इंडिया आर्ट फेअरमध्ये इक्बालच्या ओळी आणि पोलिसांची कारवाई

इंडिया आर्ट फेअरमध्ये इक्बालच्या ओळी आणि पोलिसांची कारवाई

अनामिकाच्या तक्रारीवरून कारवाई करताना पोलिस महिलांविषयीच्या या कलाकृतींमागचा उद्देश तपासायला आले. उर्दू कवी इक्बाल यांच्या कवितेच्या दोन ओळींविषयी त्यांना आक्षेप होता.

ओखला येथील एनएसआयसी मैदानावरील इंडिया आर्ट फेअरमध्ये गार्गी चंडोला यांच्याबरोबर एका सामुदायिक म्यूरलचे संचालन करणारे यमन नवलखा म्हणतात, “ते खूपच अचानक घडलं. आम्हाला सुरुवातीला धक्का बसला.” दिल्ली पोलिसांकडे कुणीतरी या प्रदर्शनातील काही कलाकृती नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात असल्याचा दावा करणारी तक्रार केल्यामुळे या दोघांची प्रत्यक्ष सादरीकरणातून प्रदर्शित केली जाणारी कलाकृती बंद पाडण्यात आली.

ही कलाकृती “द वॉल”, इटालियन दूतावासाच्या सांस्कृतिक केंद्राच्या बूथचा भाग होती. मैना मुखर्जी या त्याच्या क्युरेटर होत्या.

“आम्ही सगळे एकत्र पेंटिंग करत होतो. आम्ही सगळीकडच्या लोकांना बोलावले होते, LBGTQIA+ समुदायातले लोकही होते. आम्हाला एकमेकांबरोबर असणं दाखवायचं होतं – एकत्र येऊन पेंटिंग करत असलेल्या विविध समुदायांमधल्या स्त्रिया. आम्हाला यामध्ये राजकीय असं काहीही भाष्य करायचं नव्हतं, तर सर्व ठिकाणच्या स्त्रियांच्या सामर्थ्याचा उत्सव करायचा होता. त्यामध्ये एक ओळ ‘विरोधामध्ये सौंदर्य असते’ अशी होती,” गार्गी चंडोला सांगतात. “ही कलाकृती कोणत्याही विशिष्ट आंदोलन किंवा समस्येबद्दलची नव्हती. ती भारतातील स्त्रियांबद्दलची होती.”

तक्रारीबाबत कारवाई करण्यासाठी पोलिस या फेअरमध्ये या कलाकृतीमागच्या हेतूची चौकशी करायला आले आणि त्यामध्ये वापरलेल्या उर्दूमधील दोन ओळींबाबत त्यांना आक्षेप होता:

या ओळी इक्बाल यांच्या एका गझलमधील आहेत. ‘सितारों से आगे जहाँ और भी है, अभी इश्क की इंतेहाँ और भी है’ (ताऱ्यांच्या पलिकडेही अनेक विश्वे आहेत, अजूनही अनेक प्रेमाच्या परीक्षा बाकी आहेत).

या ओळी काय सांगतात? त्या सांगतात, हे दिसतंय तेवढंच आभाळ नाही, तुला त्यापेक्षाही आणखी खूप वर जायचं आहे.

मुखर्जी यांच्या मते, “या कलाकृतीमध्ये काहीही चुकीचे आहे असे आम्हाला कधीही वाटले नाही. आम्ही पोलिसांना हे समजावून सांगितले आणि त्यांनी हा विषय बंद केला आणि ते गेले.”

“आम्ही साई मंदिरमधून एक मौली (हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमात वापरला जाणारा पवित्र धागा) आणि निझामुद्दिन दर्ग्यामधून एक धागा आणला. आम्ही ते दोन्ही एकत्र बांधले आणि एक गायक कविता म्हणत होता. मी हे धागे लोकांना वाटत होते, आणि त्यांना सहभागी होण्याची विनंती करत होते. लोक रडत होते, माझ्याही डोळ्यात अश्रू होते – खूप भावुक क्षण होता. त्या क्षणी सगळे लोक कलाकृतीशी एकरूप झाले होते आणि त्याच वेळी पोलिस आले, त्या भावुक क्षणी ते खूपच धक्कादायक होते,” चंडोला म्हणाल्या.

पोस्ट आर्ट प्रोजेक्टने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या घटनेचा निषेध करणारे आणि त्याबाबत प्रश्न विचारणारे निवेदन प्रसिद्ध केले आहे. चंडोला यांनी इंडिया आर्ट फेअरच्या संयोजकांबद्दलही या घटनेमध्ये त्यांना समर्थन न दिल्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे.

चंडोला आणि नवलखा यांनी असेही म्हटले आहे की, “आर्ट फेअर ही सुरक्षित जागा नाही”.

मुखर्जी म्हणाल्या, “सध्याचा काळ किती भयंकर आहे हेच यातून दिसून येत आहे. लोकांच्या डोक्यात काही साचेबद्ध कल्पना आहेत त्यामुळे त्यांनी ही कलाकृती समजूनही घेण्याचा प्रयत्न न करता त्याबद्दल गृहित धरलं. आम्हाला आमचे सादरीकरण एक तास आधी गुंडाळावे लागले हे चांगले झाले नाही. इटालियन दूतावास याबाबत एक निवेदन प्रसिद्ध करेल.”

द इंडिया आर्ट फेअरच्या संयोजकांनी एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यात त्यांनी म्हटले आहे की त्यांना इटालियन दूतावासाच्या सांस्कृतिक केंद्राच्या बूथद्वारे काय सादर केले जाणार आहे याची कल्पना नव्हती. ते पुढे म्हणतात, त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य पूर्णपणे मान्य असले तरीही पाहुण्यांची सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

“पोलिस आले तेव्हाच संचालकांना या उपक्रमाबद्दल समजले. त्यांच्याकडे तक्रार आल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. आम्ही आमच्या सर्व पाहुण्यांना सुरक्षित जागा देतो, मात्र इटालियन दूतावासाच्या सांस्कृतिक केंद्राच्या बूथच्या एका क्युरेटरमुळे पोलिस फेअरमध्ये आले,” असे संयोजकांचे म्हणणे आहे.

राम रेहमान नावाचे कलाकार म्हणाले, या घटनेमुळे त्यांना सुनिल गुप्ता यांच्या “सन सिटी अँड अदर स्टोरीज: पॅरिस-सॅन फ्रान्सिस्को-दिल्ली” या २०१२ मधल्या Alliance Francaise मधल्या सादरीकरणाची आठवण झाली. ते अश्लील असल्याच्या तक्रारीमुळे ते प्रदर्शन बंद करण्यात आले होते.

त्यांना वाटते दिल्लीमधल्या आगामी निवडणुकांमुळेही वातावरणातील तणाव वाढला आहे.

ते म्हणाले, “उपरोधाची गोष्ट अशी की याच जागी, GallerySke मध्ये एका भिंतीवर राज्यघटनेचा संदर्भ असलेल्या काही कलाकृती होत्या. त्याला सध्या चालू असलेल्या वादाचा संदर्भ होता, पण त्याबद्दल कोणीही तक्रार केली नाही. या कलाकृतीमध्ये मात्र केवळ मुस्लिम दिसणाऱ्या स्त्रिया पाहून कुणीतरी त्याचा चुकीचा अर्थ लावला. असहिष्णुतेचे प्रमाण अतिशय जास्त झाले आहे. मात्र पूर्वी भीती असायची, ती भीती जामियाच्या घटनेनंतर गेली आहे. आता लोक त्यांची मते मांडायला इच्छुक असतात.”

शैलजा त्रिपाठी, या स्वतंत्र पत्रकार आहेत.

COMMENTS