सगळेच ट्वीट करून एकमेकांना सूचकपणे उत्तर देत आहेत. शरद पवार यांनी अजित पवार यांना उत्तर दिले आहे.
उपमुख्यमंत्रीपद घेऊन शपथविधी झाल्यानंतर आज अजित पवार यांनी ट्वीट करून आपले म्हणने मांडायला सुरुवात केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि इतर अनेक भाजप नेत्यांनी अजित पवार यांचे अभिनंदन केले होते. त्याला अजित पवार यांनी उत्तर देऊन त्यांचे आभार मानले.
अजित पवार यांनी एकामागोमाग १६ ट्वीट केले आहेत. मोदींचे आभार मानणारे पहिले ट्वीट करून, महाराष्ट्रात जनतेच्या कल्याणासाठी स्थिर सरकार देऊ, असे अजित पवार यांनी म्हंटले.
‘मी राष्ट्रवादीतच असून आदरणीय शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी मिळवून जनतेच्या कल्याणासाठी पुढील पाच वर्ष स्थिर सरकार देऊ’, असे ट्वीट अजित पवार यांनी केले असून, त्यामुळे संभ्रम पसरला आहे.
“काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. सर्व काही ठीक आहे. फक्त थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. तुम्हा सर्वांच्या पाठिंब्यासाठी आभार”, असे त्यांनी पुढे म्हंटले आहे.
शरद पवार यांनी ट्वीट करून अजित पवार यांना उत्तर दिले आहे. पवार म्हणतात, “भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राष्ट्रवादीने शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासोबत हातमिळवणी करत महाराष्ट्र सरकार स्थापन करण्याचे एकमताने ठरविले आहे. अजित पवार यांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे आणि खोडसाळ असून समाजात चुकीचा समज पसरविणारे आहे.”
अजित पवार यांना राष्ट्रवादीने विधीमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून निवडले होते. त्याच अधिकारामध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचा पाठींबा असल्याचे पत्र राज्यपालांना दिले आणि त्यानंतर त्यांचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला होता.
यामुळे भाजप तांत्रिक मुद्दा पुढे करून राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचा पाठींबा आणि अजित पवार हेच गटनेते असल्याचा मुद्दा पुढे रेटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान सुप्रिया सुळे यांनी शिवसेना नेते संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याबरोबरचा स्वतःचा फोटो ट्वीट केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी परत राष्ट्रवादी पक्षामध्ये यावे यासाठी पवार कुटुंबीय आणि राष्ट्रावादेचे नेते अजूनही प्रयत्न करीत आहेत.
COMMENTS