शासनसत्ता, बाजारव्यवस्था आणि समष्टी

शासनसत्ता, बाजारव्यवस्था आणि समष्टी

“जगभरच्या मनुष्य समाजाचा डोलारा त्या त्या देशात शासनसत्ता, बाजार आणि समष्टी या तीन स्तंभांवर सावरला आहे. हे तिन्ही स्तंभ ऐतिहासिक प्रक्रियेत उत्क्रांत झाले आहेत. त्यांच्यामध्ये समतोल असेल तर समाजात स्थैर्य असते. ते संतुलन बिघडले की अस्थिरता आणि कलह निर्माण होतात. संतुलन बिघडण्याची अनेक कारणे असतात.” भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची ही वरील मांडणी ‘द थर्ड पिलर’ या पुस्तकातून दिसून येते. त्यांचे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक २०१९ मध्ये प्रसिद्ध झाले. त्याचा शारदा साठे व शेखर साठे यांनी केलेला मराठी अनुवाद ‘तिसरा स्तंभ’ या नावाने मधुश्री पब्लिकेशनने नुकताच प्रसिद्ध केला असून या पुस्तकातील मनोगत द वायर मराठीच्या वाचकांसाठी देत आहोत.

खरेतर रघुराम राजन यांनी स्वतः पुस्तकाच्या सुरुवातीला पुस्तकाची प्रस्तावना आणि ओळख लिहिलेली आहे. पुस्तक कसे वाचावे, त्यातील विषय कसे समजून घ्यावे याच्याही सूचना त्यांनी दिल्या आहेत. मग

भाषांतरकारांचे स्वतंत्र मनोगत देण्याचे प्रयोजन काय? त्याची अनेक कारणे आहेत. लेखक रघुराम गोविंद राजन यांच्या भोवती तरुण वयातच कमावलेल्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वलय आहे आणि भारतातील त्यांच्या रिझर्व्ह बँकेतील कारकिर्दीसंबंधी त्यांनी केलेली निवेदने सौम्य असली तरी स्पष्टवक्तेपणाची आहेत. पुस्तकाचा विषयही अनोखा आहे. ते वित्तशास्त्राचे पदवीधर असले तरी त्यांचा अर्थवेत्ते म्हणून गवगवा आहे. त्यामुळे प्रस्तुत पुस्तक बहुतकरून अर्थविषयक आणि वित्तविषयक आहे अशी सहज समजूत होऊ शकते. अर्थात, तसा पूर्वग्रह असंयुक्तिक नसला तरी पुस्तकाचा विषय आणि मांडणी अतिशय

व्यापक आहे. राज्यशास्त्र, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र अशा विविध अंगांनी ऐतिहासिक आढावा घेत राजन यांनी जागतिक सद्यस्थितीचे चित्र केले आहे, त्याच बरोबर अधिक सुसह्य भविष्याकडे नेणारे

दिशादर्शन केले आहे. त्यामुळे राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र शिवाय इतिहास या विषयांच्या अध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना हे पुस्तक अभ्यासणे अनिवार्य वाटेल. त्याइतकेच सामाजिक आणि

राजकीय चळवळीतील कार्यकर्ते, धोरणकर्ते आणि कारभार चालविण्यास जबाबदार असलेली मंडळी यांच्या दृष्टीने ह्या पुस्तकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. राजन यांच्या मूळ सिद्धांताचा आणि त्यांनी व्यक्त केलेल्या भविष्याबद्दलच्या चिंतेचा इथे थोडक्यात उल्लेख करणे अप्रस्तुत होणार नाही.

सारांशरूपाने त्यांचा सिद्धांत असा आहे: “जगभरच्या मनुष्य समाजाचा डोलारा त्या त्या देशात शासनसत्ता, बाजार आणि समष्टी या तीन स्तंभांवर सावरला आहे. हे तिन्ही स्तंभ ऐतिहासिक प्रक्रियेत उत्क्रांत झाले आहेत. त्यांच्यामध्ये समतोल असेल तर समाजात स्थैर्य असते. ते संतुलन बिघडले की अस्थिरता आणि कलह निर्माण होतात. संतुलन बिघडण्याची अनेक कारणे असतात. त्यामध्ये तंत्रज्ञानांमधील बदल व

तदनुषंगाने होणाऱ्या बदलात उत्पादकता व उत्पादनपद्धती, रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये, शिक्षणव्यवस्था, स्वास्थ्य तसेच सामाजिक सुरक्षा इत्यादींचा समावेश होतो. त्या कारणांचे निवारण

समाजधुरीणांनी करायचे असते. सध्याच्या काळात बाजार आणि शासनसत्ता हे दोन्ही स्तंभ बलवत्तर झाले असून त्यांनी समष्टीची पीछेहाट केली आहे. समष्टीचा तिसरा स्तंभ सशक्त करून तिन्ही स्तंभांमध्ये संतुलन निर्माण करणे आवश्यक आहे.”

भविष्याबद्दल त्यांना वाटणारी चिंता थोडक्यात पुढीलप्रमाणे. “दुसऱ्या जागतिक युद्धानंतर गेल्या सत्तर वर्षांत बाजाराधिष्टित उदारमतवादी लोकशाही व्यवस्थेमध्ये जगाची भरभराट शक्य झाली. त्या व्यवस्थेलाच धोका निर्माण झाला आहे. अनेक कारणांमुळे लोकांना भविष्याबद्दल असुरक्षित वाटते. तंत्रज्ञानामध्ये होत चाललेल्या बदलांमुळे, नवीन संधी आणि सामाजिक सुरक्षितता देण्यास सरकारे

अपयशी ठरत असल्यामुळे, जागतिक बाजारपेठेच्या दबावाखाली विकसित देशांच्या अर्थव्यवस्थासुद्धा अस्थिर झाल्यामुळे जगाच्या अनेक भागातील समष्टी उखडल्या जाऊ लागल्या आहेत. परिणामी लोकांमधील असंतोषाच्या जोरावर जगभरच लोकप्रियतावादी, डावे असोत व उजवे, कट्टर विचार उसळी घेत आहेत. वर्तमानकाळ भूतकाळाशी तंतोतंत कधीच जुळत नाही. पण सध्याच्या काळातला जगातल्या अनेक भागातला एकाधिकारशाही सत्तांचा व ताकदवान पुढाऱ्यांचा उदय आणि प्रस्थापित उदारमतवादी व्यवस्थेच्या मोडतोडीचे वातावरण पाहता सद्यस्थिती आणि १९३० च्या काळातली जागतिक स्थिती यांमध्ये पुष्कळ साधर्म्य आहे असे म्हणावे लागेल. त्यामुळे जागतिक शांततेला धोका निर्माण झाला आहे, ती जोखीम वाढत आहे.”

लेखकाबद्दल ….

प्रत्यक्ष पुस्तक हीच लेखकाची खरी ओळख असते. इतर माहिती पुस्तकाच्या वेष्टनावर थोडक्यात द्यायचा प्रघात आहे. परंतु भारतीय संदर्भांसहित पुस्तकातील विश्लेषण समजून घेण्यासाठी रघुराम राजन यांच्याबद्दल अधिक विस्ताराने माहिती घेतली तर त्याचा निश्चित उपयोग होईल. त्याची दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे ते भारतीय असलेतरी त्यांची बौद्धिक जडणघडण जागतिक, आधुनिक व प्रामुख्याने उदारमतवादी, पाश्चात्य विद्यापीठीय शैक्षणिक शिस्तीमध्ये झाली आहे. आणि दुसरे कारण म्हणजे भारतामध्ये मोठे राजकीय स्थित्यंतर होत असताना, अत्यंत मोक्याच्या काळात ते भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी विराजमान होते. या दोन्ही गोष्टी डोळ्यासमोर ठेऊन “तिसरा स्तंभ” वाचले तर विद्यमान काळात जगाला आणि देशाला भेडसावणाऱ्या प्रश्नांची व्याप्ती आणि खोली यांचे आकलन व्हायला मदत होईल.

राजन यांचे वडील परराष्ट्र खात्यात अधिकारी असलेतरी गुप्तचर खात्याशी (रिसर्च अँड अनालिसिस विंग – रॉ) संबंधित होते. त्यामुळे वेगवेगळ्या देशांत राजन यांचे बालपणीचे वास्तव्य राहिले आहे. १९६५-६६ मध्ये इंडोनेशियाच्या रक्तरंजित धकाधकीच्या काळात तेथील कम्युनिस्ट पक्षाच्या लक्षावधी कार्यकर्त्यांचे आणि चाहत्यांचे शिरकाण झाले. त्या काळात राजन कुटुंबियांचे वास्तव्य इंडोनेशियामध्ये होते. १९७० साली श्रीलंकेमध्ये असताना तेथील तामिळ-सिंहली बंडाळीमुळे त्यांचे सुरुवातीचे एक शैक्षणिक वर्ष वाया गेले होते. पुढे१९७४ मध्ये वडिलांची बेल्जियमहून दिल्लीला बदली झाल्यानंतर ते भारतात परतले. आरकेपुरममधील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण करून दिल्लीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगला त्यांनी प्रवेश घेतला. तिथे त्यांना सर्वोत्तम अष्टपैलू विद्यार्थी म्हणून सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले. १९८७ मध्ये अहमदाबादच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधून पहिल्या क्रमांकाने एमबीएची परीक्षा उत्तीर्ण झाले. काही महिने टाटा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस मध्ये उमेदवारी करून

रघुराम राजन

रघुराम राजन

अमेरिकेतील सुप्रसिद्ध एमआयटी विद्यापीठाच्या स्लोन मॅनेजमेंट स्कूल मध्ये त्यांनी पीएचडी करण्यासाठी प्रवेश मिळविला. १९९१ मध्ये त्यांना पीएचडी प्राप्त झाली. त्यांच्या प्रबंधाचे शीर्षक होते, “एसेज ऑन

बँकिंग”. त्यात पतपुरवठादार बँकांचे आणि त्यांचे कर्जदार कंपन्या तसेच सरकारे यांच्यामधील संबंध कसे असतात, कर्जपुरवठा आणि गुंतवणूक यातील परस्पर विरोध तसेच सरकारी कर्जाची महागाई निर्देशांकाशी

सांगड घालण्याचा प्रश्न याविषयी मांडणी आहे. ह्यात नोंद घेण्यासारखी गोष्ट अशी की राजन यांचे शिक्षणाचे विषय व्यावसायिक (उदाहरणार्थ इंजिनियरिंग, व्यवस्थापन, वित्तकारण ) होते, बिगर व्यावसायिक म्हणजे मूलभूत संशोधनासंबंधी नव्हते. शिक्षणाने ते अर्थशास्त्रज्ञ (इकॉनॉमिस्ट) नव्हते तर वित्तव्यवसायी होते. पुष्कळदा वित्तशास्त्र आणि अर्थशास्त्र यांच्यामध्ये गल्लत होते. वस्तू आणि सेवा यांचे उत्पादन, वितरण, व्यापारउदीम, रोजगार, गरिबी, चलनव्यवहार इत्यादी विषयांचा आणि तत्सबंधी धोरणांचा अभ्यास प्रामुख्याने अर्थशास्त्रामध्ये अभिप्रेत आहे. तर, अर्थव्यवस्थेमधील सर्व घटकांच्या

व्यवहारांसाठी आवश्यक कर्ज व भांडवल पुरवठा, तद्नुषंगाने संस्थात्मक रचना, धोरणे व नियमावली हे प्रामुख्याने वित्तशास्त्राचे विषय आहेत. अर्थात ही विभागणी कठोर किंवा अविवाद्य नाही, उलटपक्षी परस्पर पूरक आहे. आर्थिक धोरणांची रचना व मीमांसा करण्यासाठी दोन्ही क्षेत्रातील ज्ञान आणि अनुभव आवश्यक आहे.

पीएचडी प्राप्त झाल्यानंतर राजन यांनी १९९१ मध्ये शिकागो विद्यापीठाच्या बूथ बिझनेस स्कूलमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली. पुढे १९९५ साली तिथेच ते पूर्णवेळ प्राध्यापक झाले. पुढल्या कारकिर्दीत त्यांनी बँकिंग, कार्पोरेट फायनान्स, आंतरराष्ट्रीय फायनान्स, विकास आणि आर्थिक वाढ, संघटनात्मक घडण यांसारख्या विषयावर विपुल निबंधस्वरूपी लिखाण केले. त्या लेखनसंपदेचे संदर्भ प्रस्तुत पुस्तकात जागोजागी आढळतील. २००३ साली लुइगी झिंगेल्स यांच्या समवेत “सेव्हिंग कॅपिटॅलिझम फ्रॉम कॅपिटॅलिस्ट” (भांडवलशाहीला भांडवलदारांपासून वाचविण्यासाठी) या शीर्षकाचे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्याच वर्षी इंटरनॅशनल मोनेटरी फंड (आयएमएफ)च्या तत्कालीन उप-महासंचालक ऍन क्रूगर यांनी प्रमुख अर्थशास्त्रज्ञ पदासाठी राजन यांना पाचारण केले. मी तर अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला नाही, मी वित्तशात्राचा अभ्यास केला आहे असे त्यांनी म्हणताच आयएमएफला वित्तशास्त्राची जाण असलेल्या व्यक्तीची गरज आहे असे त्यांना सांगण्यात आले. आयएमएफला प्रथमच चाळीशीच्या

आतली तरुण, विशेष म्हणजे, एखाद्या पौर्वात्य देशातून आलेली व्यक्ती प्रमुख अर्थशास्त्रज्ञ पदावर काम करण्यासाठी लाभली.

आयएमएफमध्ये असताना २००५ साली त्यांना ‘जॅक्सन होल’ या पर्यटन स्थळी भरलेल्या एका आर्थिक परिषदेमध्ये निबंध सादर करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेचे (अमेरिकेची केंद्रीय बँक) तत्कालीन अध्यक्ष ऍलन ग्रीनस्पॅन २० वर्षांची कारकीर्द पूर्ण करून निवृत्त होणार होते. सर्वात यशस्वी आणि चाणाक्ष केंद्रीय बँक प्रमुख म्हणून त्यांचा बोलबाला होता. परिषदेमध्ये त्यांच्या कारकिर्दीचा गुणगौरव करणारे मतप्रदर्शन होईल अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. राजन यांचा निबंध मात्र वर्तमान वित्तव्यवस्थेमधील त्रुटी, वाढणारा धोका आणि खाजगी क्षेत्रावर टीका करणारा होता. व्याजाचे दर अत्यल्प ठेऊन आर्थिक विकास साधण्याच्या धोरणामुळे गृहकर्जाचा डोंगर उभा राहत आहे, इतकेच नव्हे तर बँकांचा स्वतःचा कर्जबाजारीपणा त्यांच्या स्वतःच्या भांडवलाच्या तुलनेत बेसुमार वाढून कर्जाचा फुगा फुटला तर संपूर्ण बँकिंग व्यवस्थाच धोक्यात येईल व त्याचे दुष्परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेला भोगावे लागून हलाखीची परिस्थिती उद्भवू शकते असे भाष्य करणारा होता. त्यांचे आयएमएफचे प्रतिनिधी म्हणून केलेले सडेतोड भाषण ऐकून प्रथितयश अर्थतज्ज्ञ आणि बँक व्यवस्थापकांचा श्रोतृवृंद चपापला होता. पुढे दोन वर्षांनंतर रघुराम राजन यांनी व्यक्त केलेला धोका प्रत्यक्षात आला आणि जगावर वित्तीय अरिष्टाचे महासंकट कोसळले. अर्थशास्त्राचे पंडित आर्थिक व वित्तीय धोरणामधील संभाव्य धोक्यांबद्दल भाष्य करीत नाहीत. धोरणांचे समर्थन अथवा खंडन करणाऱ्या माहितीवर आणि विश्लेषणावर त्यांचा भर असतो. वित्तशास्त्राचे अभ्यासक तुलनात्मक आणि संभाव्य धोक्यांवर लक्ष केंद्रित करतात. पण फारच थोडे लोक धोक्याच्या निमुळत्या संभाव्यतांचे (टेल रिस्कस्) इशारे लक्षात घेतात. राजन यांच्या जॅक्सन होल येथे वाचलेल्या निबंधाचे ते वैशिष्ट्य होते. त्यांच्या मते कुठच्याही व्यवस्थेत धोके हे असतातच. परंतु व्यवस्थेमधील घडामोडी आणि हितसंबंधींचे वर्तन व जोर यांच्यामुळे असंभाव्य वाटणारे धोके प्रत्यक्षात येऊ शकतात. आधीच्या दशकातील व्याजदराबाबतीतल्या नरमाईच्या धोरणामुळे, बँकांमधील नफ्यामागे धावण्याच्या अटीतटीच्या शर्यतीमुळे बँकांचे व्यवहार, व्यवस्थापकांचे पगार/बोनस फुगले, बँक-

व्यवहारमधील जोखीम लपविली जाऊ लागली आणि बड्याबड्या बँका दिवाळखोरीत निघू लागल्या. वित्तव्यवस्थेमधील अपघात आणि आघात यांचे वास्तविक अर्थव्यवस्थेवर होणारे दुष्परिणाम दिसायला वेळ लागत नाही. तसे ते जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आणि अमेरिकेसह जगातील अनेक देशात आर्थिक विकासाचा दर मंदावू लागला. युरोपियन महासंघाला तडे जाऊ लागले. त्याचे दुष्परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही दिसू लागले.

राजन यांचा आयएमएफमधील नेमणुकीचा काळ २००७ मध्ये संपला. त्यानंतर मोन्टेकसिंग अहलुवालिया यांच्या पुढाकाराने राजन यांच्या अध्यक्षतेखाली १२ सदस्यांची एक समिती नेमण्यात आली. भारतातील आर्थिक सुधारणांचा दुसऱ्या टप्प्यात काय करावे हे सुचविण्याची जबाबदारी त्या समितीकडे देण्यात आली. “शंभर छोटी पावले” या शीर्षकाचा अहवालही त्या समितीने सादर केला. राजकीय विवाद निर्माण करणाऱ्या मोठ्या घणाघाती सुधारणांच्या ऐवजी छोट्या छोट्या धोरणात्मक सुधारणा कराव्यात असा त्या समितीचा प्रस्ताव होता. पुढे २००८ मध्ये मनमोहन सिंग यांनी त्यांना मानद आर्थिक सल्लागार आणि नंतर २०१२ मध्ये वित्त मंत्रालयामध्ये कौशिक बसू यांच्यानंतरचे प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून नेमले. लवकरच २०१३ साली सप्टेंबर महिन्यात त्यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे २३वे गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली. पुढे काही महिन्यातच सार्वत्रिक निवडणूक होऊन युपीएचे सरकार गेले व राजकीय सत्तापालट होऊन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा वरचष्मा असलेले एनडीएचे सरकार आले.

मोदींची कार्यशैली विचारविनिमयाने व सहमतीने धोरण ठरविण्याची नाही हे लवकरच स्पष्ट झाले. नवीन सरकारने पहिल्याच वर्षी आर्थिक विकासाचा दर मोजण्याची पद्धत बदलली. त्याबद्दल राजन यांनी स्थूल

राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती फार काळजीपूर्वक आखल्या पाहिजेत असं म्हणून जाहीरपणे त्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. अनेक परंतु खरा संघर्ष पुढे हजार/पाचशेच्या नोटांच्या निश्चलनीकरणाच्या वेळी निर्माण झाला. निश्चलनीकरणाला त्यांचा स्पष्ट विरोध होता. “कथित उद्दिष्टे साध्य होणार नाहीत, काळा पैसा नवीन नोटांमध्ये परत फिरविण्याचे मार्ग पैसेवाले लोक शोधून काढतील. अशाप्रकारे निश्चलनीकरण केले तर लोकांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये मोठा व्यत्यय येऊन त्यामुळे खूप हानी सोसावी लागेल. करायचेच झाले तर पर्यायी नवीन नोटा छापून झाल्यावरच करावे, पण त्याबाबत गुप्तता राखणे अवघड जाईल.” पण हा सल्ला मोदींना रुचला नाही. सप्टेंबर २०१६ मध्ये राजन यांची ३ वर्षांची गव्हर्नरपदाची मुदत संपत होती. अजून ३ वर्षांची मुदत वाढ देणे शक्य होते. पण त्यासाठी घातलेल्या अटी राजन यांना मंजूर नव्हत्या तसेच निश्चलनीकरणाला त्यांचा विरोध असल्याने त्यांना गव्हर्नरपदावर राहू देणे सरकारसाठी सोयीचे नव्हते. त्यामुळे मुदत संपल्यावर राजन पुनश्च शिकागो विद्यापीठाच्या बूथ स्कूल ऑफ बिझनेस मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विद्यापीठाने ते पद त्यांच्यासाठी राखून ठेवले होते. निश्चलनीकरणाचा देशाच्या अर्थकारणावर खरंच विपरीत परिणाम झाला का? सरकार समर्थकांच्या म्हणण्याप्रमाणे अजिबात नाही. “परंतु २०१६ सालापर्यंत जागतिक विकासाचा दर कमी असूनही भारताची आर्थिक वाढ बरी होती. २०१६ साली भारताचा विकास दर सुमारे ७.५% होता. त्यानंतरच्या वर्षात जागतिक अर्थव्यवस्थेने गती घेऊन सुद्धा भारतातील आर्थिक वाढीचा दर खाली खाली येत राहिला आहे. काही खाजगी संस्थांच्या पाहणीनुसार १ कोटीहून अधिक लोकांचा रोजगार बुडाला तो अजून सावरला नाही.” (कोव्हीड साथीचा अर्थव्यवस्थेला फटका निश्चलनीकरणानंतर साडेतीन वर्षांनी बसला. त्यानंतर जागतिक अर्थव्यवस्था संकोचून घरंगळली आहे आणि भारताच्या दृष्टीने परिस्थिती अधिकच चिंताजनक आहे). राजन यांच्या पाठोपाठ उर्जित पटेल २४वे गव्हर्नर झाले पण तेही २ वर्षात त्या पदावरून पायउतार झाले. त्यांच्या नाराजीला निमित्त होते प्रस्तावित दिवाळखोरी कायद्यामध्ये ढिलाई आणण्यासाठी होत असलेल्या लुडबुडीला. त्यांचेही सरकारबरोबर या विषयावरून मतभेद झाले. त्यांची कारकीर्द सुरू झाल्यानंतर त्यांच्या जनसंपर्कावर आपले सावट येऊ नये म्हणून राजन यांनी आपल्या मतभेदांबद्दल फारसे भाष्य करावयाचे टाळले होते.

शिकागोला परतल्यावर त्यांनी प्रस्तुत पुस्तक लिहायला घेतले. २०१९ साली ते भारतात प्रसिद्ध झाले. अर्थात, हे पुस्तक भारताविषयी नाही. परंतु भारताबद्दल काही महत्त्वाची निरीक्षणे त्यात विस्ताराने आढळतील.

भाषांतराबद्दल ….

विषयाचे नाविन्य तसेच सैद्धांतिक, अभ्यासपूर्ण व अध्यापकीय मांडणी यामुळे हे भाषांतर करणे मोठे आव्हान होते. समाजाचा गाडा पुढे ओढण्यामध्ये समाजघटकांचा वाटा असतो असे म्हणण्यामध्ये तसे नाविन्यपूर्ण काही नाही. परंतु शासनसत्ता, बाजारव्यवस्था आणि व्यक्तींची सामूहिक जीवनशैली यांच्यामध्ये अन्योन्य संबंध असतो, एकूण संघटित समाजाचे ते तीन आधारस्तंभ आहेत आणि त्यांच्यामध्ये

सतत सहकार्य व संघर्ष घडत असतो ही मांडणी नाविन्यपूर्ण आहे. स्टेट आणि मार्केट या संज्ञांचे मराठी पर्यायी शब्द स्पष्ट आहेत. परंतु, ज्या कम्युनिटीला तिसरा स्तंभ म्हटले आहे, त्याला मात्र नेहमीच्या वापरातला मराठी पर्यायी शब्द नाही. समाज हा शब्द कम्युनिटी या शब्दात अभिप्रेत असलेल्या अर्थापेक्षा फार व्यापक आहे. ज्ञाती (अथवा जात), वस्ती, गाव, मंडळी, सभा, पंचक्रोशी, मठ, संस्था, शाळा, राज्य, राष्ट्र इत्यादी समुच्चयवादी शब्द कम्युनिटी या इंग्लिश शब्दाच्या जवळ जाणारे असलेतरी त्या शब्दांना वेगवेगळे कंगोरे आहेत आणि मराठीमध्ये विशिष्ट अर्थानेच त्यांची योजना होते. त्यामुळे त्या सर्वशब्दांचा मतितार्थ एकाच मराठी शब्दात व्यक्त करण्यासाठी आम्ही ‘समष्टी’ या शब्दाची निवड केली.

सुदैवाने, समष्टी हा शब्द मराठीत फारसा वापरात किंवा प्रचलित नाही. शिवाय कम्युनिटी या इंग्लिश शब्दाशी तो समरूप आहे. समष्टीचे अस्तित्व वर व्यक्त केलेल्या वेगवेगळ्या समुच्चयवादी शब्दांनी स्वतंत्रपणे सिद्ध होते. ‘कम्युनिटी’ शब्दाला ‘समाज’ हा शब्द निवडला नाही याचे कारण तो ‘सोसायटी’ या इंग्लिश शब्दाला चपखल बसणारा शब्द आहे. त्यामुळे रघुराम राजन यांच्या ‘कम्युनिटी’ या तिसऱ्या स्तंभाला आम्ही समष्टीचा स्तंभ असे म्हटले आहे.

काही इंग्लिश शब्द किंवा इंग्लिश भाषेत सहज व्यक्त केल्या जाणाऱ्या संकल्पना यांचे भाषांतर करताना ते प्रवाही आणि समजण्यास सोपे असेल याकडे आम्ही खास लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या ठिकाणी

पारिभाषिक किंवा संरचित शब्द वापरणे अपरिहार्य होते त्या ठिकाणी आम्ही कंसात मूळ इंग्लिश शब्द उद्धृत केला आहे. पुस्तक सिद्धान्तस्वरूपी व अभ्यासपूर्ण असल्यामुळे भाषांतरकाराचे पारंपरिक स्वातंत्र्य घेण्याचेसुद्धा आम्ही टाळले आहे. लेखकाचे म्हणणे जास्तीत जास्त अचूकपणे सादर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरीसुद्धा सुजाण वाचक मूळ इंग्लिश पुस्तकही स्पष्टतेसाठी पाहतील अशी आमची अपेक्षा आहे. प्रस्तावनेतील काही संख्याशास्त्रीय निरीक्षणांसंबंधीच्या चार ओळी मराठीमध्ये भाषांतर करण्यास दुरापास्त वाटल्या म्हणून आम्ही त्या वगळल्या आहेत. अर्थात, त्यामुळे त्या निरीक्षणांमधून काढलेल्या निष्कर्षांबद्दल कोणताही संदेह उत्पन्न होत नाही.

तळटीप: मनोगतामध्ये दिलेली माहिती आणि उद्धृते रघुरामराम राजन यांनी फ्रीकॉनॉमिक्स.कॉम या संकेतस्थळावर स्टीफन जे डुबनर दिलेल्या यांना दिलेल्या मुलाखतीतून आणि विकिपीडियावरून घेतली आहे. ती प्रदीर्घ मुलाखत https://freakonomics.com/podcast/rajan/ या संकेतस्थळावर ऐकता/ वाचता येईल.

तिसरा स्तंभ (The Third Pillar)
रघुराम राजन
अनुवादः शारदा साठे व शेखर साठे
मधुश्री पब्लिकेशन

COMMENTS