एखाद्या गरोदर महिलेला सोनोग्राफी करण्यासाठी जाण्यायेण्याचा मिळून अंदाजे २०० कीलोमीटरचा प्रवास करावा लागत असेल आणि त्यासाठी परराज्यात जावं लागत असेल तर
एखाद्या गरोदर महिलेला सोनोग्राफी करण्यासाठी जाण्यायेण्याचा मिळून अंदाजे २०० कीलोमीटरचा प्रवास करावा लागत असेल आणि त्यासाठी परराज्यात जावं लागत असेल तर…? कुणाही बाईचा तो प्रवास टाळण्याकडेच कल असेल. त्यात ती बाई गरीब, अशिक्षित, रोजंदारीवर गुजराण करणारी असेल तर पोटातल्या बाळासाठी पोटाला चिमटा काढणं ही तिच्यासाठी अवघड गोष्ट. पण परिणाम म्हणून मुलांचं कुपोषण असेल किंवा गर्भावस्थेतील गुंतागुंत हे भोगायची वेळ पुन्हा तिच्यावरच. ही दुरवस्था आहे, अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातल्या अवघडलेल्या बायांची. मुख्य म्हणजे तिथंल्या रुग्णालयात सोनोग्राफी मशीन होती पण तज्ज्ञ डॉक्टर (सोनोलोजीस्ट) नव्हता.
धारणी म्हणजे मेळघाट. आणि मेळघाट म्हंटल की आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर कुपोषण, बालमृत्य- माता मृत्यू याची दृश्य येऊ लागतात. हे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. पण त्यात अजूनही काही कमतरता आढळून येतात. त्यातलाच एक प्रकार. आजही दुर्गम आदिवासी भागातल्या एखाद्या तालुका रुग्णालयात एखादा तज्ज्ञ डॉक्टर मिळवणं ही केवढी मोठी समस्या आहे, त्यासाठी लोकांना- कार्यकर्त्यांना झटावं लागतं. तिथल्या गरोदर महिलांना ‘माता आरोग्य’ सेवा आणि योजनेच्या मूलभूत सोयीसाठी वणवण करावी लागते हे यावरून स्पष्टच आहे.
साधारणपणे पहिल्या तीन ते सहा महिन्यांत सोनोग्राफी करून बाळाची वाढ, वजन, हृदयाचे ठोके असं सगळं माहीत करून घेतलं जातं. बाळ निरोगी आहे ना त्याला कुठला व्यंग नाही ना याची चाचपणी केली जाते. बाळाच्या मेंदूचा विकास योग्यरितीने होत आहे ना हेही पाहिलं जातं. साधारण आठव्या महिन्यात बाळाची गर्भातली पोजिशन पाहिली जाते म्हणजे बाळ पायाळू आहे का, बाळंतपणात काही अडचणी आहेत का, गुंतागुंत आहे का, बाळंतपण नॉर्मल होईल की सिझेरियन करावं लागेल असा अंदाज या सोनोग्राफितून घेतला जातो.
गर्भावस्थेत सोनोग्राफीचे हे महत्त्व असले तरी दुर्गम/आदिवासी भागातल्या पाड्यावर/वस्तीवर राहणाऱ्या कुटुंबासाठी हा महागडा उपद्व्याप असतो. एक तर प्रवासखर्च करायचा दुसरं तिच्या अन सोबतच्या व्यक्तीचा दिवसाचा खाडा होणार तर या दोन्ही गोष्टी त्यांच्यासाठी परवडण्याजोग्या नसतात. शिवाय सोनोग्राफी होईलच याचीही खात्री नाही. तिथं मुक्काम करण्याची वेळ आल्यास आणखी एक दिवस मोडणार, रोजंदारी बुडणार वर खर्च आणि प्रवासाची दगदग. या सगळ्याला फाटा देणं त्यांच्यासाठी जास्त सोपं ठरतं.
धारणी या तालुक्याच्या ठिकाणी ही तीच स्थिती होती. रुग्णालयात सोनोग्राफी मशीन आहे मात्र सोनोलॉजिस्ट डॉक्टर नव्हता आणि परिणाम मात्र गावातल्या गरोदर महिलांना भोगावे लागत होते. ही बाब आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या साथी या संस्थेच्या लक्षात आली.
कोरोनानंतरच्या काळात अमरावती जिह्यातील धारणी या आदिवासी भागात ‘माता आरोग्य’ची स्थिती काय आहे, त्यांना मिळणाऱ्या योजना आणि सेवांची स्थिती काय आहे याचा एक अभ्यास साथीने आणि अपेक्षा होमिओ सोसायटी संस्था व कार्यकर्त्यांच्या मदतीने केला. जून ते ऑगस्ट २०२२ या काळात त्यांनी या तालुक्यातल्या १५ गावांत सर्वेक्षण केले. सोनोग्राफीचा मुद्दा माता आरोग्य सेवांची माहिती गोळा करत असताना गावातील मिटींगांतून पुढे आला. गावातील महिलांनी हा मुद्दा प्रकर्षाने मांडला.
१५ गावातील माहिती गोळा झाल्यानंतर तालुका पातळीवर आरोग्य संवाद मेळावा घेण्यात आला. त्यात तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय धारणीचे वैद्यकीय अधिक्षक, स्थानिक पत्रकार उपस्थित होते. गरोदर महिला सोनोग्राफी करत नाहीत हा मुद्दा उपस्थित महिलांनी सर्वांसमोर मांडला. त्याच्या कारणांमध्ये मुख्यत्वेकरून सोनोग्राफी सेंटर नाही, काही ठिकाणी मशीन आहे डॉक्टर नाही असे मुद्दे समोर आले. सोनोग्राफी करायची असेल तर धारणीपासून ८० कीमीचा प्रवास करून मध्यप्रदेशात खंडव्याला जावं लागायचं त्यामुळं सोनोग्राफीच टाळली जायची.
यातून गरोदर महिलांची सोनोग्राफी होत नसल्याची बाब समोर आली.
ही माहिती समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेतली. त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. वारंवारच्या चर्चा आणि पाठपुराव्यानंतर तूर्त स्वरुपात काय करता येईल याचा विचार झाला आणि जिथं मशीन आहे, तिथं डॉक्टर देऊ अशी भूमिका जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांनी घेतली. त्यातूनच धारणी तालुक्यात रेडिओलॉजिस्ट डॉक्टरची नेमणूक झाली. आता दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी डॉक्टर तालुका केंद्रावर येतात आणि गरोदर महिलांची तपासणी करतात.
‘’सोनोग्राफीचा मुद्दा कीरकोळ वाटत असला तरी मुळातच गरोदरपणातील काळजी आणि पोषण याबाबत इथं फारसं कुणी गंभीर नसतं. या भागात कुपोषणासारखे गंभीर मुद्दे आहेत. वेळच्या वेळी सोनोग्राफी झाली नाही तर त्यातली गुंतागुंत लक्षात येत नाही. योग्यवेळी बाळाची वाढ आधीच लक्षात आल्यास गरोदर महिलेच्या आहारावर अधिक लक्ष देता येते. वरवर पाहता जरी एकाच तालुक्यात तज्ज्ञ डॉक्टरची नेमणूक दिसत असली तरी त्याचा फायदा नजीकच्या गावातल्या सर्वच महिलांना होत आहे. माता आरोग्याचे काम १५ गावांत सुरु असले तरी तालुक्यातील बरीचशी गावं ही त्याचा लाभ घेताहेत ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे’’, अशी माहिती अपेक्षा होमियो सोसायटीचे सोमेश्वर चांदेकर यांनी दिली.
जो पर्यंत असं काम गाव पातळीवर होत नाही तोपर्यंत यंत्रणा हालत नाही. आरोग्य अधिकारी- कर्मचारी- स्थानिक संस्था आणि गावातील लोक एकत्र मिळून अशा पद्धतीनं एकमेकांना प्रतिसाद देत अनेक प्रश्न मार्गी लावता येतात. एकमेकांना प्रतिसाद देण्याची प्रक्रिया जितकी वाढत जाईल तितकं लोक आणि सरकारी यंत्रणा यांच्यात विश्वासाचं नातं निर्माण होईल.
COMMENTS