हार्दिक पटेलः गुजरात काँग्रेसचा नवा आक्रमक चेहरा

हार्दिक पटेलः गुजरात काँग्रेसचा नवा आक्रमक चेहरा

गुजरातमधील आपले पक्ष सावरण्यासाठी शनिवारी काँग्रेसने पाटीदार नेता हार्दिक पटेल यांना गुजरात काँग्रेस समितीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. हा

उ. प्रदेश विधान सभा निवडणूकः काँग्रेसचा स्वबळाचा नारा
भाजपा-कॉंग्रेस साधर्म्याचं मायाजाल
शीला दीक्षित यांचे निधन

गुजरातमधील आपले पक्ष सावरण्यासाठी शनिवारी काँग्रेसने पाटीदार नेता हार्दिक पटेल यांना गुजरात काँग्रेस समितीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. हा निर्णय गुजरातमधील मोठ्या प्रमाणावरील पाटीदार मतदार आपल्याकडे यावा या उद्देशाने काँग्रेसने घेतलेला दिसतो आहे.

गेल्या मार्चमध्ये काँग्रेसने आपले ८ आमदार गमावल्याने राज्यसभा निवडणुकांत काँग्रेसला आपली जागा गमवावी लागली होती. त्यानंतर काँग्रेस खडबडून जागी झालेली दिसतेय. वास्तविक २०१७च्या विधानसभा निवडणुकांत हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचा प्रचार केला असला तरी ते १५ महिन्यानंतर २०१९च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान पक्षात अधिकृतरित्या सामील झाले होते.

रविवारी गुजरात काँग्रेस समितीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषणा झाल्याने हार्दिक पटेल यांनी सर्व काँग्रेस सदस्यांचे आभार मानले आणि आपल्यापुढे आव्हान मोठे असल्याचे सांगितले. २०२२मध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत.

हार्दिक पटेल यांना गुजरात प्रदेश काँग्रेस समितीचे कार्यकारी अध्यक्ष करण्याची सूचना काँग्रेसचे राज्यातील प्रभारी राजीव सातव यांनी पूर्वी मांडली होती. या सूचनेवर १० दिवसांपूर्वी काँग्रेस कार्यकारिणी समितीने शिक्कामोर्तब केले व शनिवारी निर्णय जाहीर करण्यात आला. हा निर्णय अत्यंत गुप्त ठेवला होता, राज्यातील अन्य काँग्रेसी नेत्यांना त्याचा पत्ताही लागून दिला नव्हता. काँग्रेसचे गुजरातमधील ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनाही या निर्णयप्रक्रियेत ठेवण्यात आले नसल्याचे अहमदाबाद मिररचे वृत्त आहे.

२०१५मध्ये गुजरातमध्ये पाटीदार आंदोलन सुरू झाले. पाटीदार समाज हा ओबीसी असून आरक्षणासाठी लाखो पाटीदार रस्त्यावर उतरले त्याचे नेतृत्व हार्दिक पटेल यांनी केले होते. हार्दिक पटेल हे मूळचे विरामगाम येथील असून पाटीदार समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा सतत राजकारण पुढे ठेवत गेल्याने तो सामाजिक मुद्दाही झाला.

हार्दिक पटेल यांच्यासोबत नंतर गुजरातमध्ये ठाकूर समाजाचे अल्पेश ठाकूर व दलित समाजाचे जिग्नेश मेवानी असे तरुण नेतृत्व उदयास आले. या तिघांच्या राजकीय व सामाजिक आंदोलनाने गुजरातमध्ये पहिल्यांदाच सत्ताधारी भाजपला मोठे आव्हान मिळाले.

२०१७च्या विधानसभा निवडणुकांत अल्पेश ठाकूर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला पण हार्दिक पटेल व जिग्नेश मेवाणी यांनी काँग्रेसला बाहेरून पाठिंबा दिला. या निवडणुकांत काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिली होती.

पण राज्यातील सत्तेची समीकरणे पाहून अल्पेश ठाकूर यांनी भाजपची वाट धरली तर अन्य काँग्रेस आमदारही भाजपकडे गेले. अल्पेश ठाकूर स्वतःहून भाजपकडे गेल्याने काँग्रेसमधला एक अवकाश हार्दिक पटेल यांच्यासाठी उपलब्ध झाला.

हार्दिक पटेल यांची प्रत्यक्ष राजकारण करण्याची महत्त्वाकांक्षा नेहमीच अडीअडचणीची ठरत आलेली आहे. २०१८मध्ये त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेताच मेहसाणा येथील स्थानिक न्यायालयाने त्यांच्यावरील दंगल भडकवण्याच्या आरोपावरून निवडणूक लढवण्यास मनाई केली. नंतर गुजरात उच्च न्यायालयाने हार्दिक पटेल यांची जामीनावर सुटका केली व त्यांची शिक्षाही रद्द केली. त्यामुळे राजकारणात उतरण्याचा एक मार्ग त्यांना मिळाला आणि काँग्रेसने आता आगामी ८ विधानसभा पोटनिवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याकडे पक्षाचे कार्यकारी अध्यक्षपद दिले आहे.

काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष पदाची घोषणा होताच हार्दिक पटेल यांनी उ. गुजरात व सौराष्ट्र या दोन भागातील ६ हजार गावे पिंजून काढणार असल्याची घोषणा केली. आपल्या दौर्याची सुरूवात राजकोट येथील खोडालधाम मंदिराचे दर्शन घेऊन करणार असल्याचेही हार्दिक पटेल यांनी सांगितले आहे. पाटीदार समुदायातील लेवा जातीसाठी हे देवस्थान पवित्रस्थान मानले जाते.

हार्दिक पटेल यांच्या रुपाने गुजरात काँग्रेसला एक आक्रमक चेहरा मिळाला असला तरी त्याने पक्षातील सत्तारचनाही बदलू शकते. सध्या गुजरात काँग्रेसमध्ये भारतसिंह सोळंकी, अर्जुन मोदवाडिया व सिद्धार्थ पटेल यांचे गट प्रभावशाली आहेत. त्यांना सोबत घेऊन हार्दिक पटेल यांना आता वाटचाल करावी लागणार आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0