अमेरिकेत कोरोना टास्कफोर्सचे नेतृत्व डॉ. विवेक मूर्तींकडे?

अमेरिकेत कोरोना टास्कफोर्सचे नेतृत्व डॉ. विवेक मूर्तींकडे?

वॉशिंग्टनः अमेरिकेतील कोरोना महासंकट परतवण्याच्या उद्देशाने नेमण्यात येणार्या कोरोना टास्क फोर्सचा पदभार भारतीय वंशांचे अमेरिकी फिजिशियन डॉ. विवेक मूर्ती यांच्याकडे सोपवण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडेन सोमवारी डॉ. मूर्ती यांच्या नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

४३ वर्षांचे डॉ. मूर्ती यांचा जन्म ब्रिटनमधील असला तरी त्यांचे कुटुंब मूळचे कर्नाटकचे असून २०१४मध्ये ओबामा प्रशासनाने त्यांना अमेरिकेचे १९ वे सर्जन जनरल म्हणून नियुक्त केले होते. पण नंतर अध्यक्षपदी निवडून आलेल्या डोनल्ड ट्रम्प यांनी डॉ. मूर्ती यांना या पदावरून हटवले होते.

शनिवारी विल्मिंग्टन, डेलवेअर येथील भाषणात जो बायडन यांनी सोमवारी आपण देशातील प्रमुख शास्त्रज्ञ व तज्ज्ञांची एक समिती नेमणार असल्याची घोषणा केली होती. ही समिती अमेरिकेतील कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक अक्शन ब्लूप्रिंट सादर करणार आहे. ही मोहीम २० जानेवारीपासून देशभर लागू होईल, असे बायडन म्हणाले होते.

या कोरोना टास्कफोर्समध्ये डॉ. मूर्ती यांच्याव्यतिरिक्त माजी सर्जन जनरल व फूड अँड ड्रग्ज अडमिनिस्ट्रेशनचे आयुक्त डेव्हीड केस्लरही असणार आहेत.

बायडन यांच्या प्रचारात मोलाची भूमिका

डॉ. मूर्ती यांनी बायडन यांच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारात मोलाची भूमिका पार पाडली होती. अमेरिकेची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था व कोरोनाचा मुद्दा यावरचे सल्ले डॉ. मूर्ती यांनी बायडन यांना दिले होते. काही जणांचे म्हणणे आहे की, डॉ. मूर्ती यांना आरोग्य सचिव पदाचीही जबाबदारी बायडन प्रशासन देऊ शकते. पण त्याची पुष्टी होऊ शकलेली नाही.

मूळ बातमी

COMMENTS