भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री

भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री

भूपेंद्र पटेल यांची गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.

‘माध्यान्ह भोजन’ कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन १ हजार
परदेशी शिष्टमंडळाच्या काश्मीर दौऱ्याचे गौडबंगाल
राज्यातील राजकीय संकट सर्वोच्च न्यायालयात

नरेंद्र मोदी यांच्या खास विश्वासातील असणारे विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर भूपेंद्र रजनीकांत पटेल यांची गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली.

शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अहमदाबाद येथे रात्री भेट दिली. त्यानंतर शनिवारी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी अचानक मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. रुपाणी यांनी पदाचा राजीनामा का दिला? याविषयी अनेक करणे दिली जात होती. तसेच विजय रुपाणी यांचे उत्तराधिकारी म्हणून उपमुख्यमंत्री नितीन पटेल, कृषिमंत्री आर. सी. फाल्दु, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि मनसुख मांडवीय यांची नावे चर्चेत होती. मात्र आज गुजरात भाजपाच्या खूप वेळ चाललेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र रजनीकांत पटेल यांची एकमताने निवड करण्यात आली. गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल हे देखील मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते. मात्र, त्यांना डावलून भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. याआधी ऑगस्ट २०१६ मध्ये आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, तेव्हा नितीन पटेल मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा होती. मात्र तेव्हा त्यांच्याऐवजी रुपाणी यांची निवड करण्यात आली होती.

विजय रुपाणी यांच्यानंतर कोण येणार? या चर्चेमध्ये कुठेही भूपेंद्र पटेल यांचे नाव चर्चेत नसतानाही त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. भूपेंद्र पटेल यांच्यामुळे पाटीदार समाजाकडे गुजरातचे मुख्यमंत्रीपद पुन्हा गेले आहे. भूपेंद्र पटेल हे गुजरातमधील घाटलोदिया मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी अहमदाबाद महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद देखील भूषवले आहे. २०१७मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भूपेंद्र पटेल यांनी १ लाख १७ हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. संपूर्ण गुजरातमध्ये २०१७च्या निवडणुकांमध्ये हा सर्वाधिक मतांचा फरक होता.

हार्दिक पटेल यांचा गौप्यस्फोट

मुख्यमंत्री रुपाणी यांना बदलण्याचं मुख्य कारण भाजपची पिछेहाट हॉट होती. पक्षाला सावरण्यासाठी रुपाणी यांना बदलण्यात आल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनी केला आहे. पटेल यांनी राज्यातील विधानसभेच्या जागांच्या सर्वेक्षणाची माहिती फोडल्याचा दावा केला आहे.

“याचवर्षी ऑगस्टमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने केलेल्या गुप्त सर्वेक्षणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली. काँग्रेसला ४३ टक्के मतांसहीत ९६ ते १०० जागा आणि भाजपाला ३८ टक्के मतांसहीत ८० ते ८४ जागा, आपला ३ टक्के मतांसहीत ० जागा, एमआयएमला एक टक्के मतांसहीत ० जागा आणि सर्व अपक्षांना १५ टक्के मतांसहीत ४ जागा मिळणार आहेत,” असे पटेल म्हणाले. मुख्यमंत्री रुपाणी यांचा साजीनामा राज्यातील जनतेची दिशाभूल करण्यासाठी घेण्यात आला असून, खरा बदल पुढील वर्षीच्या निवडणुकांमध्ये होणार आहे जेव्हा जनता भाजपाला सत्तेतून बाजूला करेल, असे पटेल म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0