‘कोणत्याही विचारधारेची मुस्कटदाबी करता येत नाही’

‘कोणत्याही विचारधारेची मुस्कटदाबी करता येत नाही’

नवी दिल्लीः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अग्रणी व सनातनी हिंदुत्वाचे समर्थक एम. एस गोळवलकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन वाहणारे ट्विट केंद्रीय सांस्कृतिक खात्याने शुक्रवारी प्रसिद्ध केल्यानंतर या खात्यावर टीका झाली होती. पण सांस्कृतिक खात्याने या टीकेला उत्तर देताना समाजातील सर्व प्रकारच्या विचारांचे आम्ही प्रतिनिधित्व करत असून कोणत्याही विचारधारेची मुस्कटदाबी करण्यावर आपला विश्वास नाही, असे स्पष्ट केले आहे.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी केंद्रीय सांस्कृतिक खात्याने गोळवलकर हे थोर विचारवंत, विद्वान व अध्वर्यू नेते होते, त्यांचे विचार भविष्यात अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरतील अशा शब्दांत त्यांच्या जयंतीबद्दल  अभिवादन करण्यात आले होते. या ट्विटवर काँग्रेसचे खासदार शशी थरूर, गौरव गोगोई सहित अनेक ट्विट खात्यांकडून म. गांधींच्या मूल्यांचा विरोध करणार्या गोळवलकर यांना अभिवादन करण्याच्या सरकारच्या प्रयत्नावर टीका झाली होती. काही जणांनी गोळवलकर यांची मुस्लिम धर्माबद्दलची मते, ज्यू हत्याकांडासंदर्भात हिटलरचे केलेले समर्थन यांचे दाखल देत सरकारवर टीका केली होती. गोळवलकर स्वतंत्र भारताचा झेंडा व राज्यघटनेचाही आदर करत नव्हते, असा थरूर यांनी आरोप केला होता.

म. गांधींचे मारेकरी नथुराम गोडसे याची पूजा करण्यात काहीच चुकीचे नव्हते असे वक्तव्य केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी संसदेत आपल्याशी बोलताना केले होते, याची आठवण तरुण गोगोई यांनी करून दिली होती.

१९ फेब्रुवारीला गोळवलकर यांच्या जयंतीचे ट्विट केल्यानंतर प्रल्हाद सिंग पटेल यांचे माध्यम सहाय्यक नितीन त्रिपाठी यांनी आणखी एक ट्विट करत भारत हा सांस्कृतिक दृष्ट्या बहुसांस्कृतिकता जपणारा देश असून बहुसांस्कृतिकतेमुळे भारतात विविध राष्ट्रे वसली आहेत. सांस्कृतिक खाते हे समाजाच्या सर्वप्रकारच्या वर्गाच्या इच्छा आकांक्षांचे प्रतिनिधित्व करत असून कोणत्याही विचारधारेचा आवाज दाबण्यावर आमचा विश्वास नसल्याचे स्पष्ट केले होते. त्रिपाठी यांनी आणखी एक ट्विट करत विशिष्ट सामाजिक-सांस्कृतिक गुण, रितीरिवाज, परंपरा व मूल्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे व भारताच्या लोकशाहीला आवश्यक असणारी तत्वे येथे अनेक शतके आहेत, असे म्हटले होते.

केंद्रीय सांस्कृतिक खात्याच्या गोळवलकरांना अभिवादन करणार्या ट्विटची अनेक केंद्रीय मंत्र्यांनी व भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली होती. भाजपचे एक खासदार राकेश सिन्हा यांनी या ट्विटसंदर्भात सांस्कृतिक खात्याचे अभिनंदनही केले होते.

नेमके प्रकरण काय आहे?

केंद्रीय सांस्कृतिक खात्याने गोळवलकरांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारे एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये गोळवलकर हे थोर विचारवंत, विद्वान व अध्वर्यू नेते होते, त्यांचे विचार भविष्यात अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरतील अशा शब्दांत त्यांचा गौरव केला होता.

वास्तविक गोळवलकर हे लोकशाहीविरोधी होते व तसे त्यांचे विचार प्रसिद्ध आहेत. सध्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही गोळवलकर यांच्या विचारांपासून स्वतःला वेगळे ठेवले होते. २००६मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गोळवलकर यांच्या एका पुस्तकापासून स्वतःची फारकत जाहीर केली होती.

म. गांधी यांच्या हत्येत वि. दा. सावरकर यांच्यासहित गोळवलकर हेही आरोपी होते. पण त्यांची नंतर सुटका झाली होती.

हिंदू व मुस्लिम एकत्र नांदू शकत नाहीत, अशी पाकिस्तानचे जनक जीना यांची भूमिका होती, तशीच भूमिका गोळवलकर यांचीही होती. ते स्वतंत्र हिंदू राष्ट्राची मागणी करत होते.

We, or Our Nationhood Defined या पुस्तकात गोळवलकर यांनी हिंदू संस्कृती स्वीकारल्याशिवाय मुस्लिमांना कोणतेही अधिकार देऊ नये, अशी भूमिका मांडली होती. मुस्लिमांना दुय्यम नागरिकत्व द्यावे अशीही त्यांची भूमिका होती.

गोळवलकरांनी आपल्या Bunch of Thoughts या अन्य एका पुस्तकात मुस्लिम, ख्रिश्चन व कम्युनिस्ट हे राष्ट्रवादाचे खरे शत्रू असल्याची मांडणी केली होती.

 मूळ बातमी

COMMENTS