यावत्चंद्रदिवाकरौ

यावत्चंद्रदिवाकरौ

कोंडमारा सहन न झाल्याने प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल या वलयांकित जोडप्याने ओप्रा विन्फ्रे हिला मनमोकळी मुलाखत दिली आणि ब्रिटनच्या राजघराण्यातली धुम्मस पुन्हा एकदा जगाच्या चव्हाट्यावर आली.

ब्रिटिशाने रिपब्लिकवर केलेला मानहानीचा दावा जिंकला
सत्यशोधक समाज
मी आणि गांधीजी – ३

यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या पूर्वसंध्येला मेगन मार्कल आणि तिचे यजमान प्रिन्स हॅरी यांची ओप्रा विन्फ्रे यांनी सीबीएस टीव्ही चॅनेलसाठी घेतलेली मुलाखत आधी अमेरिकेत आणि पाठोपाठ इंग्लंडमध्ये प्रसारित करण्यात आली. पहिल्याच प्रसारणात पाच कोटीपेक्षा अधिक लोकांनी ती मुलाखत पाहिली. हळुवारपणे, नेमके प्रश्न विचारीत मुलाखत देणाऱ्या व्यक्तींना विचारपूर्वक उत्तरे देण्यासाठी पुरेसा अवकाश देत देत पुढे जाण्यात ओप्रा विन्फ्रे यांची हातोटी अनन्यसाधारण मानली जाते. या मुलाखतीमध्ये ऐंशी आणि नव्वदच्या दशकांतील ओप्रा पुन्हा पाहायला मिळाल्या, असे अनेकांनी या मुलाखतीनंतर त्यांच्याबद्दल म्हटले. मुलाखतीची भरपूर जाहिरात केली गेली होती. “… राजघराण्यात प्रवेश, राजकुमाराशी लग्न, पुत्रप्राप्ती, त्यांचे जनकल्याणाचे कार्य अशा व्यापक विषयांवर डचेस ऑफ ससेक्स मेगन यांच्याशी बातचीत”, “राजकुमार हॅरीसुद्धा होणार सामील”, “जनमताच्या अतीव तणावाखाली जगणं” यावर प्राइम टाइममध्ये प्रकाशझोत टाकणार” अशा जाहिरातींमुळे मुलाखतीबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालं होतं.

ब्रिटिश राजसत्ता अकराव्या शतकापासून आजतागायत, भले सध्या ती दंतहीन असली तरी, इतिहासाच्या पानांत टिकून आहे. जनमानसात त्या घराण्याबद्दल प्रचंड विस्मय आणि प्रेमसुद्धा आहे. आधुनिक लोकशाही जगातले ते एक विरोधाभासी वास्तव आहे. त्यांच्या सार्वजनिक आणि खाजगी जीवनामधली लक्ष्मणरेखा अतिशय धूसर आणि वेडीवाकडी आहे. लोकांच्या कुतुहलाला चविष्ट आणि भडक वार्तापत्रे सतत खतपाणी घालतात, तथ्यांचा विपर्यास करीत अफवा पसरवतात. सर्वच सेलिब्रिटीजना, त्यांच्या कुटुंबियांना अशा चारित्र्यहननाला कायम तोंड द्यावे लागते. एखादी प्रसिद्ध व्यक्ती ख्यातनाम असली तरी तिलासुद्धा आपल्यासारखेच हाड-मांस असते, रागलोभ, नैसर्गिक भूक-वासना व नीतिमूल्ये असतात, याचा समाजाला विसर पडतो. अंगच्या गुणांमुळे किंवा संपत्तीमुळे किंवा घराण्यामुळे पदरात पडणाऱ्या विशेषाधिकारांची किंमत त्या व्यक्तीला अशाप्रकारे मोजायला लागणे, यात एक निष्ठुरता व क्रौर्य आहे. प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स विल्यम यांची आई प्रिन्सेस डायनाला त्यापायी मृत्यूला सामोरं जावं लागलं. त्या घटनेला तब्बल २४ वर्ष होऊन गेली. तत्पूर्वी नोव्हेंबर १९९५ मध्ये ‘बीबीसी’च्या मार्टिन बशीर यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रिन्सेस डायनाने आपली व्यथा मांडली होती.

प्रिन्सेस डायना आणि मेगनः पुनःप्रत्ययी व्यथा

डायनाची मार्टिन बशीर यांनी घेतलेली ती मुलाखत आणि ओप्रा विनफ्रे यांनी घेतलेली मेगनची मुलाखत यात पुनःप्रत्ययाची व्यथा आहे. फरक इतकाच, की प्रिन्स चार्ल्सला डायनाच्या व्यथेशी देणंघेणं नव्हतं, तर प्रिन्स हॅरी मेगनसमवेत ओप्राच्या प्रश्नांना सामोरा गेला. डायनाच्या हयातीत सोशल मीडिया जन्माला यायचा होता, पण भडक वर्तमानपत्रं आणि गावगप्पा पसरविणाऱ्या टीव्ही वाहिन्या यांचा त्या काळात सुळसुळाट होताच. या पार्श्वभूमीमुळेसुद्धा मेगन आणि हॅरी यांच्या मुलाखतीबद्दल प्रचंड उत्सुकता होती. डायनाची बशीर यांनी घेतलेली मुलाखत त्या वेळी २ कोटी प्रेक्षकांनी पाहिली होती. “राजघराण्याच्या सदस्यांना बाजारात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे आम्हाला दुकानातल्या शेल्फवरच्या वेगाने विक्री होणाऱ्या वस्तूंप्रमाणे सतत पुढे, पुढे ठेवलं जातं. त्यावर अनेक जणांचे व्यवसाय अवलंबून आहेत. त्याचा फार ताण सहन करावा लागतो”, असे बशीर यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना डायना म्हणाली होती. त्या उत्तरामध्ये राजघराण्याच्या ब्रिटिश भांडवलशाहीच्या यशाचे एक रहस्य दडलेलं आहे. असो.

मेगन/हॅरी मुलाखतीबद्दल खूप लिहिलं आणि बोललं गेलं आहे. त्यामुळे मुलाखतीच्या तपशिलात जाण्याचं कारण नाही. टीव्ही वाहिन्यांवर, बहुप्रसव प्रवाही माध्यमं (स्ट्रीमिंग मीडिया) माहितीमंच (यू ट्यूब सारखे मंच) यावर प्रसृत होणाऱ्या मालिकांमध्ये होणारे वास्तव दर्शन, भावना कल्लोळ, रहस्यभेद यांच्या सर्व छटा त्या मुलाखतीत दिसतील. मुलाखतीनंतर आता तीन आठवड्यांच्या पेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे. राणीने घराण्याच्या वतीने संक्षिप्त, पण द्विधा निवेदन दिले. इतर प्रतिक्रियांचा धुरळा बसू लागला आहे. धूळ उडाल्यामुळे पृष्ठभाग स्वच्छ झाला. अंतरंग दृष्टीस पडले. धूळ बसू लागल्यामुळे आसमंत स्वच्छ होऊन राजघराण्याचे एकूण सामाजिक पर्यावरणाशी असलेले धागेदोरे दिसू लागले. मुलाखतीच्या निमित्ताने अनेक गोष्टी पुढे आल्या. त्यांचा मागोवा रोचक तर आहेच पण उद्बोधकही आहे.

राजेशाहीची रचना

भांडवलशाहीचा आणि आधुनिक लोकशाहीचा उदय सरंजामशाहीच्या उदरातच झाला आहे. सरंजामशाहीची सुरुवातीची अनेक शतके फुटकळ घराण्यांची स्थानिक, छोटीछोटी गढीरूपी संस्थाने असत. स्थानिक जनता त्या त्या गढीच्या संस्थानिकास बांधील असे. त्या संस्थानिकांना आपला अंमल कायम राहावा यासाठी तसेच आक्रमणापासून गढीचे संरक्षण करण्यासाठी सैन्य आणि शस्त्रास्त्रांची गरज होती. अधिकारक्षेत्र जेवढे मोठे तितका हा खर्च अधिक. तो जनतेकडून वसूल करावा लागे. त्यासाठी धर्मसत्तेच्या पाठिंब्याचीही गरज होती. धर्मसत्तेबरोबर संघर्ष होता, तसेच संगनमतही होते. इतर गढीमालकांबरोबर सत्ता आणि सामर्थ्य दोन्ही बाबतीत स्पर्धा होती. संथ गतीने चालणाऱ्या त्या जीवनगतीला दोन गोष्टींनी धक्का देऊन मोठी चालना दिली. चीनमधून आलेले दारुगोळ्याचे तंत्रज्ञान आणि जनतेमधील हरहुन्नरी बुद्धिमंतांच्या पुढाकाराने झेपावणारे विज्ञान आणि तंत्रज्ञान. पहिल्या गोष्टीने राष्ट्ररूपी राजसत्तेच्या (नेशन स्टेट) दिशेने सत्तेच्या केंद्रीकरणाला प्रारंभ झाला, तर दुसऱ्या गोष्टीमुळे नवा अभिजन वर्ग तयार होऊन भांडवलशाहीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. संबंध युरोपमध्ये हे घडत होते, पण इंग्लंडमध्ये या घडामोडींनी विशिष्ट दिशा घेतली.

इंग्लंडमधल्या नवश्रीमंत अभिजन वर्गाला राजा महसुलासाठी केव्हाही आपल्या भांडवलावर डल्ला मारेल, अशी नेहमी भीती वाटत असे. गरीब जनता असा कितीसा पैसा देणार? म्हणून राजालाही आपल्याला महसुलासाठी याच भांडवलदारांकडे पुन्हा पुन्हा जावे लागणार, याची जाणीव होती. भांडवलदारांकडे स्वतःचे सैन्य नव्हते. राजाकडे ते होते. त्यामुळे दोघांमध्ये सतत संघर्षाचे आणि समन्वयाचे प्रसंग उभे राहत. हे क्रम ट्यूडर आणि स्ट्यूअर्ट राजघराण्यांच्या कारकिर्दीत अनेक पिढ्या चालत राहिले. त्या संघर्षादरम्यान दोन्ही शक्तींमध्ये बोलणी करण्यासाठी पार्लमेंटचा उदय झाला. हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स. लॉर्ड्स म्हणजे अर्थात उमराव. पण कॉमन्स म्हणजे नवश्रीमंत भांडवलदार (जे उमराव नव्हते)! ट्यूडर घराण्याच्या सातव्या हेन्रीने १४८५ मध्ये लढाई करून सिंहासन काबीज केले होते. त्यानंतर लढाई करून सिंहासनावर कब्जा करण्याचा प्रसंग पुढच्या कुठच्याही राजावर आला नाही. ट्यूडर्स राजांनी इतर सरदारांवर वचक ठेऊन आपली सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळविले. वचक ठेवण्याचे सर्वात मोठे हत्यार कुठचे असेल, तर ते म्हणजे बंडखोर गढी मालकावर देशद्रोहाचा आरोप ठेऊन त्याला देहदंडाची शिक्षा देणे, हे होते. दुसरे हत्यार होते, निपुत्रिक उमरावांची संस्थाने खालसा करणे! (याच कायद्याचा कित्येक वर्षांनंतर ब्रिटिश पार्लमेंटने भारतात वापर करून इथली संस्थाने खालसा केली.)

राजघराण्याच्या खंडित परंपरेला चालना

१६४१ मध्ये आयरिश बंडाचा बिमोड करण्याच्या प्रश्नावरून स्ट्यूअर्ट घराण्याचा पहिला चार्ल्स आणि पार्लमेंटमध्ये मतभेद झाला. त्याचे पर्यवसान यादवी युद्धात झाले. त्यात पहिल्या चार्ल्सचा पराभव झाला आणि त्याला देशद्रोहाच्या आरोपाखाली पार्लमेंटने शिरच्छेदाची शिक्षा सुनावली. त्याच्या मृत्यूनंतर इंग्लंडमध्ये ११ वर्ष राजा नव्हता. त्या कालखंडाला ‘टरॉयल इंटरेग्नम’ (वंशावळीतले मध्यंतर) म्हणतात. क्रॉमवेलने राजपद स्वीकारायला नकार दिला. त्याच्या मृत्यूनंतर पहिल्या चार्ल्सच्या मुलाला, दुसऱ्या चार्ल्सला (रीतसर वारस म्हणून) राज्याभिषेक करण्यात आला आणि राजघराण्याची खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरु झाली, ती परंपरा आजतागायत चालू आहे. पार्लमेंटने राजसत्तेला वेसण घातली, तिचे करनिर्धारणाचे, लष्कराच्या वापराचे अधिकार काढून घेतले आणि नाममात्र सत्ता दिली. पार्लमेंटने राजाच्या नावाने राज्यकारभार पाहण्याचे मान्य केले आणि पार्लमेंटचे निर्णय राजासाठी बंधनकारक केले. त्या बदल्यात घराण्याच्या अंतर्गत बाबींमध्ये व परंपरांमध्ये हस्तक्षेप न करण्याचे मान्य केले. त्यांच्या मानधनाची पद्धत ठरवून दिली. ब्रिटनमध्ये लिखित राज्यघटना नाही. पण अनेक शतकांच्या परंपरा, वेगवेगळ्या प्रकारच्या संघर्षांमधून मान्य होत गेलेले कायदे, न्यायनिवाडे आणि तत्वे यांचा खजिनाच त्यांच्यापाशी आहे. पार्लमेंटची सुरुवात श्रीमंत नवअभिजन वर्गाच्या सदस्यांपासून झाली असली, तरी काळाच्या ओघात अनेक लढे देऊन सामान्य लोकांनी सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवला. उशिरा का होईना, स्त्रियांना एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस मतदानाचा हक्क लढा करून मिळवावा लागला. ज्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नसे, ते साम्राज्य देशा-देशांतील जनतेच्या स्वातंत्र्यलढ्यांमुळे विलयाला गेले. इंग्लंडच्या भांडवलदारांना साम्राज्य हवेच होते. त्यांचे पार्लमेंट त्यांच्यापुरत्या लोकशाही प्रक्रियेतून तयार झाले असले, तरी ती लोकशाही वसाहतींमध्ये नव्हती. जशी प्राचीन ग्रीसमधली लोकशाही गुलामांसाठी नव्हती, तर फक्त गुलाम मालकांसाठी होती. युरोपियन राष्ट्रांनी जगाची वाटणी करून आपली साम्राज्ये उभी केली. त्यात ब्रिटनचे साम्राज्य सर्वात सामर्थ्यशाली होते. राज्यक्रांती झाली की समाज पूर्णतः बदलतो असे गृहीत धरणे चुकीचे आहे. सरंजामशाही उलथून शेकडो वर्ष लोटली आहेत तरी सरंजामशाहीचे अवशेष शिल्लक आहेतच. सुंभ जळला तरी पीळ सहजासहजी जळत नाही.

सरंजामशाहीचे अवशेष कायम

उदारमतवादी भांडवलशाहीमध्ये कायद्याने समानता आली असली, तरी प्रत्यक्षात समानता आलेली नाही. ब्रिटनचे राजघराणे हे त्याचे ढळढळीत उदाहरण आहे. ब्रिटन सर्वात जुनी आणि सर्वात पुढारलेली लोकशाही म्हटली जात असली, तरी तिथल्या विचारधुरिणांची आणि जनतेची राजसत्ता कायमची नष्ट करण्याची हिंमत अजून झालेली नाही. सरंजामशाहीचे अवशेष शिल्लक असल्याचा तो पुरावा आहे, मेगन मार्कल आणि प्रिन्स हॅरी यांची सर्वदूर गाजलेली ताजी मुलाखत तेच दाखवते. कुटुंबातले परस्पर संबंध घ्या, स्त्रीपुरुष संबंध घ्या, वंशभेद/जातीभेद पहा. हे अवशेष जागोजागी दिसतात. सध्याच्या सम्राज्ञी एलिझाबेथ द्वितीय यांच्या आधी पंचम जॉर्ज यांचे ज्येष्ठ पुत्र आठवे एडवर्ड अनभिषिक्त सम्राट होते. पण त्यांची कारकीर्द केवळ दहा महिन्यांचीच राहिली. कारण? त्यांनी वॉलिस सिम्प्सन या सामान्य अमेरिकी स्त्रीशी विवाहबद्ध होण्याचे ठरविले. श्रीमती सिम्प्सन यांनी आधी एक घटस्फोट घेतलेला होता. त्या दुसरा घटस्फोट घेण्याच्या काळात प्रिन्स एडवर्ड यांनी त्यांना मागणी घातली. राजघराण्याचा तसेच ब्रिटनच्या लोकशाही पंतप्रधानांचा त्या लग्नाला विरोध होता. एक घटस्फोटिता ब्रिटनच्या सम्राटाची पत्नी होण्याच्या लायकीची नाही, असा त्यांचा निर्णय होता. राजे एडवर्ड यांनी सिंहासनाचा त्याग केला आणि तिच्याशीच विवाह केला. त्यांच्यानंतर त्यांचे धाकटे बंधू सहावे जॉर्ज सिंहासनावर आले. १९५२ मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची ज्येष्ठ कन्या  द्वितीय एलिझाबेथ सिंहासनावर विराजमान झाली. तीच आजतागायत महासम्राज्ञी आहे.

ब्रिटनच्या राजघराण्याच्या बाबतीत एक गोष्ट विशेष आहे. सम्राटाच्या प्रत्यक्ष वंशजालाच सिंहासनावर बसण्याचा अधिकार आहे. पुत्र असेल तर तो राजा म्हणवला जातो. कन्या असेल तर ती राणी. राणीचा नवरा राजा होऊ शकत नाही. राजाची पत्नी राणी होऊ शकत नाही. अशा व्यक्तीला किंग-कन्सॉर्ट किंवा क्वीन-कन्सॉर्ट म्हटले जाते. आजची राणी ९५ वर्षांची आहे. तिची कारकीर्द १९५२ पासून सुरु झाली. तिचे यजमान प्रिन्स फिलिप हे डेन्मार्कचे राजपुत्र होते. ते सध्या ९९ वर्षांचे आहेत. राणीच्या निधनानंतर प्रिन्स हॅरीचे वडील प्रिन्स चार्ल्स सिंहासनावर बसतील. ते सध्या ७० वर्षांचे आहेत. त्यांच्या नंतर प्रिन्स हॅरीचा मोठा भाऊ प्रिन्स विल्यमचा गादीवर हक्क लागतो. राजपुत्र हॅरी हा ड्युक ऑफ ससेक्स (ससेक्स परगण्याचा जहागीरदार) आणि मेगन डचेस ऑफ ससेक्स आहेत. (यात परंपरा अशी आहे, प्रिन्स ऑफ वेल्स हाच इंग्लंडचा राजा किंवा प्रिन्सेस ऑफ वेल्स हीच राणी होऊ शकते.)

मेगन मार्कलची आई कृष्णवर्णीय आफ्रिकन अमेरिकन आहे तर वडील गौरवर्णीय आहेत. हॅरी आणि मेगनच्या मुलाचा वर्ण काळा असेल की गोरा, काळा असला तर किती काळा याबद्दल टोमणे मारले तर अमेरिकेत वाढलेल्या मेगनला काय वाटेल याचा साधा विचारसुद्धा राजघराण्यातले जे कुणी तसे म्हणाले, त्यांच्या मनात आलासुद्धा नसेल असे कसे म्हणणार? आपल्यापेक्षा वेगळ्या लोकांकडे “इतर ते” म्हणून पाहण्याची वृत्तीसुद्धा सरंजामशाहीचा अवशेष म्हटली पाहिजे.

फॅसिस्ट मनोवृत्तीचा संबंध सरंजामशाहीशी

सरंजामशाहीमध्ये व्यक्तीचे स्थान जन्मावरुनच ठरते. “इतरांमध्ये” परदेशातून आलेले स्थलांतरित, वेगळ्या वर्णाचे लोक, वेगळ्या धर्माचे लोक, शारीरिक कष्टाचे काम करणारे लोक अशांचा समावेश होतो. खरं पाहिलं तर फॅसिझमची एकूण मनोवृत्ती आणि विचारसरणी ही सरंजामशाहीची अवशेष म्हटली पाहिजे. ती आजच्या आधुनिक जगात सामान्य लोकांच्यामध्येसुद्धा उफाळून आलेली दिसते. उदारमतवादी विचारसरणीमध्ये स्वामीनिष्ठेपेक्षा नैतिक अधिष्ठानाला मूल्य म्हणून अधिक महत्त्व आहे. सध्याची जागतिक राजकीय परिस्थिती तेच दर्शविते. लोकप्रियतावादी दर्शनी राष्ट्रवादामध्ये स्वामीनिष्ठेला आणि आज्ञापालनाला प्राधान्य मिळते.

आपल्याकडे आरएसएस आणि बीजेपी यांच्या विचारसरणीमध्ये त्याच मूल्यांवर भर आहे. मेगनच्या मुलाखतीनंतर ब्रिटनमधल्या आयटीव्ही या प्रसिद्ध चॅनेलवरच्या “गुड मॉर्निंग ब्रिटन” ह्या लोकप्रिय कार्यक्रमाचे अँकर पिअर्स मॉर्गन यांनी मेगनबद्दल अनुदार उद्गार काढले. “ती खोटे बोलत आहे, नाटकी आहे, तिच्या म्हणण्यावर माझा विश्वास नाही, आमच्या राजघराण्याची तिने बेअब्रू केली, तिने हवामान वृत्त वाचून दाखविले, तरी त्यावर मी विश्वास ठेवणार नाही” अशी बेमुर्वत विधाने त्यांनी केली. त्याच कार्यक्रमातील हवामान वृत्त वाचणारे अलेक्स बेरेस्फोर्ड यांनी त्यांना कार्यक्रमाच्या मध्येच हटकले आणि मेगनबद्दल तुम्ही सूडबुद्धीने बोलत आहेत, असा भर कार्यक्रमात आक्षेप घेतला. मॉर्गन रागारागाने कार्यक्रमातून तडकाफडकी उठून गेले. त्यांच्यावर कडाडून टीका झाली आणि त्यांनी राजीनामा दिला. बोरिस  जॉन्सन यांच्यानंतर मॉर्गन पंतप्रधानपदाचे उमेदवार होणार, अशी भाकितं ब्रिटनमध्ये होऊ लागली आहेत. म्हणजे, आपल्याकडे अर्णव गोस्वामी देशाचे पंतप्रधान होतील, असं म्हणण्यासारखं होईल!

ब्रिटिश राजघराणे आणि अर्थस्थिती

शेवटी, ब्रिटिश राजघराण्याच्या आर्थिक स्थितीचा थोडा अंदाज घेऊ म्हणजे अजूनही काही अनुत्तरित प्रश्नांची उकल व्हायला मदत होईल. आजच्या काळात कारनिर्धारणाचे अधिकार सर्वस्वी ब्रिटिश पार्लमेंटकडे आहेत. मग राणीचा आणि तिच्या कुटुंबाचा खर्च कसा भागतो? तसं पाहिलं तर राणीच्या मालकीचं काहीच नाही. कारण त्यांना त्यांच्या स्थावर किंवा जंगम मालमत्तेपैकी काहीही विकून टाकण्याचा हक्क नाही. मात्र त्या मालमत्तेमधून येणाऱ्या उत्पन्नापैकी २५ टक्के रक्कम राजघराण्याचा व्यवस्थापकीय खर्च भागविण्यासाठी वापरला जातो. ७५ टक्के वाटा सरकार दरबारी जमा होतो. राणी आणि तिच्या कुटुंबीयांचा वैयक्तिक खर्च भागविण्यासाठी लँकेस्टर जहागिरीचे सर्व उत्पन्न खाजगी थैली म्हणून तिच्याकडे सुपूर्द केली जाते. त्याचे कुटुंबीयांमध्ये वितरण तिच्या मर्जीनुसार करण्यात येते. त्या व्यतिरिक्त कुटुंबांच्या सदस्यांना विशिष्ट जहागिरीचे अधिकार दिलेले आहेत. प्रत्येकाला दिलेल्या किताबामध्ये त्या त्या जहागिरीचा निर्देश होतो. त्या त्या जहागिरीतून आलेले उत्पन्न तिथल्या जमिनीमधून जे पिकतं, त्यावर व तिथल्या पर्यटनावर अवलंबून असतं. वर उल्लेख केलेल्या पंचवीस वर्षांपूर्वी दिलेल्या डायनाच्या मुलाखतीमध्ये राजघराण्याच्या ब्रँडची नेहमीच चलती असते, हे तिने नमूद केले होते. तो ब्रँड टिकावा नव्हे वाढावा, यासाठी कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला मेहनत करावी लागते. विक्री वाढली तर कुटुंबाला मिळणारा वाटाही त्याप्रमाणात वाढणार! राणीच्या वेबसाइटवरही जमाखर्चाचे पारदर्शक विवरण सादर करण्यात येते.

इतिहास हीच दौलत

पण खरी मेख आहे ती बंडखोर सदस्यांना मिळणाऱ्या शिक्षेची. उदाहरणार्थ, राजे एडवर्ड ज्यांनी प्रेमासाठी सिंहासनाचा त्याग केला, त्यांना सर्व मालमत्तेला आणि उत्पन्नाला मुकावे लागले. डायनाला तिच्या घटस्फोटानंतर मिळकतीतून बाद करण्यात आले. हॅरी आणि मेगन यांच्या मुलाला – आर्चीला किताबापासून वंचित ठेवण्यात आले. त्याचा निषेध म्हणून आणि कुटुंबात होणाऱ्या घुसमटीतून सुटका होण्यासाठी प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी राजघराण्याच्या सदस्यत्वाचा त्याग केला आणि अमेरिकेत स्वतंत्र जीवन व्यतीत करण्याचा मार्ग स्वीकारला. ब्रिटनमध्ये राजघराणे म्हणजे, एक संस्था आहे असे म्हणण्याचा प्रघात आहे. खरे म्हणजे, त्या म्हणण्यामध्ये काही तथ्य नाही. कारण, त्यांच्यावर कोणतेही लोकशाही नियंत्रण नाही. ‘रेंट सीकिंग’ हेच त्यांच्या अर्थार्जनाचे साधन आहे. ब्रिटिश साम्राज्याचा इतिहास हीच त्यांची दौलत आहे. विद्यमान विंडसर राजघराण्याने ती दौलत परिश्रमाने मिळवली आहे, असे काही म्हणता येणार नाही. असो.

यावत्चंद्रदिवाकरौ म्हणजेच चंद्र-सूर्य असेपर्यंत ब्रिटिश राजघराण्याचे अस्तित्व टिकून राहील, असे कायद्यात तरी कुठे म्हटलेले नसले तरी ब्रिटिश लोकशाहीचे अभय असल्यामुळे जोपर्यंत राजेशाहीला वारस आहेत, तोपर्यंत तरी राजघराण्याला क्षती नाही आणि त्यांच्यातल्या बंडखोरांनाही वाली नाही !

शेखर साठे, ज्येष्ठ अर्थविषयक तज्ज्ञ आणि सामाजिक-राजकीय भाष्यकार आहेत.

(१ एप्रिल २०२१च्या ‘मुक्त संवाद’ अंकातून साभार)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0