चंदीगड : हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकांत सत्ताधारी भाजपला काँग्रेसने जोरदार टक्कर दिली असून भाजपचे ९० पैकी ७५ जागा जिंकण्याचे स्वप्न भंग पावले आ
चंदीगड : हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकांत सत्ताधारी भाजपला काँग्रेसने जोरदार टक्कर दिली असून भाजपचे ९० पैकी ७५ जागा जिंकण्याचे स्वप्न भंग पावले आहे. भाजपचे सात मंत्री पराभवाच्या छायेत असून सत्तेचा घास हिसकावून घेण्याची किमया दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीने (जेजेपी) साधली आहे. अखेरचे वृत्त आले तेव्हा भाजपला ३९, काँग्रेसला ३३ व जेजेपीला ११ जागा मिळाल्या असून सत्तेच्या चाव्या जेजेपीच्या हातात आल्याचे लक्षात आल्याने काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर जेजेपीला दिली आहे.
जेजेपीचे नेते दुष्यंत चौटाला यांनी या ऑफरबद्दल अधिकृत मत व्यक्त केले नसले तरी हरियाणात सत्तास्थापनेत आपल्या पक्षाची निर्णायक भूमिका असेल असे सूचित केले आहे.
राष्ट्रवाद, ३७० कलमावरचा प्रचार भाजपला भोवला
देशाचे लष्कर व निमलष्करी दलात हरियाणातील बहुसंख्य तरुणांचा भरणा आहे. या तरुणांना व त्यांच्या कुटुंबियांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने भाजपचे अध्यक्ष अमित शहा व पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रवाद व ३७० कलम रद्द करण्यावर प्रचाराचा भर दिला होता. पण त्यांची ही राजकीय चाल पूर्णपणे चुकली. दुसरीकडे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची शेती धोरणेही पक्षाच्या अंगाशी आली. निवडणुकीच्या प्रचारात खट्टर यांनी शेतकऱ्यांना मोठी आश्वासने दिली होती. त्यांचा जाहीरनाम्यात समावेशही करण्यात आला होता. पण या आश्वासनांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून येते.
दुष्यंत चौटालांची एकाकी लढत
मूळचे इंडियन नॅशनल लोकदलचे सदस्य असलेल्या दुष्यंत चौटाला यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात चौटाला घराण्यात वादविवाद उद्भवल्यानंतर स्वत:चा जेजेपी स्थापन केला होता. दुष्यंत चौटाला हे भारताचे दिवंगत माजी उपपंतप्रधान चौधरी देवीलाल यांचे पणतू, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे नातू आहेत. १६ व्या लोकसभेत ते हिसार लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. कमी वयाचे खासदार अशी नोंदही त्यांची आहे.
दुष्यंत चौटाला यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला तेव्हा काँग्रेस व भाजपच्या अनेक नेत्यांनी या पक्षावर टीका केली होती. हरियाणातील अनेक दिग्गज नेत्यांनी या पक्षाची लहान मुलांची पक्ष म्हणून टर उडवली होती. पंतप्रधान मोदींनीही आपल्या भाषणात या पक्षावर टीका केली होती. पण जेजेपीच्या अनपेक्षित कामगिरीने भाजपचे ७५ जागा जिंकण्याचे लक्ष्य भंग पावले आहे.
COMMENTS