लखीमपुर खिरी प्रकरणातील साक्षीदारावर जीवघेणा हल्ला

लखीमपुर खिरी प्रकरणातील साक्षीदारावर जीवघेणा हल्ला

नवी दिल्लीः उ. प्रदेशातील लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणातील एक प्रमुख साक्षीदार व शेतकरी नेते दिलबाग सिंग यांच्या कारवर मंगळवारी रात्री काही अज्ञात व्य

धुमसता पंजाब
बंडखोर बेनीवालांचा २६ डिसेंबरला २ लाखांचा मोर्चा
सरकारी कारवाईने फुंकले शेतकरी आंदोलनात नवीन प्राण

नवी दिल्लीः उ. प्रदेशातील लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणातील एक प्रमुख साक्षीदार व शेतकरी नेते दिलबाग सिंग यांच्या कारवर मंगळवारी रात्री काही अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात दिलबाग सिंग यांना कोणतीही इजा झाली नाही. त्यांनी या घटनेची फिर्याद पोलिसांत नोंद केली आहे.

दिलबाग सिंग हे भारतीय किसान युनियनचे (टिकैट गट) जिल्हा प्रमुख असून ते मंगळवारी रात्री अलीगंज-मुंडा मार्गावरून गोला कोटवाली या भागाकडे आपल्या कारमधून एकटेच निघाले होते. त्यांच्या कारचा पाठलाग करत मोटार सायकलवरून दोन अज्ञात इसम आले आणि त्यांनी कारच्या टायरवर गोळ्या झाडून टायर पंक्चर केले. त्यानंतर दोघा हल्लेखोरांनी कारचा दरवाजा व चालकाच्या बाजूची खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर त्यांनी कारवर गोळ्या झाडल्या. दिलबाग सिंग वेळीच सावध झाल्याने त्यांनी ड्रायव्हर सीट खाली पाडली व ते गाडीत ते खाली बसले. यामुळे ते थोडक्यात बचावले व त्यांना कोणतीही इजा झाली नाही. या हल्ल्यानंतर दोन हल्लेखोर पळून गेले.

३ ऑक्टोबर २०२१मध्ये उ. प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या कारखाली दोन शेतकरी चिरडून मरण पावण्याची घटना घडली. या नंतर झालेल्या हिंसाचारात ८ जण ठार तर शेकडो जखमी झाले होते. संतप्त जमावाने काही गाड्या पेटवून दिल्या. मृतांमध्ये ४ शेतकरी असल्याचे उ. प्रदेश सरकारने सांगितले होते. या घटनेचे दिलबाग सिंग एक प्रमुख साक्षीदार होते.

दैनिक भास्करने दिलेल्या बातमीनुसार लखीमपुर खिरी प्रकरणातील अन्य दोन साक्षीदारांवरही या पूर्वी जीवघेणे हल्ले झाले होते, त्यानंतरचा हा हल्ला आहे.

दिलबाग सिंग यांचा अंगरक्षक काही कामानिमित्त रजेवर होता, त्यामुळे दिलबाग सिंग हे आपल्या कारमध्ये एकटे होते. दरम्यान त्यांनी गोला कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद नोंद केली आहे. पोलिसांनी एक फोरेन्सिक पथकही घटनास्थळी पाठवून पुरावे गोळा केले आहेत.

शेतकरी आंदोलनातील नेत्यांवर हल्ले

मोदी सरकारने गेल्या वर्षी वादग्रस्त शेती कायदे मागे घेतल्यानंतर शेतकरी नेत्यांवर हल्ले होत आहेत. दोन दिवसांपूर्वी बंगळुरूत भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैट यांच्यावर काळी शाई फेकण्यात आली. टिकैट हे शेतकरी आंदोलनात प्रमुख म्हणून कार्यरत होते. मंगळवारी दिलबाग सिंग यांना लक्ष्य करण्यात आले. दिलबाग सिंग यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती टिकैट यांना दिली आहे.

(छायाचित्र – दिलबाग सिंग यांच्या कारवर मंगळवारी रात्री काही अज्ञात व्यक्तींकडून गोळ्या झाडण्यात आल्या. )

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0