नवी दिल्लीः गेल्या चार वर्षांत, २०१७ ते नोव्हेंबर २०२१ या काळात ६ लाख ७ हजार ६५० नागरिकांनी आपले भारतीय नागरिकत्व सोडले असून २०१६ ते २०२० या काळात अन्
नवी दिल्लीः गेल्या चार वर्षांत, २०१७ ते नोव्हेंबर २०२१ या काळात ६ लाख ७ हजार ६५० नागरिकांनी आपले भारतीय नागरिकत्व सोडले असून २०१६ ते २०२० या काळात अन्य देशांच्या ४,१७७ नागरिकांना भारतीय नागरिकत्व दिल्याची माहिती केंद्रीय गृहखात्याने दिली आहे. केरळमधील काँग्रेसचे खासदार हिबी इदेन यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला सरकारने उत्तर दिले आहे.
वेगळ्या भाषेत सांगायचे म्हणजे भारतीय नागरिकत्व सोडलेल्या १४५ जणांच्या तुलनेत एका व्यक्तीला भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) कायदे संसदेत संमत करूनही वस्तुस्थिती वेगळी असल्याचे केंद्रीय गृहखात्याच्या आकडेवारीनुसार दिसून येते.
गृहखात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतीय नागरिकत्वाची मागणी करणारे सर्वाधिक अर्ज शेजारील देश पाकिस्तानातून आले असून या देशातून २०१६-२०२० या काळात ७,७८२ अर्ज आले आहेत. या पैकी ३,०९५ अर्ज केवळ २०१९ सालामध्ये आले होते. पाकिस्ताननंतर अमेरिका (२२७), श्रीलंका (२०५), बांगलादेश (१८४), नेपाळ (१६७), केन्या (१३५), ब्रिटन (८२), इराण (५४) व कॅनडा (४४) व कोणताही देश नसलेले निर्वासित समजले जाणारे ४५२ अर्ज गृहखात्याकडे आले होते.
२०१६-२० या काळात गृहखात्याकडे आलेल्या प्रत्येकी १० अर्जांपैकी ४ जणांचे अर्ज स्वीकारून त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे.
२०१६ पासून भारताचे नागरिकत्व सोडण्याचीही आकडेवारी अधिक आहे. २०१७मध्ये १ लाख ३३ हजार ४९, २०१८मध्ये १ लाख ३४ हजार ५६१, २०१९मध्ये १ लाख ४४ हजार १७, २०२०मध्ये ८५ हजार २४८ व या वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यात १ लाख ११ हजार २८७ नागरिकांनी आपले भारतीय नागरिकत्व सोडले आहे.
मूळ बातमी
COMMENTS