गुन्ह्यांत गुंतलेल्या अमेरिकेचं दर्शन-आयरिशमन

गुन्ह्यांत गुंतलेल्या अमेरिकेचं दर्शन-आयरिशमन

स्कॉर्सेसींच्या आयरिशमन या चित्रपटाला २०२०च्या ऑस्करची उत्तम चित्रपटासह एकूण १० नामांकनं मिळाली आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पहायला मिळतो.

‘शेतकऱ्यांवरचे अत्याचार थांबवा’
देशात ओबीसी ४४.४ टक्के
नागरिकत्वाचा मुद्दा पेटला, पुढे काय? – भाग २

खून मारामाऱ्या करणारा फ्रँक शीरन या चित्रपटाचा नायक आहे. शीरन आता शेवटले दिवस मोजतोय. मरणानंतर कुठल्या पेटीत आपल्याला घालावं, आपली कबर कशी असेल याची व्यवस्थाही त्यानं करून ठेवलीय. एक प्रीस्ट फ्रँकला भेटतो आणि केलेल्या गुन्ह्यांची कबूली दे असं ख्रिस्ती प्रथेनुसार सांगतो. हा गडी गुन्हा कबूल करायला तयार नाही. पत्रकार येतात आणि म्हणतात की आता शेवटले काही दिवसच उरलेत आता तरी तू गुन्हे कसकसे केलेस ते सांग. हा गडी जाम हलत नाही, काहीही सांगत नाही, आपण गुन्हे केलेत हे कबूल करत नाही.

एकीकडं पत्रकार, प्रीस्ट यांना हा माणूस दाद देत नाही तरी स्वगत केल्यागत आपल्या आयुष्याबद्दल बोलतो, सगळं सगळं सांगून टाकतो. चित्रपटाची सुरवातच त्या स्वगतानं होतं.

अमेरिकेतल्या गुन्हेगारी जगामधे घर रंगवणं असा एक वाक्प्रचार आहे. घर रंगवणं म्हणजे खून करणं. गोळी घातल्यावर माणसाच्या शरीरातून रक्ताची चिरकांडी उडते, भिंत  लाल होते. हेच घर रंगवणं. फ्रॅंक शीरन सुरवात करताना म्हणतो की मला एकानं विचारलं तू घर रंगवशील का. फ्रँक म्हणतो की सुरवातीला त्याला या वाक्रप्रचाराचा अर्थ समजला नाही पण नंतर ती घरं रंगवू लागला.

चार्ल्स ब्रँडच्या ” आय हर्ड यू पेंट हाऊसेस ” या पुस्तकावर चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे.

चित्रपट सुरु होतो आणि तिसऱ्या चौथ्या दृश्यातच एक पिस्तूल येतं, त्यातून गोळी सुटते, एक चेहरा दिसतो, भिंतीवर रक्ताची चिरकांडी दिसते.

फ्रँक दुसऱ्या महायुद्धात युरोपात होता. एकदा दोन जर्मन सैनिक शरण येतात. वरचा अधिकारी सांगतो की पटापट आटपा. म्हणजे त्याना युद्ध कैदी वगैरे करून ठेवू नका, संपवा. जर्मन सैनिक खड्डा खणून जमिनीवर येतात तेव्हां फ्रँक त्यांच्यावर बंदुक उगारतो. ते गयावया करू लागतात. फ्रँक त्याना गोळ्या घालतो, आपणच खणलेल्या खड्ड्यात दोघांची प्रेतं पडतात.

जिवाची भीक मागणाऱ्या माणसाला गोळ्या घालणं.कोणाही सैनिकाला आयुष्यभर भीक मागणारे डोळे दिसत रहातात. ती व त्या हिंस्र घटना सतत मनाच्या कोपऱ्यात ठेवून सैनिक जगत असतो. त्यातून निर्माण होणारा ताण सैनिकाचं व्यक्तिमत्वच बदलून टाकतो. युद्धावरून परतल्यावर अमेरिकेत सैनिकाना मानसिक उपचार देतात. पण तरी निर्माण झालेली विकृती कधीही नाहिशी होत नाही. ते  हिंसा करायला तयार असतात, कुठल्याही क्षणी. असे हज्जारो सैनिक अमेरिकन जीवनात वावरत असतात.अशांपैकीच एक म्हणजे फ्रँक.

युद्धावरून परतल्यावर फ्रँक ट्रक चालवतो, चार पैसे जास्त मिळवण्यासाठी आपल्या ट्रकमधलं मांस चोरून विकतो, नोकरी जाते. ट्रक ड्रायव्हर युनियनचा माणूस त्याला मदत करतो, मिंधं करतो आणि नोकरी देतो. नोकरी काय तर घर रंगवणं.

ट्रक युनियन हा एक धंदा असतो. जिमी हॉफ्फा हा माणूस नाना लफडी करून आणि गुन्हे करून युनियन वाढवतो, युनियनचं नेतृत्व आपल्याकडं टिकवतो.त्याचा आणि माफियाचा संबंध असतो. माफिया आणि अमेरिकन राजकीय पक्षाचा संबंध असतो. माफिया अमेरिकेचा प्रेसिडेंट निवडून देतात आणि प्रसंगी त्याचा खूनही करतात. सीआयए, अमेरिकन सरकार, क्यूबात घातपात करतात आणि त्यात युनियनवाले मदत करतात.

फ्रँकला मुलं असतात. फ्रँक स्वतःला कुटुंबवत्सल म्हणवतो. खून बीन करून घरी पैसे आणतो, त्या पैशावर मुलाना शिकवतो आणि मुलांनी सज्जन जीवन जगावं अशी अपेक्षा बाळगतो. फ्रँकचा गॉडफादर असतो एक रसेल नावाचा माफिया दादा. या दादानं आपलं जीवनच एक खून करून सुरु केलेलं असतं आणि आयुष्यभर हा   तुफ्फान खून गुन्हे करवून घेत असतो, समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरत असतो. अट्टल गुन्हेगार समाजात धर्मादाय कामं करतो, गरीबांना मदत करतो, धर्मादाय संस्थांना मदत करतो, हे सारं स्कॉर्सेसेनी त्यांच्या डिपार्टेड या सिनेमात दाखवलंय.

फ्रँकला चार मुली आहेत. पैकी पेगी सर्वात मोठी. ती छोटी असताना नाक्यावरचा दुकानदार तिच्याशी उद्धटपणे वागतो. फ्रँक दुकानात जाऊन त्या माणसाला मार मार मारतो, तुडवतो. पेगी भीतीथक्क होते. नंतर अनेक वेळा फ्रँक पिस्तुलं बॅगेत भरून बाहेर पडताना पेगी पहाते, पँटमधे कंबरेभोवती पिस्तूल खोचताना फ्रँकला पहाते, नंतर स्वतंत्रपणे कोणाचा तरी खून झाल्याची बातमी तिला कळते. ती जे काही समजायचं ते समजते. सबंध सिनेमाभर पेगी मूक असते, फक्त सहा शब्द बोलते. बराच फ्रँक दिद्गर्शकानं   पेगीच्या कोनातून दाखवलाय.

अमेरिकन समाज आतून कसा पोखरलेला आहे, भ्रष्टाचार आणि गुन्ह्यांत गुंतलेला आहे हे दिद्गर्शक स्कॉर्सेसी आयरिशमनमधे दाखवतात. या आधी कित्येक चित्रपटात त्यांनी अमेरिकन समाजाचं असंच चित्रण केलं आहे. काही दिवसांपूर्वीचा त्यांचा वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट अमेरिकेतील अर्थसंस्थांचं चित्रण करतो, ते पहाताना किळस येतो.

दी लास्ट टेंप्टेशन ऑफ ख्राईस्ट हा खिस्तांच्या जीवनावरचा चित्रपट करणारा, कुंदून हा दलाई लामांच्या जीवनावर चित्रपट करणारा, बॉब डीलन यांच्यावर डॉक्यूमेंटरी करणारा माणूस आयरिशमन किवा टॅक्सी ड्रायवर किंवा रेजिंग बुल यासारखे गुन्हे पटही तयार करतो.

चित्रपट प्रभावशाली करणं हे स्कॉर्सेसी यांचं वैशिष्ट्यं. चित्रपट चित्रपट म्हणजे तरी काय? एक रंजक, नाट्यमय गोष्ट. चित्रपटातलं नाट्य साडेतीन तास टिकवणं आणि प्रेक्षकाला खुर्चीत खिळवून ठेवणं. ते  कौशल्य स्कॉर्सेसींकडं आहे.

चित्रपटातली दृश्य फार वेगानं सरकतात. रिव्हॉल्वर, गोळी सुटल्याचा आवाज, एक चेहरा, भिंतीवर रक्तचित्रं. हॉफ्फा दरवाजाबाहेर पडायला निघतो. फ्रँक गोळ्या घालतो. हॉफ्फा रक्ताच्या थारोळ्यात पडतो. फ्रँक रिव्हॉल्वर त्याच्या अंगावर ठेवून निघून जातो. दोघे जण रात्रीच्या काळोखात एका खोक्यात हॉफ्फाचं प्रेत ठेवतात. त्यावर रिव्हॉल्वर ठेवतात. एका जाळ पेटलेल्या चेंबरमधे प्रेत ढकलतात. ज्वाळा. हॉफ्फाच्या तोंडातूनही ज्वाळा येत रहातात. चेंबरचा दरवाजा बंद.

काही सेकंदांची दृश्यं. ढॅण ढॅण आवाज नाही. भीषणता दाखवणारे क्लोज अप नाहीत.

आवश्यक आहे तिथं दृश्यं  संथ होतात. फ्रँक आठवणी सांगतो, विचारात गुंतलेला असतो, स्वतःशीच बोलतो  तेव्हां दृश्यांची गती मंदावते. १९९०-७० च्या दशकातलं पॉप संगित स्कॉर्सेसीनी चित्रपटात वापरलंय. चित्रपटाची सुरवातच इन द स्टिल ऑफ नाईट या पछाडून टाकणाऱ्या  सुरेल गाण्यानं होते. चित्रपटात २१ गाणी,सुरावटी, आहेत.

रॉबर्ट डी निरो, अल पचिनो आणि जो पेसी हे तीन कसलेले नट प्रमुख भूमिकांत आहेत. त्यांची वयं ७५ च्या पलिकडं गेलेली. तरीही त्यांनी तिशी-चाळिशीतली   पात्रं वठवलीत. यात त्यांचं अभिनयाचं कौशल्य तर आहेच. पण त्याच बरोबर डीएजिंग या तंत्राचीही कमाल आहे. हे तंत्र वापरून तिघांचेही चेहरे आणि वयं तिशीत नेऊन ठेवलीत.

एका मुलाखतकारानं स्कॉर्सेसीना आयरिशमन पूर्ण झाल्यावर विचारलं- तुम्ही अजूनही झुंडपट करायचं म्हणताय? झुंडपटात तोच तोच पणा येतो असं काही लोकाना वाटतं.

स्कॉर्सेसी म्हणाले- समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात झुंडी गुन्हे करत असतात. राजकारणात, बँकांत, धर्मात. झुंड विषयाला मरण नाही.

थोडक्यात असं की पंचाहत्तरी ओलांडली तरी स्कॉर्सेसी थांबायला तयार नाहीत.

स्कॉर्सेसीनी २५ चित्रपट आणि १५ डॉक्युमेंटरी केल्या आहेत. त्यांना किती तरी महोत्सवात नामांकनं मिळाली आहेत, बक्षिसं मिळाली आहेत.

निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0