मोदींचा सुरुवातीचे प्रतिस्पर्धी हरेन पंड्या यांच्या खून प्रकरणी नवे पुरावे, जुनी असत्ये

मोदींचा सुरुवातीचे प्रतिस्पर्धी हरेन पंड्या यांच्या खून प्रकरणी नवे पुरावे, जुनी असत्ये

हरेन पंड्यांच्या खुनासाठी सोहराबुद्दिन हाच जबाबदार होता आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी डी.जी वंजारा यांनी तशी सुपारी दिल्याचे त्याने आपल्याला सांगितले होते अशी साक्ष या प्रकरणातील एका साक्षीदाराने दिली. त्यामुळे या प्रकरणामधील संशयितांची१५ वर्षांची प्रतीक्षा संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सुशांत सिंह, साना गांगुली, फरहान बोलले; सौरभ, सेहवागचे मौन, मराठी चित्रपटसृष्टी थंड
एनआरसी लागू करण्याचा अद्याप निर्णय नाहीः सरकार
मोदीच शहांना खोडून काढत आहेत – विरोधकांची टीका

हरेन पांड्या खून प्रकरणाची पुन्हा तपासणी करण्यासाठी दाखल याचिकांवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या खून प्रकरणाची पुन्हा तपासणी होणे, का आवश्यक आहे, हे विषद करणारी ही दोन भागांची लेख मालिका.

हा दोन भागांच्या मालिकेतील पहिला लेख आहे. दुसरा भाग येथे आहे.

§

हैद्राबाद मागच्या रविवारी मुंबईतील सीबीआय विशेष न्यायालयात झालेल्या आझम खान या किरकोळ गुंडाने दिलेल्याआश्चर्यकारक साक्षीमुळे एक गोष्ट निःसंशय सिद्ध झाली आहे: तो अजूनही जिवंत आहे. ही दया दाखवल्याबद्दल त्याने देवाचे आभारच मानायला पाहिजेत. अर्थात दहा-बारा वर्षं तुरुंगाच्या आतबाहेर काढणे याला आयुष्य म्हणायचं का हा प्रश्नच आहे!

मार्च २००३ मध्ये गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पंड्या यांचा खून झाला. या घटनेनंतर पंधरा वर्षांनी आझम खान याने खुल्या न्यायालयात अशी साक्ष दिली की गुन्हे शाखेचे माजी अधिकारी आणि त्यावेळी मुख्यमंत्री असणाऱ्या नरेंद्र मोदींचे लाडके डी. जी. वंजारा यांनी या खुनाची सुपारी दिली होती.

आझम खान नक्की काय बोलला ते समजून घेणे महत्त्वाचे आहे.

तो म्हणाला, सोहराबुद्दिनने असा दावा केला होता की पंड्यांची सुपारी तीन लोकांना देण्यात आली होती. त्यांच्यापैकी एक म्हणजे सोहराबुद्दिन शेख. इतर दोघेजण होते नईम खान आणि शाहिद रामपुरी. रामपुरी हा आणखी एक गुंड, ज्याचे नाव पंड्यांच्या प्रकरणात पहिल्यांदाच आले आहे. आझम खान म्हणाला की “सोहराबुद्दिनच्या आग्रहावरून”, पंड्यांचा खून सोहराबुद्दिनचा  सहकारी तुलसीराम प्रजापती, आणि “एक पोरगा” यांनी केला.

आजवर गुप्तपणे चालू असलेल्या चौकशीमधून गेली १५ वर्षे ही अफवा ऐकिवात आहेच, पण त्याबाबत कधीच काही उघडपणे समोर आले नव्हते. यावेळी मात्र पहिल्यांदाच, खुल्या न्यायालयात ही साक्ष दिली गेली. सोहराबुद्दिन आणि तुलसीराम प्रजापती या दोघांचाही मृत्यू झाला आहे. पूर्वी नक्षलवादी असलेला पण आता पोलिसांचा खबऱ्या झालेला रियल इस्टेटमधला ठग नयीमुद्दिन ऊर्फ नईम यानेही या नाटकात भूमिका निभावली होती आणि त्याचाही मृत्यू झालेला आहे. हे तिघेही सोयिस्करपणे २००५ ते २०१६ दरम्यान पोलिसांच्या चकमकीत मारले गेले आहेत. माजी गृहमंत्री अमित शाह यांनी एकदा तक्रार केली होती की गुजरात पोलिसच सतत प्रकाशझोतात असतात हे हैद्राबादच्या पोलिसांवर अन्याय करणारे आहे. आणि ते खरेच आहे.

मात्र, आता यातून अनेक महत्त्वाचे प्रश्न उभे राहतात.

  • आझम खान सत्य सांगत आहे का? आणि जे काही असेल, ते आत्ता का सांगत आहे?
  • हे सत्य असेल तर, वंजारा अशी सुपारी का देतील?
  • हा दुसरा ‘पोरगा’ कोण होता? तो अजून जिवंत आहे का? असेल, तर कुठे आहे?
  • शाहिद रामपुरी कुठे आहे आणि तो अजून जिवंत आहे का?
  • आणि शेवटी, पंड्यांच्या प्रकरणाशी वंजारांचा काय संबंध होता?

संपूर्ण आणि निव्वळ सत्य?

आझम खानचे वडील एक छोटे व्हिसा एजंट होते. त्यांचा लवकर मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या मुलाला ते फारसे शिकवू शकले नाहीत. खानला स्वतःलाही शिक्षणात विशेष रस नव्हताच. ९० च्या दशकाच्या शेवटी आणि २००० च्या सुरुवातीला क्रिकेट बेटिंगचा धंदा जोरात होता. आझम खानने छोट्या छोट्या बेटिंगसह गुन्हेगारी विश्वात प्रवेश केला. त्याच्यामुळेच तो स्थानिक पोलिसांच्या संपर्कात आला आणि गुन्हेगारांच्या यादीतही त्याचे नाव आले. अशा तऱ्हेच्या बहुतांश लोकांच्या कहाण्या त्याच ठिकाणी येऊन संपतात.

९० च्या दशकाच्या सुरुवातीला, अब्दुल लतीफ हा गुजरातचा आवडता गुंड होता. तो लोकांना एकतर आवडत तरी असे किंवा ते त्याचा तिरस्कार तरी करत. या ना त्या प्रकारे बऱ्याच लोकांचा त्याच्याशी संबंध असे, मात्र ते जगाला कळू नये अशीही त्यांची इच्छा असे. गुजरातमधील दहशतवादविरोधी पथकाबरोबरच्या (एटीएस) चकमकीत लतीफ मारला गेला तेव्हा त्याचे दोन मुख्य सहकारी शरीफ खान आणि रसूल पार्टी यांच्याकडे त्याचा वारसा गेला. सलिम अन्वरुद्दिन शेख हा शरीफ खानचा ड्रायव्हरहोता. एकदा शरीफसाठी एका हॉटेलमध्ये चेक-इन करत असताना त्याने एक त्याच्या आवडीचे टोपणनाव घेतले आणि नंतर कायम तेच टोपणनाव वापरले. हे नाव होते सोहराबुद्दिन.

आझम खानच्या दुर्दैवाने २००१-२००२ मध्ये तो सोहराबुद्दिनला भेटला. त्या वेळी लतिफचा मृत्यू झालेला होता, शरीफ खान आणि रसूल दुबईला पळून गेले होते, आणि मुख्यमंत्री सुरेश मेहतांच्या काळातल्या प्रसिद्ध ‘एके-४७ प्रकरणा’मध्ये सोहराबुद्दिन जामिनावर बाहेर होता.

टोळीबरोबरची वाढ

जाता जाता काही रोचक गोष्टी: १९९२ मध्ये जवळजवळ हरेन पंड्यांसारख्याच परिस्थितीमध्ये काँग्रेस नेते रौफ वलिउल्लाह यांचा खून झाला. त्यानंतर त्यावेळी अगदी तरुण असलेल्या गीता जोहरी यांनी शरीफ खानला अटक केली. पण अहो आश्चर्यम्! शरीफ खान पळून गेला! अनेक पोलिस कॉन्स्टेबलवर आरोप ठेवण्यात आले आणि त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

त्यानंतर पोलिसांनी शरीफ खानच्या ड्रायव्हरला, सोहराबुद्दिनला अटक केली. त्यांना सोहराबच्या मूळ गावी, झिरणिया, मध्यप्रदेश येथे एका कोरड्या पडलेल्या विहिरीत लपवलेल्या २६ एके ४७ सापडल्या. सुरुवातीला त्यांची संख्या ४८ असल्याचा संशय होता, पण प्रकरण न्यायालयात जाईपर्यंत ती संख्या २६ झाली. शरीफ खान निसटून गेला आणि सोहराब मात्र गुन्हे शाखा आणि एटीएसच्या पुढच्या पिढीतल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या तावडीत सापडला.

लतीफचा मुख्य धंदा बेकायदेशीर दारूचा होता. त्याचा मृत्यू झाल्यावर गुजरातमधला बेकायदेशीर दारूचा धंदा मुस्लिम टोळ्यांकडून हिंदू टोळ्यांकडे गेला. यामुळे सोहराबकडे काम उरले नाही. बहुसंख्य मुस्लिम टोळ्या उदयपूरला गेल्या. यात लतिफच्या मुलांचाही समावेश होता.

गुजरातचे वरिष्ठ पोलिस अधिकारी अभय चुडासामा यांनी सोहराबुद्दिनला जमिनीच्या आणि संगमरवराच्या व्यवसायातल्या आंतरराज्यीय माफियांकडे वळवले आणि त्याला त्यात गुंतवून ठेवले. यामागचे कारण काय त्यांचे त्यांना माहीत! बराच काळ सोहराबुद्दिन खरे तर चुडासामाचाच माणूस होता आणि वंजारांना तो योगायोगानेच सापडला. या प्रकरणाशी जवळून संबंध असलेल्या एका स्रोतानुसार, सोहराबचा भाऊ रुबाबुद्दिन याने जेव्हा त्याच्या भावाच्या केसमध्ये पुन्हा अपील करण्याचे ठरवले तेव्हा त्याने विशेषत्वाने चुडासामांना या अपीलमधून बाहेर ठेवले जावे अशी मागणी केली.

सोयिस्कर मृत्यू

गोळाबेरीज अशी : सोहराबुद्दिनचे एकंदर गुजरात पोलिसांशी, आणि विशेषकरून वंजारांशी (आणि चुडासामांशी सुद्धा, आझम खानने त्याच्या एका पूर्वीच्या जबाबामध्ये त्यांचाही उल्लेख केला आहे) जवळचे संबंध असल्याचे आझम जेव्हा सांगतो, तेव्हा तो निश्चितच खरे बोलत आहे. सोहराबुद्दिनचा पोलिसांबरोबर मोठा इतिहास आहे – आणि त्यापैकी सगळाच काही कुंपणाच्या त्या बाजूचा नाही.

पण हे संपूर्ण सत्य आहे का? आझम खानची अधिकृत साक्ष संपली आहे पण कथा संपलेली नाही. उदाहरणार्थ, आझम, सोहराबुद्दिन, तुलसीराम आणि इतरांना ३१ डिसेंबर २००४ रोजी हमीद लाला नावाच्या आणखी एका गुंडाच्या हत्येबद्दल अटक करण्यात आली होती. तेव्हाच गुजरात पोलिसांनी सोहराबुद्दिन आणि तुलसीला पुन्हा कस्टडीमध्ये घेतले – सोहराबुद्दिन रेकॉर्डवर होता, तुलसी नव्हता – आणि शेवटी मारून टाकले.

आझमने न्यायालयात सांगितले त्यानुसार, तो स्वतः २००९ मध्ये हमीद लालाच्या प्रकरणामधून सुटला. मात्र एक तथ्य अजूनही नमूद केले गेलेले नाही. ते म्हणजे सोहराबुद्दिनची सुद्धा खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली होती. हमीद लालाच्या खुनाचे प्रकरण अजूनही उलगडलेले नाही.

म्हणजे मग अजून एक प्रश्न उभा राहतो: हमीद लालाला कोणी मारले आणि त्याचा आरोप सोहराबुद्दिनवर कोणी ठेवला? सोहराबुद्दिनचा इतका सोयिस्कररित्या मृत्यू झाला आहे की आता त्याला कुठल्याही गोष्टीसाठी जबाबदार धरता येते!

अपूर्ण माणूस

आणखी एक गोष्ट अगदी उघड आहे ती म्हणजे हरेन पंड्या यांना मारण्याची सुपारी दिली गेली होती.

हरेन पंड्या

त्या वेळी सीबीआयने हे प्रकरण दाबण्याचा केलेला प्रयत्न इतका नवशिक्यासारखा आणि मूर्खासारखा होता की फोरेन्सिकच्या जगात हे कळेल तेव्हा त्याची नोंद नक्कीच कसला तरी जागतिक विक्रम म्हणून केली जाईल.

पंड्यांच्या खुनामध्ये बारा लोकांवर आरोप ठेवण्यात आला होता. या आरोपाबरोबरच व्हीएचपीचा एक कनिष्ठ कार्यकर्ता जगदीश तिवारी याच्या हत्येचा प्रयत्न हाही एक आरोप त्यांच्यावर होता.

फिर्यादी पक्षाच्या कथनामध्ये इतकी मोठी छिद्रे होती की एखादा बुलडोझर त्यातून सहज पार व्हावा. शिवाय प्रमुख आरोपी रसूल पार्टी आणि मुफ्ती सुफियान सोयिस्कररित्या गायब झालेले होते. पण तरीही २००७ मध्ये न्या. सोनिया गोकणी यांना सर्व आरोपींवरचे आरोप सिद्ध होतात असे आढळले. त्यांनी सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २०११ मध्ये मात्र, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी. एच. वाघेला आणि जे. सी. उपाध्याय यांनी, सादर केलेल्या आणि सादर न केलेल्या पुराव्यांचा अधिक जागरूकतेने विचार करून हरेन पंड्या प्रकरणातील सर्व आरोपींची मुक्तता केली.

त्या वेळी, पंड्यांच्या पत्नीने पुन्हा तपास करावा याकरिता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आणि सुटकेच्या विरोधातले अपील कोणी केले असेल? मनमोहन सिंग सरकारने! गृहमंत्री पी. चिदंबरम आणि कायदामंत्री सलमान खुर्शीद यांच्यासमोर सीबीआयने केस मांडल्यानंतर हे अपील केले गेले. आझम खानने जे काही सांगितले त्याबाबत सीबीआयने या मंत्र्यांना माहिती दिली का ते माहीत नाही. हे अपील अजूनही न्यायालयात पडून आहे.

थोडक्यात: आत्तापर्यंत, अधिकृतरित्या, हरेन पंड्यांना कुणीच मारलेले नाही. खुनाचा आरोप असलेल्या आरोपींनी तर नक्कीच नाही.

हरेन पंड्या खून प्रकरणातून सुटका झालेल्या असगर अली याला अलिकडेच तेलंगणा पोलिसांनी एका दलित युवकाच्या ऑनर किलिंग प्रकरणामध्ये सामील असल्याच्या आरोपावरून अटक केली. वरील छायाचित्रात त्याने पांढऱ्या चौकटींचा निळा शर्ट घातला आहे. छायाचित्र श्रेय: टीव्ही१८ तेलगू.

मात्र, आणि हे महत्त्वाचे आहे, प्रकरणातील मुख्य आरोपी असगर अली याला नुकतेच एका पूर्णपणे वेगळ्याच प्रकरणी, तेलंगणामधील नलगोंडा या त्याच्या मूळ जिल्ह्यातून अटक करण्यात आली. सप्टेंबरमध्ये तिथला एक स्थानिक प्रतिष्ठितमारुती राव याने त्याच्या स्वतःच्या दलित जावयाची हत्या केली. ही ऑनर किलिंगची घटना काही काळ बरीच चर्चेत होती. मारुती रावला आणि ज्याने प्रत्यक्ष वार केले तो सुभाष शर्मा यांना इतर काही जणांबरोबर ताब्यात घेण्यात आले. या इतरांमध्ये पंड्याच्या केसमध्ये आरोपी असलेले आणि नंतर सुटका झालेले असगर अली आणि अब्दुल बारी हे दोघेही होते. त्यांच्यावर आता ऑनर किलिंगच्या घटनेच्या मागचे सूत्रधार असल्याचा आरोप आहे.

असगर अली हासुद्धा सोहराबसारखाच गुन्हेगारीचा इतिहास असलेला गुंड आहे आणि पंड्यांच्या खुनामागचे सत्य काय आहे हे माहीत असणाऱ्या तीन किरकोळ गुन्हेगारांपैकी एक आहे. जर हे लोकही चकमकीत मारले गेले तर निदान न्यायालयातील साक्षीपुरती तरी पंड्यांच्या खऱ्या खुन्यांबद्दलची माहिती कदाचित त्यांच्याबरोबरच संपून जाईल. (म्हणूनच या साक्षीदारांची सुरक्षा ही सत्य जाणून घेण्यामध्ये स्वारस्य असणाऱ्यांची पहिली चिंता असली पाहिजे).

यामुळे आता अजूनही वंजारांवरचा संशय कायम आहे.

पण वंजाराच का? केवळ हरेन पंड्यांचाच विचार केला तर वंजारांचा त्यात काही संबंध नाही. ते तर कुणाच्या तरी वतीने काम करत होते. राजकारणी लोक छोट्या गुन्हेगारांशी संबंध ठेवत नाहीत – पोलिस ठेवतात!

डी. जी. वंजारांचा, आता भारताचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांच्याशी खूप जुना, अगदी खुला आणि सर्वात जोखमीचा संबंध आहे. त्यांना त्याबाबत बढाई मारायलाही आवडते. काही लोक जणू प्रकाशझोतात राहण्यासाठीच बनलेले असतात, आणि काही सावलीत! वंजारांनी खरे तर कायम सावलीत राहणे अपेक्षित होते. ही महत्त्वाची गोष्ट त्यांचे सहकारी डाह्याभाई गोबरजी यांना व्यवस्थित समजली होती. वंजारा यांना मात्र ती समजली नाही.

एका वादग्रस्त सीबीआय स्टिंगबाबत अमित शाह एकदा बोलून गेले होते, “सोहराबुद्दिनने स्वतःच पायावर धोंडा मारून घेतला”. आता कदाचित वंजारांकडेही ते तसेच पाहत असतील, की वंजारांनी स्वतःच आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. वंजारा २०१३ मध्ये तुरुंगात होते तेव्हा, मोदींच्या गप्प राहण्यामुळे वैतागून त्यांनी सीबीआयच्या संजय तामगाडगे यांना हे सांगितलेच होते की पंड्यांचा खून हा एक राजकीय कट होता. याच तामगाडगे यांनी एकदा आझमची शपथपूर्वक साक्ष घेतली होती. त्यानंतर काही महिन्यांमध्ये वंजारा यांची जामिनावर सुटका झाली होती.

तरीही ज्या इल्लोळ गावात सोहराबुद्दिनची पत्नी कौसर बी हिला जिवंत जाळून पुरले गेले, त्याच गावच्या या माणसाबाबत कसलेही भाकीत करणे अवघड आहे. आणि मांजराला तर नऊच आयुष्ये असतात, याच्याकडे त्याहूनही जास्त आहेत. सोहराबुद्दिनच्या केसमध्ये सात वर्षे तुरुंगात काढूनही, किंवा काढल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयाने या वर्षी सत्र न्यायालयाने केलेल्या त्याच्या सुटकेवर शिक्कामोर्तब केले.

स्पष्ट सांगायचे तर, या प्रकरणाची सुनवाई सीबीआयच्या विशेष न्यायालयात चालू आहे. पंड्यांच्या खुनाबाबतचा विषय त्यात आणलेला असल्यामुळे आता बरेच काही पणाला लागले आहे.

प्रश्न असा आहे की वंजारांचा पंड्यांच्या प्रकरणाशी काही संबंध होता का?

अधिकृत कथन असे आहे की त्यांच्या त्याच्याशी काहीही संबंध नव्हता. अधिकृत कथन धादांत खोटे आहे.

सरिता रानी या मूळच्या इंजिनियरअसून आता पत्रकार म्हणून १८ वर्षे काम करत आहेत. त्या सध्या एका स्वतंत्र प्रकल्पाकरिता संशोधन करीत आहेत.

सदर लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.

अनुवाद: अनघा लेले

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0