‘असत्याचे राजकारण करणाऱ्यांना गांधी कसे समजणार?’

‘असत्याचे राजकारण करणाऱ्यांना गांधी कसे समजणार?’

नवी दिल्ली : भारत आणि म. गांधी हे समानार्थी आहे पण काही लोकांना आरएसएसला भारताशी समानार्थी करायचे आहे. गांधींची अहिंसा, त्यांचा सत्याचा आग्रह हे असत्याचे राजकारण करणाऱ्यांना कधीच समजणार नाही. आज गांधी असते तर देशातील परिस्थिती पाहून ते दु:खी झाले असते, अशा शब्दांत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी भाजप व संघपरिवाराच्या राजकारणावर टीका केली.

म. गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त काँग्रेस पदयात्रेच्या सांगता कार्यक्रमात बोलताना सोनिया गांधी यांनी गांधींजींच्या विचारावर काँग्रेस चालत असून काँग्रेसचे सरकार असताना देशातल्या लाखो तरुणांना रोजगार, शिक्षण मिळाले होते, कोट्यवधी शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले होते, असा दावा केला. काँग्रेसच्या या कामगिरीची सध्याच्या सरकारच्या कामाशी तुलनाच होऊ शकत नाही, असेही त्या म्हणाल्या.

हिंदीमध्ये केलेल्या भाषणात सोनिया गांधी यांनी नेहरु, शास्त्री, इंदिरा गांधी, नरसिंह राव, डॉ. मनमोहन सिंग या माजी पंतप्रधानांच्या नावाचा उल्लेख करत या सर्व नेत्यांनी म. गांधींच्या मार्गाचा अवलंब करून देशाचा विकास केल्याचे सांगितले.

आजचा भारत हा गांधी विचाराने घडला आहे. त्यांचे नाव घेणे सोपे आहे पण त्यांच्या मार्गावर चालणे कठीण आहे. असत्याचे राजकारण करणाऱ्यांना गांधी सत्याचे आग्रही होते हे समजणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

COMMENTS