बदलाची प्रक्रिया सुरु झाली असून, तरुणांचा मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, “२२० जागा मिळविण्याचे जे चित्र उभे करण्यात आले होते, ते महाराष्ट्रातील जनतेने नाकारले आहे. सत्तेमध्ये गेल्यानंतर पाय जमिनीवर ठेवायचे असतात. सत्तेचा दुरुपयोग करायचा नसतो. डोके ताळ्यावर ठेऊन निर्णय घ्यायचे असतात. पण विरोधी पक्षाच्या नेत्यांवर वैयक्तिक हल्ला करण्याचा जो प्रकार झाला, त्याला जनतेने नाकारले आहे. हे शासन आणि मुख्यमंत्री याना लोकांनी नाकारले आहे” मात्र आम्हाला विरोधी पक्षामध्ये बसण्याचा कौल मिळाला असल्याचेने सहकारी काँग्रेस आणि इतर पक्षांशी विचारविनिमय करून पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पवार म्हणले, की आम्ही सगळे मित्रपक्ष बहुमताच्या आसपास जाऊ ही अपेक्षा होती, पण अधिक प्रयत्न करायला हवे होते.
ते म्हणाले, “जे यश मिळाले त्याचा आनंद आहे. तरुणांचा आम्हाला खूप मोठा पाठींबा मिळाला. बदलाची प्रक्रिया सुरु झाली आहे. जनमत पाहता पक्ष पुन्हा जोमाने उभा करणार आहे. नवे नेतृत्त्व उभे करणार आणि ही लढाई पुढे नेणार.”
महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी कलम ३७० चा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. त्याविषयी बोलताना पवार म्हणाले, की शेतीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, उद्योग- कारखाने बंद पडत आहेत. बेरोजगारी वाढत आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आणि कलम ३७० जे संसदेने रद्द केले आहे. ते परत आणण्याचा प्रश्नच नाही, तरी पंतप्रधान आव्हान देत होते.
पवार म्हणले, “देशाचा पंतप्रधान विरोधी पक्षाच्या नेत्यांना, ‘डूब मरो’, असे जे म्हणतात ते त्यांना त्यांच्या पदाला शोभा देत नाही.”
साताऱ्यामध्ये भाजपचे लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा मोठ्या फरकाने पराभव होत असल्याचे चित्र आहे. त्याविषयी बोलताना ते म्हणाले, “गादीची प्रतिष्ठा न ठेवण्याची काही जणांची भूमिका असेल, तर लोक काय करतात याचे सातारा, हे उत्तम उदाहरण आहे. श्रीनिवास पाटील यांना मोठ्या प्रमाणावर जनतेने पाठींबा दिला.” पवार म्हणाले, की काही अपवाद वगळता, पक्षांतराला लोकांनी पाठींबा दिला नाही. पक्ष सोडून गेलेल्या लोकांविषयी जनतेची प्रतिक्रिया नकारात्मक होती.
पवारांचे राजकारण आता संपेल, असे जे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा म्हणत होते, त्याविषयी बोलताना पवार म्हणाले, की त्यांचे ज्योतिषशास्त्राचे ज्ञान किती आहे, याची मला कल्पना नव्हती. पण पंतप्रधान आणि गृहमंत्री आता महाराष्ट्राला सहकार्य करतील, अशी आशा आहे.
COMMENTS