‘द्र’ – दिल्लीतला आणि मुंबईतला

‘द्र’ – दिल्लीतला आणि मुंबईतला

राजकारणात पहिला वार गुरूवर करावा लागतो कारण चेल्याला त्याच्याकडूनच विद्या प्राप्त झालेली असते. आपली राजकीय वाट मुख्यमंत्री झाल्यावर निष्कंटक राहावी म्हणून त्यांनी पहिला बंदोबस्त खडसेंचाच केला. पंकजा मुंडे यांच्यात स्पार्क आहे हे महाराष्ट्रातल्या ‘द्र’नी हेरले होते, त्यामुळे त्यांचा पाय चिक्कीच्या चिखलात रूतेल अशी व्यवस्था केली. मध्यंतरी तावडेंच्या महत्त्वाकांक्षेने थोडी उचल खाल्ली होती, तेंव्हा तावडेंना राज्यपाल म्हणून कुठेतरी पाठवणार असल्याच्या वावड्या उठल्या आणि तावडेंनी आपली सतरंजी केवढी आहे ते नीट पाहून घेऊन पुन्हा हातपाय आक्रसून घेतले. नारायण राणेंना त्यांनी ज्या पद्धतीने घोळात घेऊन, पायात पाय घालून खाली पाडले, त्याला तर तोडच नाही.

ती ऑफर नाकारली – पवार
हरिद्वार धर्मसंसदेत मुस्लिमांच्या शिरकाणाचे आवाहन
हलाल मांसावर बंदी हवीः भाजप आमदाराची मागणी
लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

गेली पाच वर्षे नरेंद्र हे नाव जेवढे आणि जसे आपल्या कानावर सतत पडत राहिले तसेच देवेंद्र हे नावही सर्व प्रसार माध्यमांमधून आपल्या कानी गुंजत राहिले आहे. दिल्लीतले ‘द्र’ हे मुख्यमंत्री म्हणून प्रशासक म्हणून साधारण काय पद्धतीने काम करतात हे आपल्याला गुजरातमुळे माहिती होते, परंतु महाराष्ट्रातले ‘द्र’ राजकारणी म्हणून थोडेफार माहिती होते आणि प्रशासक म्हणून सर्वस्वी अपरिचित होते. त्यांचा लोभस चेहरा, गोड बोलणे आणि तोवरची विधासभेतील कामगिरी यामुळे एक प्रसन्न, मनमिळावू आणि तरुण नेतृत्व म्हणून त्यांच्या कोऱ्या पाटीकडे पाहिले गेले होते. पाच वर्षे संपता संपता, त्यांच्या स्वतःच्याच पक्षातील नेते आता या ‘द्र’चा उल्लेख ‘शातीर’ या शब्दांत करत आहेत. शातीरचा सोप्या मराठीतला अर्थ ‘पोचलेला’ (खरं तर एकेकाला पोचवणारा) असा होतो आणि जरा शुद्ध मराठीत ‘धूर्त’ असा होतो. त्यांनी सत्तेवर, राजकारणावर अशी काही मांड ठोकली आहे की त्यांच्यासमोर तोंडातून ‘द्र’ काढायची कुणाची हिंमत राहिलेली नाही. ज्यांची ज्यांची अशी हिंमत होऊ शकते असे वाटत होते त्या सर्वांचा चोख बंदोबस्त करण्याचा एककलमी कार्यक्रम या महाराष्ट्रातले ‘द्र’ यांनी राज्यात गेली पाच वर्ष राबवला आहे. अनेक बाबतीत ते दिल्लीतील ‘द्र’चे अक्षरशः प्रतिबिंब वाटतात. ते स्वच्छतागृहांच्या प्रचंड संख्येबाबत जसे शुध्द लोणकढी जबर आत्मविश्वासाने ठोकून देतात तेच महाराष्ट्रातले ‘द्र’  जलयुक्त शिवाराबाबत करतात.

राजकारणात पहिला वार गुरूवर करावा लागतो कारण चेल्याला त्याच्याकडूनच विद्या प्राप्त झालेली असते. विरोधी पक्षात असताना, एकनाथ खडसेंनी प्रकृतीच्या कारणास्तव आणि कदाचित आपला पक्ष सत्तेत येण्याची शक्यता त्यांना तेंव्हा अजिबात वाटत नसल्याने सतत देवेंद्र फडणवीस यांना पुढे केले होते. राज्यात सत्ता आलीच तर गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री होणार हे खडसेंच्याही मते निश्चित होते. परंतु ३ जून २०१४ रोजी मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला आणि बदललेल्या परिस्थितीत खडसे बाजूला पडले, महाराष्ट्रातल्या ‘द्र’ने बाजी मारली. ऑक्टोबर २०१४ मध्ये राज्यातला भाजपचा पहिला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. आपली राजकीय वाट पुढे निष्कंटक राहावी म्हणून त्यांनी पहिला बंदोबस्त खडसेंचाच केला. पंकजा मुंडे यांना सत्तापद जरी राजकीय वारसदार म्हणून मिळाले असले तरी त्यांच्यात स्पार्क आहे हे त्यांनी हेरले होते, त्यामुळे पंकजा यांचा पाय चिक्कीच्या चिखलात रूतेल अशी व्यवस्था केली. (हे चिक्की प्रकरण नेमके २०१९च्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा उद्भवले आहे, हा केवळ योगायोग समजावा.) शिक्षणमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून विनोद तावडेंनी थोडा आवाज करण्याचा प्रयत्न केला, तेंव्हा ‘द्र’ यांनी नेमकी कुठली कळ फिरवली ते माहिती नाही परंतु तावडे पत्रकारांना एकट्या दुकट्याला भेटायचेसुद्धा टाळतात, असे म्हटले जाते. मध्यंतरी तावडेंच्या महत्त्वाकांक्षेने थोडी उचल खाल्ली होती तेंव्हा तावडेंना राज्यपाल म्हणून कुठेतरी पाठवणार असल्याच्या वावड्या उठल्या आणि तावडेंनी आपली सतरंजी केवढी आहे ते नीट पाहून घेऊन पुन्हा हातपाय आक्रसून घेतले. पक्षाबाहेरील राजकारणही त्यांनी फार हुषारीने केले. नारायण राणेंना त्यांनी ज्या पद्धतीने घोळात घेऊन, पायात पाय घालून खाली पाडले त्याला तर तोडच नाही.

सत्तेस सहभागी असलेल्या शिवसेनेच्या नेतृत्वाचे पळपुटे आणि स्वार्थी राजकारण फडणवीस यांच्या पत्थ्यावर पडले. राज्यात काही कल्याणकारी करावे, सत्ता आलीच आहे तर आपल्या मंत्र्यांकरवी चार चांगल्या गोष्टी करून घ्याव्यात, यात उद्धव ठाकरेंना काडीचाही रस असल्याचे कधीच दिसले नाही. केवळ मुंबई महापालिकेपुरते त्यांचे राज्य होते तेंव्हा आणि राज्याच्या सत्तेत वाटा मिळाला तेव्हाही, त्यांचे एकच धोरण होते –  ज्याला राजकीय भाषेत ‘एमएमडी, टीटीजी’ (माझे मला द्या, तुमचे तुम्हाला घ्या) म्हणतात. सेनेला राज्यापेक्षा मुंबई महापालिकेत रस आहे, राज्यातील ताकदीचा वापरही केवळ मुंबई महापालिका राखण्यातच करायचा आहे हे ताडून फडणवीसांनी एक धोरणी पाऊल टाकत, उद्धव ठाकरेंना मुंबई ‘आंदण’ देऊन टाकली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या निमित्ताने दादर चौपाटीजवळची महापौर निवासाची मोक्याची मौल्यवान जागाही ताब्यात देऊन टाकली आणि दुसऱ्या पावलात उर्वरित महाराष्ट्र स्वतः पादाक्रांत केला.

पोकळ घोषणाबाजी हे दिल्लीतील ‘द्र’चे वैशिष्ट्य आहे, हे राज्यातील ‘द्र’ने चांगलेच लक्षात ठेवले आणि त्यांचा कित्ता गिरवला. जलयुक्त शिवारावर पाच वर्षात अक्षरशः हजारो कोटी रूपये खर्च केले, त्याचा गवगवा केला आणि फार मोठी जलक्रांती केल्याचा आव आणला. प्रत्यक्षात ज्या विदर्भाचा दुष्काळ दूर करण्यासाठी हा पैसा खर्च झाला त्या विदर्भाच्या अकरा जिल्ह्यांपैकी सात जिल्ह्यात यावर्षीसुद्धा दुष्काळ जाहीर करावा लागला. मग ही जलक्रांती झाली कुठे? विदर्भातील उर्वरित चार जिल्हे शहरी आहेत आणि गेल्या पाच वर्षात विदर्भात जेवढ्या मोठ्या योजना केल्या गेल्या त्या सर्व या चार जिल्ह्यांतच राबवल्या जात आहेत. सगळा पैसा केवळ, फडणवीस-गडकरी-मुनगंटीवार यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या ‘नागपूर, चंद्रूपर, भंडारा आणि वर्धा’ याच परिसरात आला आहे. परंपरेने विकासापासून वंचित राहिलेला वऱ्हाड प्रांत म्हणजे यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम हे पाच जिल्हे आजही तृषार्त आणि भेगाळलेलेच आहेत.

 ‘कंटेंटपेक्षा इव्हेंटवर भर’ हे दिल्लीतल्या ‘द्र’ यांचे आणखी एक महत्त्वाचे सूत्र.

२०१६च्या फेब्रुवारी महिन्यात ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत पहिली परिषद भरवण्याच्या निमित्ताने ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ आयोजित करून फडणवीसांनी आपणही इव्हेंटचे बादशहा आहोत हे दाखवून दिले. या परिषदेत ८ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले होते. त्यापैकी प्रत्यक्षात केवळ ७० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे काम सुरू झाले असल्याचे तज्ज्ञ सांगतात. हा आकडा थोडाबहुत अधिकही असू शकेल परंतु तो ८ लाख कोटींच्या तुलनेत नगण्यच आहे. म्हणजे बोभाटा रूपयाचा आणि कमाई पाच पैशाची अशीच ही स्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी अमेरिका, चीन जपान, जर्मनी,स्वीडन, इस्रायल, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिराती या देशांना भेटी देऊन झाल्या, तिथून  गुंतवणूकीच्या रूपात पैसा किती आला हे मात्र गुलदस्त्यातच आहे. याचे मुख्य कारण बहुधा, राज्याचा विकास वगैरे नंतर करू आधी खुर्चीचे पाय मजबूत करून घेऊ आणि त्या मजबुतीसाठीची तरतुद करून घेऊ असा एकूण रोख होता.

गिरीश महाजन, डॉ रणजीत पाटील या दोन तरूण मंत्र्यांना हाताशी धरून महाराष्ट्रातल्या ‘द्र’ने  पक्षांतर्गत एक वेगळी फळी निर्माण केली आणि सत्तेचा बुंलद दरवाजा ताब्यात ठेवला. प्रतिस्पर्धी म्हणून हतबल विरोधी पक्ष मिळाला हे या ‘द्र’चे सुदैव! म्हणूनच त्यांना पक्षातील विरोधकांच्या मुसक्या बांधण्यावर लक्ष केंद्रीत करता आले. दिल्लीतले ‘द्र’ ज्या प्रमाणे एकाही भाषणात आपल्या पाच वर्षातील महत्वाच्या कामाविषयी चकार शब्द काढत नाहीत, तसेच आमचे ‘द्र’ही  उंच पट्टीत आणि एकाच सूरात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि आता मनसेवर टीका करण्याखेरीज काही करत नाहीत.

विकासाचे शुद्ध पाणी दिल्लीच्या आडातच नाही तर मुंबईच्या पोहऱ्यात तरी कुठून येणार?

अगस्ती चापेकर, घरंदाज राजकीय विश्लेषक असून, लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0