वाढती बेरोजगारी व राष्ट्रवादी भावना : सैन्य भरतीचा प्रस्ताव

वाढती बेरोजगारी व राष्ट्रवादी भावना : सैन्य भरतीचा प्रस्ताव

नवी दिल्ली : देशाच्या लष्करात सामान्य नागरिकाला भरती व्हावे, त्याने तीन वर्षे लष्करात अधिकारी पद भूषवावे अथवा लष्करातील अन्य सेवा त्याने करावी यासाठी संरक्षण दलातील वरिष्ठ अधिकार्यांकडून प्रस्ताव तयार केला जात आहे. देशातील वाढती बेरोजगारी व राष्ट्रवादाची वाढती भावना पाहता हा प्रस्ताव तयार केला जात असल्याचे लष्करातील सूत्रांनी सांगितले. इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भात वृत्त दिले असून निमलष्करी दलात किंवा केंद्रीय राखीव दलात कमाल सात वर्षांसाठी ही भरती करण्याबाबतही विचार सुरू आहे. सात वर्षांची सेवा संपल्यानंतर संबंधित जवान वा अधिकारी आपल्या पूर्वीच्या नोकरी, व्यवसायाकडे वळू शकतो अशा स्वरुपाचा हा प्रस्ताव असल्याचे समजते.

सामान्य नागरिकाला ३ वर्षांसाठी सैन्यात सामील केल्यामुळे त्यांना भारतीय लष्करातील सुमारे १३ लाख अधिकारी, जवानांच्या कार्याची जवळून ओळख होते हाही या मागचा एक उद्देश आहे. भारतीय लष्कराचे प्रवक्ते अमन आनंद यांनी या संदर्भात सांगितले की, जर अशा प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास लष्करात सामील होण्याचा तो नागरिकाचा स्वैच्छिक अधिकार असेल पण लष्करात दाखल होण्यासाठी शारीरिक अटी या कडकच राहतील त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. या प्रस्तावानुसार भारतीय लष्करात नव्याने १०० अधिकारी व १ हजार जवानांची भरती केली जाणार आहे.

एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ज्या युवकांना लष्करात जाण्याची इच्छा आहे, ज्यांना लष्करी जीवन जवळून पाहायची आहे पण त्यांना त्यांची पूर्ण कारकीर्द लष्करात व्यतित करायची नाही, अशांसाठी हा प्रस्ताव आहे.  भारतीय लष्करात सुधारणा कार्यक्रम करण्याचा एक मोठा प्रयत्न सुरू आहे, त्याचाच एक भाग म्हणून ही अल्पकालिक सेवा भरती आहे, असेही या सूत्राने सांगितले. सध्या या प्रस्तावर लष्करातील वरिष्ठ अधिकार्यांकडून विचार विनिमय सुरू आहे, या निर्णयाने भारतीय लष्कराला आर्थिक दृष्ट्याही लाभ होईल असे लष्करातील सूत्रांचे म्हणणे आहे.

सध्या शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे १० वर्षे लष्करात काम करता येते. आता ही कालमर्यादा १४ वर्षे करण्यावर विचार सुरू आहे.

मूळ बातमी

COMMENTS