स्वर्गलोकांतून अवतरलेली धार्मिक प्रतिके-पताका एकेकाळी दैवी शक्तीचे रुप मानली जात होती. ही रुपे सामान्य माणसांच्या आयुष्यात सुरक्षितता आणि हर्षोल्हास आणत होती, परंतु काळ जसा बदलत गेला, तसे आधुनिक भारताच्या आयुष्यात धर्मध्वजाची भूमिका बदलत गेली. ती कशी याचा वेध घेणारा हा लेख...
चिनी संस्कृतीप्रमाणेच भारतीय संस्कृती हीदेखील नदीच्या काठांवर बहरत गेली. या संस्कृतीत शक्र म्हणजेच देवांचा राजा, राजाधिराज इंद्र हा आदिपर्वातला उत्तुंग नायक होता. धर्ममान्यतेनुसार इंद्र हा जलाधिपतीसुद्धा होता आणि सर्व देवांमध्ये कमीत कमीत विनम्रही. त्याचे जसे पावसाच्या चक्रावर नियंत्रण होते, तसेच घनगर्जना, चक्रीवादळे आणि विजेच्या गडगडाटावरही (वज्र) तो आपले वर्चस्व राखून होता. तो जितका कोपिष्ट होता तितकाच लहरीसुद्धा. त्याच्या या लहरी स्वभावाचे दर्शन इहलोकीतल्या आपल्या भक्तांवर, त्यातही शेतीभाती करणाऱ्या भक्तांवर आणि भटक्या गो-पालकांवर त्याच्या बरसण्यातून होत असे. म्हणून त्याला पुजणारे त्याचे अनुयायी नेहमीच त्याच्या शक्तीपुढे नतमस्तक असत आणि वेळोवेळी यज्ञयागादी धार्मिक विधी करून त्याला आपला भक्तिभाव प्रकट करीत.
कालांतराने इंद्राचे साम्राज्य लयास गेले आणि आधी राम आणि नंतर श्रीकृष्णासाठी राजमार्ग मोकळा होत गेला. मात्र, इंद्राचे राज्य खालसा झाले असले तरीही, त्याचा वारसा त्याच्या ध्वजाच्या म्हणजेच इंद्रध्वजाच्या रुपाने कायम राहिला. हा वारसा पुढे जाऊन बौद्ध आणि जैन पंथीयांनीदेखील स्वीकारला.
सत्तेचे प्रतीक
हा ध्वज, अगदी इंद्राच्या काळापासून सत्तेचे आणि सर्वदूर पसरलेल्या विशाल साम्राज्याचे एका झेंड्याखाली होणाऱ्या एकीकरणाचे ठसठशीत प्रतीक बनलेला होता. २०१४ पासून भाजपप्रणीत आघाडीने जनतेच्या आकांक्षांना हात घालतानाच भविष्याबद्दलच्या जनतेच्या आशा आणि भयालाही धग दिली, या प्रक्रियेत भारताचा राष्ट्रीय ध्वज असलेल्या तिरंग्याचे अत्यंत योजनाबद्धरित्या महत्त्व वाढवत नेले. देशातल्या राजकीय सत्ताधारी नेतृत्त्वाने तिरंगा हा शक्तिशाली भारताचे प्रतीक असल्याचे वेळोवेळी अधोरेखीतही केले. ते महत्त्व ठसवण्यासाठी वेगवेगळ्या स्थानांवर, वेगवेगळ्या प्रसंगांत त्याचे प्रदर्शन करणेही आवश्यक बनत गेले. अगदी काही वर्षांपूर्वी जेव्हा सत्ताधारींनी जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले कलम ३७० रद्दबातल ठरवून या राज्यांचे त्रिभाजन केले, तेव्हा जम्मू-काश्मीरचा स्वतंत्र ध्वज उतरवून तिथे तिरंगा फडकावण्याच्या कृतीला देण्यात आलेले महत्त्व खूप काही सांगून जाणारे ठरले.
इथून भाजपशासित राज्यांमध्ये सरकारी कार्यालये आणि सरकारपुरस्कृत विद्यापीठांमध्ये आपापल्या प्रांगणात तिरंगा, त्यातही उंचच उंच तिरंगा फडकाविण्याची स्पर्धाच सुरु झाली. हा जणू नव्या युगातला एकप्रकारे इंद्रध्वज ठरला. अगदी सिनेमागृहांमध्येसुद्धा प्रत्यक्ष चित्रपट सुरु होण्यापूर्वी उपस्थित प्रेक्षकांना उभे राहून राष्ट्रीय गीत गाणे बंधनकारक केले गेले. इथे २१ व्या शतकातला इंद्रध्वज समोरच्या चित्रपटगृहाच्या पडद्यावर अवतीर्ण झालेला होता.
हिंदूंना एकीचे आवाहन
आपण या टप्प्यावर येतो न येतो तोच, रा. स्वं. संघाचे कर्नाटकातले एक नेते के. प्रभाकर भट यांनी, देशातल्या सर्व हिंदूंनी भगव्या ध्वजाखाली एक व्हावे असे आवाहन केले. या मुद्द्यावर संसदेतले संघाला मानणारे सर्व हिंदू सदस्य एकवटले तर संसदीय मतदान प्रक्रियेचा अवलंब करीत भट यांचे म्हणणे खरे ठरण्यात तशीही अडचण येणार नाही. गेल्या महिन्यात भारताचे पंतप्रधान जर्मनीच्या भेटीवर असताना तिथल्या अनिवासी भारतीय समूदायाने ध्वजपताका उंचावून आपल्या नेत्याचे अभिवादन, स्वागत केले, तेव्हा ती कृती इंद्र परंपरेशी असलेले आपले नाते सांगण्याचा एक भाग होती. त्यावेळी भगव्या रंगाचे उपरणे आणि भगव्या रंगाची टोपी परिधान केलेल्या कोणी एका अनिवासी भारतीयाने हाती उंच ध्वज धरून तो एका लयीत वर-खाली करण्यातून जी दृश्यप्रतिमा बघणाऱ्यांच्या मनावर ठसत होती, त्याने इंद्र परंपरा अधिक ठळकपणे अधोरेखित होत होती. मात्र, त्या दृश्यांमध्ये भारताचा राष्ट्रीय ध्वज मात्र लक्षात येईल अशाप्रकाराने गायब दिसत होता.
इंद्रध्वजाचा वारसा
महाभारतात हे घटित नोंदण्यात आले आहे, त्यानुसार आपल्या अनुयायांना समूहशक्ती म्हणून एकत्रित गेल्यानंतर देवाधिराज इंद्र स्वर्गस्थ झाला. परंतु, स्वर्गारोहण करण्याआधी इंद्राने छेदी जनपद ( अंदाजाने आताचा बुंदेलखंड प्रांत) इथला राजा उपरिचराशी युती केली. छेदी जनपद म्हणजे इहलोकांतला पाण्याचे दुर्भीक्ष्य असलेला प्रांत. तिथे जलाधिपती इंद्राने सहकार्याचा हात पुढे केला. त्याने आपला सहचर म्हणून राजा उपरिचराची नियुक्ती केली आणि आपल्या संपत्तीच्या रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर सोपविली. परंतु, सर्व राजकारणचतुर सम्राटाप्रमाणे इंद्राने आदिदेव अशी गणना झालेल्या शिवासाठीसुद्धा अवकाश कायम ठेवला. इंद्रमाह या आपल्या नावाने होणाऱ्या विधी आणि उत्सवात शिवशंभो सहभागी होईल, अशी तजवीज केली. असे करताना त्याने आपल्या इहलोकीतल्या अनुयायांना देवांप्रमाणे हवेतून प्रवास करण्यासाठी विमान (वाहन), सदासतेज कमल फुलांची माळ (वैजयंतीमाला) आणि ३२ हात उंच दणकट बांबूची काठी (वैष्णवी यष्टी) अशा तीन प्रतिकात्मक भेटस्वरुप वस्तू दिल्या.
इंद्राने राजाला सांगितले की दणकट यष्टी शिवाच्या निर्मळ हास्याचे प्रतीक आहे, यापुढे सगळ्या समूहांचे सर्व आनंदोत्सव या यष्टीच्या अवतीभवती पार पडले पाहिजेत. इंद्राच्या आपल्या ज्येष्ठ आणि उत्तराधिकाऱ्यांबरोबर घड़ून आलेल्या संमीलनानंतर आनंदाचे प्रतीक म्हणून या यष्टीवर बहुरंगी ध्वज लावला पाहिजे, असेही आदेश दिले. त्यानंतर इंद्राने छेदी जनपदाची यात्रा सुरु केली. ही यात्रा सुरु असताना राजाने सर्वात पुढे होत त्याची यष्टी धरून इंद्राचे अभिवादन केले. त्यावेळी यष्टीवर लावलेला इंद्रध्वज वेगवेगळ्या कापडांपासून बनवलेला होता, त्यावर फुलांची माळ, चमकदार आभुषणे आणि उसाची पेरे लावण्यात आली होती. नगराच्या मध्यभागी येताच, नव्या राजाचा आशीर्वाद लाभलेला हा इंद्रध्वज जमिनीत भक्कमपणे रोवण्यात आला आणि इथून पुढे शत्रूशी दोन हात करण्यास आम्ही सज्ज आहोत, असे सुचविण्यात आले.
पंथप्रभाव विस्तारला
कालांतराने ही आनंदोत्सवाप्रसंगी ध्वजरोहणाची प्रथा रुजत गेली आणि तिला यात्रा ( जत्रा) असे नाव पडले. यात्रा म्हणजे प्रवासी जनांनी आनंदोत्सव साजरा करण्याची जागा, इथे पंचपक्वान्ने तयार करण्यापासून कथाकथनापर्यंतची सर्व कार्ये पार पडत गेली. हिमालयाच्या पर्वतराजीत असलेल्या वस्त्या आणि प्रांतांमध्ये, अर्थातच यात नेपाळ या देशाचाही समावेश होतो, आजही बहुतेक सर्व उत्सवांची सुरुवात प्रवासी इंद्रध्वजारोहणाने होत असते. जसाजसा इंद्राचा पंथप्रभाव दक्षिणेकडे सरकत गेला तसतसे इंद्र वा शक्र ध्वज दाक्षिणात्य कथाकथनांतही डोकावू लागला.
हरिवंश पुराणानुसार असे सांगितले गेले आहे, की जेव्हा द्वापारयुग सुरु होईल, तेव्हा रंगाने निळासावळा कृष्णनामक नायक वर्णाने उजळ इंद्राच्या एकाधिकारशाहीला आव्हान देईल. भविष्यवाणी खरी ठरली. गाई-गुरे राखणाऱ्या गुराख्यांमध्ये वाढलेल्या कृष्णाचा इंद्राशी अभूतपूर्व असा संघर्ष झाला, त्यातून इंद्राच्या अनुयायांचा संख्या क्षीण होत गेली. त्यामागे जशी दैवीशक्ती कृष्णाची होती, तशीच ती इंद्रध्वजाचीदेखील होती. कृष्णाने मोठ्या मनाने इंद्रध्वजाच्या भोवती राज्यातल्या सर्व समूदायांना आणि या समुदायांतल्या कारागीरांना आनंदोत्सव साजरा करण्याची मुभा दिला होती. पण ते कशासाठी? याचे कारण, सगळ्या नायकांना नाट्य हवे असते. जेव्हा हे नायक लढाईला जातात, किंवा प्रजेची ख्यालीखुशाली जाणण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर निघतात, तेव्हा त्यांना त्यांचे आगतस्वागत शंखध्वनी आणि बासरीच्या सुरांत नगरातल्या स्त्री-पुरुषांनी आकर्षक नृत्य करीत व्हावे असे वाटत असते. नव्हे, तसे ते त्यांना आवडतही असते. भारतमुनींच्या नाट्यशास्त्रात सर्व प्रकारच्या राजेशाही यात्रा संगीत, नृत्य, नाट्य आणि सेवनाशी अगदी सहजपणे जोडलेल्या आहेत. या टप्प्यावर इंद्र असो वा नसो बहुरंगी इद्रध्वज हा सर्वप्रकारच्या सृजनशीलतेचे मूळ ठरलेला आहे.
इंद्रध्वजाला आव्हान ?
त्यामुळे भारतभूमीवर मुस्लिम शासकांचे पाऊल पडेपर्यंत इंद्रध्वज डौलाने फडकत होता नि नगरानगरांतली स्थानिक जनता आपल्याआपल्या शहर-गावांत उत्सवाप्रसंगी मध्यवर्ती प्रेरकशक्ती म्हणून त्याचे रोहण करण्यात आनंद मानत होते. तो वारसा जपत सांप्रत काळात महादेवाच्या यष्टीला आणि इंद्राच्या रंगबेरंगी ध्वजाला साक्षी ठेवत वसंत पंचमी, रंग पंचमी, होळी, दसरा, रामलीला, बंगालमध्ये दुर्गापूजा, भगवान महादेवाचा वास असलेल्या कैलास पर्वताकडे होणाऱ्या प्रयाणाचे प्रतीक म्हणून गढवाल भागातल्या गावागावांतून साजरा होणारा नंदा-सुनंदा असे अनेकविध सण-उत्सव साजरे होत आले आहेत.
‘यह वसंत सब कर त्योहारू’ असे म्हणून कवी जायसीने इंद्रध्वज आणि त्याच्या अवतीभोवती जमा होणाऱ्या नगरवासीयांच्या आयुष्यात फुलणाऱ्या आनंद आणि उल्हासाचे नेमके वर्णन केले आहे.
असा उत्सवानंद देण्यात आता यापुढे कोणत्या राजकीय पक्षाचा वा संघटनेचा ध्वज, इंद्रध्वजास मागे टाकणार आहे? मुळात, तसा तो मागे टाकू शकेल का?
(१९ मे २०२२ रोजी इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित लेखाचा हा अनुवाद आहे. लेखिका हिंदी वृत्तपत्रसृष्टीतल्या ज्येष्ठ संपादिका-लेखिका आणि प्रसार भारतीच्या माजी अध्यक्षा आहेत.)
(‘मुक्त-संवाद’ नियतकालिकाच्या १ जून २०२२ अंकातून साभार)
COMMENTS