परीक्षेच्या शेवटच्या कठीण विषयामध्ये प्रावीण्य मिळवून पास होणे असेच काहीसे आज झाले. भारताने चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंडला चारीमुंड्या चित करून,
परीक्षेच्या शेवटच्या कठीण विषयामध्ये प्रावीण्य मिळवून पास होणे असेच काहीसे आज झाले. भारताने चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंडला चारीमुंड्या चित करून, मालिका 3/1 ने जिंकून, 18 जुन 2021 ला लॉर्ड्स मैदानावर खेळण्याचे स्वप्न सत्यात उतरविले. तसेच 06 मार्च रोजी पन्नास वर्षापूर्वी जागतिक क्रिकेटमध्ये एका चमकदार भारतीय ताऱ्याचा उदय झाला होता, तो म्हणजे सुनील गावस्कर. वेस्ट इंडीज सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध आणि त्यांच्या द्रुतगती गोलंदाजीच्या तोफखान्या समोर धीराने आणि धैर्याने उभा राहणारा आणि त्या कसोटी मालिकेत 774 धावांचा पाऊस पाडणाऱ्या सुनील गावस्करच्या कसोटी क्रिकेट पदार्पणाला पन्नास वर्ष पूर्ण झालीत. 06 मार्च 1921 रोजी भारताने इंग्लंडविरुद्ध कसोटी आणि मालिका जिंकून या विक्रमवीराला दिलेली ही अविस्मरणीय भेट. सुनीलने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वप्रथम 10000 धावा अहमदाबादच्या मैदानावरच पूर्ण केल्या होत्या हे उल्लेखनीय. जगातील सर्व द्रुतगती गोलंदाजांविरुध्द हेल्मेट शिवाय खेळणारा एकमात्र आघाडीचा फलंदाज. कारकीर्दीच्या शेवटी केवळ तीन वर्षे त्याने स्कलकॅपचा वापर केला. भारताचा पहिला वहिला क्रिकेट विक्रमादित्य. पुढे सचिनने त्याचे फलंदाजीतील बरेच विक्रम मोडले, तरी सचिन भारतीयच आहे ह्या गोष्टीचा सदैव अभिमान बाळगणारा सुनील गावस्कर. भारतीय फलंदाजीला भरभरून आत्मविश्वास देणारा सुनील गावस्कर. तुझ्या सुवर्णमयी कारकिर्दीला सलाम.
चौथी कसोटी इंग्लंडपेक्षा भारतासाठी खूपच महत्त्वाची होती. या कसोटीतील पराभवामुळे जागतिक क्रिकेट कसोटीतील भारताचे आव्हान संपुष्टात येणार होते. अहमदाबाद खेळपट्टीचा वाद निरनिराळ्या मंचावर चर्चिला गेला. विविध क्रिकेट खेळणाऱ्या देशामधील अनुभवी खेळाडूंनी याबाबत आपली मते नोंदवली होती. तो धुरळा खाली बसत नाही, तोच चौथ्या कसोटीची सुरुवात झाली. अहमदाबादची खेळपट्टी या कसोटीत काय रंग दाखवेल हे मात्र गुलदस्त्यात होते. जो रूट परत एकदा नाणेफेकीच्या बाबतीत नशीबवान ठरला. इंग्लंडने डाॅमनिक बेस हा अतिरिक्त फिरकी गोलंदाज घेतला. द्रुतगती गोलंदाजी अँडरसन आणि स्टोक्स वर सोपवली. एक अतिरिक्त फलंदाज उपलब्ध व्हावा म्हणून ही धडपड होती. भारताने बुमराह ऐवजी सिराजला खेळविले. इंग्लंडने चौथ्या डावात खेळावयास लागू नये म्हणून फलंदाजी स्वीकारली. पहिल्या डावात इंग्लंडला चांगल्या धावा करणे आवश्यक होते. क्रॉली आणि सिबलीला अक्षरने लवकर बाद करून इंग्लंडला सुरक्षात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडले. सिराजच्या एक अप्रतिम चेंडूवर रूट पायचीत झाला. बेस्ट्रो आणि स्टोक्सने काही अप्रतिम फटके मारून इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण दोघांचेही दुर्दैव की त्यांच्या नशिबी सिराज आणि सुंदरचे बाहेरून आत येणारे चेंडू लिहिले होते. इंग्लंडच्या डावात स्टोक्स (55) आणि लॉरेन्स (46) जर सोडले तर बाकी फलंदाजांनी काही विशेष योगदान दिले नाही. अक्षर (4), आश्विन (3), सिराज (2) आणि सुंदर (1) यांनी इंग्लंडचा पहिला डाव 205 धावात गुंडाळला. भारताची अप्रतिम गोलंदाजी आणि इंग्लंडची बचावात्मक फलंदाजी इंग्लंडचा डाव परत एकदा कोसळण्यास कारणीभूत ठरली. मालिका संपत आली तरी अक्षर आणि आश्विनच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या फलंदाजांना उत्तर सापडले नाही हे नक्की. आता प्रश्न एवढाच होता की भारत 205 धावांचे आव्हान पेलू शकेल की नाही. दिवसअखेर भारताने गिलला गमावून 24 धावा जमविल्या. वेगाने आत येणारे चेंडू बऱ्याच फलंदाजांना खेळायला कठीण जाते. अँडरसनने गिलला चकविले. पुजारा जमतो न जमतो तोच बाद झाला. विराटला स्टोक्सचा उसळता चेंडू सोडता आला नाही. त्याने परत एकदा शून्य धावा पदरात पाडून घेतल्या. रहाणे आणि रोहितने भारताचा डाव 80 धावापर्यंत कसाबसा पोहोचविला. रहाणेचा डाव अँडरसनने संपविला. रोहित आणि ऋषभची जोडी जमली. भारत इंग्लंडची धावसंख्या सहज पार करेल असे वाटू लागले. पण स्टोक्सने रोहितचा अडसर दूर केला. आश्विन लवकर बाद झाल्यावर ऋषभ आणि सुंदर यांनी धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात केली. 146 धावांवर अडखळलेला भारताचा डाव ही जोडी कुठपर्यंत पोहचु शकेल हाच महत्त्वाचा प्रश्न होता. ही जोडी सामना इंग्लंडच्या हातून हिसकावून घेईल अशी पुसटशी कल्पना येणे त्या क्षणी शक्य नव्हते. ऋषभ आणि सुंदर दोघेही त्यांच्या आतापर्यंतच्या क्रिकेट जीवनातील सर्वोत्तम खेळी खेळणार हे इंग्लिश गोलंदाजांना नक्कीच माहीत नव्हते. स्टोक्स, लिच, अँडरसन यांनी भारतीय फलंदाजांना बांधून ठेवले होते. पण ऋषभची आक्रमकता आणि सुंदरचा संयम जिंकला. दोघांनी शतकी भागीदारी करून भारताला बढत मिळवून दिली. ऋषभने कसोटी कारकीर्दीतले तिसरे शतक झळकावले. अँडरसनच्या गोलंदाजीवर रुटने अप्रतिम झेल घेऊन ऋषभचा डाव संपविला. सुंदरने अक्षर सोबत आणखी एक शतकी भागीदारी केली. अक्षर स्वतःच्या चुकीमुळे धावबाद झाला. सर्व बाद होण्यापूर्वी भारताला 160 धावांची बढत मिळाली होती. ईशांत आणि सिराजच्या बाद होण्यामुळे सुंदर स्वतःचे शतक पूर्ण करू शकला नाही. सुंदरच्या या डावातील 96 धावा क्रिकेट रसिक बराच काळ विसरू शकणार नाही. भारताने पहिल्या डावात 365 धावा काढल्या.
दुसऱ्या डावात तरी इंग्लिश फलंदाज नेटाने खेळातील असे वाटत असतांनाच आश्विनने क्राॅली आणि बेस्ट्रोचा अडसर दुर केला. अक्षर आणि आश्विनने परत एकदा इंग्लंडचा डाव गुंडाळला. रूट (30) आणि लॉरेन्स (50) दोघेही इंग्लंडला एका डावाच्या पराभवापासून वाचवू शकले नाही. इंग्लंड चमू दुसऱ्या डावात केवळ 135 धावा काढू शकली. आश्विन,अक्षरने प्रत्येकी पांच गडी बाद केले आणि भारताने ही कसोटी एक डाव आणि 25 धावांनी जिंकली. आश्विन मालिकावीर आणि ऋषभ सामनावीर ठरले. इंग्लंड आणि भारत मालिकेत पहिला कसोटी सामना सोडला तर भारताची सरशी राहिली. भारतीय फिरकीसमोर इंग्लिश फलंदाजांचा आत्मविश्वास डगमगला. फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर रुटला गडी बाद करण्यासाठी अँडरसन, आर्चर, ब्रॉड आणि स्टोक्स वर अवलंबून राहावे लागले. मालिकेतील पराभव पचवणे इंग्लंड टीम, व्यवस्थापन आणि इंग्लिश क्रिकेट बोर्डाला कठीणच जाईल. विराटची बॅट अपेक्षेप्रमाणे तळपली नाही. त्याच्याकडून शतकाची अपेक्षा आहे, तो दुष्काळ बऱ्याच काळापासून भारतीय क्रिकेट रसिक अनुभवत आहेत. रोहित, ऋषभ, आश्विन आणि सुंदरच फलंदाजी बहरली. गिल अपेक्षापूर्ती करू शकला नाही. ही मालिका आश्विन आणि अक्षर यांच्या अत्युच्च फिरकी गोलंदाजीसाठी लक्षात ठेवली जाईल. सिराजची गोलंदाजी सुद्धा चांगली झाली.
भारताने जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेत अव्वल स्थान मिळविले. 18 जुन 2021 रोजी भारताचा सामना न्यूझीलंडशी होईल. मालिका विजयामुळे आयसीसी रँकिंग मधे भारत प्रथम क्रमांकावर आहे. आता लक्ष लॉर्ड्स वरील सामन्याकडे असेल. तत्पूर्वी इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय आणि T Twenty सामने खेळले जातील. भारतातर्फे नवनवीन खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता राहील.
COMMENTS