हिंसापीडित महिलांना कोविड-१९ टाळेबंदीतही ‘दिलासा’

हिंसापीडित महिलांना कोविड-१९ टाळेबंदीतही ‘दिलासा’

टाळेबंदीच्या काळात हिंसापिडीत महिलांना मदत करण्यासाठी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांतील दिलासा विभागांनी आपल्या कार्यपद्धतीत जाणीवपूर्वक बदल केला. हा अनुभव आपल्यासमोर ठेवत आहोत. महिलांवर होणार्‍या हिंसेच्या प्रश्नावर काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना नक्कीच याचा उपयोग होईल.

उ. कोरियात ‘कोविड-१९’चा संशयित रुग्ण
दिल्ली दंगलीत नेत्यांचा सहभाग नाही – पोलिस
फादर स्टेन स्वामी यांचे निधन

आजवरचा जागतिक इतिहास बघितला तर लक्षात येते की कुठल्याही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्कालीन परिस्थितीमध्ये महिला आणि मुलींवर होणार्‍या हिंसेत वाढ  होते. कोविड – १९ च्या साथीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीचाही  याला  अपवाद नाही. जागतिक स्तरावर महिला सक्षमीकरण, स्त्री-पुरुष समताधिष्ठीत समाज निर्मितीसाठी महिला व मुलींवर होणार्‍या हिंसेच्या  प्रतिबंधासाठी काम करणार्‍या संयुक्त राष्ट्रांच्या (यू.एन.च्या) शाखेने कोविड लॉक डाऊनमध्ये वाढणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराला ‘शॅडो पॅनडेमीक’ – म्हणजेच समोर रुद्रावतारात दिसणार्‍या कोविड १९ च्या महासाथीमागे सावलीसारखी  थंड पावलांनी येणारी, पण तितकीच भीषण असलेली महासाथ — म्हटले आहे.

सध्याच्या कोविड १९ च्या महासाथीचे महिला-मुलींवरील परिणाम आता दिसून येऊ लागले आहेत. चीन, ब्रिटन, अमेरिका आणि इतर देशांच्या अहवालावरून कोविड -१९च्या उद्रेकानंतर कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आलेले आहे. एका अहवालानुसार, चीन मधील हुबेई प्रांतात ह्या साथीला आटोक्यात आणण्यासाठी लागू केलेल्या साडेतीन महिन्यांच्या टाळेबंदीच्या  काळात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांची संख्या तिपटीने वाढली. भारतात टाळेबंदीच्या पहिल्या आठवड्यातच राष्ट्रीय महिला आयोगाकडे येणाऱ्या कौटुंबिक हिंसेसंबंधी तक्रारींमध्ये दुपटीने वाढ झाली, आणि हे केवळ हिमनगाचे टोकच असल्याचे आयोगाने म्हटले होते.

ह्या माहितीवरून टाळेबंदी आणि महिलांवर होणार्‍या हिंसेचा प्रत्यक्ष संबंध असल्याचे सिद्ध होते. म्हणूनच हिंसापिडीत महिलांना मदत देणार्‍या सेवा यंत्रणा टाळेबंदीच्या काळातही सुरळीत चालू राहणे अत्यावश्यक आहे हा विचार जगभरातून विविध पातळीवरून मांडला आहे. परंतु हिंसापिडीत महिला सेवांपर्यंत कशा पोहोचणार आणि ह्या सेवा देणार कोण याविषयी मात्र माध्यमांतून फारशी चर्चा दिसून येत नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १३ उपनगरीय रुग्णालयात हिंसापिडीत महिला-मुलींना सेवा देणारे दिलासा विभाग आहेत. आजवर अंदाजे ७००० पेक्षा अधिक हिंसापिडीत महिला आणि मुलींना रुग्णालयस्थित दिलासा विभागातून सेवा देण्यात आली आहे. टाळेबंदीच्या काळातही हिंसापिडीत महिलांसाठी सेवा सुरू ठेवण्यासाठी ‘सेहत व ‘दिलासा’तील समुपदेशकांनी केलेल्या प्रयत्नांची येथे थोडक्यात ओळख करून दिली आहे.

दिलासा विभाग रुग्णालयात का?

·      महिला व मुलींवर होणारी लिंगभाव आधारित हिंसा मानवी हक्कांची पायमल्ली आहे.  कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन  होऊ शकत नाही.  तसेच सर्व प्रकारच्या हिंसेचे, हिंसा सोसणार्‍या महिलेच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असतात. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील आरोग्य यंत्रणेची हिंसापिडीत महिलांना मदत करण्यात महत्वाची भूमिका आहे ह्या विचारातून दिलासा विभागांची स्थापना झाली.

·      पहिला दिलासा विभाग २००० साली, दुसरा २००७ साली सुरू झाला. २०१५ साली राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या ११ उपनगरीय रुग्णालयात दिलासा विभाग स्थापन करण्यात आले.

दिलासा विभागातून हिंसापिडीत महिला ब मुलींना देण्यात येणारी मदत

·      मनोसामाजिक समुपदेशन सेवा

·      कायदेशीर समुपदेशन

·      निरनिराळ्या सेवा यंत्रणांशी संपर्क करून देणे

·      आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात तातडीने तात्पुरत्या निवाऱ्याची सोय

  • सेवा देण्याची पहिली पायरी  – अधिकार्‍यांशी संवाद

टाळेबंदीच्या पहिल्याच आठवड्यात महानगर पालिकेने काळाची गरज ओळखून दिलासा विभाग हा सार्वजनिक आरोग्यसेवेतील साथकाळातील अत्यावश्यक विभाग असल्याचे जाहीर केले. परंतु सुरळीतपणे सेवा देण्यासाठी संचार निर्बंधांच्या काळात दिलासा समुपदेशक रुग्णालयात पोहोचतील याची सोय करणे आवश्यक होते. या काळात कामावर येणाऱ्या दिलासाच्या समुपदेशकांच्या सुरक्षित प्रवासासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना देण्यात येणारे विशेष ओळखपत्र व योग्य ती संरक्षक उपाययोजना समुपदेशकांनाही उपलब्ध करून देण्याविषयी सेहतने सूचना करून, अंमलबजावणीसाठी पाठपुरावा केला. सुरुवातीच्या काळात अशी ओळखपत्रे असूनही काही समुपदेशकांना प्रवासात अडथळे आले. अशावेळी योग्य त्या अधिकार्‍यांच्या संपर्कात राहून ते दूर करण्याचे कामही केले गेले.

  • समुपदेशकांच्या मनातील शंकांचे निरसन

साथकाळाच्या सुरूवातीला योग्य माहितीच्या अभावी समाजात सगळीकडेच चिंता आणि अनिश्चिततेचे वातावरण होते. हे लक्षात घेऊन प्रत्येक समुपदेशकाशी फोनवरून संवाद साधून त्यांच्या मनातील विचार जाणून घेऊन माहिती देण्यात आली. कोविड १९ चा संसर्ग कशाप्रकारे पसरतो त्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याविषयी विश्वसनीय सूत्रांकडून प्रसिद्ध केलेली माहिती समुपदेशकांपर्यंत पोहोचविली गेली. महिलांवर होणारी हिंसा आणि टाळेबंदी ह्याचा संबंध स्पष्ट व्हावा म्हणून जागतिक, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर प्रसिद्ध होणारी आकडेवारी; साथी, टाळेबंदी, आणि महिलांवर होणार्‍या हिंसेमधील परस्पर संबंध ह्यांचे विश्लेषण करणारे लिखाण समुपदेशकांना उपलब्ध करून दिले गेले.

  • कोविड -१९ महासाथ, टाळेबंदी आणि समुपदेशकांची भूमिका

आपत्कालीन परिस्थितीत महिलांवरील वाढलेला घरातील कामाचा भार, हिंसा करणारी व्यक्ती सतत घरातच असणे, आर्थिक विवंचना, जीवनावश्यक वस्तूंची अनुपलब्धता, संचार निर्बंधामुळे दूर गेलेले नातेवाईक व इतर मदतकर्ते ह्या व अशा अनेक बाबीमुळे हिंसेला सुरुवात होऊ शकते या बाबी लक्षात घेऊन कामाचे स्वरूप आखण्याविषयी चर्चा झाली.

अनेक देशात असे दिसून आले आहे की टाळेबंदीत महिलांना गर्भनिरोधक साधने मिळणे कठीण झाले – संचार निर्बंधांमुळे महिला रुग्णालयांत पोहोचू शकत नव्हत्या आणि रुग्णालयांतही गर्भनिरोधकांचा साठा पुरेसा नव्हता. आपल्या देशातही अशी परीस्थिती असू शकेल हे लक्ष्यात घेऊन सुरक्षित लैंगिक संबंध कसे ठेवावे याविषयी समुपदेशक महिलांना मार्गदर्शन देत होते.

महिलांच्या गरजा समजून घेऊन मदत करणे आणि इतर सामाजिक संघटनांशी त्यांना मदतीसाठी जोडून  देण्यातही समुपदेशकांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

  • हिंसापिडीत महिलांना उपयोगी पडेल अशा माहितीचे एकत्रीकरण

हिंसापिडीत महिलांना निरनिराळ्या प्रकारच्या माहितीची आवश्यकता भासू शकेल हे लक्षात घेऊन समुपदेशकांनी तयारी केली.

दिलासातून सेवा घेणार्‍या सर्वच महिला सरकारद्वारे किंवा समाज माध्यमांवर उपलब्ध होणार्‍या कोविड १९ संदर्भातील माहिती मिळवू शकत नसतील हे लक्षात घेऊन कौटुंबिक हिंसाचारावर करण्यात येणार्‍या समुपदेशनासोबतच साथीसंबंधी साधारण माहिती समुपदेशकांनी दिली. दिलासाच्या संपर्कात येणार्‍या हिंसापिडीत महिलांशी बोलताना समुपदेशक कोविड १९ संदर्भातील त्यांच्या शंकांना उत्तरे देत होते. तसेच संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे पुन्हा पुन्हा सांगणे, लक्षणे जाणवल्यास महानगर पालिकेच्या रुग्णालयांत तपासणीस जाण्याचे महत्व इत्यादी बाबींचा समावेश प्रत्येक संभाषणात केला गेला.

कोविड-१९च्या टाळेबंदीच्या काळात महिला बाल कल्याण विभागाकडून हिंसापिडीत महिलांना सेवा पुरविण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली गेली नव्हती. हिंसा असह्य झाल्याने घर सोडावे लागले तर महिलांसाठी पर्यायी निवास व्यवस्था कोठे असेल, कडक संचार निर्बंधांच्या काळात त्या सुरक्षित ठिकाणी कशा पोहोचणार, त्यांना मदत देण्यात पोलिसांची भूमिका काय असेल याविषयी स्पष्टता नव्हती. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयाच्या आसपासच्या भागात जीवनावश्यक सेवा पुरविण्यासाठी मदत करणार्‍या संस्था – संघटनाची, आश्रय गृहांची माहिती समुपदेशकांनी एकत्रित केली.

साथ काळात काही रुग्णालये कोविड १९ साठी राखीव केल्यामुळे अन्य सेवांसाठी महिलांना जवळच्या दुसर्‍या रुग्णालयांत संदर्भित केले जात होते. निरनिराळ्या रुग्णालयांतून कोणकोणत्या सेवा दिल्या जात आहेत याची माहिती समुपदेशकांनी जमविली आणि त्यानुसार महिलांना मार्गदर्शन केले.

दिलासा संदर्भातील ‘सेहतची भूमिका

–    २००५ सालापासून सेहतची दिलासा विभागांना तांत्रिक सहाय्य पुरविण्याची भूमिका – नव्याने स्थापन झालेल्या दिलासा विभागांचे कार्य सुरळीतपणे चालावे यासाठी प्रशासकीय पातळीवर संवाद साधणे, तांत्रिक गुणवत्ता वाढविण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण व साहित्य उपलब्ध करून देणे,  गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये मार्गदर्शन करणे इत्यादी

कोविड १९ संबंधित टाळेबंदीतील सेहतची भूमिका 

–    निरनिराळ्या माध्यमांतून प्रसारित होणारी सामाजिक व वैद्यकीय विषयांवरील माहिती संकलित करून सोप्या भाषेत समुपदेशकांना उपलब्ध करून देणे

–    समुपदेशकांना सेवा देणे सोपे व्हावे म्हणून रुग्णालय प्रशासनाच्या संपर्कात राहून अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढण्यास मदत करणे

–    कोविड १९ आणि टाळेबंदीच्या संदर्भात हिंसापिडीत महिलांना समुपदेशन देण्यासाठी; तसेच समोरासमोर बसून समुपदेशन देणे व फोनद्वारे समुपदेशन देणे यातील तांत्रिक बारकाव्यांचा विचार करून हिंसापिडीत महिलांना समुपदेशन देण्यासाठी मार्गदर्शिका तयार करणे, आवश्यक तेव्हा प्रशिक्षण देणे

–    मुंबईत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार्‍या व हिंसापिडीत महिलांना इतर मदत देणार्‍या संस्था, संघटना व गटांची माहिती एकत्रित करून समुपदेशकांना पुरविणे

–    बालकल्याण समिति, संरक्षण अधिकारी, आश्रय गृहे यांच्या टाळेबंदीच्या काळातील कामाच्या बदललेल्या स्वरूपविषयी माहिती संकलित करून दिलासा समुपदेशकांना देणे

–    तणाव व चिंताग्रस्त वातावरणात समुपदेशन सेवा देताना समुपदेशकांना येणारा ताण लक्षात घेऊन नियमित संपर्कात राहून, गुंतागुंतीच्या प्रकरणांची चर्चा करणे  (डी ब्रिफिंग ), मार्गदर्शन करणे

–    कठीण परीस्थितीत दिलासा विभागांनी केलेल्या कामाची दखल घेतली जावी म्हणून संबंधित माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे

  • हिंसापिडीत महिला-मुलींसाठी फोनवरून समुपदेशन

बऱ्याचदा प्रत्यक्ष येऊन समुपदेशकांशी संवाद साधणाऱ्या महिला टाळेबंदीच्या काळात दिलासात येऊ शकणार नाहीत हे ओळखून त्यांना फोनद्वारे संपर्क करण्यास समुपदेशकांनी सुरुवात केली.

समुपदेशकांनी फोनवरील संभाषणास सुरुवात कशी करावी, हिंसेविषयी चर्चेची सुरुवात कशी करावी, हिंसा करणार्‍या व्यक्तीनेच जर फोनला उत्तर दिले तर संभाषण कशा पद्धतीने पुढे न्यावे, याची मार्गदर्शिका तयार करण्यात आली.

ज्या महिलांनी पूर्वी महानगर पालिकेच्या रुग्णालयातून सेवा घेतल्या आहेत त्यांची चौकशी करण्यासाठी हा फोन केलेला आहे असे सांगून समुपदेशक संभाषणास सुरुवात करतात.

महिलेशी बोलतानाही समुपदेशक प्रथम तिच्या आरोग्याची विचारपूस करतात. “साथ काळात तुम्ही ठीक आहात का? तुमची तब्येत कशी आहे? दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आवश्यक त्या सर्व वस्तू पुरेशा प्रमाणात आहेत का? तुम्हाला कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंची गरज आहे का? कुटुंबातील सर्व व्यक्ति घरीच सुरक्षित आहेत का? घरातील परीस्थिती कशी आहे? काही ताणतणाव आहेत का?” – याची चौकशी केल्यानंतरच हिंसेविषयी विचारतात. अशाप्रकारे संवेदनशील पद्धतीने सुरुवात करत चौकशी केल्यामुळे हिंसा करणारी व्यक्ति महिलेच्या आजूबाजूला असली तरीही महिलेशी संवाद साधता येतो. त्यातूनच संचार निर्बंधाच्या काळात हिंसा करणारी व्यक्ति घरातच असतांनाही स्वतःचे संरक्षण कसे करावे, तसेच हिंसेच्या घटना घडल्यास, हिंसेत वाढ झाल्यास किंवा हिंसा होईल अशी भीती वाटल्यास काय करावे, मदत कशी मिळवावी याविषयी माहिती समुपदेशक देत आहेत.

टाळेबंदीच्या काळात हिंसा होत असल्यास काय करावे?

–    तुम्हाला मदत करू शकतील असे शेजारी, गृहनिर्माण संस्थेचे अधिकारी यांना तुमच्यावर होणार्‍या हिंसेची कल्पना देऊन ठेवावी व गरज भासल्यास मदत करण्याविषयी बोलून ठेवावे.

–    १०३ / १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांची तत्काळ मदत घ्यावी. जेणेकरून पोलिस घरी येतील व थोड्या काळापुरती हिंसा थांबेल.

–    पोलिस ठाण्यात जाऊन किंवा ई मेल द्वारे पोलिसात तक्रार नोंद करावी व सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी.

–    कौटुंबिक हिंसापिडीत महिला आणि मुलींना मदत देणार्‍या हेल्पलाइनचे दूरध्वनि क्रमांक आपल्याजवळ ठेवावे व गरज असेल तेव्हा त्यांवर मदत मागावी.

सततच्या ताणतणावामुळे मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होऊन आपले जीवन संपवण्याबद्दलचे विचार मनात येऊ शकतात. याबाबतही महिलांशी बोलणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे हिंसापिडीत महिलेची सुरक्षितता अजमावताना आत्महत्येस कारणीभूत होणाऱ्या बाबींकडेही समुपदेशक लक्ष देतात. महिलेला नैराश्य, चिंता, ताणतणाव जाणवतो आहे का, घरातील कामाच्या रगाड्यात तिला दुर्लक्षित वाटते आहे का, तिच्या आरोग्याची घरातील व्यक्तिकडून हेळसांड होते आहे का, तिच्या भावनांची दखल घेतली जात नाही आहे असे तिला वाटते आहे का याची विचारपूस समुपदेशक करतात.

सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत फोनद्वारे आत्महत्येपासून, महिलेला परावृत्त करण्यासाठी समुपदेशन देणे, संवेदनशील पद्धतीने चर्चेची सुरुवात करून, होणार्‍या हिंसेमुळे किंवा परिस्थितीचा तणाव असह्य झाल्यामुळे जीवन संपवावेसे वाटते आहे असे सांगणार्‍या महिलेच्या सुरक्षेची खात्री समुपदेशक करून घेतात. नकारात्मक विचारांच्या गर्तेत सापडलेल्या महिलेला ‘तुमचे जीवन अमूल्य आहे. तुम्ही एकट्या नाही आहात, धीर सोडू नका.’ इत्यादी सांगून आशेचा किरण दाखवतात. आत्महत्येचे विचार मनात येत असल्यास जवळच्या व्यक्तीशी बोलून मन हलके करण्याचा, मन प्रसन्न होईल अशा एखाद्या छंदात मन रमविण्याचा, मानसिक ताण अधिकच वाढल्यास हेल्पलाइनला फोन करून समुपदेशकांशी बोलण्याचा सल्ला महिलांना दिला जातो.

गेल्या चार आठवड्यात दिलासा समुपदेशकांनी साधारण ४०० महिलांना फोनद्वारे समुपदेशन दिले आहे.

  • हिंसापिडीत महिलांना मदत देणार्‍या संस्थांशी संपर्क

हिंसापिडीत महिलांना समुपदेशनाबरोबरच तातडीचा निवारा, कायदेशीर मदत, इत्यादींचीही गरज असते. टाळेबंदीच्या काळात वस्तीपातळीवर मदतकार्य करणार्‍या धान्य, औषधे इत्यादि पुरविणार्‍या संस्थांची गरज असू शकते. दिलासाच्या संपर्कात येणार्‍या महिलांना योग्य त्या संस्थांचा संपर्क देण्यासाठी मुंबईत अशी मदत देणार्‍या संस्थांची माहिती सेहतने एकत्रित केली आणि समुपदेशकांपर्यंत पोहोचविली. शासकीय पातळीवर जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुरक्षा अधिकारी, बाल कल्याण समिती, आश्रयगृह यांच्यासाठी काही सूचना नव्हत्या. हिंसापिडीत महिलाना सुरक्षितता देण्यात या यंत्रणांची भूमिका महत्वाची असते. कोविड १९ लॉकडाऊनच्या काळात याही अत्यावश्यक सेवाच आहेत. त्यामुळे सेहत व दिलासाच्या समुपदेशकांनी बाल कल्याण समिती, सुरक्षा अधिकारी व आश्रय गृह यांच्याशी संपर्क करून कामाचे बदललेले स्वरूप, मदत मिळवण्याची प्रक्रिया, आश्रय गृहात प्रवेश देण्यासाठीचे निकष इत्यादींची माहिती गोळा केली. त्यामुळे महिलांना योग्य ती मदत उपलब्ध करून देणे शक्य झाले.

  • टाळेबंदी, व महिला आणि मुलींवर होणारी लैंगिक हिंसा

टाळेबंदीच्या काळातही १६ बलात्कार पीडिता रुग्णालयात पोहोचल्या. ह्या महिला पोलिसांबरोबर तपासणीसाठी आल्या होत्या. रुग्णालयांवर कोविड १९ संबंधित सेवा देण्याचा ताण असल्यामुळे लैंगिक हिंसापीडित महिलांना न्यायवैद्यकीय सेवा मिळण्यास विलंब होण्याची शक्यता होती. लैंगिक हिंसेला बळी पाडलेल्या महिला आणि मुली प्रचंड मानसिक ताणाखाली असतात. न्यायवैद्यकीय प्रक्रियेत विलंब झाल्यास मनावरचा ताण वाढतो.  दिलासा समुपदेशकांनी डॉक्टर व आरोग्यसेवकांच्या संपर्कात राहून ह्या महिलांना आवश्यक त्या आरोग्य सेवा त्वरित मिळवण्यास मदत केली. दिलासची ही खूप महत्त्वाची भूमिका आहे.

महिलांवर, मुलींवर घरात, कुटुंबातील व्यक्तींकडूनही लैंगिक हिंसा होऊ शकते. टाळेबंदीच्या काळात या प्रकारची हिंसा वाढू शकते असे काही मान्यवर संस्थांचे मत आहे. महिलेवर जर लैंगिक हिंसा होत असेल तर तिने हिंसा थांबविण्यासाठी काय प्रयत्न करावे याचे मार्गदर्शन दिलासा समुपदेशक करतात. लैंगिक हिंसा होत असेल तर त्याविषयी जवळच्या व्यक्तीशी बोलणे, हेल्प लाईनला फोन करून मदत घेणे याविषयी संगितले जाते.

महिलांवर पति / जोडीदाराकडूनही महिलेच्या इच्छेविरुद्ध केलेले, असुरक्षित, पीडादायक शारीरिक संबंध, गर्भनिरोधकांचा वापर न करणे अशा स्वरुपात लैंगिक हिंसा होत असते. याचे प्रमाण टाळेबंदीच्या काळात वाढलेले दिसते. याप्रकरच्या हिंसेविषयी जोडीदारशी कशा प्रकारे बोलावे याविषये समुपदेशक महिलांना मार्गदर्शन करतात. महिलेला यावेळी नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी सुरक्षित लैंगिक संबंधांविषयीही माहिती दिली जाते.

  • समुपदेशकांना आधार

समुपदेशकांसाठी देखील हा काळ ताणाचा आहे. हिंसापिडीत महिलांना समुपदेशन करण्यानेही समुपदेशकांना ताण येऊ शकतो. काही वेळा परिस्थितीच्या मर्यादांमुळे नैराश्य येणेही शक्य असते. लॉकडाऊनच्या काळात संसर्गाची भीती असताना प्रवास करणे, रुग्णालयात काम करणे याने देखील तणाव निर्माण होत आहे. त्यांना पाठबळ पुरविण्याचे काम सेहत करीत आहे. दिलासात येणार्‍या महिलांच्या समस्यांविषयी दुसर्‍या समुपदेशकांशी बोलणे, चर्चा करणे, कधी महिलेला काय सूचना द्याव्या हयाविषयी सल्ला घेणे या समुपदेशकांचा कामामुळे येणारा ताण, थकवा दूर करण्याच्या नेहेमीच्या पद्धती आहेत. त्यानुसार सेहतचे समुपदेशक नियमितपणे फोनवरून दिलासा समुपदेशकांच्या संपर्कात आहेत. रुग्णालयांनीही सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून समुपदेशकांना आळीपाळीने दिलासात येण्याची सवलत दिली आहे.  

  • टाळेबंदी नंतर काय?

टाळेबंदीचा हा चौथा टप्पा संपला आहे. दिलासा समुपदेशकांचा अनुभव दाखवितो आहे की महिला आणि मुलीं कौटुंबिक हिंसेसंदर्भात मदत घेण्यासाठी रुग्णालयात व दिलासात येत आहेत. यापैकी काही हिंसेमुळे झालेल्या दुखापतींवर उपचार घेण्यासाठी रुग्णालायत आल्या तर इतर काही महिला अन्य रुग्णांसोबत रुग्णालयात आलेल्या होत्या व नंतर दिलासामध्ये हिंसेसंदर्भात मदत घेण्यासाठी पोहोचल्या. काही महिलांना मदतीची गरज असूनही त्या रुग्णालयांपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. या आणि इतर अनेक महिलांना समुपदेशन व इतर सेवांची गरज आहे आणि त्या सेवांपर्यंत पोहोचू शकत नसल्याने सेवा देणार्‍यांनीच त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या आपत्कालीन परिस्थितीत महिला व मुलांसाठी मनोसामाजिक सेवा उपलब्ध करून देऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने एक चांगला पायंडा घालून दिला आहे. दिलासा विभागही  आपत्कालीन परीस्थितीत त्यांच्या सुविधा किती उपयोगी ठरत आहेत हे त्यांच्या कामातून दाखवून देत आहेत. टाळेबंदी उठविल्यावरही जनजीवन सामान्य व्हायला काही कालावधी जावा लागेल. ह्या काळातही हिंसापिडीत महिला-मुलींपर्यन्त पोहोचण्यासाठी नावीन्यपूर्ण पद्धतींचा वापर करावा लागेल. दिलासा प्रमाणेच हिंसा पिडीत व्यक्तींना सुविधा पुरवणाऱ्या इतरांनीही मार्गदर्शक तत्वे तयार करून, आपल्या कामाच्या पद्धतीत आवश्यक ते फेरफार करून  नव्याने तयार झालेल्या परिस्थितीचे आव्हान पेलणे शक्य आहे.

सेहत संस्थेच्या दिलासा हेल्पलाइनचा क्रमांक :  ९०२९०७३१५४

संस्थेचा ई मेल पत्ता : cehatmumbai@gmail.com

दिलासाचा ई मेल पत्ता : dilaasamumbai@gmail.com

आभार / ऋणनिर्देश :

प्रस्तुत लेखाचा  मसुदा सुजाता आयरकर, अनुप्रिया सिंग आणि अनघा प्रधान यांनी तयार केला. अरुणा बुरुटे, चित्रा जोशी, मृदुला सावंत यांनी मजकूर काळजीपूर्वक वाचून महत्त्वाच्या सुधारणा सुचविल्या. ह्या सर्वांचे आणि टाळेबंदीच्या काळात सेवा देणार्‍या सर्व दिलासा समुपदेशकांचे मनःपूर्वक आभार.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0