गुजरातमधील अतिरिक्त मृत्यूंची कथा

गुजरातमधील अतिरिक्त मृत्यूंची कथा

नवी दिल्ली: गुजरातमधील अमरेली गावातील दोन स्मशानभूमींपैकी कैलाश मुक्तिधाम या स्मशानभूमीतील चार दहनस्थळे मोडकळीला आली आहेत. मृतदेह ज्या लोखंडी जाळ्यांव

महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा होणार
शतमूर्खांचा लसविरोध
कोरोना संकटाचे गांभीर्य नेतृत्वाला होते का?

नवी दिल्ली: गुजरातमधील अमरेली गावातील दोन स्मशानभूमींपैकी कैलाश मुक्तिधाम या स्मशानभूमीतील चार दहनस्थळे मोडकळीला आली आहेत. मृतदेह ज्या लोखंडी जाळ्यांवर ठेवले जातात, त्या जाळ्या, सतत दहन सुरू राहिल्यामुळे, वितळून गेल्या आहेत.

“गेला महिनाभर दररोज २४ तास चिता जळत होत्या,” मगनभाईंनी सांगितले. मगनभाई शेतकरी आहेत आणि स्मशानामध्ये ते स्वयंसेवक म्हणून काम करतात. एप्रिल व मे २०२१ या दोन महिन्यांमध्ये कोविड-१९ साथीने अमरेली शहरात घडवलेल्या उत्पाताच्या आठवणी ते सांगत होते. स्मशानभूमीवरील जळाऊ लाकडाचा साठा संपून गेल्यामुळे कार्यकर्त्यांना स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिराती द्याव्या लागल्या होत्या. त्यांच्या २० जणांच्या पथकातील तिघांचा कोविडने मृत्यू झाला.

या दोन महिन्यांत दोन स्मशानभूमींवर मिळून १,१६१ दहने झाली. या स्मशानभूमींची क्षमता तेवढीच होती. त्यामुळे बाकीचे मृतदेह आजूबाजूच्या खेड्यांमध्ये दहनासाठी पाठवावे लागले. मुस्लिम दफनभूमीमध्ये १०० मृतदेहांचे दफन झाले. मृतदेहांची संख्या वाढल्याने खड्डे खणण्यासाठी अर्थमुव्हर्स मागवावे लागले.

अमरेलीतील केवळ एका स्मशानभूमीत एप्रिल व मे महिन्यात मृत्यूंची नोंद करणाऱ्या ७.५ वह्या भरून गेल्या. प्रत्येक वहीत १०० पाने असतात. सौजन्य: श्रीगिरीश जालिहाल/द रिपोर्टर्स कलेक्टिव

अमरेलीतील केवळ एका स्मशानभूमीत एप्रिल व मे महिन्यात मृत्यूंची नोंद करणाऱ्या ७.५ वह्या भरून गेल्या. प्रत्येक वहीत १०० पाने असतात. सौजन्य: श्रीगिरीश जालिहाल/द रिपोर्टर्स कलेक्टिव

कोविडच्या दुसऱ्या लाटेने उर्वरित भारताप्रमाणेच गुजरातमधील प्रत्येक खेड्याला हलवून टाकले, मृत्यूंचा आकडा प्रचंड वाढला. या संदर्भातील अचूक डेटा संकलित करण्याचे निर्देश गुजरात उच्च न्यायालयाने देऊनही, राज्य सरकार केवळ १०,०७५ जणांचा कोविडने मृत्यू झाला, असा दावा करत राहिले. २०२० मध्ये सुरू झालेल्या कोविड साथीच्या दोन्ही टप्प्यांमध्ये मरण पावलेल्यांची ही संख्या होती. गुजरातने “कोविड संकट उत्तम हाताळल्याची ”पावतीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देऊन टाकली.

आता अधिकृत आकडेवारीतून असे समोर येत आहे की, राज्य सरकारने मृत्यूच्या खऱ्या आकड्यांवर व नुकसानीच्या प्रमाणावर पडदा टाकला आहे.

राज्यातील १७० पैकी ६८ नगरपालिकांमधील मृत्यू नोंदवह्या ‘द रिपोर्टर्स कलेक्टिव’च्या हाती लागल्या. याच रजिस्टरमध्ये मृत्यू व मृतांचे तपशील यांची अधिकाऱ्यांद्वारे प्रथम नोंद केली जाते. आम्ही जानेवारी २०१९ ते एप्रिल २०२१ या काळातील हाताने भरलेल्या नोंदवह्यांच्या प्रती गोळा केल्या आणि हजारो पाने चाळली.

या मृत्यू नोंदवह्यांचे विश्लेषण केले असता असे पुढे आले की, ६८ नगरपालिकांच्या क्षेत्रांत मार्च २०२० ते एप्रिल २०२१ या काळात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या त्यापूर्वीच्या म्हणजे कोविड पूर्वीच्या वर्षभरातील संख्येच्या तुलनेत १६,८९२ ने अधिक होती. या ६८ नगरपालिकांमध्ये राज्याच्या ६.०३ कोटी या लोकसंख्येपैकी ६ टक्के जनता राहते. हा आकडा गृहीत धरून संपूर्ण गुजरातमधील मृत्यूंच्या संख्येबाबत अंदाज केला असता, राज्यात कोविड साथीमुळे किमान २.८१ लाख जास्तीचे मृत्यू झाले आहेत. गुजरात सरकार कोविड-१९ने राज्यात झालेल्या मृत्यूंबाबत ज्या संख्येचा दावा करत आहे, त्या संख्येहून ही संख्या २७ पटींनी अधिक आहे.

“नगरपालिका क्षेत्रांतील अतिरिक्त मृत्यूंच्या संख्येतून असे दिसून येते की, कोविड-१९ आजारामुळे झालेल्या अधिकृत मृत्यूंच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणातील कोविड मृत्यूंचा समावेश करण्यात आलेला नाही,” असे हार्वर्ड टी. एच. चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील एपिडेमिओलॉजीच्या प्राध्यापक डॉ. कॅरोलिन बकी म्हणाल्या.

“अतिरिक्त मृत्यू” ही साथीच्या काळातील मृत्यूंच्या एकूण आकड्याशी मागील साथपूर्व काळातील मृत्यूंच्या आकड्याशी तुलना करून मोजले न गेलेले मृत्यू मोजण्याची सुलभ पद्धत आहे. सर्व अतिरिक्त मृत्यू कोविड-१९ आजारानेच झाले असे म्हणता येत नाही. मात्र, मृत्यूंच्या संख्येतील वाढीचे स्पष्टीकरण देणारे अन्य कोणतेही कारण नसल्यामुळे बहुतेक अतिरिक्त मृत्यू कोविड-१९ साथीमुळे झालेले असावेत असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्यसेवेची पुरेशी उपलब्धता नसल्याचा हा परिणाम असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गुजरातमधील अतिरिक्त मृत्यूचा आकडा मर्यादित आहे, कारण, नगरपालिकांमधील नोंदींमध्ये ग्रामीण भागातील मृत्यूंचा आकडा समाविष्ट नसतो. गुजरातच्या एकूण लोकसंख्येत ग्रामीण भागाचा वाटा ५७ टक्के आहे आणि ग्रामीण भागांमध्ये शहरी भागांच्या तुलनेत सार्वजनिक आरोग्यसेवा खूपच तोकड्या आहेत. आम्ही मे २०२१मधील आकडेवारी वगळली आहे. कारण, ६८पैकी केवळ तीन नगरपालिकांकडे मे अखेरपर्यंतचा डेटा उपलब्ध होता. मेमधील मृत्यूंची संख्या सरकारी आकडेवारीनुसारही एप्रिलमधील मृत्यूंच्या तुलनेत अधिक आहे.

परीक्षण केलेल्या ६ टक्के लोकसंख्येमध्ये एप्रिल महिन्यात १०,२३८ अतिरिक्त मृत्यूंची नोंद झाली. संपूर्ण साथीदरम्यान राज्यभरात १०,०७७ मृत्यू झाल्याची अधिकृत आकडेवारी आहे. त्या तुलनेत एप्रिलमधील आकडा खूपच जास्त आहे.

हे माप लावले असता, गुजरातमध्ये एप्रिल २०२१ मध्येच १.७१ लाख अतिरिक्त मृत्यू झाले असावेत. आणि कोविडची दुसरी लाट खऱ्या अर्थाने जेव्हा कळसाला गेली होती, त्या मे महिन्यातील आकडे आपल्याला अद्याप माहीतीच नाहीत.

या नोंदवह्यातील हजारो पाने अधिकृत आकडेवारीतील खोटेपणा उघड करतात. सौराष्ट्र भागातील सुरेंद्रनगर जिल्ह्याचे उदाहरण घेऊ. २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १७,५६,२६८ होती. सरकारच्या आकडेवारीनुसार, या जिल्ह्यात कोविड-१९मुळे केवळ १३६ मृत्यू झाले. मात्र, जिल्ह्यातील १४ टक्के लोकसंख्या जिच्या क्षेत्रात येते अशा एका नगरपालिकेची मृत्यू नोंदवही बघितली असता असे दिसते की, मार्च व एप्रिल २०२१ या दोन महिन्यात या क्षेत्रामध्ये १,२१० अतिरिक्त मृत्यू झाले आहेत. (आलेख बघा)

“स्पष्ट निर्देश असूनही भारतातील बहुसंख्या कोविड-१९ मृत्यूंची नोंदच होत नाही असे दिसत आहे. यामागे संमिश्र कारणे असू शकतात. काही ठिकाणी मृत्यूंवर देखरेख ठेवण्याच्या कमकुवत पद्धतींमुळेही हे होत आहे,” असे लंडनच्या मिडलसेक्स युनिव्हर्सिटीतील गणित तज्ज्ञ मुराद बानाजी म्हणाले. बानाजी कोविड-१९संदर्भातील सांख्यिकीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

“काही राज्यांची सरकारने कोविड-१९ मृत्यू नोंदीबाबतच्या निर्देशांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत असे दिसत आहे. उदाहरणार्थ, मृत्यूंचे ऑडिट करणाऱ्या समित्या सहव्याधीग्रस्त कोविड-१९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करताना कोविडचा उल्लेख गाळत आहेत. हे प्रकार गुजरातसह अनेक राज्यांमध्ये घडत असल्याच्या बातम्या आहेत,” असे बानाजी म्हणाले.

भारतामध्ये राजकीय कारणांमुळे आकडेवारी दाबण्यासह मृत्यूंच्या अपुऱ्या नोंदी तसेच मृत्यूच्या कारणांचे अनियमित वर्गीकरण अशा अनेक बाबींमुळे कोविडने झालेल्या मृत्यूंचा आकडा काढणे अशक्य होत आहे. कोविडमुळे झालेल्या मृत्यूंची सरकारी आकडेवारी नसल्यामुळे, विध्वंसाचा स्तर समजून घेण्यासाठी ‘अतिरिक्त मृत्यू’ ही संकल्पना उपयोगात आणण्याचा सल्ला, जगभरातील तज्ज्ञ देत आहेत.

थेट कोविड-१९ प्रादुर्भावामुळे झालेल्या मृत्यूंशिवाय, अनेक रुग्णांच्या मृत्यूचे कारण सहव्याधी असू शकेल. यातील अनेक सहव्याधी कोविड-१९ प्रादुर्भावामुळे अधिक गंभीर झालेल्या असू शकतात किंवा कोविडनंतर होणाऱ्या रक्ताच्या गुठळ्या, हृदयविकाराचे धक्के किंवा फुप्फुसांच्या फायब्रोसिस यांसारख्या आजारांनी रुग्णांचा मृत्यू झालेला असू शकतो.

“संकटानंतर होणाऱ्या मृत्यूंचा अधिकृत आकडा मृत्यूच्या प्रमाणपत्रावर संकटाचा (कोविड-१९) उल्लेख आहे की नाही यावर अवलंबून असतो,” असे डॉ. बकी म्हणाल्या. “ही व्यवस्था सदोष असू शकते. मृत्यूंचे कारण सार्स-सीओव्ही-टू आहे की नाही याबाबत स्पष्टता नसते. साथीच्या सुरुवातीच्या काळात निदानात्मक निकष निश्चित केलेले नसणे, चाचण्यांचा अभाव, राजकीय हस्तक्षेप अशी अनेक कारणे यामागे आहेत.”

“साथी या प्रदीर्घ सार्वजनिक आरोग्य आपत्ती समजल्या जातात. या काळात आजाराच्या उद्रेकामुळे मृत्यू होतातच, शिवाय या साथीच्या सामाजिक व्यवहारांवर झालेल्या परिणामांमुळेही मृत्यू होतात,” असे बर्कली येथील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील डेमोग्राफीच्या असिस्टण्ट प्रोफेसर आयेशा महमूद यांनी स्पष्ट करून सांगितले.

“साथीचा परिणाम मोजायचा असेल तर रुग्णसंख्या व मृत्यूंच्या अधिकृत आकडेवारीच्या तुलनेत अतिरिक्त मृत्यू ही संकल्पना अधिक खात्रीशीर ठरते,” असे बानाजी यांनी नमूद केले.

नगरपालिकेच्या स्तरावरील मृत्यू नोंदवह्यातील आकडेवारीवर आधारित गृहितकांची पडताळणी करण्यासाठी रिपोर्टर्स कलेक्टिवने संपूर्ण बोताड जिल्ह्यातील मृत्यूच्या नोंदी मिळवल्या. यात शहरी नगरपालिकांसोबतच ग्रामपंचायतींमधील नोंदींचाही समावेश होता.

बोताडमध्ये केवळ ४२ जणांचा कोविड-१९ आजारामुळे मृत्यू झाल्याचा राज्य सरकारचा दावा आहे. मात्र, या नोंदींमधून जिल्ह्यात मार्च २०२० ते जून २०२१ या काळात ३,११७ अतिरिक्त मृत्यू झाल्याचे दिसत आहे. सरकारने दिलेल्या संख्येच्या तुलनेत ही संख्या तब्बल ७४ पटींनी अधिक आहे.

मृतांची मोजणी

अन्य अनेक राज्यांप्रमाणे गुजरातमधील मृत्यूंचा आकडा लपवला जाण्याची प्रकरणे स्थानिक माध्यमांनीच पुढे आणली. कोविडची दुसरी लाट पूर्ण भरात असताना, मृतांचे अधिकृत आकडे व स्मशानभूमींमधील आकडेवारी यातील तफावतींच्या बातम्या येऊ लागल्या. या बातम्या तुरळक व किश्श्यांच्या स्वरूपातील असल्या तरी सरकारकडून होणाऱ्या लपवाछपवीच्या प्रकारांबाबत इशारा देण्याचे काम या बातम्यांनी केले.

त्यानंतर माध्यमांनी नागरी नोंद प्रणालींमधील (सीआरएस) आकडेवारीच्या आधारे अतिरिक्त मृत्यूंबाबत आडाखे बांधण्यास सुरूवात केली. सीआरएसमध्ये राष्ट्रीय स्तरावरील जन्म व मृत्यूच्या नोंदी असतात. सीआरएस अद्ययावत होण्यास अवधी लागतो असा दावा करत केंद्र सरकारने हात वर केले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले होते, “सीआरएस डेटा संकलन, संपादन, एकत्रीकरण आणि प्रसिद्धी यांसाठी एका प्रक्रियेचे पालन करते. ही प्रक्रिया काहीशी प्रदीर्घ आहे पण यामुळे कोणतेही मृत्यू गाळले जात नाहीत. या कामासाठी येणारा खर्च व त्याचा आवाका यामुळे आकडेवारी प्रसिद्ध होण्यास पुढील वर्ष उजाडते.”

म्हणूनच द रिपोर्टर्स कलेक्टिवने तीन महिने घालवून कष्टपूर्वक डेटा संकलित केला, भाषांतरित केला आणि मृत्यूनोंदींसारख्या प्राथमिक स्रोताच्या आधारे त्याचे विश्लेषण केले. सीआरएस याच नोंदींमधून आकडेवारी प्राप्त करते.

साबरकांथा जिल्ह्यातील खेडब्रामा नगरपालिकेतील मृत्यू नोंदवहीतील एक पान. सौजन्य: श्रीगिरीश जालिहाल/द रिपोर्टर्स कलेक्टिव

साबरकांथा जिल्ह्यातील खेडब्रामा नगरपालिकेतील मृत्यू नोंदवहीतील एक पान. सौजन्य: श्रीगिरीश जालिहाल/द रिपोर्टर्स कलेक्टिव

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण २०१९-२०नुसार, गुजरातमध्ये, ९३ टक्के मृत्यूंची नोंद होते. सात टक्के मृत्यूंची अनेक कारणांमुळे नोंद होऊ शकत नाही. अनेकदा लोक कुटुंबात मृत्यू झाल्यानंतर माहिती देण्यास वेळ घेतात. त्यामुळे मृत्यूची नोंद करताना मृत्यूच्या तारखेसोबत नोंदणीच्या तारखेचीही नोंद केली जाते.

ही आकडेवारी संथगतीने वर सरकत जाते: नगरपालिकांतून (शहरी भागांत) व ग्रामपंचायतींतून (ग्रामीण भागांत) ही आकडेवारी जिल्हा मुख्यालयात येते. तेथे ही आकडेवारी डिजिटाइझ्ड सीआरएमध्ये अद्ययावत केली जाते आणि त्यातून संपूर्ण राज्याची आकडेवारी आकार घेते. मात्र, राज्याच्या स्तरावरील समन्वय व पडताळणी यांमध्ये बराच वेळ जात असल्याने ही आकडेवारी राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यास विलंब होतो. केंद्र सरकारला ही राजकीयदृष्ट्या सोयीस्कर सबब सापडली असून, साथीमुळे झालेल्या अतिरिक्त मृत्यूंचे विश्लेषण स्वतंत्र संस्थांनी लगेच करू नये असे संकेत सरकारने या सबबीखालीच दिले आहेत.

“प्रत्यक्ष तळागाळातील आकडेवारी राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यास दोन वर्षांपर्यंत वेळ लागू शकतो. अशा परिस्थितीत सीआरएसच्या अंतिम आकडेवारीची प्रतीक्षा करण्यापेक्षा नगरपालिकांमधील मृत्यू नोंदवह्यांचे विश्लेषण करणे हा मृत्यूदर समजून घेण्यासाठी उत्तम मार्ग आहे,” असे केंद्र सरकारच्या एका संस्थेत डेमोग्राफीवर काम करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

डेटामधील पारदर्शकता

गुजरातमधील ६८ नगरपालिकांमधील डेटासंच हा देशभरातील ‘अतिरिक्त मृत्यू डेटा’ एकत्रित व प्रसिद्ध करण्याच्या द रिपोर्टर्स कलेक्टिवच्या प्रयत्नांचा भाग आहे. वार्तांकन करताना गुजरातमधील १००हून अधिक नगरपालिकांमधील मृत्यूंच्या नोंदी तसेच अन्य राज्यांतील ३५हून अधिक जिल्ह्यांमधील नोंदी एकत्र करण्यात आल्या. हा डेटा ‘क्रिएटिव कॉमन्स लायसन्स’खाली एका ऑनलाइन ‘वॉल ऑफ ग्रीफ’वर सार्वजनिकरित्या उपलब्ध करण्यात आला. ही ‘वॉल ऑफ ग्रीफ’ म्हणजे नागरिक, माध्यमसंस्था व काही व्यक्तींनी, साथीत प्राण गमावलेल्यांची आठवण म्हणून, एकत्रितपणे तयार केली आहे.

गुजरातमधील नगरपालिकांच्या मृत्यू नोंदवह्यांतून प्राप्त झालेला डेटा हार्वर्ड टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील तज्ज्ञांसोबत शेअर करण्यात आला. या तज्ज्ञांनी यापूर्वी प्युएर्टो रिकोमधील हरिकेन मारियानंतरच्या मृत्यूच्या आकड्यांचे अन्वेषण केले आहे.

“मृत्यूदरासंदर्भातील आकडेवारी संकटादरम्यान व संकटादरम्यान खूप महत्त्वाची असते. कारण, यातून कोणाचा, कुठे, कधी व कसा मृत्यू झाला याबद्दलची महत्त्वपूर्ण एपिडिमियॉलॉजिकल माहिती प्राप्त होते. जेणेकरून सार्वजनिक आरोग्य यंत्रणा यावर काम करू शकते व संकटावर अधिक धारदार पद्धतीने प्रतिसाद देऊ शकतो,” असे हार्वर्डमधील इमर्जन्सी फिजिशियन व संकट प्रतिसाद क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. सत्चित बलसारी यांनी सांगितले.

“जगभरातील सरकारे डेटा लपवण्याची चूक करतात. मात्र, निकृष्ट दर्जाच्या आकडेवारीमुळे सार्वजनिक आरोग्य संकटाला दिला जाणारा प्रतिसाद कमकुवत होतो,” असेही ते म्हणाले.

प्रत्यक्ष विध्वंस किती झाला आहे हे समजून घेण्यासाठी दोन वार्ताहरांपैकी एकाने जूनमध्ये संपूर्ण गुजरातचा दौरा केला. मृत्यू नोंदवह्यांतून उघड झालेल्या आकडेवारीवर दु:ख व हानीच्या प्रत्यक्ष दर्शनाने शिक्कामोर्तब झाले. बहुतेक नगरपालिकांमधील डेटाचे विश्लेषण केले असता असे दिसत आहे की, अन्य वयोगटांच्या तुलनेच ५० ते ८० या वयोगटातील मृत्यूंमध्ये खूप वाढ झाली आहे. घरात मृत्यू झालेल्यांच्या तुलनेत रुग्णालयात मृत्यू झालेल्यांची संख्याही दुसऱ्या लाटेदरम्यान अधिक होती.

प्रत्यक्षात काय घडले असावे याचे प्रतिबिंबच या संशोधनातून दिसत आहे.

“६० वर्षीय व्यक्तीचा ऑक्सिजन पुरवठा काढून घेऊन विशीतील तरुणांना दिला गेल्याचे मी अनेकदा बघितले आहे,” असे दारूल उलुम मेहबुबीया या अमरेलीतील दफनभूमीची व्यवस्था बघणाऱ्या संस्थेचे कार्यकर्ते सैय्यद मेहबूब रेहमान यांनी सांगितले.

“ऑक्सिजन उपलब्ध करण्याच्या प्रयत्नात नागरिकांच्या पथकांनी पुढाकार घेतला. सरकारकडून कोणतीही मदत पुरवली जात नव्हती. लोक कम्युनिटी हॉल्समधून ऑक्सिजन भरून घेत होते. डॉक्टर्सही उपलब्ध नव्हते,” असे रेहमान म्हणाले.

१९ एप्रिल, २०२१ रोजी अमरेलीतील रेडिओलॉजिस्ट डॉ. भरत पाडा स्मशानभूमीत उभे राहून ईमेलद्वारे सीटी स्कॅन रिपोर्ट्स बघत होते. त्यांच्यासमोर त्यांच्या ७४ वर्षांच्या वडिलांची चिता जळत होती. त्यांच्या वडिलांना मृत्यूच्या सात दिवस आधी कोविड-१९ आजाराचे निदान झाले होते.

“मी आतून दगडासारखा झालो होतो,” अमरेलीतील रेडिओलॉजिस्ट डॉ. भरत पाडा सांगतात. त्यांचे ७४ वर्षांचे वडील कोविड-१९चे निदान झाल्यानंतर ७ दिवसांनी मरण पावले. सौजन्य: श्रीगिरीश जालिहाल/द रिपोर्टर्स कलेक्टिव

“मी आतून दगडासारखा झालो होतो,” अमरेलीतील रेडिओलॉजिस्ट डॉ. भरत पाडा सांगतात. त्यांचे ७४ वर्षांचे वडील कोविड-१९चे निदान झाल्यानंतर ७ दिवसांनी मरण पावले. सौजन्य: श्रीगिरीश जालिहाल/द रिपोर्टर्स कलेक्टिव

डॉ. पाडा दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सोनोग्राफी लॅबमध्ये आले. शहरातील तीन लॅब्जपैकी एक त्यांची लॅब आहे. दुसऱ्या दिवसापासून ते दिवसाचे १५-१५ तास काम करू लागले, मध्यरात्रीपर्यंत क्लिनिकमध्ये थांबू लागले. “मी आतून दगडासारखा झालो होतो. मला भावनांची जाणीवच नव्हती,” त्यांनी सांगितले.

मृत्यूच्या सरकारी आकड्यांबद्दल साशंकता असलेल्या अनेकांमध्ये डॉ. पाडाही आहेत. “मृत्यूचा दैनंदिन अधिकृत आकडा जेवढा सांगितला जात आहे, तेवढी तर माझ्या ओळखीतील मृतांची संख्या आहे. एवढेच लोक मरण पावले असतील हे अशक्य आहे.”

अमरेली जिल्ह्यातील ९पैकी ६ नगरपालिकांच्या मृत्यू नोंदवह्यांनुसार, एप्रिल २०२१ मध्ये एप्रिल २०१९च्या तुलनेत १,२५७ अतिरिक्त मृत्यूंची नोंद आहे. मात्र, सरकारी आकडेवारीनुसार, जिल्ह्यात ग्रामीण भाग धरून केवळ १४ जणांचा कोविड-१९ने मृत्यू झाला आहे.

मृत्यू नोंदवह्यांमधून एकत्रित केलेले अतिरिक्त मृत्यूंचे आकडे प्रत्यक्ष मृत्यूच्या आकड्यांहून कमीच असण्याची शक्यता आहे. कुटुंबात मृत्यू झाल्यानंतर अनेकदा लोक जवळपास महिनाभराने मृत्यूची नोंद करतात. मात्र, नोंदवह्यांतील मृत्यूंची संख्या प्रत्यक्ष मृत्यूंच्या संख्येहून अधिक असतील अशी शक्यता अजिबात नाही.

……

आकडे

आलेख: २०२० सालाच्या सुरुवातीच्या महिन्यांतील मृत्यूंची आकडेवारी आणि २०१९ सालातील आकडेवारी यात फारसा फरक नाही. मात्र, एप्रिल २०२०पासून म्हणजेच कोविडची लागण लोकांना होऊ लागल्यापासून यातील तफावत वाढत गेलेली दिसत आहे. सर्व ६८ नगरपालिकांमधील अतिरिक्त मृत्यूंची सर्वोच्च संख्या जुलैमध्ये १२२८ इतकी होती. २०२१ मध्ये एप्रिल महिन्यात दुसऱ्या लाटेदरम्यान अतिरिक्त मृत्यूंची संख्या प्रचंड वाढली.

Jan Feb March April May June July Aug Sept Oct Nov Dec
2019 3263 2894 2678 2519 2613 2486 2498 2941 2871 2846 2763 2990
2020 3259 2867 2631 2607 2879 2760 3726 3932 3979 3629 3953 3895
2021 3136 2458 3109 12757

गुजरात सरकारचा खोटेपणा उघड: कोविड१९चा खराखुरा मृत्यूदर

२०२० सालापासून राज्यात कोविड-१९ आजाराने केवळ १०,०७५ जणांचा मृत्यू झालाचा दावा गुजरात सरकार करत आहे. मात्र, केवळ एप्रिल २०२१ या एका महिन्यात, राज्याच्या एकूण लोकसंख्येतील केवळ ६ टक्के लोक राहत असलेल्या ६८ नगरपालिकांमध्ये १२,७५७ जणांचा कोविड-१९ सह सर्व कारणांमुळे मृत्यू झाला आहे. २०१९ मध्ये हा आकडा १०,२३८ होता. येथे वाय-अक्ष कोविड-१९सह सर्व कारणांनी मरण पावलेल्यांचा आकडा दाखवत आहे. 

आलेख २:  सुमारे तीन महिने चाललेल्या दुसऱ्या लाटेने मे २०२१ मध्ये कळस गाठला होता हे अधिकृत आकडेवारी व बातम्यांवरून स्पष्ट आहे. मात्र, बहुतेक नगरपालिकांमध्ये केवळ १० मेपर्यंतची अधिकृत आकडेवारी उपलब्ध होती. मे २०२०च्या पहिल्या १० दिवसांत ६७ नगरपालिकांच्या क्षेत्रात ३,५३२ मृत्यूंची नोंद झाली. या १० दिवसांतील सरासरी दैनंदिन मृत्यूंची संख्या मे २०१९च्या तुलनेत सुमारे चौपट होती. मे महिनाच्या अखेरीपर्यंतची मृत्यूची आकडेवारी तीन नगरपालिकांमध्ये उपलब्ध होती. त्यातही एप्रिल २०२१च्या तुलनेत अधिक मृत्यूंची नोंद आढळून आली.

नगरपालिका एप्रिल २०२१ मधील मृत्यू मे २०२१ मधील मृत्यू
चोरवाड ४१ ७३
खेडब्रामा ३८ ५७
इदर ५६ ७७

मे महिन्यांत मृत्यूंमध्ये वाढ

मे २०२० मध्ये मृत्यूंची संख्या एप्रिल २०२१च्या तुलनेत अधिक होती, असे मेच्या अखेरीपर्यंत आकडेवारी उपलब्ध असलेल्या नगरपालिकांतील नोंदवह्यांवरून दिसते. येथे वाय हा अक्ष मृत्यूंची संख्या दर्शवतो.

आलेख ३:  मार्च ते एप्रिल २०१९, २०२० आणि २०२१ या काळात १० नगरपालिकांच्या क्षेत्रात झालेल्या सर्व वयोगटांतील मृत्यूचे विश्लेषण आम्ही केले. ५० ते ८० या वयोगटांतील मृत्यूचा दर अन्य वयोगटांच्या तुलनेत प्रमाणाहून अधिक होता. ६० ते ७० या वयोगटांतील व्यक्तींचे प्रमाण मृतांमध्ये सर्वाधिक होते.

 

वयोगट २०१९ २०२० २०२१
०-९ ८३ ११४ ५४
१०-१९ ४६ ६० ५३
२०-२९ ९८ १०६ १५३
३०-३९ ११९ ११२ ३९९
४०-४९ १८२ १९३ ९३०
५०-५९ २५९ ३२० १,५१७
६०-६९ ४५२ ४६७ १,९५०
७०-७९ ३७४ ४४४ १,७१२
८०-८९ २७१ ३१३ ८५०
९०-९९ ९५ १०५ २३०

वयोवृद्धांवर सर्वाधिक परिणाम

१० नगरपालिकांच्या नमुन्यातील एकूण मृत्यूंमध्ये ५०-८० या वयोगटाचे प्रमाण खूप अधिक होते. साथीचा सर्वाधिक फटका ६०-७० या वयोगटाला बसला. वाय अक्ष हा मृत्यूंची संख्या दर्शवतो.

आलेख ४ (कॅप्शन): ज्या नगरपालिकांमध्ये आकडेवारी उपलब्ध होती, त्यांतील बहुसंख्य ठिकाणी एक नमुना आढळला. हा नमुना म्हणजे मार्च-मे २०२१ या काळात एकूण मृत्यूंमध्ये रुग्णालयात झालेल्या मृत्यूंची टक्केवारी खूप जास्त आहे. २०२९ आणि २०२० या काळातील आकडेवारीशी तुलना करता हे निदर्शनास आले.

मार्च-एप्रिल २०१९ (%) मार्च-एप्रिल २०२० (%) मार्च-एप्रिल २०२१( %)
गोंदाल ४.७६ २८.६८ ४१.६६
बरवाल ६.२५ ३८.५७
धरंगधरा १.३६ २.४३ ३३.७६
देसा २२ २२ ४६.६२
खंबालिया ३०.३ ४५.८३ ७९.३१

रुग्णालयात झालेल्या मृत्यूंची टक्केवारीही वाढली

मार्च व एप्रिल २०२१ मध्ये झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये रुग्णालयात झालेल्या मृत्यूंची टक्केवारी मागील दोन वर्षांच्या तुलनेत खूप अधिक आहे. वाय अक्ष हा एकूण मृत्यूंपैकी रुग्णालयात झालेल्या मृत्यूंची टक्केवारी दर्शवतो.

आलेख ५: सर्वाधिक फटका बसलेल्या पाच नगरपालिका

सुरेंद्रनगर, अमरेली, नडियाद, भडोच आणि करमसाद या नगरपालिकांच्या क्षेत्रात मार्च व एप्रिल २०२१ मध्ये २०१९ सालातील याच महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक अतिरिक्त मृत्यू झाले. वाय अक्ष हा मृत्यूंची संख्या दर्शवतो.

सुरेंद्रनगर नगरपालिकेत अतिरिक्त मृत्यूंचा आकडा सर्वाधिक होता. एप्रिल २०२१ या नगरपालिकेच्या क्षेत्रात, एप्रिल २०१९च्या तुलनेत १,१९५ अधिक मृत्यू झाले. हा आकडा जिल्हाभरात आत्तापर्यंत नोंद झालेल्या १३६ या कोविड मृत्यूंच्या संख्येहून ८.७ पटींनी अधिक आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: