले जाईल असा इशाराच पाकिस्तानला दिला आहे.

लष्करप्रमुखपदाची जबाबदारी घेण्याआधी लेफ्ट. जनरल मनोज नरवणे भारत-चीन दरम्यान सुमारे ४ हजार किमीच्या सीमारेषेचे संरक्षण करणाऱ्या पूर्व विभागाचे प्रमुख होते.

नरवणे हे पुण्याचे असून त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीत (एनडीए)मध्ये लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले. देशाच्या लष्करप्रमुखपदी त्यांची नियुक्ती झाल्याने देशाच्या तीनही दलाचे प्रमुख ज्यात नौदल प्रमुख अडमिरल करमबीर सिंह, हवाई दल प्रमुख आरकेएस भदोडिया यांचाही समावेश आहे, हे तीनही अधिकारी एनडीए या एकाच संस्थेचे एकाच तुकडीचे (५६ वा कोर्स) विद्यार्थी आहेत. हा योगायोग आहे.

आपल्या ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत नरवणे यांनी जम्मू व काश्मीर, ईशान्य भारतातील दहशतवादाविरोधात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांचा बिमोड करताना राष्ट्रीय रायफल्स नेतृत्व, ईशान्य भारतातील एका तुकडीचे ब्रिगेडियरपद भूषवले आहेत. त्या अगोदर त्यांनी श्रीलंकेतील भारतीय शांती सेनेतही भाग घेतला होता. नागालँडमध्ये आसाम रायफल्स (उत्तर)चे महानिरीक्षक असताना त्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल विशिष्ट सेवा पदक व अति विशिष्ट सेवा पदकानेही  गौरवण्यात आले होते. म्यानमारमधील भारतीय दुतावासातील लष्कर विभागातही त्यांनी काम केले आहे. दिल्लीमधील ‘जनरल ऑफिसर इन कमांडिंग’, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महूमधील लष्कर युद्धशास्त्र विद्यापीठातील प्रशिक्षक अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत.

मूळ बातमी

COMMENTS