शास्त्रज्ञांचे आज मौन; उद्या विज्ञानाच्या बाजूने कोण बोलणार?

शास्त्रज्ञांचे आज मौन; उद्या विज्ञानाच्या बाजूने कोण बोलणार?

आयआयटी मुंबईमध्ये अलीकडेच झालेल्या पदवीदान समारंभात केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी अनेक भ्रामक वैज्ञानिक दावे केले. आयआयटीचे संचालक प्रा. सुभाष चौधरी यांच्या त्यावरील मौनाबाबत प्रश्न विचारणारे खुले पत्र.

माध्यान्ह भोजनासोबत नाश्त्याची सोय
हम घास है…
मुलीच्या शिक्षणाचे लॉकडाऊन होऊ नये म्हणून….

माननीय प्रोफेसर चौधरी :

आयआयटी मुंबईच्या अलीकडेच पार पडलेल्या पदवीदान समारंभात केल्या गेलेल्या लज्जास्पद दाव्यांबाबत आपण आणि आपली प्रतिष्ठित संस्था यांनी ज्या प्रकारे मौन बाळगले आहे ते पाहून आम्ही क्षुब्ध झालो आहोत. पुन्हा एकदा, शिक्षणामधले यश साजरे करण्यासाठीच्या या कार्यक्रमाचे, काल्पनिक भूतकाळाबद्दलचे भ्रामक दावे करणाऱ्यांनी अपहरण केले. मानवी संसाधन विकास मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांच्या भाषणातल्या दोन प्रमुख दाव्यांचे आम्ही विच्छेदन करू इच्छितो, कृपया आम्हाला परवानगी द्या.

त्यांनी घोषणा केली, “नासा म्हणते, बोली भाषा वापरणारे संगणक… केवळ संस्कृत भाषेमुळेच टिकून आहेत.” या अशा दाव्याचा आधार काय आहे? अवकाश संशोधन क्षेत्रातील या अग्रगण्य संस्थेने असे काही पत्रक प्रसारित केले आहे का? की खुद्द मंत्रीमहोदयांना व्यक्तिगतरित्या तसे पत्र पाठवले आहे? अर्थातच इतर सर्वांप्रमाणेच आपल्यालाही माहित आहे, की तसे काहीही नाही.

भारत म्हणजे मानवाला ज्ञात असलेल्या सर्व ज्ञानाचा स्रोत असे स्थापित करण्याच्या प्रयत्नात ते कोणत्याही थराला जाऊ शकतात हे सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी दाखवून दिले आहे. या वेळी, त्यांनी नासा एम्स रीसर्च सेंटर कॅलिफोर्निया येथे पूर्वी काम करत असलेले रिक ब्रिग्ज यांच्या १९८५ मधील एका प्रबंधाचा आधार घेतला आहे. या प्रबंधामध्ये लेखकाने नैसर्गिक भाषासुद्धा एक कृत्रिम भाषा – संगणकासाठीची भाषा – म्हणून कशी उपयुक्त असू शकते याची चर्चा केली आहे. मंत्रीमहोदय जे म्हणाले त्याच्याशी संबंधित कोणतेही विधान त्या प्रबंधामध्ये केलेले नाही.

२०१०मध्ये याच मूळ लेखाची मोडतोड करून रत्नेश द्विवेदी यांनी कोलोरॅडो इथल्या, ज्याला फार तर “इंटरनेट सोसायटी”म्हणता येईल अशा एका आऊटलेटकरिता या विषयावर काही ओळी लिहिल्या.मंत्रीमहोदयांनी आपल्या भाषणाकरिता बहुधा त्यातूनच प्रेरणा घेतली असावी. असाच दावा करणारे आणखीही अमूल्य ठेवे आपल्याला सहजपणे इंटरनेटवर सापडतात. एक आहे, sanskritdocuments.org, त्यावर ब्रिग्ज यांच्या प्रबंधात संस्कृतबद्दलचे प्रशंसोद्गारही घुसडून दिले आहेत. या मजकुरातील काही भाग द्विवेदींच्या मजकुराशी जुळतो, पण त्यावर लेखकाचे नाव किंवा प्रकाशनाची तारीख वगैरे काही नसल्याने कुणी कुणाची नक्कल केली ते आपले आपणच ठरवायचे.

जर कुणी “संस्कृत”, “नासा” असे शब्द वापरून गूगलवर शोध घेतला तर पहिल्या पानावर वर नमूद केलेल्या वेबसाईटसारख्याच इतर अनेक लिंक मिळतात. ते पाहिले तर एखाद्या सरळ मनाच्या व्यक्तीला आपल्या संस्थेच्या पोडियमवरून ज्या पद्धतीचे खोटेनाटे दावे केले गेले ते सर्व खरेच वाटतील. मात्र एक प्रतिष्ठित शास्त्रज्ञ म्हणून आपल्याकडून आमच्या वेगळ्या अपेक्षा आहेत. एका मूळ प्रबंधामध्ये मांडलेल्या कल्पना विरुद्ध मनमानी पद्धतीने लिहिलेला इंटरनेटवरचा दस्तावेज यातील फरकाबद्दल आपण स्पष्टपणे बोलले पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे.

मंत्रीमहोदयांच्या दुसऱ्या दाव्यानुसार, त्यांनी अणूंच्या आणि रेणूंच्या “शोधा”चे श्रेय वैद्यकशास्त्रातील एका प्राचीन अभ्यासकाला दिले. हा दावाही जितका निराधार तितकाच अजब आहे. अणू हे पदार्थाचे सर्वात लहान कण असतात आणि त्यांचे पुढे विभाजन करता येत नाही या संकल्पनेला अणूवाद म्हणतात. जरी प्राचीन भारतात, आणि प्राचीन ग्रीसमध्येही ही संकल्पना मांडणारे विचारवंत होते, तरीही त्यापैकी कुणीही अणूचा शोध लावला नव्हता. त्यांनी असा अंदाज बांधला होता की पदार्थाचे पुन्हा पुन्हा विभाजन करत राहिल्यास एक वेळ अशी येईल ज्याच्यापुढे आणखी विभाजन करणे अशक्य असेल. अशी संकल्पना मांडणे आणि अणूचा शोध लावणे ह्या दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत.

विविध देशांमध्ये काम करणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांनी पुढे अनेक शतकांनंतर अणूच्या अस्तित्वाचे पहिले पुरावे शोधले. वैज्ञानिक शोध कसे लावले जातात त्याची प्रक्रिया माहित नसलेल्या राजकारणी व्यक्तीला असे दावे करण्याबाबत एकवेळ माफ करता येईल, पण ज्यांना माहिती आहे अशांकडून या दाव्यांना काहीच आव्हान दिले न जाणे योग्य नव्हे, आणि यामध्ये आपल्यासारख्या शास्त्रज्ञांचाही समावेश होतो.

हो, अशा विधानांना प्रतिसाद देणे प्रतिक्रियात्मक वाटू शकते. परंतु अशा प्रसंगांच्या वेळी गप्प राहणारे अशा विचित्र दाव्यांचे सर्वात मोठे समर्थक सिद्ध होतात, कारण तसे करून ते त्यावर मान्यतेची मोहोर उठवतात. आणि मौन बाळगून दिलेल्या या मान्यतेची किंमत अनेकांना चुकवावी लागते. इथे आपल्याला दक्षिण अमेरिकेमध्ये एचआयव्ही/एड्सला नाकारण्याची जी चूक घडली त्याचे उदाहरण पाहता येईल. राजकारण्यांनी उचलून धरलेल्या या दाव्याबाबत शास्त्रज्ञ गप्प राहिले आणि त्याचा परिणाम काय झाला? ३००,००० टाळता येण्याजोगे मृत्यू आणि ३५,००० हून जास्त नवीन रुग्ण!

आजच्या आपल्या मौनाची भारताला काय किंमत चुकवावी लागेल?

आपण अशा काळात राहतोय, जेव्हा शास्त्रज्ञांनी केवळ अती महत्त्वाच्या नियतकालिकांमध्ये आपले प्रबंध प्रकाशित करत राहून भागणार नाही. विज्ञान, आणि वैज्ञानिक निर्वात पोकळीत राहत नाहीत हे आपण ओळखणे गरजेचे आहे. आणि असे करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लोकांशी आणि राज्यकर्त्यांशी बोलणे. आपण पुराव्यांच्या बाजूने बोलले पाहिजे. मत आणि तथ्य यांच्यातल्या सीमारेषा स्पष्ट केल्या पाहिजेत.

भ्रामक विज्ञानाची गोष्ट येते तेव्हा ‘निरुपद्रवी’ असे काही नसते. जर शास्त्रज्ञ आज बोलले नाहीत, तर उद्या विज्ञानाच्या बाजूने बोलायला शहाणे आवाजच शिल्लक राहणार नाहीत.

या लेखातील मजकूर विविध गटांमध्ये पत्र स्वरूपात फिरवला जात आहे. त्यावर सह्या करणाऱ्यांची नावे लवकरच येथे दिली जातील.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0