लडाखच्या पूर्वेकडील गलवान खोर्यात सोमवारी व मंगळवारी रात्री चीन व भारताच्या सैनिकांमध्ये हाणामारी होऊन २० भारतीय सैनिक शहीद झाले व चीनचे ४३ सैनिक मृत
लडाखच्या पूर्वेकडील गलवान खोर्यात सोमवारी व मंगळवारी रात्री चीन व भारताच्या सैनिकांमध्ये हाणामारी होऊन २० भारतीय सैनिक शहीद झाले व चीनचे ४३ सैनिक मृत वा जखमी झाले. चीनने आपल्या मृत वा जखमी सैनिकांच्या संदर्भातील आकडेवारी अद्याप अधिकृतरित्या दिलेली नाही.
चीन व भारतीय सैन्यामध्ये चकमक उडाल्यानंतर त्यात तीन भारतीय जवान शहीद झाल्याचे वृत्त पहिल्यांदा मंगळवारी दुपारी प्रसार माध्यमात आले पण त्यावेळी या शहीद सैनिकांची नावे जाहीर झालेली नव्हती. पण नंतर १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू, हवालदार पलानी व शिपाई ओझा अशी शहीद जवानांची नावे उघडकीस आली.
नंतर बुधवारी बंगालचे राजेश ओरांग व हिमाचल प्रदेशचे अंकुश ठाकूर या दोन शिपायांची नावे प्रसिद्ध झाली. त्यानंतर पूर्ण शहीदांची नावे भारतीय लष्कराने जाहीर केली. त्यात नायब सुभेदार नुदूराम सोरेन, नायब सुभेदार मनदीप सिंग, नायब सुभेदार सुभेदार सतनाम सिंग, हवालदार सुनील कुमार, हवालदार बिपूल रॉय, नायक दीपक कुमार, शिपाई गणेश राम, शिपाई चंद्रकांता प्रधान, शिपाई गुरुबिंदर, शिपाई गुरतेज सिंग, शिपाई चंदन कुमार, शिपाई कुंदन कुमार, शिपाई अमन कुमार, शिपाई जय किशोर सिंग व शिपाई गणेश हान्सदा या जवानांचा समावेश होता.
पीटीआय व अन्य वृत्तसंस्थांनी २० शहीद जवानांपैकी ७ जणांची माहिती प्रसिद्ध केली आहे, ती खालील प्रमाणे.
कर्नल संतोष बाबू
आपल्या मुलाने भारतीय लष्करात भरती होऊन देशाची सेवा करावी अशी शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेखातर संतोष बाबू भारतीय लष्करात सामील झाले.
‘मला स्वतः भारतीय लष्करात सामील व्हायचे होते पण माझे स्वप्न अपुरे राहिले होते. माझा मुलगा भारतीय लष्करात सामील झाल्याने माझे स्वप्न पुरे झाल्याचे’ शहीद कर्नल संतोष बाबूंचे वडील बी. उपेंदर सांगतात. ते निवृत्त बँक अधिकारी असून आपल्या नातेवाईकांच्या विरोधाला बळी न पडता त्यांनी आपल्या मुलाला भारतीय लष्करात रुजू होण्याचा सल्ला दिला होता.
शहीद कर्नल संतोष बाबू यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा व मुलगी असून ते दिल्लीत राहतात. गेल्याच रविवारी संतोष बाबू यांनी आपल्या आईशी फोनवरून संवाद साधला होता व सीमेवर तणाव असल्याचे त्यांना सांगितले होते. माझा मुलगा देशासाठी शहीद झाला, त्याचा मला अभिमान असल्याची त्यांची प्रतिक्रिया होती.
हवालदार के. पलानी
मूळचे तामिळनाडूचे असलेले हवालदार के. पलानी सोमवारी चिनी सैनिकांच्या हल्ल्यात शहीद झाले. गेले २२ वर्षे ते भारतीय लष्करात होते. पुढील वर्षी ते निवृत्त होणार होते.
तामिळनाडू सरकारने पलानी यांच्या कुटुंबियाना २० लाख रु.ची आर्थिक मदत जाहीर केली आहे व कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याचे जाहीर केले आहे. पलानी यांचे एक बंधु भारतीय लष्करात राजस्थानमध्ये कार्यरत आहेत.
पलानी वयाच्या १८ व्या वर्षी भारतीय लष्करात सामील झाले होते. त्यांचे मूळ गाव रामनाथपुरम जिल्ह्यातल्या काडूक्कलूर असून पलानी यांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
शिपाई राजेश ओरांग
२०१५मध्ये राजेश ओरांग भारतीय लष्करात सामील झाले. मंगळवारी राजेश यांच्या मृत्यूची वार्ता भारतीय लष्कराने ओरांग कुटुंबियांना सांगितली. वडील सुभाष ओरांग हे सीमांत शेतकरी असून प. बंगालमधील बिरभूम जिल्ह्यातील बेलगोरीया गावात त्यांची थोडी शेती आहे. माझा मुलगा देशासाठी गेला, त्याने देशसेवा केली अशी प्रतिक्रिया सुभाष यांनी दिली.
शहीद राजेश विशीतील होते. पुढील सुटीवर घरी येतील तेव्हा त्यांचे लग्न करून देण्याची तयारी त्यांची आई ममता यांनी सुरू केली होती. राजेश यांना दोन भाऊ व दोन बहिणी असून १२ वी पास झाल्यानंतर ते बिहार रेजिमेंटमध्ये दाखल झाले होते.
माझ्या भावाला लहानपणापासून देशाची सेवा करण्याची इच्छा होती, त्यामुळे त्याने १२ वी होताच लगेचच लष्करात जाण्याचे ठरवल्याचे त्याची बहिण शकुंतला यांनी सांगितले.
शिपाई अंकुश ठाकूर
हिमाचल प्रदेशातील कारोहटा हे गाव शहीद शिपाई अंकुश ठाकूर यांचे. केवळ २१ वय. २०१८मध्ये ते पंजाब रेजिमेंटमध्ये दाखल झाले. त्यांचे वडील व आजोबा भारतीय लष्करात होते. अंकुश यांना धाकटा भाऊ आहे.
अंकुश शहीद झाल्यानंतर त्यांचे गाव दुःखात बुडाले. ग्रामस्थांनी चीनविरोधात घोषणा दिल्या. बुधवारी सरकारी इतमामात त्यांच्या अंत्यसंस्कार केले जातील असे सरकारने जाहीर केले होते.
शिपाई कुंदन कुमार ओझा
शिपाई कुंदन कुमार ओझा हे मूळचे झारखंडमधील साहेबगंज जिल्ह्यातील दिहारी गावचे. त्यांचे वय २६ होते. सोशल मीडियात प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार कुंदन कुमार यांना १७ दिवसांपूर्वीच पुत्ररत्न झाले होते. पण ही माहिती अधिकृत स्वरुपाची नाही.
शिपाई चंद्रकांता प्रधान
ओदिशातील कंधमाल जिल्ह्यातील बियारपंगा गावात जन्मलेले चंद्रकांता प्रधान २०१४ मध्ये भारतीय लष्करात सामील झाले. घराची आर्थिक परिस्थिती बरी नसल्याने चंद्रकांता यांनी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला. ते अविवाहित होते. त्यांच्यामागे दोन लहान भाऊ व एक बहिण आहे.
चंद्रकांता यांच्या मृत्यूची बातमी मंगळवारी रात्री वडील करुणाकर प्रधान यांना कळाली व त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला. माझा मुलगा कर्तव्यात चुकला नाही, तो धाडसी, पराक्रमी होता. अशी प्रतिक्रिया करुणाकर प्रधान यांनी दिली.
नायब सुभेदार नंदूराम सोरेन
४३ वर्षाचे शहीद नायब सुभेदार नंदूराम सोरेन हे मयूरभंज जिल्ह्यातील चंपूडा या गावातले रहिवासी होते. १९९७मध्ये १२ वी झाल्यानंतर नंदूराम यांनी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला.
नंदूराम शहीद झाल्याची बातमी कळाल्यानंतर आम्हा प्रचंड धक्का बसला, तो आमचा व आमच्या गावातला सर्वांचा लाडका होता अशी प्रतिक्रिया त्यांचे वडील माझी यांनी दिली.
नंदूराम यांच्या पश्चात त्यांची पत्नी व तीन मुली आहेत.
मूळ लेख
COMMENTS