नवी दिल्लीः भारतीय लष्करातील अग्निपथ भरती प्रक्रियेला विरोध म्हणून सोमवारी भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. गेल्या आठवड्यात अग्निपथ भरतीला विरोध म्
नवी दिल्लीः भारतीय लष्करातील अग्निपथ भरती प्रक्रियेला विरोध म्हणून सोमवारी भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. गेल्या आठवड्यात अग्निपथ भरतीला विरोध म्हणून देशातल्या ७-८ राज्यांमध्ये रेल्वे गाड्यांना आगी लावण्याचे प्रकार घडले होते. सोमवारी खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय रेल्वेने ५२९ गाड्या रद्द केल्या. तर ५३९ रेल्वे गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. रद्द झालेल्या रेल्वे गाड्यांमध्ये १८१ मेल व एक्स्प्रेस गाड्या तर ३४८ गाड्या या पॅसेंजर होत्या असे रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकात सांगितले.
भारत बंदच्या निमित्ताने बिहार, उ. प्रदेश या राज्यात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे दिल्ली-गुरुग्राम एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी झाली. फतेहबादमध्ये निदर्शकांनी चक्का जाम आंदोलन केले होते. हरयाणात अंबाला, सोनिपत, रेवारी, पंजाबमध्ये लुधियाना, जालंदर, अमृतसर येथे मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात होता. झारखंडमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. दक्षिणेत केरळमध्ये भारतबंद शांततेत पार पडला. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये बंदचा फारसा परिणाम दिसून आला नाही.
अग्निपथ योजना रद्द केली जाणार नाही, असे रविवारी भारतीय लष्कराने स्पष्ट केले होते, त्या पार्श्वभूमीवर सोमवारी अग्निपथ योजनेतील अग्निवीर भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली. ही भरती येत्या जुलैपासून सुरू होणार आहे.
मूळ वृत्त
COMMENTS