ग्रेटा थनबर्गच्या टुलकिटवर गुन्हा

ग्रेटा थनबर्गच्या टुलकिटवर गुन्हा

नवी दिल्लीः शहराच्या सीमांवर गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन करणारे ट्विट केल्यानंतर गुरुवारी दिल्ली पोलिसांनी पर्यावरण

‘बहुसंख्य शेतकरी संघटना शेती कायद्याच्या बाजूच्या’
शेतकरी आंदोलन संपण्याची शक्यता
शेतकऱ्यांना चिरडून टाकणारा व्हीडिओ व्हायरल

नवी दिल्लीः शहराच्या सीमांवर गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन करणारे ट्विट केल्यानंतर गुरुवारी दिल्ली पोलिसांनी पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांच्या टुलकिटवर सायबर गुन्हा दाखल केला आहे. धर्म व जातीच्या आधारांवर दोन समाजांमध्ये मत्सर पसरवणे व गुन्हेगारी स्वरुपाचे षडयंत्र रचणे असे आयपीसी १५३ अ व १२० ब अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दिल्ली पोलिसांनी फिर्यादीत मात्र ग्रेटा थनबर्ग यांचा उल्लेख केलेला नाही, असे स्पष्ट केले. दिल्ली आंदोलनावर मत व्यक्त करणार्या सोशल मीडियावरच्या सुमारे ३०० हून अधिक अकाउंटवर आमचे लक्ष असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

ग्रेटा थनबर्गने ३ फेब्रुवारीला मी शेतकर्यांच्या सोबत आहे, त्यांना शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार असून त्यांना माझे समर्थन आहे. घृणा, धमकी किंवा मानवाधिकाराचे उल्लंघन याने त्यात बदल होणार नाही, असे ट्विट केले होते. त्यानंतर देशभर गदारोळ उडाला होता.

४ फेब्रुवारीला ग्रेटाने तिच्या टुलकिटवर फिर्याद नोंदवल्यानंतरही आपला शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा कायम असल्याचे पुन्हा ट्विट केले.

द हिंदूच्या वृत्तात दिल्ली पोलिसांनी आपल्या फिर्यादीत थनबर्गवर आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा एक भाग असल्याचा आरोप करत देशाला बदनाम करण्याचे त्यांचे प्रयत्न असल्याचा ठपका ठेवल्याचे म्हटले आहे.

ग्रेटाने ट्विटरवर एक टूलकिट शेअर केले होते, त्याचीही फिर्यादीत नोंद आहे. या टूलकिटमध्ये शेतकर्यांच्या आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळावा व भारतीय दुतावासांपुढे निदर्शने केली जावीत, यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत, याची माहिती आहे.

बुधवारी दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध गायिका व सेलेब्रिटी रिहाना, ग्रेटा थनबर्गने ट्विट केल्याने मोदी सरकार हादरले होते.

बुधवारी रात्री उशीरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोणताही दुष्प्रचार भारताच्या एकतेला संपवू शकत नाही. कोणताही दुष्प्रचार भारताची प्रगती रोखू शकत नाही. भारत विकासाच्या दिशेने एकजूट असल्याचे ट्विट करावे लागले होते.

या दोन व्यक्तींव्यतिरिक्त अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस, यूट्यूबर लिलि सिंह आदींनी शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दिला होता.

त्या अगोदर दुपारी बुधवारी भारतीय परराष्ट्र खात्याने तातडीने एक ट्विट करून भारतातील शेतकरी देशाचा एक अविभाज्य भाग असून त्यांच्या समस्येवर तोडगा काढण्याचे हरप्रकारे प्रयत्न सरकारकडून केले जात आहे व त्यावर उत्तरही मिळत आहे. अशावेळी फूट पाडणार्या वक्तव्यांकडे लक्ष न देता सौहार्दपूर्ण वातावरण राहावे व त्याचे समर्थन करावे, अशी विनंती केली होती. यासाठी परराष्ट्र खात्याने #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda…” असा हॅशटॅगही लावला होता.

या घटनेनंतर तासाभरात बॉलीवूडमधील काही सरकार समर्थक सेलेब्रिटींनी सरकारच्या बाजूने #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda…” हा हॅशटॅग वापरत ट्विट करण्यास सुरूवात केली. या सेलेब्रिटींमध्ये अक्षय कुमार, करण जोहर, अजय देवगण, एकता कपूर, सुनील शेट्टी आदींचा समावेश आहे. तसेच बहुसंख्य मंत्र्यांनीही हे ट्विट रि-ट्विट केले. नंतर भारतरत्न व जगप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनीही सरकारच्या समर्थनार्थ ट्विट केले.

भारताच्या सार्वभौमत्वशी कधीच तडजोड केली जाणार नाही. भारताला भारतीय लोकच ओळखतात आणि भारताबाबतचे निर्णय भारतीयांनीच घेतले पाहिजेत. एक देश म्हणून आपण एकत्र राहूयात, असे सचिन तेंडुलकर यांनी सोशल मीडियावर म्हटले होते.

अक्षय कुमारने आपल्या ट्विटमध्ये म्हटले कीः शेतकरी भारताचा अत्यंत महत्त्वाचा व अविभाज्य भाग आहे. त्यांच्या प्रश्नाचा तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशावेळी सरकारच्या प्रयत्नांना साथ देणे महत्त्वाचे असून मतभेद निर्माण करणार्यांकडे दुर्लक्ष करणे या घडीला महत्त्वाचे आहे.

करण जोहरने आपल्या ट्विटमध्ये आपण सर्वांनी समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रत्येकाचे त्यातून हित साधले जावे, कुणीही त्यापासून वंचित राहू नये, असे म्हटले होते.

एकता कपूर यांनी आपल्या ट्विटद्वारे, अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रचाराविरोधात एकत्र उभे राहूया असे आवाहन केले होते.

अजय देवगण यांनी जनतेने अशा प्रचाराला बळी पडू नये असे आवाहन केले होते.

सुनील शेट्टी यांनी असा प्रचार अर्ध सत्याहून अधिक भयंकर असल्याचे मत व्यक्त करत परराष्ट्र खात्याचे ट्विट शेअर केले होते.

संगीतकार कैलाश खेर यांनी भारत असा प्रचार सहन करणार नाही, असे ट्विट होते.

मूळ बातमी  

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0