बनावट चकमकीचे बनावट समर्थन

बनावट चकमकीचे बनावट समर्थन

“तुमच्या मुलीवर , बहिणीवर , बायकोवर असा अत्याचार झाला असता तर तुम्हाला कळल्या असत्या आमच्या भावना. तेंव्हा तुम्ही बोलला असता का कायद्याचे राज्य वगैरे ही भाषा ?”. हा प्रश्न भेदक आहे. हा प्रश्न जर डॉ. प्रियांका रेड्डींच्या जवळच्या लोकांनी विचारला असता तर तो अत्यंत प्रामाणिक वाटला असता. पण हा प्रश्न विचारणारा प्रत्येक माणूस प्रियांका रेड्डींच्या नातेवाईकाईतका प्रमाणिक आहे का ? आणि त्यातील अनेकजण ईतरांना नाही तरी स्वतःला तरी फसवत नाहीयेत ना?

हैदराबादेत महिला डॉक्टरवर बलात्कार करून जिवंत जाळले
निवडणूक पालिकेची, प्रचारात राष्ट्रीय नेते!
हवामान बदलाने शहरे बुडण्याची भीती
कायद्याचे राज्य या अवस्थेपर्यंत येण्यासाठी माणसाने अनेक शतके घेतली. कोणत्याही परिस्थितीत निष्पाप माणसाला गुन्हेगार ठरवले जावू नये, त्याचा बळी जावू नये हे तत्व मान्य व्हायलादेखील अनेक शतके लागली. आणि हे तत्व मान्य झाल्यामुळेच सुसंस्कृत समाज बनण्याकडे पाउल टाकणे शक्य झाले. पण आजदेखील अगदी अमेरीकेसारख्या प्रगत देशात अशी प्रकरणे बाहेर येतात जिथे कळते की फाशी दिला गेलेला माणूस प्रत्यक्षात निर्दोष होता. सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यावर जर हे घडू शकते तर पोलिसांच्या हातातच कायदा दिला तर काय घडेल याचा विचार करणे आवश्यक आहे. पण अनेकांना हे लक्षात येत नाही. हैदराबादमध्ये जे घडले ते योग्यच आहे अशी या लोकांची पप्रमाणिक भूमिका असते. पण अशी भूमिका असणारे सर्वच जण प्रामाणिक असतात असे मानायचे कारण नाही. आणि अश्या लोकांचा अप्रामाणीकपणा उघड करणे हे महत्वाचे आहे.
रोजच्या अत्यंत खडतर परिस्थितीशी झुंजणारा जो एक अफाट जनसमूह आपल्या देशात आहे त्याला कदाचित विचार करून भूमिका घेणे अवघड होत असेल तर ते समजण्यासारखे आहे. पण या एन्कौउंटरचे समर्थक या गरीब वर्गातील नाहीयेत. बहुतेक सर्व लोक बऱ्यापैकी सोशल मिडीयावर सक्रीय असणारे आहेत . काही तर अत्यंत श्रीमंत वर्गातील आहेत. सिनेमाच्या ग्ल्यामरस क्षेत्राशी संबंधीत आहेत. तेंव्हा त्यंना अजिबात विचार करता येत नाही असे मानणे अवघड आहे. त्यांना हे माहित नाही असे मानायचे  का पोलिसांच्या हातातील अनिर्बंद्ध सत्ता अनेक निष्पाप लोकांचा बळी घेवू शकते ?  पोलिसांकडून झालेले महिलांवरील अत्याचार त्यांना माहित नाहीत असे म्हणायचे का ? पोलीस आणि राजकारणी यांच्यातील अनेकदा समोर येणारी अभद्र युती त्यांना माहित  नाही असे म्हणायचे का ? एन्कौउंटरसाठी प्रसिद्ध असलेल्या पोलिसांनी जमवलेली प्रचड माया त्यांना दिसली नाही असे म्हणायचे का ? असे अश्यक्य आहे.
आपल्याला असाच निष्कर्ष काढणे भाग आहे की या सर्व लोकांमधील एक मोठा जनसमूह हा अत्यंत अप्रमाणिक आहे. ते आपल्यासमोर असलेले सूर्यप्रकाशासारखे असलेले सत्य हे जाणून बुजून नजरेआड करत आहेत.  कारण त अप्रमाणिकपणाचे  त्यांना हवे आहेत. या निमित्ताने आपण किती संवेदनशील आहोत याचा टेंभा मिरवता येतो. या देशात अश्या असे अनेक लोक आहेत, अश्या अनेक संस्था आहेत ज्यांनी न्यायदानाची प्रक्रिया लवकर व्हावी यासाठी सुधारणा व्हाव्यात म्हणून आपले आयुष्य खर्ची घातलेले असते. आपण तर असे काही केलेले नाही. तसे करणे फार अवघड असते. त्याऐवजी सवंग भूमिका घेवून आपले सामाजिक उत्तरदायित्व सिद्ध करणे हे सोपे असते. याच्यात आणखी एक लबाडी असते. अनिर्बंद्ध अधिकार दिलेल्या पोलिसांकडून आपणदेखील भरडले जावू शकतो असे त्यांना वाटत नसते. काहे झाले तर आपण बऱ्या आर्थिक परिस्थितील असतो. आपल्याकडे पैशाची ताकद असते. गरज भासली तर उच्चपदस्थ लोकांशी संबंध साधता येतात. कायदा हातात घेणाऱ्या सरकारी यंत्रणेकडून बळी जाणारे , अत्याचार सहन करणारे लोक आपल्या वर्गातील थोडेच असतात ? ते गरीब वर्गातील असतात. त्यांच्याशी आपले काय नाते ? त्यांचा विचार आपण करायचे कारण नाही. आता आपल्याला आपली संवेदनशीलता दाखवण्याचे संधी मिळतेय ना, मग करा या हत्यांचे समर्थन.
एन्कौन्टरचे समर्थन करणारा प्रतिसाद आणखी गुंतागुंतीच्या मानसिकतेतून येवू शकतो. आपला समाज हा सामजिक आणि आर्थिकदृष्ट्या कमालीचा विषम आहे. तो कमालीचा सरंजामी मानसिकतेत अडकलेला आहे. अश्या समजात पदाच्या किंवा पैश्याच्या स्वरूपात मिळालेले यश हे अनेकता कर्तुत्वापेक्षा ईतर गोष्टींमुळेच मिळालेले असते. आणि आपल्याला त्याची जाणीव आणि थोडा न्यूनगंडदेखील असतो. अश्या घटना आपल्याला हा न्यूनगंड झाकण्याची संधी देतात. रुढार्थाने यश तर मिळाले आहे पण  विचार करण्याची , विश्लेषण करण्याची क्षमता मात्र नाही याची खंत ओलांडण्याची संधी अश्या घटना देतात. आपण सवंग भूमिका घ्यायची आणि जे विश्लेषण , विचार करून भूमिका घेतात त्यांना ‘कोरडे बुद्धीजीवी ‘ वगैरे म्हणून हिणवण्याची संधीदेखील अश्या लोकांना मिळते.
पण सर्वच जण असे दांभिक नसतात. ही विषम समाजरचना अनेकांना पार पिचवून टाकते. सरंजामी व्यवस्थेमुळे कामाच्या ठिकाणी बॉसपुढे हुजरेगिरी करावी लागते. पटत नसलेल्या गोष्टी स्वीकाराव्या लागतात. अन्याय सहन करावा लागतो. अश्या वेळेस पोलिसांनी कायदा मोडून दाखवलेले हे शौर्य(?) आपल्याला आकर्षक वाटू शकते. “ बरे झाले , सा…ना अशीच अद्दल घडायला हवी होती . “ असे म्हणण्यात जणू काही आपणच ते शोर्य दाखवले आहे याचे खोटे समाधान मिळते. सबंध समाजव्यवस्थेवरील आपला राग काढण्याची संधी मिळते. अश्या लोकांना दांभिक नाही म्हणता येणार.
एन्कौन्टरचे समर्थन करणाऱ्या लोकांच्या मानसिकतेतील अनेक विसंगती सुदैवाने समाजमाध्यमाद्वारे आपल्या समोर आल्या आहेत. या लोकांनी आसराम्म बापू , नित्यानंद किंवा ईतर तथाकथित साधू संतांच्या अत्याचाराब्द्दल कधीही , अपवादाने सुद्धा या लोकांनी  अशी टोकाची भूमिका घेतल्याचे आपल्यासमोर आलेले नाही. कारण  याच  लोकांपुढे हे लोक  झुकलेले असतात . आपण नाही तर आपल्या वर्गातील, जातीतील लोक त्यांचे शिष्य असतात. मग त्यांच्याब्द्दल अशी भूमिका कशी घ्यायची. हैदराबादमधील त्या चार पोरांबद्दल अशी भूमिका घेणे सोपे असते.    या देशात खेड्यापाड्यात दलितांनी किती भयानक अत्याचार सहन केलेत . तिथेही अश्या प्रतिक्रिया या लोकांनी दिल्या नाहीत.  या विसंगती मोठ्या आहेत. वर्ग , वर्ण , ग्रामीण शहरी अश्या भेदांच्या चीरफाळ्या उडालेल्या आपल्या समजात आपले भावनिक प्रतिसाददेखील दुर्दैवाने शुद्ध  रहात नाहीत . पण या सर्वापलीकडे जाणारी एक भयानक विसंगती आपल्या प्रतिसादामध्ये असते . त्याची चर्चा होणे आवश्यक आहे.
अशी कल्पना करा की हैद्राबादमधील घटनेत बलात्कार नसता . फक्त हत्या असती तर आपल्या प्रतिक्रिया ईतक्या तीव्र असत्या का ? याचे उत्तर नाही असे आहे.  नगर मध्ये काही वर्षापूर्वी चार लहान वयाच्या मुलांची हत्या झाली होतीच की ? तेंव्हा कुठे एव्हढा जनक्षोभ उसळला? सत्य असे आहे की आपण बलात्काराला खुनापेक्षा जास्त गंभीर मानतो. म्हणजे स्त्रियांच्या जगण्याच्या हक्कापेक्षाही त्यांचे हे तथाकथित  ‘शुद्ध’ असणे हे आपण जास्त महत्वाचे मानतो. युद्धात शत्रुदेशातील स्त्रियांवर  बलात्कार होतात ते त्यामध्ये  त्या स्त्रियांची  आणि पर्यायाने त्या शत्रुदेशाचा अवमान , विटंबना करणे हाच उद्देश असतो.   मध्ययुगीन काळात राजस्तानी  स्त्रिया त्यांची ‘अब्रू’ किंवा ‘शील’ वाचवण्यासाठी जोहार करत याचे आपल्यालातील अनेकांना अजूनही कौतुक असते. शील , अब्रू या शब्दामध्ये होणारे विचार हेच मुळात स्त्रियाचे व्यक्ती म्हणून असलेले त्यांचे स्वातंत्र्य नाकारणारे आणि त्यांना बंधनात टाकणारे असते. म्हणजे एन्कौन्टरचे समर्थन करणाऱ्या मानसिकतेत वर वर पहाता स्त्रीअत्याचाराविरुद्ध घेतलेली भूमिका दिसत असली तरी थोडे खरवडल्यावर आपल्याला स्त्रियांना दुय्यम लेखणारी विचारसरणीचा प्रभावच आपल्याला दिसेल. स्त्रियांवर बलात्कार करणारी मानसिकता ही देखील अशीच ‘योनी शुचिता’ ‘शील’ , ‘अब्रू’ अश्या कल्पनांवर विश्व्वास ठेवणारी असते.
आता लेखाच्या सुरवातीला एन्कौन्टरला विरोध करणाऱ्या लोकांना जो प्रश्न विचारला जातो त्याचे उत्तर देवू. त्याचे उत्तर असे की “ होय आमच्या घरातील कोणा स्त्रीवर असा अत्याचार झाला तर दुखाने विमनस्क झालेल्या आमच्या मनात देखील आज प्रियांका रेड्डीच्या घरातील लोकांच्या मनात जी भावना एन्कौन्टरच्या समर्थनाची भावना असेल तशीच भावना कदाचित आमच्याही मनात येईल. पण त्यावेळेस समाजाने आमच्याशी सहानुभूती बाळगून आमच्या या भावनेचा मात्र विरोध करण्याचे धैर्य दाक्वले पाहिजे. ही सुसंक्सृत समजाने , कायद्याचे राज्य असावे असे मानणार्यांनी द्यायची किंमत आहे. नाही तर आपला असंस्कृत अरबस्तान होईल”. पण हे उत्तर देण्यापूर्वी असा प्रश्न विचारणार्यांची लबाडीदेखील आपण उघड केली पाहिजे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0