एका संस्कृतीचा मृत्यूलेख

एका संस्कृतीचा मृत्यूलेख

खुद्द पंतप्रधानांचे काश्मिरसंबंधांतले ‘सत्य’ दाबून ठेवणाऱ्या वर्गाविरोधात उघड भूमिका घेणे आणि त्याला प्रतिसाद म्हणून देशात मुस्लिमविरोधी जनभावना उफाळून येणे असे अचानक घडलेले नाही. यास एक इतिहास आहे. परधर्मद्वेषमूलक भूमिकांमधले सातत्यही आहे. या दाहक वास्तवाची जाणीव करून देणारा समाजअभ्यासक, मानसशास्त्र तज्ज्ञ आशीष नंदी यांचा सन २००२ मधला मूळ इंग्लिशमधला लेख सध्या समाज माध्यमांवर राबता असलेल्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. त्या लेखाचा हा साभार अनुवाद. या लेखात वर्तमानातल्या विद्वेषी माहोलाची बिजेही सापडतात आणि सर्वोच्च नेत्याच्या कृतीमागील मानसिकताही उलगडते...

बिल्कीस बानू प्रकरणः महत्त्वाच्या साक्षीदाराला दोषीकडून धमकी
स्नूपगेट २०१३ : ‘साहेबां’साठी तरुण आर्किटेक्टवर हेरगिरी
गुजरात दंगलः मोदी व अन्य जणांची क्लिन चीट कायम

रवांडा आणि बोस्निया येथे झालेल्या भीषण शिरकाणांनी नरसंहाराच्या अभ्यासक विद्यार्थ्यांना एक गोष्ट नक्कीच शिकवली. दोन समुदायांमध्ये जेव्हा अत्यंत द्वेषपूर्ण, पाशवी हत्याकांड व अत्याचार घडतात, तेव्हा त्यात सामील दोन समुदाय एकमेकांसाठी कधीच अनोळखी नसतात. किंबहुना, हे दोन समुदाय सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्या एकमेकांच्या समीप असतात आणि त्यांची आयुष्ये कितीतरी पद्धतींनी एकमेकांत मिसळलेली असतात. परंतु, जेव्हा या जवळिकीची जागा द्वेष घेतो किंवा या जवळिकीचा एका टप्प्यावर उद्रेक होतो, तेव्हा त्यातून अनोळखी आणि भयकारक भासावे, असे राक्षस बाहेर पडतात.

आशीष नंदी

आशीष नंदी

गुजरातमधील पशुवत किंवा रानटी स्वरूपाच्या सांप्रदायिक हिंसेमुळे ज्यांना जबर धक्का बसला असेल, त्यांनी रवांडा आणि बोस्नियामधील हत्याकांडांच्या हकिगती जरुर वाचाव्यात. दोन्ही ठिकाणी हिंसाचारात हात बरबटवणारे समुदाय एकमेकांच्या जवळ होते आणि वांशिक संहाराने पाशवी, आत्मघातकी आविष्काराचे स्वरूप घेतले होते. १९४६ ते ४८ या काळात देशाच्या झालेल्या फाळणीमुळे नेमके हेच घडले. तिकडे पॅलेस्टिनी अरब आणि ज्यू इझ्रायलींना मृत्यूचा विळखा घालणाऱ्या पश्चिम आशियातील हिंसेच्या तांडवातही याच नाट्याचा नव्याने प्रयोग होत आहे.

दंगल हे उपजिविकेचे साधन

दंगल हे उपजिविकेचे साधन

गुजरातमध्ये अशा प्रकारच्या हिंसक आविष्काराची तयारी दीर्घकाळापासून सुरू होती. या राज्याने ३३ वर्षे अखंड दंगली बघितल्या आहेत. नाही म्हणायला येथे अधूनमधून शांतता होती, पण तीही तणावपूर्ण आणि अवघडलेली. चक्रावून टाकणारी बाब ही होती की, या काळात गुजरातमधील शहरी निम्न स्तरातील एका मोठ्या वर्गासाठी सांप्रदायिकता व दंगलबाजी ही उपजीविकेचे, झटपट नफा मिळवून देणारे, मनोरंजनाचे साधन झाले होते. नव्हे, ही जगण्याची एक नवीन शैली बनली होती. या वर्गाला दंगली तात्पुरत्या काळासाठी एक प्रतिष्ठा मिळवून देत आल्या आहेत. म्हणूनही दंगलींच्या काळात आणि त्या शमल्यानंतरचा बराच काळ या वर्गातील लोक आपापल्या समुदायांसाठी ‘हिरो’ होऊन जायचे. समाजातील परिघावर राहणाऱ्या व्यक्तींसाठी हे तर खूप मोठे बक्षीस होते.

दंगलखोरी हा प्रामुख्याने शहरी विकारच आहे. गोपाळ कृष्ण यांच्यापासून ते असगर अली इंजिनअर यांच्यापर्यंत आणि पी. आर. राजगोपालन यांच्यापासून आशुतोष वार्ष्णेय यांच्यापर्यंत दंगलींच्या सर्व समाजशास्त्रज्ञांनी हे वास्तव पुन्हापुन्हा दाखवून दिले आहे. दंगल हे शहरी भागाचे वैशिष्ट्य भारतात अधिक प्रमाणात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यात सध्याचा गुजरातमधील शहरी मध्यमवर्ग हा सर्वाधिक प्रमाणात जातीयवादी झालेला आहे; हा वर्ग जातीय हिंसेला सक्रियपणे उत्तेजन आणि प्रेरणा पुरवत आला आहे. सुस्थित मध्यमवर्गातील काही समूह लुटालुटीतही उत्साहाने भाग घेतात, हे आपण अलीकडील काळात झालेल्या दंगलींमध्ये बघितले आहे; हिंसाचारात फारसा भाग न घेऊ शकणारे लुटालुटीत अग्रक्रमाने सामील असतात, असाही याचा एक अर्थ असतो.

(वांशिक वा जातीय संघर्षामध्ये फारशा न उतरणाऱ्या म्हणून गेल्या शंभरेक वर्षांपासून ओळखल्या जाणाऱ्या समुदायांना- उदाहरणार्थ, बंगालीबाबू, काश्मिरी मुस्लिम आणि गुजराती उच्चवर्णीय- हिंसेचे विशेष आकर्षण वाटत राहिले आहे, विशेषत: कोणीतरी हाणामारी करत असेल आणि आपले प्राण पणाला लावत असेल, तर त्याचे आकर्षण या समुदायांना नेहमीच वाटत आले आहे. अर्थात, गेल्या काही वर्षांत, आकर्षणाची भावना व अभिव्यक्तीचा मार्ग म्हणून हिंसाचाराचा अवलंब या दोन्हीस व्यक्तीच्या ‘नामर्दपणा’च्या प्रायश्चित्ताचा दर्जा प्राप्त झाला आहे आणि या सर्व भावना सार्वजनिक आयुष्यात थेट व्यक्त होत आहेत.)

दंगलप्रवण गुजरात

उत्तर प्रदेशासारख्या राज्यांमध्ये शहरांना विशेष महत्त्व नाही, पण गुजरातमध्ये ते आहे. गुजरातच्या राजकीय पटलावर शहरी सभ्यपणाचे निर्णायक अस्तित्व आहे. राज्यात पन्नास शहरे आहेत आणि त्यातील बहुतेक शहरे ही सांप्रदायिक द्वेष आणि भयाचा भ्रम निर्माण करणारी केंद्रे झाली आहेत.

किंबहुना, बेदरकार हिंसाचाराला वाट करून देणाऱ्या शहरी-औद्योगिक दृष्टीचे गुजरात हे आता लक्षवेधी उदाहरण झाले आहे. आत्तापर्यंत हे उद्दिष्ट या राज्याने व्यवस्थित पोटात दडवून ठेवले होते. असेही म्हणता येते की, ते राज्याच्या पोटात वास करून होतेच. त्यामुळे हे राज्य नुसते दंगलप्रवण नाही, तर नेहमीच स्वत:शी युद्ध पुकारल्यासारखे झाले आहे. अगदी आत्ताच्या म्हणजेच २००२च्या  दंगली शमल्यानंतरच्या आकडेवारीतूनही असे दिसून येते की, गुजरातमधील दंगली अन्य राज्यांच्या तुलनेत दीर्घकाळ धुमसत राहतात. यात फारतर तात्पुरता युद्धविराम येऊ शकतो. पण दोन्ही बाजूंमध्ये आतल्याआत तणाव आणि द्वेष धुमसत राहतो नि दोन्ही बाजू दंगलींच्या पुढील फेरीसाठी सज्ज होतात. यावरून असे नक्कीच म्हणता येते, गुजरात हे आता नागरी युद्धाचे क्षेत्र झालेले आहे आणि पुढील काही वर्षे ते तसेच राहणार अशीच शक्यता अधिक आहे.

अनेक भारतीयांच्या मते, देवाप्रमाणे सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, सर्वज्ञ असलेल्या, पाकिस्तानातील इंटर-सर्व्हिस इंटेलिजन्सने ही परिस्थिती निर्माण केलेली नाही. अलीकडील दंगलीत बळी पडणारे बहुतांशी अल्पसंख्याक होते, हेही यामागील कारण नाही. तर राज्य सरकारकडून आपल्याला कोणतेही संरक्षण मिळणार नाही, हे या राज्यातील अल्पसंख्याकांना आता कळून चुकले आहे आणि म्हणूनच ही नागरी युद्धाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्य सरकारच्या कनिष्ठ पातळीवरच्या यंत्रणांनी दंगलखोरांना साथ देण्याचे प्रकार अनेकदा आणि अनेक राज्यांमध्ये घडले आहेत. मात्र, प्रशासनातील आणि कायदा व सुव्यवस्था यंत्रणेतील काही धाडसी विरोधकांचा अपवाद वगळता राज्याची संपूर्ण यंत्रणा अल्पसंख्याकांच्या विरोधात उभी राहिल्याचे गुजरात हे १९८४ सालच्या शीखविरोधी दंगलींनंतरचे, पहिलेच उदाहरण आहे. (१)

हे चांगले किंवा वाईट आहे हा भाग वेगळा पण आपल्या संरक्षणासाठी  आपणच सज्ज राहिले पाहिजे, हे गुजरातमधील अल्पसंख्याकांना आता कळून चुकले आहे. हे विध्वंसाला हिरवा झेंडा दाखवला गेल्यासारखे आहे. यामुळे नागरी युद्धाचे वातावरण तर धुमसत राहीलच, शिवाय, दहशतवाद फोफावण्यासाठीही पोषक वातावरण निर्माण होईल.  ऑपरेशन ब्ल्यू स्टारमुळे पंजाबमधील दहशतवादी कारवायांमध्ये जेवढी वाढ झाली नाही, तेवढी वाढ १९८०च्या दशकातील शीखविरोधी दंगलींमुळे झाली; त्याचप्रमाणे गुजरातमधील दोन दशकांतील दंगलींमुळे जी आत्यंतिक निराशेची भावना निर्माण झाली, तिने दहशतवादाच्या उद्रेकाला वाट करून दिली.

अल्पसंख्यांकांचे जमातीकरण

१९६०च्या दशकात मी पौगंडावस्थेतील एक विद्यार्थी म्हणून गुजरातमध्ये गेलो होतो, तेव्हा गुजरात हे कधीतरी दंगलींचे केंद्र होईल यावर विश्वास ठेवणेही कठीण गेले असते. लोक भूतकाळातील दंगलीबद्दल बोलायचे, पण राज्याला छोट्या दंगली किंवा चकमकींचाही इतिहास नव्हता. अहमदाबादमधील अनेक हिंदूधर्मीयांच्या मनात मुस्लिमांबद्दल भीतीची आणि संशयाची भावना होती, पण ती प्रामुख्याने गुजराती नसलेल्या मुस्लिमांबद्दल होती, त्यांतील बहुसंख्य अहमदाबादमधील महाकाय वस्त्रनिर्मितीच्या उद्योगातील कामगार होते. गुजरातमधील उद्योगक्षेत्राचा मोठा भाग असलेल्या गुजराती मुस्लिमांमध्ये आणि हिंदूंमध्ये तसे पाहता बऱ्यापैकी अंतर राखलेले दिसत होते. मात्र हिंदूधर्मीय या मुस्लिमांना गुजरातचा भाग मानत होते.

मागे वळून बघितले तर कोचीमधील चित्रही बहुतांशी समान होते. कोची शहराचा अभ्यास मी काही वर्षांपूर्वी धार्मिक व वांशिक सौहार्दाचे शहर म्हणून केला होता. (२) अहमदाबादच्या जैन-बनिया संस्कृतीत मुस्लिमधर्मीयांबद्दल तामसिक तत्त्वाचे प्रतिनिधी म्हणून एक सौम्य स्वरूपाची नावड होती एवढाच काय तो फरक कदाचित असेल. मात्र, शहरात स्थापन होणाऱ्या नवीन, फॅशनेबल शैक्षणिक किंवा तत्सम संस्थांमध्ये येणाऱ्या पाश्चिमात्य राहणीमानाच्या बाहेरील लोकांबाबत त्याच पद्धतीची नावड असल्याने मुस्लिमांबद्दलची नावड काहीशी ‘समतोल’ राहिली होती. पारंपरिक अहमदाबादने या दोन्ही प्रकारच्या लोकांना दूर ठेवले होते.

१९६९ सालापासून सुरू झालेल्या दंगलींनी अहमदाबाद शहराचा चेहरा एकदम पालटून टाकण्यास सुरुवात केली. मात्र त्या वेळी ते बदल तेवढे स्पष्टपणे दिसत नव्हते. दक्षिण आशियातील सर्व दंगलींप्रमाणे हेही सारे नियोजित होते आणि याचे नियोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने व्यवस्थापनाच्या देखाव्याखाली पद्धतशीर केले होते. या हिंसाचाराने खूप लाभ मिळवून दिले. विश्व हिंदू परिषद आणि आरएसएसच्या मोहिमांनी काल्पनिक द्वेष प्रत्यक्षात आणण्यात मोठी भूमिका बजावली. या दोहोंच्या प्रयत्नांमुळे मुस्लिमांमधील जमातीकरणाच्या (घेट्टोवायजेशन) प्रक्रियेला वेग मिळाला आणि दोन्ही समुदायांमध्ये लढण्यासाठी कायम शिवशिवते हात असलेल्या तसेच हिंदू किंवा मुस्लिमांचे रक्षणकर्ते असल्याचा आव आणणाऱ्या माफियासदृश संघटना तयार झाल्या.

गुन्हेगारीकरण, पण लादलेले

अर्थात, या गुन्हेगारी समूहाची वाढ तरुण व बेरोजगार मुस्लिमांमध्ये तुलनेने खूप अधिक प्रमाणात झाली. दोन्ही समुदायांमध्ये पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या सामाजिक अंतराने विचित्र रूप घेतले. नोकरी आणि घरे मिळवण्यात पावलोपावली भेदभावाचा सामना करावा लागल्यामुळे अनेक बेरोजगार मुस्लिम तरुणांनी बेकायदा दारूचा व्यवसाय, अमली पदार्थांचा व्यापार, प्रोटेक्शन रॅकेट्स तसेच भुरट्या गुन्ह्यांसारखे जगभरातील झोपडपट्ट्यांमध्ये फोफावणारे धंदे करायला सुरुवात केली. रस्त्यावर उतरून हाणामारी करायला हे तरुण नेहमीच सज्ज दिसू लागले. अहमदाबादमधील प्रख्यात वस्त्रनिर्मिती उद्योग कोसळल्यानंतर तर परिस्थिती आणखीच खराब झाली. वस्त्रोद्योग कोसळल्याचा फटकाही मुस्लिमांना अधिक बसेल याची काळजी शहरातील बदलत्या राजकीय संस्कृतीने घेतली. (३)

१९६९ सालातील दंगलींनी पेरलेल्या बियांना आता राज्यभरात अंकुर फुटलेले आहेत. रक्तरंजित सांप्रदायिक दंगे आणि जमावाद्वारे भीषण हिंसाचार हा गुजरातचा नियमित वार्षिक कार्यक्रम झाला आहे.  रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान ही संस्कृती चांगलीच फोफावलेली दिसून आली. लालकृष्ण अडवाणी नावाचे महान सारथी गुजरातमधून रथ हाकत घेऊन गेले, तेव्हाही तेथे दंगलींची मालिका लागली. अभ्यासक अच्युत याज्ञिक यांच्या मते, या दंगलींमध्ये प्रथमच स्त्रिया आणि मुलांना हल्ले व अत्याचारांसाठी बेधडकपणे लक्ष्य ठरवले गेले. दंगली आता अधिकाधिक पाशवी आणि रानटी होत चालल्या होत्या.

बहुसंख्यांकामधील पाशवी मनोवृत्तीचे दर्शन

मागील दशकातही गुजरातने दंगलींची परंपरा कायम राखली. या दंगलींमध्ये स्त्रिया आणि मुलांवर केवळ हल्लेच करण्यात आले नाहीत, तर त्यांची हत्या करण्यात एक विकृत आनंद लुटला जाऊ लागला. हा विकृत आनंद कोणत्याही नागरी समाजाला पचण्याजोगा नव्हता. अगदी गोध्रा येथे करसेवकांवर झालेल्या हल्ल्यांमध्येही प्रामुख्याने स्त्रिया व मुलेच बळी पडली होती, असे दिसून आले. पुढील उतारा प्रत्यक्ष साक्षीदाराच्या एका विस्तृत प्रसार झालेल्या कथनाचा भाग आहे. अनेकांनी तो वाचला नसेल. हा उतारा भारतीय प्रशासन सेवेतील एका अधिकाऱ्याने कथन केलेला आहे :

‘गुजरातला हलवून सोडणारी दहशत आणि नरसंहार दहा दिवस बघितल्यानंतर, किळस आणि भीतीने बधीर झालेल्या मनाने मी परत आलो … दंगलीतून बचावलेल्यांच्या अहमदाबादमधील शिबिरातून चालताना (या शिबिरांमधील २९ तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये सुमारे ५३,००० स्त्रिया, पुरुष व मुले राहत आहेत) दु:खाचे उघड प्रदर्शन तर दिसत नाही… पण तुम्ही शिबिरात एखाद्या ठिकाणी बसलात की लोक बोलू लागतात, त्यांचे शब्द म्हणजे भल्यामोठ्या जखमांना चीर दिल्यानंतर भळभळणाऱ्या पू सारखे भासत होते. ते ज्या भयाबद्दल बोलत होते, ते एवढे भेसूर होते की लिहिताना माझी लेखणी थरथरते… सशस्त्र तरुण मुलांच्या संघटित पथकांनी स्त्रिया आणि मुलांविरोधात दाखवलेला निर्दयी पाशवीपणा, देशाला वारंवार मान खाली घालायला लावणाऱ्या यापूर्वीच्या दंगलींमध्ये बघितलेल्या अन्य कशाच्याही तुलनेत, अधिक हिंस्र होता….

‘जिवाची भीक मागणाऱ्या आठ महिन्यांच्या गरोदर स्त्रीबद्दल तुम्ही काय म्हणू शकता. हल्लेखोरांनी तिची विनंती मान्य केलीच नाही, उलट, तिच्या पोटावरच चीर दिली, त्यातील गर्भ बाहेर काढला आणि तिच्या डोळ्यापुढे तो चिरून टाकला. घरातच पाणी भरून आणि नंतर या पाण्यात उच्च दाबाची वीज सोडून एकोणीस जणांच्या कुटुंबाला मारून टाकण्याच्या कृत्याला तुम्ही काय म्हणू शकता?

जुहापारामधील एका सहा वर्षांच्या छोट्या मुलाच्या आईला व सहा भावंडांना त्याच्या डोळ्यासमोर मारून टाकण्यात आले, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? हा छोटा मुलगा वाचला, कारण तो बेशुद्ध पडला आणि हल्लेखोरांना तो मेला आहे असे वाटले. नरोडा-पटियासारख्या अहमदाबादमधील दंगलीचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागातून निसटून जाण्याच्या प्रयत्नात एका कुटुंबाने तरुण मुलगी आणि तिचे तीन महिन्यांचे बाळ गमावले. एका पोलीस हवालदाराने या मुलीला ‘सुरक्षित’ स्थळ निर्देशाने दाखवले आणि तेथे गेली असता ती एका जमावाच्या गराड्यात सापडली. या जमावाने केरोसिन ओतून या मुलीला व तिच्या बाळाला जिवंत जाळले.

‘गुजरातमधील अलीकडील काळात जमावाने केलेला नृशंस हिंसाचार बघता, मला असे वाटते की, स्त्रीच्या लैंगिक अधीनतेचा वापर यापूर्वी कधीही कोणत्या दंगलीत एवढ्या विस्तृतपणे केला गेला नव्हता. तरुण मुली व स्त्रियांवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या बातम्या सगळीकडून येत होत्या. हे बलात्कार त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यादेखत घडत होते आणि त्यानंतर जिवंत जाळून किंवा हातोडा मारून स्त्रियांची हत्या केली जात होती. एका प्रकरणात तर स्क्रू ड्रायव्हरचा वापर करण्यात आला होता.’ (४)

मोहनदास करमचंद गांधी यांना आपले मानणे गुजरातने कधीच सोडून दिले होते. राज्याचा राजकीय आत्माही गांधींच्या मारेकऱ्यांनी हस्तगत केला होता. त्यांनी गांधीजींना पुन्हा एकदा मारून टाकले आणि एवढे करून ते थांबले नाहीत, ते त्यांच्या मृतदेहावर नाचले, आनंदात धुंद होऊन त्यांनी अश्लिलतेचा कळस गाठला. याला उत्तर म्हणून गांधीवाद्यांनी खरे तर गुजरातमध्ये सत्तेवर असलेल्या नाझींच्या विरोधात ठोस भूमिका घ्यायला हवी होती, प्रत्यक्षात त्यांनी काही निष्प्रभ शांती मोर्चे काढले. साबरमती आश्रमाने दंगलींच्या काळात शहरातील सर्वांत मोठे आश्रयस्थान व्हायला हवे होते, प्रत्यक्षात त्यांनी आपल्या संरक्षणासाठी आवारातील दरवाजे लावून घेतले. ही बातमी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली, तेव्हा कोणाला त्याचे आश्चर्यही वाटले नाही. (५)

 गुजराती संस्कृतीची घसरण

गुजराती मध्यमवर्गीय संस्कृतीची घसरण आणि ऱ्हास त्यांचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी जेवढा उघडा केला असेल, तेवढा अन्य कोणीही केली नसेल. त्यांनी दंगलींचे निर्लज्जपणे समर्थन केले आणि दंगलखोरांच्या मुख्य आश्रयदात्याची भूमिका बजावली. त्यांच्या बोलण्यातील अश्लीलता म्हणजे सार्वजनिक आयुष्यावरील मळीच होती. त्यांनी केलेले दंगलींचे समर्थन सर्बियाचे एकेकाळचे अध्यक्ष स्लोबोदान मिलोसेविच यांनी केलेल्या समर्थनाप्रमाणेच विचित्र होते. सध्या मिलोसेविच यांच्यावर मानवतेविरोधात केलेल्या गुन्ह्यांसाठी खटला सुरू आहे. शेकडो जणांची हत्या करण्यातील सहभागाप्रकरणी तसेच वांशिक संहाराच्या प्रयत्नांप्रकरणी भारतातील तसेच जगभरातील मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या समूहांनी मोदी यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय समन्स कसे जारी करून घेतले नाही, याचे मला नेहमीच आश्चर्य वाटते.  मोदी यांचे वर्तन मानवतेविरोधातील गुन्हा नसेल, तर मग हा गुन्हा नेमका काय आहे?

फॅसिझमचे जिवंत उदाहरण

अनेक वर्षांपूर्वी जेव्हा मोदी कोणीच नव्हते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे छोटे प्रचारक होते आणि भाजपच्या यंत्रणेत छोटे स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा त्यांची मुलाखत घेण्याचा योग मला अच्युत याज्ञिक यांच्यासमवेत आला. मोदी यांनी याज्ञिक यांना सुदैवाने ओळखले नाही. (सुदैवाने अशासाठी की ते याज्ञिक यांना नावाने ओळखत होते आणि नंतर त्यांच्या कृतींवर आणि सदरलेखनावर मोदी यांनी तुच्छतापूर्ण टिप्पण्या केल्या होत्या). या बराच वेळ चाललेल्या मुलाखतीनंतर हे  फॅसिझमचे एक नमुनेदार व व्यवच्छेदक लक्षणांनी युक्त असे उदाहरण आहे, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका उरली नाही. मी कधीच ‘फॅसिस्ट’ ही संज्ञा शिवीसारखी वापरत नाही; माझ्यासाठी हा एक निदानात्मक प्रवर्ग आहे आणि यात व्यक्तीच्या आदर्शात्मक भूमिकेचाच नव्हे, तर या विचारधारेतील व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यांचा व प्रेरणात्मक नमुन्यांचाही अंतर्भाव होतो.

मनोविकारतज्ज्ञ, मनोविश्लेषक आणि मानसशास्त्रांनी अनेक वर्षांच्या प्रयोगजन्य कामातून हुकूमशाही व्यक्तिमत्वाचे जे काही निकष मांडले आहेत, ते सगळे मोदी खरोखर पूर्ण करतात हे सांगण्यात मला फारसा आनंद होत नाही! सनातनी धर्मनिष्ठांमध्ये असलेली ताठरता, भावनिक आयुष्याचा संकोच, अहंकाराचा बचावात्मक वापर, स्वत:च्या आवडीनिवडींबद्दल नकार व भीतीची भावना आणि त्याला मिळालेली हिंसेच्या कल्पनांची जोड- हे सगळे भयगंडग्रस्त आणि पछाडलेल्या व्यक्तिमत्वामध्ये एका विशिष्ट परिमाणात आढळते. मला त्यांचा तो थंड, मोजूनमापून लावलेला सूर अजून आठवतो. याच सुरात त्यांनी भारताविरोधात कसा वैश्विक कट रचला जात आहे, याचा सिद्धांत स्पष्ट केला, प्रत्येक मुस्लिमाचे चित्र संशयित दगाबाज व संभाव्य दहशतवादी म्हणून रंगवले. मी मुलाखतीनंतर धक्का बसलेल्या अवस्थेतच बाहेर आलो आणि याज्ञिकांना म्हणालो की, प्रथमच मी फॅसिस्टाचे पाठ्यपुस्तकातील उदाहरण प्रत्यक्ष पाहिले आहे आणि ही व्यक्ती भविष्यकाळात कदाचित मोठा संहार करू शकेल.

त्यांनी ज्या पद्धतीने गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाकडे जाणारी वाट स्वत:साठी मोकळी करून घेतली त्यावरून तुम्हाला आपल्या राजकीय प्रक्रियेबद्दल तसेच आपल्या लोकशाहीने गेल्या अनेक वर्षांत जो मार्ग घेतला आहे, त्याबद्दल बरेच काही कळू शकेल. खरे तर देशावर खूप मोठी आपत्ती येऊ घातली आहे हे मला स्पष्ट दिसत आहे.

विद्वेषाचे नवे पर्व

गुजरात दंगलींनी भारतीय राजकारणात एका नवीन विद्वेषी पर्वाची सुरुवात करून दिली. आपण काश्मीर व ईशान्य भारतातील दहशतवादाबद्दल बोलतो आणि पंजाबमध्ये उसळलेला दहशतवाद कसा कौशल्याने दाबला गेला हेही अभिमानाने सांगतो. या प्रकरणांत गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण, विशेषत: दहशतवादाप्रती सहानुभूती असलेल्या लोकांची संख्या, नेहमीच अल्प राहिली आहे. पाकिस्तानातील आयएसआय आणि त्यांच्यासाठी काम करणारे भारतीय यांनी काश्मीर खोऱ्यातील सर्व काश्मिरींना दहशतवादाला पाठिंबा देण्यासाठी तयार केले आहे, असे गृहीत धरले तरी या काश्मिरींची संख्या ३० लाख आहे, म्हणजे दिल्ली शहरातील लोकसंख्येहून कितीतरी कमी आहे.

गुजरातमधील हिंसाचारातून समोर आलेल्या शक्ती पूर्णपणे वेगळ्या आहेत. फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलींनी जो परिणाम केला, तोच परिणाम या शक्ती करत आहेत. कदाचित या भारतातील पहिल्या दृकश्राव्य दंगली असतील. म्हणजे टीव्ही कॅमेरासमोर झालेल्या दंगली. त्याचा प्रभाव-दुष्प्रभाव भारतभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरला आहे. देशभरातील अल्पसंख्याकांनी वांशिक संहाराचे प्रयोग बघितले आहेत तसेच मुस्लिम समुदायाचा आर्थिक कणा मोडून टाकण्याचे प्रयत्नही बघितले आहेत. त्यामुळे गुजराती मुस्लिमांमध्ये जी नैराश्याची भावना बळावली आहे, ती संसर्गजन्यही ठरू शकते.

देशातल्या तब्बल १२ ते १३ कोटी मुस्लिमांच्या मनात कडवटपणा भरला, तर त्याचे काय करायचे हा माझ्यापुढील यक्षप्रश्न आहे. त्यांच्यातील एक मोठा समूह नैराश्याच्या जवळ पोहोचलेला आहे. यातून भारताचा, निदान गुजरातचा, पॅलेस्टाइन तर होणार नाही? हा मला पडलेला सवाल आहे. वरकरणी तरी मोदी यांनी त्यांचे काम पूर्ण केले आहे. संघ परिवाराचा द्विराष्ट्र सिद्धांत वास्तवात उतरत आहे आणि भारताच्या दुसऱ्या फाळणीची प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. आपल्याला, आपल्या मुलांना, नातवंडांना, आणि त्याहून अधिक म्हणजे सगळ्या गुजरातींना, नागरी युद्धाच्या स्थितीत कायम राहणे शिकावेच लागेल. याची मोठी किंमत गुजराती मध्यमवर्गाला मोजावी लागणार आहे. सांस्कृतिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना खूप काही मोजावे लागणार आहे. एका विशिष्ट जमातीच्या सुनियोजित हत्याकांडात सहभागी झाल्याची ही किंमत आहे.

(अनुवादः सायली परांजपे)

तळटीपा:

१. हा मुद्दा त्रिदीप सुहृद यांनी अप्रत्यक्षपणे मांडला आहे- ‘नो रूम फॉर डायलॉग’, इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली ४७ (११), १६ मार्च २००२, पाने. १०११-२.

२. आशीष नंदी, ‘टाइम ट्रॅव्हल टू अ पॉसिबल सेल्फ: सर्चिंग फॉर द ऑल्टरनेटिव कॉस्मोपॉलिटॅनिझम ऑफ कोचीन’,  जॅपनीज जर्नल ऑफ पोलिटिकल सायन्स  १(२), डिसेंबर २००१,  पाने. २९३-३२७.

३. गुजरातमधील दंगलींपूर्वी घडलेले गोध्रा प्रकरण, ही काही अंशी एका मोठ्या प्रक्रियेची परिणती आहे, संघ परिवाराच्या दाव्याप्रमाणे आयएसआयचे कारस्थान नाही. त्याचप्रमाणे राजकीयदृष्ट्या योग्य पवित्रा घेण्याचा आग्रह धरणारे सेक्युलॅरिस्ट म्हणतात त्याचप्रमाणे गोधरा येथील हत्याकांड करसेवकांनी मुस्लिमांना चिथावल्याचा परिणाम होता हेही खरे नाही. करसेवकांनी दिलेली चिथावणी असंख्य प्रवाशांना (यातील बहुतेक स्त्रिया व मुले होती) जिवंत जाळण्याएवढी मोठी नव्हती. गोधरा घटना फारशी महत्त्वाची नव्हती असे स्पष्ट करण्याच्या या दुबळ्या प्रयत्नांकडे मी या क्षणापुरते दुर्लक्ष करतो. काही मार्गांनी हा प्रकार घटनासाखळीचे वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे. ही घटनासाखळी अलीकडील काळात अनेकदा दिसून आली आहे- झोपडपट्ट्या व घेट्टोमधील निराश व संतप्त तरुणांना मुद्दामहून चिथावणी द्यायची आणि त्यापाठोपाठ मुस्लिमांवर संघटित, व्यापक हल्ले करायचे.

४. हर्ष मांदेर, ‘क्राय, द बिलव्हेड कंट्री: रिफ्लेक्शन्स ऑन द गुजरात मॅसेकर’, इंटरनेटवर प्रसारित होणारा पण प्रसिद्ध न झालेला एक अहवाल, २१ मार्च २००२.

५.. अच्युत याज्ञिक आणि सुचित्रा शेठ यांचा ‘व्हीदर गुजरात? व्हायोलन्स अँड आफ्टर’ हा इकॉनॉमिक अँड पोलिटिलकल वीकली ४७ (११) मधील लेख बघा. १६ मार्च २००२, पृष्ठ क्रमांक १००९-११.

( १ एप्रिल २०२२ ‘मुक्त-संवाद नियतकालिकामधून साभार)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: