दरवर्षी २५ एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षीचे ब्रीदवाक्य आहे, ZERO MALARIA STARTS WITH ME. तुम्ही हा लेख वाचून पूर्ण करेपर्यंत पाच मिनिटांमध्ये जगभरात ५ वर्षांखालील १० मुले मलेरियाने (हिवतापाने) मृत्यूमुखी पडलेली असतील. मलेरिया हे पाच वर्षाखालील बालके आणि प्रौढांमधील अनारोग्याचे आणि मृत्यूचे महत्त्वाचे कारण मानले जाते.
तुम्ही हा लेख वाचून पूर्ण करेपर्यंत पाच मिनिटांमध्ये जगभरात ५ वर्षांखालील १० मुले मलेरियाने (हिवतापाने) मृत्यूमुखी पडलेली असतील. मलेरिया हे पाच वर्षाखालील बालके आणि प्रौढांमधील अनारोग्याचे आणि मृत्यूचे महत्त्वाचे कारण मानले जाते. जगातील ८०% पेक्षा अधिक रुग्ण हे केवळ ११ देशांमध्ये एकवटले आहेत; त्यात आफ्रिकाखंडातील देश आणि त्याखालोखाल आशिया खंडामधील भारताचा प्रामुख्याने समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी मलेरियावर जागतिक अहवाल सादर करते. २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार २०१७ मध्ये जगभरात मलेरियाच्या २१ कोटी रुग्णांची नोंद करण्यात आली आणि त्यातील ४३,५०० रुग्णांचा मृत्यू झाला. भारतात साधारण ८४,००० रुग्णांची नोंद करण्यात आली आणि १९४ रुग्णांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षात ही आकडेवारी अधिक असण्याची शक्यता आहे. याशिवाय त्याचा आरोग्य यंत्रणेवर पडणारा भार, कुटुंबातील कमावती व्यक्ती अंथरुणाला खिळल्यावर त्याचे बुडणारे वेतन, त्याचा देशाच्या दरडोई उत्पन्नावर होणारा परिणाम या सर्व बाबींचा विचार करता मलेरियाची भयानकता अधिकच अधोरेखित होते. डासासारख्या लहानशा जीवाने जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँक आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय आरोग्य परिषदांना गेली अनेक दशकेधारेवर धरले आहे.
मलेरिया हा प्लाझमोडीयम नावाच्या पॅरासाईटमुळे होतो. एनाफिलीस या डासाची मादी या पॅरासाईटची वाहक म्हणून काम करते. मलेरियाचे पॅरासाईटस शरीरात असलेला डास माणसाला चावला की ते रक्तातील लाल पेशींमध्ये वाढू लागतात आणि मलेरियाची लक्षणे दिसू लागतात.‘प्लाझमोडीयम फाल्सिपेरम’, ‘प्लाझमोडीयम वायवॅक्स’, ‘प्लाझमोडीयमओवेल’ आणि‘प्लाझमोडीयममलेरिये’ हे चार प्रकारचे पॅरासाईट मलेरियास कारणीभूत असतात. यातील ‘प्लाझमोडीयम वायवॅक्स’ हा प्रकार सर्वाधिक प्रमाणात आढळतो. मात्र ‘प्लाझमोडीयम फाल्सिपेरम’ सर्वाधिक मृत्युस कारणीभूत असतो. पॅरासाईट, डास यांबरोबरच काही पर्यावरणीय घटक मलेरियाच्या प्रसारास मोठ्या प्रमाणावर जबाबदार असतात. उष्ण वातावरण आणि भरपूर पर्जन्यमान हे डासांच्या उत्पत्तीस अनुकूल घटक असतात. त्यामुळे उष्णकटीबंधातील देशांमध्ये मलेरियाचा प्रादुर्भाव अधिक असतो. भारतही त्यातील एक.
मलेरियाचा रुग्ण ओळखणे फारसे सोपे नसते. थंडी वाजून ताप, उलट्या, डोकेदुखी, अंगदुखी ही मलेरियाची सर्वसाधारण लक्षणे आहेत. परंतु भारतासारख्या देशात सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या इतर विकारांचाही मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असल्याने या रूग्णांमध्ये वरील लक्षणे कधीना ना कधी दिसतातच. त्यामुळे कोणताही ताप हा मलेरियाच आहे असे गृहीत धरून त्यावर प्राथमिक उपचार सुरु करावेत आणि रक्ताच्या तपासणीनंतर मलेरियाचे खात्रीशीर निदान झाल्यावर radical treatment सुरु करावी अशी भारत सरकारची मार्गदर्शक तत्वे आहेत. त्वरित निदान झाल्यास मलेरिया हा खरंतर अगदी प्राथमिक उपचारांनी बरा होणारा रोग आहे. परंतु ‘फाल्सिपेरम’ जरा घातकी पॅरासाईट आहे कारण तो थेट मज्जासंस्थेवर आघात करतो आणि व्यक्तीला मेंदूज्वर होतो. आकडी येणे, शुद्ध हरपणे, रक्तदाब कमी होणे, श्वसनसंस्थेवर आणि मुत्राशयावर विपरीत परिणाम अशा विविध गुंतागुंतीतून त्वरित निदान आणि उपचाराभावी रुग्ण दगावू शकतो. ‘प्लाझमोडीयम फाल्सिपेरम’च्या वारंवार होणाऱ्या संसर्गामुळे अनिमिया होऊ शकतो. तसेच गर्भवती महिलेस याची लागण झाल्यास गर्भपात होण्याची किंवा बाळ कमी वजनाचे जन्माला येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेच्या दृष्टीने लहान मुले आणि गरोदर महिला या अतीजोखमी (High risk) वर्गात गणल्या जातात.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेपुढील आव्हान
मलेरिया होण्यास, त्याचा प्रसार करण्यास आणि वाहकाच्या उत्पत्तीस अनुकूल असणाऱ्या अशा तीनही घटकांची (Epidemiological Triad) आपल्याला इत्थंभूत माहिती असूनही मलेरियाचे निर्मुलन हे गेली अनेक दशके अविकसित आणि विकसनशील देशांमधील सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेपुढील मोठे आव्हान राहिलेले आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या अशा कोणत्याही समस्यचे निराकरण तीन टप्प्यांमध्ये केले जाते.
- पहिल्या टप्पात विशिष्ठ प्रतिबंधात्मक उपाय आणि लोकशिक्षणाचा समावेश होतो. मलेरियाच्या बाबतीत जगभरात मच्छरदाण्याचा वापर हा मलेरिया नियंत्रणाचा आर्थिकदृश्त्या सर्वात किफायतशीर आणि प्रभावी मार्ग असल्याचे संशोधनाअंती सिध्द झाले आहे. मलेरिया कसा पसरतो, त्याची लक्षणं काय, डासांची उत्त्पतीस्थाने नष्ट करणे याबरोबरच मच्छरदाणीचा नियमित वापर अशा संदेशांवर सरकारचा विशेष भर असतो.
- यानंतरचा पुढचा स्वाभाविक टप्पा असतो त्वरित निदान आणि अचूक उपचाराचा. वर उल्लेख केल्याप्रमाणे थंडी वाजून येणाऱ्या कोणत्याही तापावर मलेरियाचे उपचार सुरु करण्याचा (presumptive treatment) सरकारचा आदेश आहे. त्याचबरोबर रक्ताची लवकरात लवकर चाचणी करून मलेरियाचे निदान करणे हेही महत्त्वाचे असते. गेली अनेक वर्ष मलेरियाचे निदान हे सूक्ष्मदर्शकाखाली रक्तामधील पॅरासाईटच्या निरीक्षणातून होत असे. परंतु अशाप्रकारचे निदान हे ‘त्वरित’ होत नसून रुग्णास मलेरियाची radical उपचार सुरु होण्यास विलंब लागत आहे हे लक्षात आले. यावर उपाय म्हणून २००५ च्या सुमारास भारत सरकारने काही मिनिटांमध्ये फाल्सिपेरमचे त्वरित निदान करणारे रॅपिडडायग्नोस्टीक किट (RDK) बाजारात आणले. परंतु त्याचा वापर सार्वत्रिकरीत्या केला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.
- एकदा रुग्णाला मलेरिया झाला आहे हे नक्की झाल्यावर त्याला वेळेत योग्य उपचार सुरु करून नेमून दिलेल्या कालावधीपर्यंत ते चालू आहेत, त्यात खंड पडत नाही याची खातरजमा करणे हे मलेरिया नियंत्रणाच्या साखळीतील महत्त्वाची कडी आहे. ताप उतरला की रुग्ण औषध बंद करतो आणि अर्धवट घेतलेल्या गोळ्यांचा फायद्यापेक्षा तोटा अधिक होतो. या तिसऱ्या टप्प्यामध्ये एखाद्या आजारामुळे अपंगत्व किंवा यासारखी गुंतागुंत निर्माण होत असल्यास त्याची तीव्रता कमी करण्यासाठी उपाययोजना केली जाते जे मलेरियास लागू होत नाही.
भारत सरकार जेव्हा मलेरिया निर्मुलनाचा राष्ट्रीय कार्यक्रम आखते त्यावेळी मलेरिया प्रतिबंध ते यशस्वी उपचार या संपूर्ण साखळीतील प्रत्येक कडी भक्कम असणे अपेक्षित असते आणि यावर कार्यक्रमाचे यश अवलंबून असते. एखादीही कमकुवतकडी बाकीचा भक्कम कड्यांना खिळखिळी करते. उदाहरणार्थ रक्ताची तपासणी होऊन निदान होण्यास जर आठवड्याभराचा वेळ लागला तर दवाखान्यात उत्तमोत्तम औषधांचे साठे असून उपयोग नाही. मच्छरदाण्यांच्या वाटपाच्या उपक्रमाला त्या का आणि कशा वापराव्या यासंबंधीच्या लोकशिक्षणाच्या सत्राची जोड नसेल तर या मच्छरदाण्या हळूहळू मासेमारीसाठी वापरल्या जातात. एकीकडे सरकार दरबारी वाटपाची नोंद होत राहते आणि दुसरीकडे मलेरियाची रुग्णांची संख्याही वाढत राहते. भारतात १९७० पासून राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबवला जात आहे. ४०० लोकवस्तीच्या गावापासून ते महानगरांमध्ये हजारो आरोग्य सेवकांची फळी केवळ मलेरिया नियंत्रणासाठी काम करत आहे. याव्यतिरिक्त The World Bank, Clinton Health Access Initiative (CHAI), Global Fund for AIDS, Tuberculosis and Malaria (GMATM) अशा अनेक आंतरराष्ट्रीय संस्थाकडून भारताला मलेरिया नियंत्रणाच्या विविध कार्यक्रमांसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या प्रयत्नांमुळे मलेरियामुळे दगावणार्या रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी जगभरातच मलेरियाच्या रुग्णांची संख्या कमी होण्याचा वेग २०१६ नंतर मंदावल्याचे जागतिक अहवालामध्ये (२०१८) नमूद केलेले आहे. याला वर उल्लेख केलेल्या उपाययोजननांमधील त्रुटी कारणीभूत आहेत तर काही न बदलता येणारे पर्यावरणीय घटक! सरकारतर्फे होणारा मछारदाण्यांचा आणि रॅपिडडायग्नोस्टीक किटचा अपुरा पुरवठा, पॅरासाईटला प्रतिबंध निर्माण झालेल्या औषधांचा होणारा वापर ही त्यातील काही कारणे. उष्ण हवामान आपण बदलू शकत नाही आणि भारतातल्या २४% जंगलांनी व्यापलेल्या भागात वृक्षतोडही करू शकत नाही. पण शहरे स्वच्छ ठेवून आपण येथील मलेरिया कमी करू शकतो. कोणताही ताप अंगावर न काढता त्वरित दवाखाना गाठल्यास आपण फक्त स्वत:चेच नाही तर आपल्या आजूबाजूच्या लोकांना मलेरियाची लागण होण्यापासून वाचवू शकतो. शासनाने बंदी आणलेल्या औषधांचावापरजाणीवपूवकटाळू शकतो.
दरवर्षी२५ एप्रिल हा जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षीचे ब्रीदवाक्य आहे, Zero malaria starts with me. खरंतर प्रत्येकच आजाराचा प्रतिबंध स्वत:पासून सुरु होतो. आपले आरोग्य खऱ्या अर्थाने आपल्याच हाती ठेवण्यासाठी मलेरिया नियंत्रणाची सुरुवात स्वत:च्या घरापासूनच सुरु करणे गरजेचे आहे. तेव्हा कुठे आपण zero malaria म्हणजेच मलेरियाच्या संपूर्ण उच्चाटनाची स्वप्ने पाहू शकू. डासांची घरातील उत्पत्तीस्थाने नष्ट करणे, रात्र मच्छरदाणीचा वापर करणे हे काही साधे उपाय आपल्याला मलेरियापासून दूर ठेवू शकतात.
चारुता गोखले, सार्वजनिक आरोग्यक्षेत्राच्या अभ्यासक असून, सध्या ‘ग्लोबल फंड फॉर एड्स, ट्युबरक्यूलॉंसिस अॅन्ड मलेरिया’ या संस्थेचे आर्थिक सहाय्य लाभलेल्या क्षयरोगावरील एका प्रकल्पात महाराष्ट्र राज्य व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.
COMMENTS