मी आणि गांधीजी

मी आणि गांधीजी

गांधी समजून घेताना - महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांच्या जन्माला १५० वर्ष होत आहेत. काळाचा मोठा फरक असला तरी गांधीमुल्य कायम आहेत का? काळाच्या कसोटीवर गांधींचे विचार कसे उतरतात? एका तरुणाचा महात्मा गांधी यांच्याशी निरंतर संवाद सुरु आहे. खरेतर गांधींच्या बरोबर, हा संवाद कोणाचाही होऊ शकतो. 

कोविडमध्ये ३० हजार मुले अनाथ
कोरोनामुळे जगाचे ८,८०० अब्ज डॉलरचे नुकसान
जगदीश धनखड यांची देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवड

१.

मी : फार बोअर होतंय…

गांधीजी : फेसबुक आहे की. पुस्तकं आहेत. मोदी आहेत. राम रहीम आहे. डावी-उजवी वादावादी आहे. केवढं तरी आहे. काँग्रेससुद्धा आहे अजून.

मी : तरी आतून बोअर होतंय ना.

गांधीजी : बरं, मग चरखा चालवून बघ. निर्मितीचं समाधान मिळेल. किंवा त्या मोबाइलशी खेळत असतोस तो मोबाइल चालतो कसा याचा अभ्यास कर.

मी : समाधानाचं काय करायचं?

गांधीजी : म्हणजे रे?

मी : समाधानसुद्धा बोअर झालं तर?

गांधीजी : तुम्हाला समाधानसुद्धा बोअर होतं?

मी : होऊ शकतं. कालांतराने.

गांधीजी : ओके. म्हणजे खरं तर तुला बोअर होत नाहीये.

मी : म्हणजे?

गांधीजी : अरे, बोअर माणसाला बोअर कसं होईल? हे म्हणजे माशाने पोहावंसं वाटतंय म्हणण्यासारखं आहे.

२.

मी : काय हो? २०१९ सालची लोकसभा निवडणूक कोण जिंकेल असं वाटतं?

गांधीजी : माहीत नाही.

मी : असं कसं? अंदाजसुद्धा नाही?

गांधीजी : मी विश्लेषक नाही, त्यामुळे…

मी : कायतरीच. अहो प्रत्येक माणूस हा क्षणांचा लूझर आणि अनंतकाळचा अ‍ॅनॅलायझर असतो

गांधीजी : असेल असेल.

मी : तुम्हाला त्रास होत नाही आपण विश्लेषक नसल्याचा? आपल्याला मत नसल्याचा?

गांधीजी : नाही बुवा.

मी : कसं काय?

गांधीजी : कारण मी तुझ्यासारखा विश्लेषक नाही. बरं, दुधी भोपळ्याचा रस काढायचा आहे. इंटरेस्टिंग काम असतं. येतोस का?

मी : नको, तुम्हीच जा.

गांधीजी : ठीक आहे.

३.

मी : बेस्ट पाऊस पडतोय. रोमँटिकली कांदा-भजी खावीशी वाटतायत.

गांधीजी : खा की मग.

मी : करायचा कंटाळा आलाय.

गांधीजी : बरं, मग खाऊ नको.

मी : असं कसं लगेच टोकाला जाता हो तुम्ही?

गांधीजी : का? काय झालं?

मी : लगेच ‘खाऊ नको’ काय? ‘बाहेरून घेऊन ये’ म्हणायचं.

गांधीजी : ओके ओके. बरं बाहेरून घेऊन ये.

मी : पुन्हा टोकाला.

गांधीजी : अरे, तूच म्हणालास ना, म्हणून म्हटलं. बरं चल, मी करून देतो.

मी : नको. तुम्ही मिळमिळीत कराल.

गांधीजी : बरं. अरे, पण अशा प्रवृत्तीने तुला भजी कशी मिळणार?

मी : हं…भज्यांचं काय हो एवढं….तळणारं कुणी असेल तर भज्यांना अर्थ आहे…कुणी तळणारच नसेल तर कांदासुद्धा व्यर्थ आहे.

गांधीजी : काय होतंय?

मी : तुम्हाला नाही कळणार. हा माणूस आणि भज्यांमधला जुना संघर्ष आहे.

गांधीजी : असू दे, असू दे. मला वाटायचं की, संघर्ष सत्य आणि असत्यामध्ये असतो. बरं, प्रार्थनेची वेळ होईलच आता. येणार का?

मी : नको. प्रार्थना मला सूट होत नाही.

गांधीजी : बरं.

४.

मी : भक्त पेटलेत.

गांधीजी : कोण? काय झालेत?

मी : अहो भक्त…

गांधीजी : कुणाचे?

मी : अहो, असं काय करता…मोदींचे…

गांधीजी : अच्छा…नरेंद्र मोदींच्या समर्थकांना भक्त म्हणतात का?

मी : हो.

गांधीजी : अरे, पण कुणालाही असं हिणवायचं कशासाठी?

मी : कमाल करता…अहो हा सर्वमान्य शब्द आहे आज. आणि भक्त आहेतच ते. त्यांना तर्कबिर्क काही कळत नाही.

गांधीजी : अच्छा. आणि तुला तर्क कळतो. किंवा तू करतोस तो तर्क आहे असं तुझं म्हणणं आहे.

मी : अहो तसं नाही. पण काही गोष्टी सरळ सिम्पल असतात. त्या तरी कळायला हव्यात की नकोत?

गांधीजी : बरं. पण समजा त्यांना नाही कळत तर हिणवल्याने त्या कळतील का?

मी : नाही…

गांधीजी : मग?

मी : अहो, पण माझा वैताग बाहेर येतो ना…

गांधीजी : पण तू तर तार्किक आहेस ना? मग?

मी : अहो, पण मी माणूसही आहे. आणि माणूस वैतागतो.

गांधीजी : म्हणजे ‘माणूस’ जास्त आहे. ‘तार्किक माणूस’ त्यामानाने कमी आहे.

मी : असं म्हणता येऊ शकेल.

गांधीजी : मग नरेंद्र मोदींचे समर्थक कोण आहेत?

मी : तुमच्याशी बोलण्यात अर्थ नाही.

गांधीजी : बरं.

५.

गांधीजी : केवढा रे हा आवाज? काय चालू आहे?

मी : अहो, गणपती…

गांधीजी : गणेशोत्सवात हे असलं सगळं चालतं?

मी : हो. विसर्जन मिरवणूक बघा एकदा. म्हणजे तुम्हाला मोक्ष मिळेल.

गांधीजी : अरे, पण मग तुम्ही काही प्रबोधन करता की नाही?

मी : आम्ही निषेध वगैरे करतो. प्रबोधन करायला रस्त्यावर उतरावं लागतं आणि फेसबुकवर अजून ती सोय नाही.

गांधीजी : सगळ्याच सार्वजनिक उत्सवात हे चालतं?

मी : बहुतांश सर्वच.

गांधीजी : पण मग धार्मिक संघटना काय करतात?

मी : म्हणजे?

गांधीजी : अरे, हे धार्मिक उत्सव आहेत, मग धार्मिक संघटनांनी उत्सवांच्या बिघडत्या स्वरूपाबद्दल काही करायला नकॊ? त्यांच्या डोळ्यासमोर देवा-धर्माची विटंबना होतेय ते त्यांना कसं बघवतं?

मी : तुम्ही फारच ओल्ड फॅशन्ड आहात हो.

गांधीजी : का? काय झालं?

मी : धार्मिक संघटना अशा गोष्टीत फार लक्ष घालत नाहीत. कारण विटंबना कोण करतं हा कळीचा मुद्दा असतो. शिवाय त्यांना धर्मसुधारणेपेक्षा इतर महत्त्वाची कामं असतात.

गांधीजी : म्हणजे?

मी : निवडणूक वगैरे.

गांधीजी : मग कसं रे होणार?

मी : तुम्ही फार विचार करता हो. एवढा विचार करू नये. शिवाय अतिविचार तुम्हाला देशद्रोहाकडे नेऊ शकतो.

गांधीजी : हे काय आता?

मी : तुम्हाला नाही कळणार. सोडून द्या.

गांधीजी : बरं.

६.

मी : गेम ऑफ थ्रोन्स बघणार का?

गांधीजी : काय?

मी : गेम ऑफ थ्रोन्स…

गांधीजी : काय आहे ते?

मी : मालिका आहे एक. अमेरिकन टेलिव्हिजनवरची.

गांधीजी : काय संदेश दिलाय त्यात?

मी : संदेश? संदेशबिंदेश काही नाही हो. एक कल्पित आणि रंजक कथा आहे. सॉलिड थ्रिलिंग आहे… अगदी एंडलेस थ्रिल!

गांधीजी : मग नको.

मी : का?

गांधीजी : एंडलेस थ्रिलचं बिल फार जास्त असतं.

मी : म्हणजे?

गांधीजी : एकदा सायंप्रार्थनेला ये. मग सांगतो.

मी : नको बाबा. मी आपला गेम ऑफ थ्रोन्स बघतो.

गांधीजी : बरं.

७.

गांधीजी : हे शरद पोंक्षे कोण आहेत रे?

मी (भेदरून) : का? काय झालं?

गांधीजी : त्यांना मला भेटायचंय. त्यांचा निरोप आला होता.

मी : ते अभिनेते आहेत.

गांधीजी : अरे वा! कलाकार मनुष्याला भेटायला आवडेल मला. चार्ली चॅप्लिनना भेटलो होतो एकदा. फार मस्त माणूस रे…

मी : चार्ली चॅप्लिन? आणि शरद पोंक्षे? अहो, ही काय तुलना आहे का?

गांधीजी : तुलना वगैरे नाही रे. कलाकारवरून आठवलं.

मी : तुम्ही त्यांना भेटू नका.

गांधीजी : का?

मी : त्यांना तुमचे विचार मान्य नाहीत. कडवे विरोधक आहेत ते तुमचे.

गांधीजी : विरोधक असले म्हणून काय झालं? ते काय मला गोळी घालणारेत?

मी : अहो, तुम्हाला काय सांगायचं….आपल्याला ज्यांचे विचार पटत नाहीत त्यांना गोळी घालणे हाच सध्या चर्चेचा मार्ग आहे.

गांधीजी : हं… पण आपण शरद पोंक्षेंबद्दल बोलतोय…

मी : हो. ते गोळी नाही घालणार बहुधा, पण बोलूनच मरणाचं टॉर्चर करतील.

गांधीजी : अच्छा. पण विरोधक असून ते मला भेटायचं म्हणतात. मग मी का नको भेटू?

मी : तुमचं अवघड आहे.

गांधीजी : ‘पोंक्षेंचं अवघड आहे’ असं म्हणाला असतास तर माझा हुरूप वाढला असता.

 

उत्पल व. बा., हे लेखक आणि संपादक आहेत.

क्रमशः

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0