मी आणि गांधीजी – २

मी आणि गांधीजी – २

गांधी समजून घेताना - महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांच्या जन्माला १५० वर्ष होत आहेत. काळाचा मोठा फरक असला तरी गांधीमुल्य कायम आहेत का? काळाच्या कसोटीवर गांधींचे विचार कसे उतरतात? एका तरुणाचा महात्मा गांधी यांच्याशी निरंतर संवाद सुरु आहे. खरेतर गांधींच्या बरोबर, हा संवाद कोणाचाही होऊ शकतो.

विवेकी समाजासाठी सिटीझन सायंटिस्टची गरज
फॅसिझमचे रचनाशास्त्र
भटके विमुक्त आणि सीएए

मी : हां, झालं लिहून? आता ‘पोस्ट’वर क्लिक करा.

गांधीजी : अच्छा…अरे वा! म्हणजे आता लोक हे वाचणार का?

मी : हो. बघा, जमलं की नाही?

गांधीजी : जमलं बुवा. चांगलंय रे हे. अभिव्यक्ती आणि माहितीची देवाणघेवाण. तीही वेगाने.

मी : हो.

गांधीजी : अरे कुणीतरी कमेंट केली वाटतं.

मी : काय म्हणतोय?

गांधीजी : चिडलाय बहुतेक.

मी : बघू. अरे हा होय? वाटलंच मला. असाच आहे तो. ठोका त्याला.

गांधीजी : काय??

मी : आय मीन चांगलं खरमरीत उत्तर द्या.

गांधीजी : अरे कशाला?

मी : मग काय शांत बसणार?

गांधीजी : हो.

मी : का?

गांधीजी : कारण चर्चेचा नियम.

मी : कुठला नियम?

गांधीजी : एका वेळी एकानेच चिडायचं.

मी : रोहिंग्या मुस्लिमांच्या प्रश्नावर तुमचं काय मत आहे?

गांधीजी : मला तो विषय नीट माहीत नाही. मुळातून बघावं लागेल.

मी : काय???

गांधीजी : एवढं दचकायला काय झालं?

मी : अहो, काहीतरीच काय बोलता?

गांधीजी : कुठे काय बोललो?

मी : विषय माहीत नाही??

गांधीजी : हो.

मी : असं कसं होऊ शकतं?

गांधीजी : का नाही होऊ शकत?

मी : अहो, विषय माहीत नसणं आणि त्यावर प्रतिक्रिया न देता येणं हा गुन्हा आहे. एकवेळ विषय माहीत नसू दे, पण प्रतिक्रिया देता यायला हवी.

गांधीजी : म्हणजे? सगळ्या गोष्टींवर प्रतिक्रिया द्यायलाच पाहिजे का?

मी : नाहीतर आयुष्यात करण्यासारखं आहेच काय? प्रतिक्रिया देणं हा आजचा युगधर्म आहे. अहो, बोलायचं बेफाम. पोस्ट्स लिहायच्या. फेसबुक लाइव्ह करायचं. फक्त सेकंडरी रीसर्चच्या बळावर लोकांना मंत्रमुग्ध करायचं. अहो, काश्मीर प्रश्नावर आज चौथीतली मुलंसुद्धा बोलतात. आहात कुठे?

गांधीजी : मी? मी अजून ज्युनिअर केजीत आहे.

१०

मी : काय हो…

गांधीजी : बोला!

मी : ही आरएसएसची भानगड काय आहे नक्की?

गांधीजी : का? काय झालं?

मी : संघातले लोक संघाचं कौतुक करताना थकत नाहीत. संघ समजून घ्यायचा असेल तर शाखेवर या म्हणतात. आता संघ समजून घ्यायचा असेल तर शाखेवर जाण्यापेक्षा मोहन भागवतांच्या अंतर्गत बैठकांना गेलं पाहिजे हे इतरांना कळत नाही असं त्यांना वाटतं. पण ते एक सोडा. दुसरीकडे संघात नसलेले किंवा संघात लहानपणी असलेले आणि नंतर विचार करू लागल्यावर बाहेर पडलेले लोक संघावर टीका करताना थकत नाहीत. म्हटलं तर संघ स्वयंसेवी संस्था, म्हटलं तर सांस्कृतिक संघटना, म्हटलं तर राजकीय संघटना, पण एकूणात संघटना म्हणून आवाका मोठा…

गांधीजी : यात दोन गोष्टी आहेत.

मी : कोणत्या?

गांधीजी : शिस्तपालन आणि मूल्यमापन.

मी : म्हणजे?

गांधीजी : सांगतो. तू शिस्तपालन कधी करणार नाहीस.

मी : का? करू की.

गांधीजी : मग संघासारखी देशव्यापी संघटना का नाही उभी राहिली तुझी?

मी : तुम्हीच बोलायचं बाकी होतं…. यावर बरंच बोलू शकेन. पण जाऊ दे. तुम्ही बोला…

गांधीजी : तर तू शिस्तपालन करणार नाहीस आणि संघातला मनुष्य स्वतःचं किंवा संघाचं मूल्यमापन करणार नाही. थोडक्यात तू सारखे प्रश्न विचारणार आणि ते सारखे शिस्त पाळणार. तुला बुद्धीविकास हवा, त्यांना कार्यविकास हवा.

मी : हं..

गांधीजी : म्हणून खरं तर दोघांनी एकत्र काम करायला पाहिजे.

मी : काय??

गांधीजी : झटका बसला ना?

मी : हो.

गांधीजी : बसणारच. कारण तू मूल्यमापनवाला आहेस.

११

मी : जरा बाजूला व्हाल का?

गांधीजी : का? अच्छा, टीव्ही अडतोय होय…

मी : हो

गांधीजी : जवळजवळ भांडतायत रे हे लोक

मी : त्याला चर्चा असं म्हणतात

गांधीजी : आणि यातून काय निष्पन्न होतं?

मी : जनमत तयार होतं अहो.

गांधीजी : म्हणजे टीव्हीजन इतर जनांचं मत तयार करतात

मी : हो

गांधीजी : आणि मग इतर जन काय करतात?

मी : जनमताचं रूपांतर निवडणुकीच्या मतात करतात.

गांधीजी : हं…आणि मग जे सरकार येईल त्याची प्रशंसा किंवा त्याच्यावर टीका करतात

मी : बरोबर.

गांधीजी : पण जनांनी स्वतः काहीतरी करायला हवं ना?

मी : मत देतातच की!

गांधीजी : पण ते पुरेसं होत नाहीये ना?

मी : पुरेसं कधीच काही होणार नाही.

गांधीजी : असं कसं? सत्तेचं विकेंद्रीकरण, स्वशासन, जमिनीची सामायिक मालकी अशा गोष्टींवर काम केलं पाहिजे. माणसाच्या वृत्तीवर काम केलं पाहिजे.

मी : ते बोअरिंग आहे हो.

गांधीजी : मग एक्सायटिंग काय आहे?

मी : तुम्ही पुन्हा ज्याच्या मधे येताय ते.

१२

मी : वाढदिवस आला तुमचा. उद्या पार्टी करू. काय?

गांधीजी : पार्टी कधी केली नाही रे मी.

मी : अहो मग यावर्षी करा.

गांधीजी : बरं. काय करायचं?

मी : तुम्हाला खायला काय आवडतं?

गांधीजी : खाण्यात आवड-निवड असते?

मी : असते, असते!

गांधीजी : अरे, पण आपण खातो ते शरीराला इंधन म्हणून. आणि म्हणून ते सकस असलं पाहिजे. इतकं पुरेसं आहे.

मी : चवीकरतासुद्धा खातोच की.

गांधीजी : हं. पण मी इंधनवाला आहे. तुझ्या भाषेत बोअरिंग आहे मी.

मी : अहो, चवीने खावं. त्यात काही वाईट नाही. रसिक असावं माणसाने. एकदा जरा पावभाजी वगैरे खाऊन बघाच तुम्ही. वाटल्यास इंधन म्हणून खा.

गांधीजी : चालेल. पण नंतर माझ्याबरोबर बकरीचं दूध घेणार का थोडं?

मी : मी?

गांधीजी : हो. का?

मी : बरं.

गांधीजी : निरुत्साहीच झालास की एकदम. अरे, तुला कुणी काळ्या पाण्यावर नाही पाठवत. बकरीचं दूध प्यावं. त्यात काही वाईट नाही. रसिक असावं माणसाने. एकदा जरा पिऊन बघच. वाटल्यास चव म्हणून पी.

मी : कळलं. पितो.

१३

मी : काय, दौरा कुठे?
गांधीजी : फोनला स्क्रीन गार्ड बसवून घ्यावं म्हणतो.
मी : बरं. फेसबुक चेक केलं का?
गांधीजी : नाही. कधी?
मी : तुमचा वाढदिवस झाला त्या दिवशी..
गांधीजी : नाही.
मी : नंतर?
गांधीजी : नाही पाहिलं अजून. का?
मी : लोक तुम्हाला वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा सोडत नाहीत.
गांधीजी : का? काय झालं?
मी : तेच नेहमीचं.
गांधीजी : म्हणजे?
मी : तुम्ही कसे व्हिलन आहात हे ओरडून सांगायचा दिवस म्हणजे तुमचा वाढदिवस. कुणीही काहीही बोलतं. तुमच्याबद्दल खोटंनाटं पसरवलं जातं.
गांधीजी : हं. पण ज्यांना मी व्हिलन वाटतो त्यांना तसं म्हणू दे की. शिवाय माझ्याबद्दल कुणीही काहीही बोलू शकतो, वाढदिवसाचं औचित्य पाळावं लागत नाही हे चांगलंच नाही का? सगळ्यांचं असं भाग्य नसतं.
मी : तुम्ही ना कमाल करता कधीकधी. अहो तुमचं मूल्यमापन व्हावंच. पण म्हणून काहीही खोटंनाटं चालवून घ्यायचं? वर यांचे नेते मात्र तुमच्यासमोर डोकं टेकवणार.
गांधीजी : नेत्यांवरून आठवलं. मजबूरी का नाम महात्मा गांधी म्हणतात ते तिथे लागू होईल का रे?
मी : होईल, होईल.
गांधीजी : जमायला लागलं मला… हां, तू बोल.
मी : तर तुम्ही या लोकांची कड घेता?
गांधीजी : बरं नाही घेत कड. पण तू कडकड करू नकोस…वा! आय अ‍ॅम ऑन फायर टुडे.
मी : तुम्ही गंभीर होणार आहात की नाही? आणि कसले दयनीय विनोद करताय..
गांधीजी : यावरही सुचलंय एक, पण बोलत नाही.
मी : गौतम गंभीर, विनोद कांबळी वगैरे काहीतरी असेल…
गांधीजी : बरोबर ओळखलंस की!
मी : मुद्दा बाजूला राहतोय.
गांधीजी : अरे असं बघ की नेते डोकं टेकवायला मजबूर आहेत. समर्थक खोटंनाटं पसरवायला मजबूर आहेत. तू अस्वस्थ व्हायला मजबूर आहेस. लोक स्थितिशीलता न सोडायला आणि इतिहासातून बाहेर न यायला मजबूर आहेत. त्यामुळे देशाचं वर्तमान मजबूर आहे.
मी : मग?
गांधीजी : मग अशा परिस्थितीत मी विनोद करायला मजबूर आहे.

उत्पल व. बा., हे लेखक आणि संपादक आहेत.

क्रमशः

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: