लडकियाॅं, ये भीमनगरकी लडकियाॅं!

लडकियाॅं, ये भीमनगरकी लडकियाॅं!

त्यांना ‘आझादी’ हवी, म्हणून त्या घराबाहेर पडल्या. आधी घराबाहेर, मग मोहल्ल्यात आणि मग आणखी बाहेर...पोलीस स्टेशनमध्ये, सरकारी कार्यालयात. आणि एकदा तर चक

दिल्लीचं सत्तावर्तुळ
एमपीएससी परीक्षा : ३०,३१ ऑक्टोबरला लोकल प्रवासास मुभा
प्रमाणभूत भाषिक धारणांचे पुनर्मूल्यांकन गरजेचे – भाग १

त्यांना ‘आझादी’ हवी, म्हणून त्या घराबाहेर पडल्या. आधी घराबाहेर, मग मोहल्ल्यात आणि मग आणखी बाहेर…पोलीस स्टेशनमध्ये, सरकारी कार्यालयात. आणि एकदा तर चक्क माथेरानला. सोबत कुणीही मोठं ‘पेरेंटिंग’ करणारं नसताना फक्त त्यांच्या रत्नाताईसोबत. स्वतःच्या स्वातंत्र्याचा पैस शोधता शोधता त्यांनी तो आपल्यापुरताच राहणार नाही, ना हेही पाहिलं. म्हणजे त्यांनी नेमकं काय काय केलं?

मुंबईतल्या मानखुर्दचं अगदी शेवटचं टोक असलेली भीमनगर वस्ती पावसाळ्यात भरपूर गवताने-चिखलाने वेढलेली असते. आपण नक्की मुंबईतच आहोत ना, असा प्रश्न तिथे गेल्यावर पडतो. चक्रव्यूहाप्रमाणे गोल गोल, अगदी आत-आत आपण कल्पना करू शकत नाहीत, तिथपर्यंत सगळी पत्र्याची घरं. शेजारी नाला वाहतो. सार्वजनिक दिवे, शौचालयं किंवा इतर पायाभूत सोयी-सुविधांची वानवा, ही जणू या वस्तीची ओळखच. हातावर पोट असणारे इथले बहुतांश कष्टकरी हे दलित, मुस्लीम . भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली तरी इथे अजूनही वीज, पाण्यासाठी लोकांचा झगडा सुरूच आहे. सगळ्या शाळकरी मुला-मुलींना दररोज पाणी आणण्यासाठी चार किलोमीटर दूरवरच्या चिता कॅम्प परिसरात जावं लागतं.

महिला बालविकास विभागाला आंगणवाडीचं निवेदन देणाऱ्या भीमनगर वस्तीतल्या मुली.

महिला बालविकास विभागाला आंगणवाडीचं निवेदन देणाऱ्या भीमनगर वस्तीतल्या मुली.

पूजा सांगते,  “शाळेतून आल्यावर कपडे बदलून, न जेवताच आम्ही पाणी आणण्यासाठी धूम ठोकतो.” तर फहीम मोहम्मद सांगतो, “या आमच्या मैत्रिणींना पाणी आणण्यासाठी जाणंही खूप अवघड आहे, कारण लाईट नसते, संध्याकाळच्या वेळी वाटेवर, नशा केलेले तरुणही बसलेले असतात, त्यांची इतकी भीती वाटते, की संध्याकाळी क्लासलाही कुणी एकटं जाऊ शकत नाही. मुलींवर लैंगिक अत्याचार केेले जाण्याची भीती तर मुलांवर चाकूहल्ला करण्याची, पाकीटमारीची भीती.”

तर अशा या वस्तीत राहतात, वंदना डोंगरदिवे, सविता प्रधान, केसर शहा, अलिफिया, शहाजहांन, रुक्सार बानो, रोली आणि त्यांचे काही मित्र फहीम मोहम्मद, जयकिश विश्वकर्मा, विशाल चौहान आणि आणखी काही मित्र-मंडळी. हे सगळे जण चौदा ते बावीस वयोगटातले. या मुला-मुलींनी एक गट तयार केला आहे – ‘पॉवर ग्रुप’. या ग्रुपच्या माध्यमातून घराबाहेर, मोहल्याबाहेर पडण्याची आझादी मिळवत या सगळ्या जणी स्वत:ला समृद्ध करत आहेत. वंदना आणि तिच्या मैत्रिणींची आझादीची कहाणी जितकी महत्वाची आहे, तितकीच महत्वाची आहे, त्यांच्या मित्रांची त्यांना मिळणारी साथ आणि या सगळ्यांनी एकत्र येत वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून समजून घेतलेला लिंगभाव.

गोष्ट त्यांनी सुरू केलेल्या आंगणवाडीची

भीमनगर वस्तीत राहणारी ही सगळी मुलं-मुली मागच्या चार वर्षांपासून ‘कोरो’ या संस्थेच्या ‘युवा मंथन’ कार्यक्रमाअंतर्गत एकत्र आली आहेत. ‘कोरो’ ही संस्था महाराष्ट्रात स्त्रियांचं सक्षमीकरण, लिंगभाव समता यासाठी मागील पंचवीस वर्षांहून अधिक काळ काम करते. वस्ती पातळीवरील – विविध वंचित समूहातून नेतृत्वविकास करण्यावर या संस्थेचा भर आहे.

आपल्या वस्तीतल्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र येऊन काम करणं आणि लिंगभाव समजून घेणं ही या मुला-मुलींची मुख्य उद्दिष्टं. दर आठवड्याला हे सगळे जण एकत्र जमून वस्तीत कोणत्या सुविधा हव्यात, याबद्दल चर्चा करतात. अशाच एका चर्चेदरम्यान, आपल्या वस्तीत आंगणवाडीच नाही आणि त्याची खूप आवश्यकता आहे, असं त्यांच्या लक्षात आलं. मग याच मुला-मुलींनी वस्तीत एक सर्वेक्षण केले. त्यासाठी प्रश्न काढून दारोदार फिरण्यापासून सगळं केलं. भीमनगरमधल्या साधारण चारशे-पाचशे कुटूंबात गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, लहान मुलं, पोषणाचा अभाव असलेल्या किशोरवयीन मुली किती, या सगळ्याचा शोध त्यांनी या सर्वेक्षणातून घेतला. १० डिसेंबर ते १५ डिसे २०२० च्या दरम्यान ही सर्वेक्षण झाले. त्यानंतर त्यांनी राज्याच्या महिला बालविकास विभागाशी संपर्क साधून, पत्रव्यवहार करून, एकात्मिक बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. अधिकाऱ्यांना निवेदन देऊन, भीमनगरमध्ये आंगणवाडी सुरू

अंगणवाडीकरता मुला-मुलींनी केलेलल्या सर्वेक्षणाचा एक नमुना.

अंगणवाडीकरता मुला-मुलींनी केलेलल्या सर्वेक्षणाचा एक नमुना.

करण्याची मागणी केली. त्याचा पाठपुरावाही केला. यावर्षी १ जानेवारी २०२१ पासून या प्रभागात आंगणवाडी सुरूदेखील झाली. सध्या कल्पना तोडकर या आंगणवाडी ताई तिथली जबाबदारी पाहतात. या मुला-मुलींच्या प्रयत्नांत त्यांची साथसोबत करणारी रत्ना माने ही कम्युनिटी लीडर सांगते, “अंगणवाडीचं सगळं काम मुलांनीच केलं, मी फक्त त्यांना सोबत केली. आताही अंगणवाडी दररोज सुरळीतपणे सुरू आहे, ना याची देखरेख मुलंच करतात.”

चौदा ते बावीस वयोगटातल्या या मुलां-मुलींनी आपल्या वस्तीत आंगणवाडी तर आणलीच शिवाय वीज, पाणी मिळवण्याकरताही प्रयत्न केले. ही सगळीच मुलं-मुली शाळा-कॉलेजात शिकणारी, यांच्यापैकी कुणाच्याही घरी सुखवस्तू सोडाच पण किमान बरं जगता येईल अशीही परिस्थिती नाही. तरीही ती धडपडत आहेत. पायाभूत सुविधांसाठी काम, चांगला अभ्यास, खेळ तसंच इतर कार्यक्रमांच्या माध्यमातून स्त्री-पुरुष समतेचे धडेही गिरवत आहेत.

रत्ना आणि ‘कोरो’ संस्थेचे तिचे इतर सहकारी या मुला-मुलींसोबत जे कार्यक्रम घेतात, त्यातून इथल्या मुला-मुलींची लिंगभावाची समज चांगलीच विकसित झाल्याचं लक्षात आलं. फहीम सांगत होता, “आधी आम्ही आमच्या वस्तीतल्या तृतीयपंथीयांशी नीट वागत नव्हतो, इतर लोक त्यांना हसतात, म्हणून आम्हीही हसायचो. पण इथे येऊन आम्हाला हळूहळू कळू लागलं, की तीही आपल्यासारखीच माणसं आहेत.” तर रोली सांगते, “मला डान्स करायला खूप आवडतं, पण घरून तसा सपोर्ट नव्हता, इथं आमच्या पॉवर ग्रुपसोबत जोडल्यामुळे मला हळूहळू माझ्या आवडीच्या गोष्टी करता येऊ लागल्या.”

भीमनगर वस्तीत अब्रार सलमानी यांच्या घरी जमलेली वस्तीतली मुलं-मुली.

भीमनगर वस्तीत अब्रार सलमानी यांच्या घरी जमलेली वस्तीतली मुलं-मुली.

रुक्सार बानो म्हणते, “पुर्वी आम्हाला घरातून बाहेर पडण्यासाठी खूप प्रश्नांचा सामना करावा लागायचा. मुलीच्या जातीने कशाला बाहेर पडायचं, असं ऐकावं लागायचं. पण आता आमच्या रत्नाताईमुळे, अब्रार खालुमुळे आई-वडील बिंधास्त कुठेही पाठवतात. आम्ही माथेरानला पिकनिकला गेलो होतो, तेव्हा पहिल्यांदा आम्ही दिवसभर घराबाहेर राहिलो. सोबत कुणी नाही, फक्त आम्ही मित्र-मैत्रिणी आणि रत्नाताई. त्यादिवशी इतकं आझाद वाटलं की काय सांगू.”

या मुला-मुलींमध्ये निकोप मैत्री व्हावी, त्यांनी स्वत:चे प्रश्न समजून काम करावं, समानता, धर्मनिरपेक्षतेसारखी मूल्यं त्यांच्यात रुजावीत, याकरता या वस्तीतले सगळ्या मुलांचे लाडके अब्रार खालूही खूप मेहनत घेतात. मी गेले होते, तेव्हा सगळे अब्रार खालूच्याच घरी जमले होते. अब्रार सलमानी भीमनगर वस्तीत ‘एकता वेल्फेअर असोसिएशन’च्या माध्यमातून वस्तीपातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी काम करतात. मागील काही वर्षांपासून ते ‘कोरो’शी जोडले गेलेले आहेत. थोडेसे वृद्धत्वाकडे झुकलेले, हसतमुखाने स्वागत करणारे अब्रार सलमानी फार प्रसन्न दिसतात. रुढार्थाने शिक्षण न झालेले अब्रार खालू भीमनगर वस्तीसाठी आणि त्यांच्या प्रिय मुला-मुलींसाठी स्वतच्या घराची, स्वयंसेवी संस्थेच्या ऑफिसची दारं नेहमीच खुली ठेवतात. या मुलांची प्रगती पाहून त्यांना भरून येतं. ते म्हणतात, “मी इथं आलो तेव्हा इथं चिखलाशिवाय काहीही नव्हतं. आम्हाला या वस्तीत हरेक गोष्टीसाठी झगडावं लागलं आणि अजूनही आम्ही झगडतो. कधी लालफितीतला कारभार तरी कधी स्थानिक राजकारण आडवं येतं, पण ‘कोरो’च्या मदतीनं आमची मुलं इतकी हुशार झालीत, की आता त्यांच्या खांद्यावरच सगळी मदार आहे. आमच्या वस्तीत लाईट, पाणी नाही, म्हणून ज्या मुली पुढे येऊन बोलल्या, मीडियाला बाईट्स दिले, त्यांना वस्तीतल्या गुंडांकडून नंतर धमक्याही आल्या पण मुली अजिबात घाबरल्या नाहीत.”

इवल्याशा या मुली एकाच वेळी अनेक पातळ्यांवर लढताहेत. अभावग्रस्ततेचा टिळाच लावून जन्माला आल्याने मूलभूत जगण्यासाठी, शिक्षणासाठी, स्व-सुरक्षेसाठी, घरातल्या पुरुषसत्तेशी…अशा अनेक पातळ्यांवर लढताना त्यांची उमेद कायम आहे. प्रत्येकीला काही तरी बनायचंय. डॉक्टर, शिक्षक, समाजसेवक वगेरे. शिवाय त्या किशोरवयात त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्जनशील, शिक्षणास पूरक आणि मुख्य म्हणजे लिंगभाव समता असलेल्या स्पेसचा शोध घेत आहेत.

या धडपडीत त्यांचा आत्मविश्वास वाढतोच आहे, हे कसं काय? जगण्याचीच भ्रांत असलेल्या वस्तीत अशा प्रकारचं काम उभारणं किती आव्हानात्मक आहे? या प्रश्नांवर कोरोच्या ‘युवा मंथन’चे कार्यक्रम अधिकारी राहुल गवारे सांगतात,  “या मुलांचे प्रश्न त्यांनीच सोडवावेत, यावर आमचा भर असतो. त्याकरता लागणारी सर्व प्रकारची मदत, ग्रास रुट लीडरशिप – फेलोशिपच्या माध्यमातून विकसित करण्याचं काम आम्ही करतो. जेंडर इक्वॉलिटीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर अशा वस्त्यांमध्ये कामाच्या विभागणीच्या पातळीवर समता दिसते, घरात मुलगा असो की मुलगी – त्यांना पाणी भरण्यापासून विविध कामं अपरिहार्यपणे करावीच लागतात. पण ही फंक्शनल इक्वॉलिटी एवढ्यापुरतीच मर्यादित राहू नये. अपरिहार्यता म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून आपण सगळे समान आहोत, हा विचार सैद्धांतिक पातळीवर त्यांच्यात रुजावा, यासाठी आमचे प्रयत्न वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू असतात. रत्नासारख्या कम्युनिटी लीडरचा त्यात मोठा रोल आहे. मुला-मुलींना जड-बोजड शब्दांत व्याख्यानं देण्यापेक्षा खेळ, गाणी, त्यांचेच प्रश्न – त्यावरची उत्तरं आणि इतर माध्यमांतून आम्ही हे करतो.”

वंदना, केसर, रुक्सार आणि भीमनगर वस्तीत राहणाऱ्या त्यांच्या इतर मैत्रिणी या केवळ स्वत:साठी, घरातून बाहेर पडण्याची, फिरण्याची, मोकळेपणाने हसण्या-बोलण्याचीच, मुलांशी मैत्री करण्याचीच आजादी मिळवू पाहत नाहीयेत – अर्थात या छोट्या छोट्या गोष्टींकरता त्यांना स्वतंत्र पैस मिळणं महत्वाचंच आहे, पण त्यापुढे जात आपल्या वस्तीलाही शोषणापासून आझादी मिळवून द्यायला हवी, हे भानही त्यांच्या डोळ्यांत तरळत होतं. त्यांच्या आझादीचं खूप कौतुक वाटण्याचं आणि त्यावर हा वृत्तांत लिहिण्याचं हे एक मुख्य कारण…

शब्दश: चक्रव्यूहासारख्या दिसणाऱ्या त्यांच्या वस्तीतल्या शोषणापासून, पुरुषसत्तेपासून आणि विषम समाजव्यवस्थेपासूनही त्या आझादी मिळवण्याचा पावलोपावली प्रयत्न करतीलच, अशी खात्री त्यांना भेटल्यावर वाटली नसती तरच आश्चर्य…!

प्रियांका तुपे, मुक्त पत्रकार असून, लाडली मीडिया फेलोशिपअंतर्गत त्यांनी हा वृत्तांत केलेला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0