विवेक व प्रेम पसरवणं ही आपली जबाबदारी

विवेक व प्रेम पसरवणं ही आपली जबाबदारी

जामियाची मुले आपली नाहीत? आयआयएमची मुले आपली नाहीत? ईशान्य भारतातील मुले आपली नाहीत? काश्मीर-गुजरातमधील मुले आपली नाहीत? ही मुले आपली सर्वांची आहेत.

शार्जिल इमामला बिहारमधून अटक, देशद्रोहाचा गुन्हा दाखल
अलिगढ विद्यापीठात पोलिसांची क्रूर मारहाण, अर्वाच्च शिवीगाळ
जामिया मिलिया व अलिगड मुस्लिम विद्यापीठात पोलिसांची दडपशाही

माझा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला सांगतो. २००४मध्ये भारताचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. हा दौरा मित्रत्वाचा होता. मी राहुल द्रवीड, एल. बालाजी व पार्थिव पटेलसोबत लाहोरमधील एका कॉलेजमध्ये गेलो होतो. तेथे आमचा कॉलेजमधील मुलांसोबत प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुमारे १५०० हून अधिक मुले-मुली सभागृहात जमा झाले होते. कार्यक्रम सुरू झाला. काही वेळाने एक मुलगी उठली आणि तिने मला थेट प्रश्न केला. तिच्या आवाजात संताप दिसत होता. ती मला म्हणाली, तुम्ही मुसलमान असूनही भारताच्या टीमसोबत का खेळता?

मी उठलो आणि म्हणालो, ‘भारताच्या टीमसोबत खेळून मी काही त्यांच्यावर मेहरबानी करत नाही. हा देश माझा आहे. माझ्या पूर्वजांच्या अनेक पिढ्या या देशात राहिल्या आहेत. अशा देशाच्या क्रिकेट टीममध्ये मी असणे व खेळणे हा मला बहुमान वाटतो.’

माझे हे उत्तर ऐकून सभागृहात टाळ्यांचा कडकटात झाला.

असे जर मी पाकिस्तानात जाऊन, खुलेपणाने, छातीवर हात ठेवून बोलत असेन तर मला वाटत नाही की माझ्या देशात मला बोलण्यासाठी कुणाची परवानगी घ्यावी लागेल. मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे हे काही लोकांनी समजून घ्यावं. जेव्हा मी गोलंदाजी करण्यासाठी धाव घेतो तेव्हा माझ्या मनात मी मुस्लिम आहे असा विचार नसतो. मी काहीही असण्यापेक्षा प्रथम भारतीय आहे.

आणि मी माझ्या ट्विटमधून काय वेगळे बोललोय? “Political blame game will go on forever but I and our country is concerned about the students of #JamiaMilia #JamiaProtest”

(‘राजकीय आरोप-प्रत्यारोप अविरत सुरू राहतील पण मला व माझ्या देशाला जामिया मिलियातील विद्यार्थ्यांबाबत चिंता वाटतेय.’)

या ट्विटमध्ये काही चुकलंय? यात कुणाविषयी मत्सर, विखार दिसतोय?

जेव्हा दोन परस्परविरोधी भिन्न विचार तुल्यबळ असतात तेव्हा मी ट्विट करत नाही. पण इथे मुद्दा वेगळा आहे. शांततेत निदर्शने करणे हा लोकशाहीने दिलेला मुलभूत अधिकार आहे. मी या अधिकाराकडे सर्वांचे लक्ष वेधू इच्छितो. ही मुले आपले उद्याचे भविष्य आहे.

जामियाची मुले आपली नाहीत? आयआयएमची मुले आपली नाहीत? ईशान्य भारतातील मुले आपली नाहीत? काश्मीर-गुजरातमधील मुले आपली नाहीत? ही मुले आपली सर्वांची आहेत. मी सोशल मीडियात प्रसारित झालेले अनेक फोटो, व्हिडिओ पाहिले आणि मनाशी ठरवलं की आपण बोललं पाहिजे. हा प्रश्न जामियाचा असो वा आयआयएमचा वा अन्य कोणाचा ही मुले आपली भविष्य आहेत आणि त्यांच्यामुळेच हा देश भविष्यात प्रगती करणार आहे.

हिंसेत कुणीच भाग घेऊ नये हे खरं पण आंदोलनातून पाठिंबा देणे यात काहीच गैर नाही. जर मुलं चुकीचे काही करत असतील, त्यांचा मार्ग चुकत असेल तर त्यांना योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. पण मुले शांततेने निदर्शनं, आंदोलनं करत असतील तर त्यात गैर काहीच नाही. माझे एखादे मत मी समाजापुढे मांडत असेल तर त्यात चुकीचे काय? मी समाजासाठी काही केलेलं नाही का? मी केलंय. मला माहितेय की, हा काळ सोशल मीडियाचा आहे आणि त्यावर वेगवेगळ्या स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असतात. मला हेही समजतं अनेक प्रतिक्रिया ‘फेक अकाउंट’मधून प्रसृत केल्या जातात.

मी विचार केला की मला बोललं पाहिजे आणि मी बोललो. कुणीतरी बोलायची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वत:च सुरवात करावी. मला नव्या चेंडूवर गोलंदाजी करायला आवडते. यातला विनोदाचा भाग सोडा पण मला वाटलं की मी बोललं पाहिजे.

२००४मध्ये पाकिस्तानमध्ये जे काही घडलं ते मला नेमकं रात्री आठवलं आणि मी ते ट्विट केलं. मी पाकिस्तानी खेळाडूंना मैदानावर त्रिफळाचीत केलं आहे तसंच त्या देशात जाऊन तेथील लोकांनाही. असं असताना माझ्या हेतूवर माझ्या देशात का शंका घेतली जावी?

गेल्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी युनायटेड नेशनमधील भाषणात रक्तपात व युद्धखोरीची भाषा केली होती. त्यावेळी मी त्यांच्याविरोधात अनेक ट्विट केले होते. तेव्हा मला ‘लाडला’ असं ट्विटरवर बोललं गेलं होतं. आज मी तसा नाही का? जर मी माझ्या देशातल्या मुलांच्या भविष्याबद्दल बोलत असेन तर ते मी चुकीचे बोलतोय का?

सेलेब्रिटीजनी देशातल्या मुद्द्यांवर बोललं पाहिजे असा प्रश्न मला अनेक जण विचारतात. मला असं वाटतं की हे व्यक्तिगत स्तरावर परिस्थिती पाहून ज्याचे त्याने ठरवावे.

मला आणखी एक माझा अनुभव सांगायचा आहे. जम्मू व काश्मीरच्या क्रिकेटसंघाचा प्रशिक्षक म्हणून मी काश्मीरमध्ये होतो. तेव्हा पुलवामा हल्ला झाला होता. आपल्या लष्करावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर लगेचच आमच्या संघाला जम्मूला हलवलं. जवानांचे कुटुंबिय या हल्ल्यातून सावरले नव्हते. मी माझ्या हॉटेलच्या रुममधून रस्त्यावर पाहात होतो. काही लोकं बाइक व कारना आग लावत होते. या कार, बाईक कुणाच्या होत्या? आपल्याच लोकांच्या ना? आपले जवान शहीद झालेले पाहून लोकांचा अनावर झालेला संताप मला दिसत होता. त्यावेळी मी ट्विट करणं टाळलं. मी त्यावेळी हिंसा करू नका, वाहने जाळू नका अशा आशयाचे ट्विट करू शकलो असतो. पण माझा तो मूर्खपणा झाला असता. हिंसा करणे हा अधिकार नाही पण मला लोकांच्या भावना लक्षात येत होत्या.

जर स्वत:च्या मनातल्या भावना बोलत असाल आणि त्यात दुसऱ्याविरोधात मत्सराची भावना नसेल तर समाज ते सकारात्मक पद्धतीने स्वीकारतो. माझ्या ट्विटमध्ये तुम्हाला मत्सराचा लवलेश सापडणार नाही. मी अगदी इम्रान खानच्या विरोधात जरी ट्विट केले असले तरी त्यात मी शांततेचा आग्रह करत आलो आहे. शांततेचे पालन करणे यालाच माझे प्राधान्य आहे.

मला माहितेय की, आपल्याकडे समाजात हिंसा वाढावी म्हणून आभासी जगतातून एकप्रकारचा माहोल उभा केला जातो. कधीकधी मीडियातूनही तसा प्रकार होत असतो. मी अशावेळी प्रतिक्रिया देणे टाळतो.

आपल्या सर्वांना विखाराचे, मत्सराचे वातावरण कसे तयार केले जाते हे माहितेय. सोशल मीडियात अपप्रचार करण्यासाठी कसे पैसे दिले जातात, समाजात नकारात्मक पसरवण्यासाठी कसे प्रयत्न केले जातात हे माहितेय. हा देश सुंदर आहे आणि या देशात शांतता नांदण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे.

रोटी, कपडा, मकान या आपल्या मुलभूत गरजा आहेत व नंतर विकास. मग धर्म. पण लक्षात ठेवा बहुसंख्यांकांना विकास व समृद्धी हवी आहे.

जेव्हा काही मित्रांसोबत मी बोलत असतो तेव्हा धर्म या विषयावर आम्ही कधीच बोलत नाही. आम्ही एकमेकांच्या कामाबद्दल बोलत असतो. त्यांचं जगणं, त्याचे कुटुंब यावर बोलतो. आपण सर्वांनी पुढे जायला हवं, आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायला हवी. जर आपण अधिक प्रगल्भ झालो तर देशही पुढे जाईल.

द्वेष पसरू नका. आपणा सर्वांच्या मनात सकारात्मकता हवी. आपण फोन सुरू केला की आपल्याला द्वेषयुक्त शेकडो मेसेज दिसतात. अशावेळी आपली जबाबदारी आहे की आपण सर्वांना निरोगी जगायचे असेल तर शांत राहणे व समाजात प्रेम, सकारात्मक विचार पसरवणे गरजेचे आहे.

मी प्रामाणिकपणे व कष्टाने पैसा कमावला आहे. सोशल मीडियात मी द्वेष पसरवणारा एखादा मेसेज केला असेल तर तो मला कुणी दाखवला तर मी सोशल मीडिया कायमचा सोडेन. माझ्या लहानपणी माझ्याकडे साधी सायकलही नव्हती. आज माझ्या देशाने, माझ्या लोकांनी मला प्रचंड प्रेम दिले आहे आणि ते कायम राहील असे आहे. मला मनापासून वाटतेय की जे काही मी ट्विट केले आहे त्यामागची माझी भावना व हेतू आपणाला लक्षात येईल.

(२००७मध्ये भारताने जिंकलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक संघात इरफान खान यांनी प्रतिनिधित्व केले होते.)

मूळ लेख इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झाला होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0