शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या होणार

शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या होणार

मुंबई: कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांत शिक्षकांच्या बदल्या केलेल्या नाहीत, या शैक्षणिक वर्षापूर्वी शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या केल्या जाणार असून त्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेले आहे. या बदल्यांमधून डोंगरी भागात शिक्षकांची नियुक्ती केली जाईल, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत सांगितले.

डॉ. विनय कोरे, रईस शेख या सदस्यांनी विधानसभेत विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ग्रामविकासमंत्री मुश्रीफ म्हणाले की, राज्यात २ लाख २७ हजार ५९१ शिक्षकांची पदे रिक्त असून कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या १३०४ इतकी आहे. सुगम आणि दुर्गम भागात शिक्षक बदल्यांच्या निकषात बरीच तफावत असून शिक्षण धोरणानुसार सगळ्या शाळेत समान शिक्षक असणे अनिवार्य असल्याने बदल्यांच्या निकषातील तफावत दूर करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती नेमली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यात ४७ दुर्गम गावे असून त्यातील १५ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, या वर्षी होणाऱ्या बदल्यांमध्ये या रिक्त जागा भरण्यात येतील असेही ग्रामविकासमंत्र्यांनी सांगितले. नव्याने शिक्षक भरतीसाठी शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

COMMENTS