कोव्हिड लसींची परिणामकारकता

कोव्हिड लसींची परिणामकारकता

लसींची परिणामकारकता म्हणजे किती टक्के लोकांना कोव्हिड-१९ होऊ शकतो असा त्याचा अर्थ नाही. हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला लागू नये आणि मृत्यू होऊ नये एवढीच लसींची उद्दिष्टे आहेत. लस घेऊन हॉस्पिटल आणि मृत्यू टळला तरी सौम्य कोव्हिड-१९ होऊ शकतो. आणि ती व्यक्ती व्हायरस पसरवू शकते. त्यामुळे लस घेतल्यावरही फेसमास्क लावणे आणि सोशल डिस्टंटन्सिंग पाळणे आवश्यक आहे.

देशात कोरोनाचे ११४ रुग्ण
कोरोनात सरकारपुढे शरणागत सर्वोच्च न्यायालय
एकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे

कोव्हिडचा अनपेक्षित उद्रेक झाला आणि जगातील सर्व देशांना एका अनोळखी संकटाला तोंड द्यावे लागले. कुठल्याच देशाची तयारी नव्हती. सुरुवातीस गोंधळ झाला. करोना किती वेगाने पसरणार याची कल्पना आली नाही. उपचार आणि औषधे याबाबत अनिश्चितता होती. असे असताना विविध देशांनी अपेक्षेपेक्षा जलदगतीने लसींची निर्मिती केली. मात्र मानवतेसाठी सर्व देशांनी एकत्र येणे, गरीब देशांना मदत करणे,  औषधी कंपन्यांनी नफ्याऐवजी मानवतेला प्राधान्य देणे आवश्यक होते. कदाचित अजूनही दर्जेदार लसी बनल्या असत्या. आणि त्या त्वरित जगभर वितरित होऊन कोव्हिड-१९ लवकर आटोक्यात आला असता. मात्र हा वेगळा विषय आहे. या लेखात कोव्हिड लसींची परिणामकारकता आणि कोव्हिड होण्याची शक्यता यावर लक्ष केंद्रित केले आहे. उदाहरणांसाठी अमेरिकेतील आणि भारतातील लसींवर चर्चा केली आहे.

जगात ज्या लसींना निरनिराळ्या देशात संमती मिळाली आहे त्यांच्या नावाबरोबर परिणामकारकतेचा आकडा (% efficacy) दिला जातो. याचा अर्थ काय? अमेरिकेत सध्या तीन लसी दिल्या जात आहेत. त्या म्हणजे फायझर (95% परिणामकारकता), मॉडर्ना (94% परिणामकारकता) आणि नुकतीच आलेली जॉन्स (70 % परिणामकारकता) किंबहुना सर्व जगात इतर लसींच्या तुलनेत हिची परिणामकारकता खूप खाली आहे. त्यामुळे मिशिगनमधील डिट्रॉइट शहराला जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीचा पुरवठा गेला तेव्हा डिट्रॉइटच्या महापौरांनी परिणामकारकता तुलनेने कमी आहे ती लस स्वीकारायला नकार दिला. ते बरोबर होते का? भारतातील मिळणाऱ्या दोन लसी म्हणजे ऑक्सफर्डची ऍस्टराझेनेका म्हणजे कोव्हिशिल्ड (90% परिणामकारकता) आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन (81% परिणामकारकता). म्हणजे इथे ऑक्सफर्डची कोव्हिशिल्ड सरस वाटू शकते. तसे खरे आहे का?

पण कुठली लस वापरावी हे ठरवण्यासाठी हे आकडे तसे फसवे आहेत. ते कसे बघण्यासाठी आधी हे आकडे कसे काढले जातात हे बघणे आवश्यक आहे. कुठल्याही लसीच्या चाचणीत हजारो उमेदवार असतात. उदा. फायझरच्या चाचणीत ४३ हजार उमेदवार होते. उमेदवारांचे दोन सारखे गट केले जातात. त्यांना ‘प्लॅसीबो’ गट आणि ‘लस’ गट म्हणूयात. उमेदवारांना आपण कोणत्या गटात आहोत हे अजिबात माहीत नसते. ‘प्लॅसीबो’ गटाला प्लॅसीबो, म्हणजे खोटी लस दिली जाते. व्हिटॅमिन बी किंवा तत्सम इंजेक्शन दिले जाते. ‘लस’ गटाला मात्र चाचणी करण्यात येणारी लस दिली जाते. ही माहिती अत्यंत गुप्त ठेवली जाते. उमेदवारांना तर अजिबात माहीत नसते. यानंतर या सर्वांना दैनंदिन आयुष्याप्रमाणे इतर जनतेत मिसळू दिले जाते. त्यांचे निरीक्षण करण्यात येते. काही कालावधीनंतर त्यांचे टेस्टिंग केले जाते. दोन्ही गटातील कोव्हिड झालेल्या पेशंटच्या मोजणीच्या विशिष्ट समीकरणाने परिणामकारकतेची संख्या काढतात. दोन गटातील कोव्हिड झालेल्या संख्येतील फरकाला ‘प्लॅसीबो’गटातील संख्येने भागतात आणि नंतर 100 ने गुणतात.

परिणामकता % = (दोन गटातील कोव्हिड झालेल्यांच्या संख्येतील फरक) / (‘प्लॅसीबो’ गटातील कोव्हिड झालेल्यांची संख्या) x 100

आता ही आकडेवारी कशी असते ते बघू यात. उदाहरणार्थ जर ‘प्लॅसीबो’ गटात 50 आणि ‘लस’ गटात 50 रोगी असतील तर परिणामकारकता शून्य टक्के. कारण लस दिली काय, नाही दिली काय दोन्ही गटात कोव्हिडचे पेशंट सारखेच. परंतु जर ‘प्लॅसीबो’ गटात सर्व 100 पेशंट आणि ‘लस’ गटात कुणीच नाही तर परिणामकारकता १०० टक्के.

वास्तवात फायझरच्या चाचणीत दोन्ही गटात एकूण 170 उमेदवारांना कोव्हिड झालेला आढळला. त्यातील ‘प्लॅसीबो’ गटातील 162 उमेदवारांना कोव्हिड झाला तर ‘लस’ गटात उर्वरित 8 उमेदवारांना कोव्हिड झाला. त्यांच्यातील फरक 162 वजा 8 म्हणजे फरक 154 आहे. यावरून आपल्याला वरील समीकरण वापरून काढता येईल. 154 भागिले 162 गुणिले 100. फायझरची परिणामकारकता 95% आहे.

फायझरची परिणामकारकता% = 154 /162 x 100 = 95%

फायझरची परिणामकारकता 95% आहे याचा अर्थ फायझरची लस घेतलेल्या दर १०० जणांपैकी ५ जणांना कोव्हिड होऊ शकतो असा अजिबात नाही. तसे अनुमान चुकीचे आहे. हे जे परिणामकारकतेचे आकडे आहेत ते शास्त्रज्ञांना चाचणीत काय आढळले ते आहेत. हे आकडे संशोधनासाठी उपयुक्त आहे. भविष्यात काय होईल ते परिणामकारकता सांगत नाही. मात्र गणिती शक्यतेनुसार आपण म्हणू शकतो की परिणामकारकतेचा अर्थ असा आहे की ती लस घेतलेल्या एखाद्या माणसाला लस न घेणाऱ्या माणसापेक्षा कोव्हिड होण्याची शक्यता परिणामकारकता % ने कमी आहे. जेवढे टक्के जास्त तेवढे जास्त संरक्षण मिळू शकते. उदा. फायझर घेतलेल्या व्यक्तीला लस न घेतलेल्या व्यक्तीपेक्षा कोव्हिड होण्याची शक्यता 95% ने कमी आहे.

अशा गणिती शक्यता शास्त्रानुसार जॉन्सन अँड जॉन्सनची लस घेतलेल्या एखाद्या माणसाला लस न घेणाऱ्या माणसापेक्षा कोव्हिड होण्याची शक्यता 69% ने कमी आहे. म्हणजे या लसीची कोव्हिड होण्याची गणिती शक्यता फायझर आणि मॉडर्नापेक्षा जास्त आहे. म्हणून फायझर आणि मॉडर्ना या लसी जॉन्सन अँड जॉन्सन लसीपेक्षा सरस आहेत का? तसेच भारतात भारत बायोटेकची, कोव्हॅक्सिनची लस घेतलेल्या एखाद्या माणसाला लस न घेणाऱ्या माणसापेक्षा कोव्हिड होण्याची शक्यता 81% ने कमी आहे. तर ऑक्सफर्डची ऍस्टराझेनेका म्हणजे कोव्हिशिल्डची लस घेतलेल्या एखाद्या माणसाला लस न घेणाऱ्या माणसापेक्षा कोव्हिड होण्याची शक्यता 90% ने कमी आहे. म्हणजे भारत बायोटेकची, कोव्हॅक्सिनची लसीची कोव्हिड होण्याची गणिती शक्यता ऍस्ट्रोझेनेकाच्या लसीपेक्षा जास्त आहे. म्हणून ऍस्ट्रोझेनेकाची लस ही भारतात भारत बायोटेकच्या लसीपेक्षा सरस आहे का?

या प्रश्नांची उत्तरे आपण लसींकडून काय अपेक्षा आहेत यावर अवलंबून आहे, लसी काय करू शकतात तसेच हॉस्पिटल आणि आरोग्य सेवेतील मनुष्यबळाच्या (डॉक्टर आणि इतर कर्मचारी) याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.

आकृती क्रमांक 1 मध्ये दाखवल्याप्रमाणे करोना व्हायरसचा संसर्ग झालेले रोगी विविध स्टेजमध्ये पोचतात. बऱ्याच जणांना संसर्ग होऊनही कुठलीही लक्षणे दिसत नाहीत. तरीही ते व्हायरस दुसऱ्यांना देऊ शकतात. नंतरच्या स्टेजमध्ये सौम्य लक्षणांपासून मृत्यू हा स्पेक्ट्रम आहे. सौम्य लक्षणे आणि तीव्र लक्षणे असलेले रोगी घरच्या घरी औषधे घेऊन आणि क्वारन्टीन होऊन बरे होऊ शकतात. मात्र तीव्र लक्षणवाल्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करायला लागण्याची दाट शक्यता असते.

हॉस्पिटल, आरोग्य मनुष्यबळ यांच्या दृष्टीने तीव्र लक्षणे असलेले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलेले रोगी हे आरोग्य व्यवस्थेवर ताण आणतात, संसर्ग मृत्यूचे प्रमाण वाढवतात. डॉक्टर्स आणि नर्सेस यांना दिवसाला विश्रांती न घेता १२-१२ तास काम करावे लागते. हॉस्पिटल क्षमतेच्यावर रुग्णांनी भरभरून वहात असतात. मृत्यू मोठ्या प्रमाणात होतात. सध्या तरी विकसित झालेल्या लसी संसर्गापासून संपूर्ण संरक्षण देऊ शकत नाही. त्यामुळे तीव्र लक्षणे, हॉस्पिटलमध्ये दाखल होणे, मृत्यू पावणे या गोष्टी होऊ देऊ नये ह्या लसींकडून अपेक्षा आहेत. फायझरच्या चाचणीतील ‘लस’ गटात 8 जणांना कोव्हिड झाला. मात्र त्यातील एकाही व्यक्तीला ना  हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले ना ती मृत्यू पावली. ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. म्हणजे कोणत्याही मान्यता मिळालेल्या लसीमुळे कोव्हिड होण्यापासून संपूर्ण संरक्षण मिळाले नाही मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल होणे किंवा मृत्यू यांपासून संरक्षण झालेले दिसत आहे. सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत हॉस्पिटल आणि आरोग्य मनुष्यबळ यांच्या दृष्टीने हे पुरेसे आहे.

आकृती क्र. 2 मधे दाखवल्याप्रमाणे कुठलीही लस घेतल्यानंतर तीन शक्यता आहेत. एक, संसर्ग न होता व्यक्ती निरोगी राहू शकते. दोन, व्यक्तीला कोव्हिड होऊ शकतो परंतु त्याची लक्षणे न दिसता ती व्यक्ती (Asymptomatic Patient) करोना व्हायरस दुसऱ्याला देऊ शकते. तीन,  हॉस्पिटल आणि मृत्यू टळला तरी सौम्य लक्षणांचा कोव्हिड होऊ शकतो. आणि ती व्यक्ती व्हायरस पसरवू शकते. औषधे आणि स्वतःला घरी  क्वारन्टीन तो बरा होऊ शकतो. म्हणजे लस घेतली तरी मास्क लावणे आणि सोशल डिस्टंटसिंग पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहता. समाज सुरक्षित राहू शकतो.

चाचण्यांनंतर जेव्हा लस मोठ्या प्रमाणात लोकांना दिली जाते तेव्हा तिचे साईड इफेक्ट्स दिसू लागतात. वर बघितल्याप्रमाणे लस घेऊनही कोव्हिड होऊ शकतो. पण लक्षणे तीव्र नसतात. लस घेऊनही कोव्हिड झाला अशा बातम्या येतात. त्यांनी आश्चर्य वाटून घेऊ नये आणि घाबरून जाऊ नये. लसींचे साईड इफेक्ट्स मात्र गंभीर असू शकतात. कधीकधी वर्तमानपत्रात वाचतो की लस घेऊन मृत्यू झाला. ते शक्य आहे. परंतु किती जणांना लस दिली आणि त्यातील किती जणांना मृत्यू आला हे जाणणे महत्त्वाचे आहे. अशा घटना एका लाखात दोन-तीन मृत्यू असतील त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मध्यंतरी युरोपच्या बऱ्याच देशांनी ऑक्सफोर्डच्या ऍस्टराझेनेकाची लस घेतल्यावर रक्तात गुठळ्या होतात म्हणून बंदी घातली. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ती लस स्वीकारणीय आहे असे म्हटले आहे. असे दिसले की 50 लाख लस दिलेल्यांपैकी फक्त 30 लोकांना गुठळ्या झाल्या. काही तज्ज्ञांनी लस आणि गुठळ्या यांच्या संबंधावर शंका व्यक्त केली आहे. जरी त्या गुठळ्या लसीमुळे झाल्या असे मानले तरी हे प्रमाण इतके कमी आहे की त्यामुळे ही लस वापरणे बंद करावे हे अत्यंत चुकीचे आहे. शिवाय इतर लसींच्या साईड इफेक्ट्सचा डेटा अजून मिळालेला नाही. कुठल्याही औषधाला साईड इफेक्ट्स असतातच. म्हणून लस न घेणे हे योग्य नाही. लस घेण्याचे फायदे हे लस न घेण्याच्या तोट्यांपेक्षा खूप जास्त आहेत.

या सर्व चर्चांनंतर थोडक्यात असे म्हणता येईल की

  • लसींच्या परिणामकारकतेच्या आकड्यांच्या अर्थ माहीत करून घेणे महतत्वाचे आहे.
  • भविष्यात काय होईल ते परिणामकारकता सांगत नाही.
  • एखाद्या लसीची परिणामकता जर (उदाहरण म्हणून) 80% असेल तर लस घेतल्यांपैकी शंभरातील 80 जणांना कोव्हिड होत नाही आणि 20 लोकांना कोव्हिड होऊ शकतो असा अर्थ होत नाही. तर ती लस घेतलेल्या एखाद्या माणसाला लस न घेणाऱ्या माणसापेक्षा कोव्हिड होण्याची शक्यता 80% ने कमी आहे असा अर्थ होतो.
  • कोव्हिड अजिबात होऊ न देणे लसींचे उद्दिष्ट नाहीये. तर हॉस्पिटल मध्ये दाखल होण्याची गरज नसणे आणि मृत्यू होऊ नये ही उद्दिष्टे आहेत.
  • मान्यता मिळालेल्या सर्व लसींमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होणे आणि मृत्यू यांच्यापासून संरक्षण मिळते. या परिप्रेक्ष्यातून सर्व लसी या सारख्या परिणामकारक आहेत.
  • लस घेऊन हॉस्पिटल आणि मृत्यू टळला तरी सौम्य लक्षणांचा कोव्हिड होऊ शकतो. आणि ती व्यक्ती व्हायरस पसरवू शकते. त्यामुळे लस घेतल्यावरही फेसमास्क लावणे आणि सोशल डिस्टंटसिंग पाळणे आवश्यक आहे.
  • सर्व लसींना गंभीर साईड इफ़ेक्ट्स असणार आहेत. मात्र लस घेण्याचे फायदे हे तोट्यांपेक्षा खूप जास्त आहेत.

टीप – सर्व संख्या मार्चच्या सुरुवातीच्या आहेत. आज त्या बदलल्या असू शकतात. तरीदेखील या लेखातील स्पष्टीकरण, युक्तिवाद आणि निष्कर्ष बदलणार नाहीत.

डॉ. प्रमोद चाफळकर हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये कन्सल्टन्सी करतात. ते अमेरिकेत मिशिगन राज्यातील ग्रँड रॅपिड्स या शहरात राहतात.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0