भारताची अंटार्क्टिकावरची नवी मोहीम

भारताची अंटार्क्टिकावरची नवी मोहीम

भारताची अंटार्क्टिकावरची नवी मोहीम गोव्यावरून सुरू होणार आहे. जानेवारीच्या १ किंवा २ तारखेला हे पथक जहाजात जाऊन बसेल व त्यांचा प्रवास एक-दोन दिवसानंतर सुरू होईल.

सीरमने सर्व आरोप फेटाळले
चक्रीवादळात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मोठे नुकसान
आसाममध्ये मतघोटाळा : मतदार ९० प्रत्यक्षात मते १८१

कोरोनाचा ताप सारे जग गेले वर्ष सहन करत आहे. त्याचा व्याप साऱ्या जगभर पसरलेला आहे. या महासाथीतून फक्त एक अंटार्क्टिका खंडच स्वतःला दूर राखू शकला होता. पण आता ती परिस्थिती राहिली नाही. तिथेही हा विषाणू पोहोचला आहे. अंटार्क्टिकाची ओळख आपल्या सर्वांना एक सफेद खंड या नात्याने नक्कीच आहे. तिथे बाराही महिने बर्फ पसरलेला असतो व तीन ते चार महिने दिवस व उरलेल्या काळात रात्र असते. थंडी तर इतकी कडाक्याची असते, खास करून हिवाळ्यात, त्याची दाहकता कल्पनेपेक्षाही भीषण असते. उत्तर व ईशान्य भारतात जितकी थंडी असते त्याच्या अनेकपटीने अंटार्क्टिका खंडावर थंडी असते.

अंटार्क्टिका व संशोधन 

इथे लोकवस्ती अजिबात नाहीये. जे काही सजीव तिथे पृष्ठावर सापडतात ते पेंग्विन व सील या प्रकारचे असतात. त्या खंडावर फक्त संशोधनासाठी काही देशांचे वैज्ञानिक दरवर्षी जात असतात. पण महामारीपूर्वी पर्यटनाची सुद्धा मुभा देण्यात आली होती. मोजके पर्यटक तिथे फेररफटका मारून परत येत असतात. मात्र या पूर्ण वर्षात पर्यटन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे तिथे स्थायी स्वरूपात कोणीही राहू शकत नाही. दक्षिण ध्रुवाजवळचा हा खंड वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असल्याकारणाने फक्त मूलभूत संशोधनाची मुभा साऱ्या राष्ट्रांना एका संधीद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळेच तिथे लोकवस्ती स्थापन करणे किंवा सामरिक तळ उभारणे या सारख्या गोष्टींना मनाई करण्यात आली आहे. भारताने अंटार्क्टिका करारावर स्वाक्षरी करून आपल्या संशोधन कार्याची सुरुवात १९९१ साली केली. आपले पहिले अंटार्क्टिक पथक १९९१ साली तिथे गेले व दक्षिण गंगोत्री या नावाने आपला संशोधन तळ उभा केला. त्या मोहिमेत आयुष्यात कधीही नैसर्गिक बर्फ न पाहिलेल्या संशोधकांचा भरणा अधिक होता. अनेक हालअपेष्टा सोसून, त्यांना सामोरे जाऊन, या संशोधकांनी अंटार्क्टिकावर संशोधनाची पताका रोवली होती. त्यानंतर भारत सरकारने प्रत्येक वर्षी अंटार्क्टिका मोहिमांचे आयोजन केलेले आहे.

नवी मोहीम

भारतातील अनेक संशोधन संस्थांप्रमाणे भारतीय भूचुंबकत्व संस्था सुद्धा दरवर्षी या मोहिमेत सामील होत असते. सध्या भारती व मैत्री असे दोन संशोधन तळ तिथे कार्यरत आहेत व या दोन्ही ठिकाणी या संस्थेचे वेगवेगळे प्रयोग चालू आहेत. तिथले भूचुंबकीय बदल कशा प्रकारचे आहेत, ध्रुवीय उद्योत कसे निर्माण होतात, वैश्विक ऊर्जा प्रवाहाचा परिणाम काय होतो असे अनेक प्रयोग अंटार्क्टिकावर केले जातात. यावर्षीची जी मोहीम आहे ती माझ्या सहकाऱ्याच्या व मित्राच्या, नेतृत्वाखाली जाणार आहे. त्यांचे नाव आहे अतुल कुलकर्णी. कोविड-१९ महामारीमुळे अनेक देशांनी आपल्या पथकातील वैज्ञानिकांची संख्या कमी केलेली आहे. त्याप्रमाणेच आपणही किमानच संशोधकांना घेऊन या मोहिमेवर जाणार आहोत. त्यामुळे अतुल यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. त्यांच्याकडे अगदी मर्यादित प्रमाणात सर्व प्रकारची सामुग्री उपलब्ध असणार आहे व त्याचा योग्य प्रकारे वापर करणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली भारतातील वेगवेगळ्या संशोधन संस्थेतील वैज्ञानिक अंटार्क्टिकाकडे जानेवारीतील पहिल्या आठवड्यात कूच करणार आहेत. त्यांचे प्रशिक्षण व वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली आहे व सध्या त्यांना गोव्यातील एका हॉटेलात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांना कोणाहीकडून कोरोनाची लागण होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हॉटेलच्या आपल्या रूमची सफाई सुद्धा हे सारे वैज्ञानिक  स्वतःच स्वतः करत आहेत. अंटार्क्टिकावर कोणत्याही परिस्थितीत महामारीचे विषाणू घेऊन जायचे नाहीत हा चंगच त्यांनी बांधलेला आहे. या आधीची प्रत्येक मोहीम विमानाने दक्षिण आफ्रिकेत जाऊन, तिथे काही दिवस तळ ठोकून, तिथून आवश्यक सामान घेऊन ते अंटार्क्टिकाकडे जहाजातून कूच करत असत. पण ही नवी मोहीम गोव्यावरूनच सुरू होणार आहे व थेट अंटार्क्टिकाकडे रवाना होणार आहे. हा सारा प्रवास जहाजाने होणार आहे. जानेवारीच्या १ किंवा २ तारखेला हे पथक जहाजात जाऊन बसेल व त्यांचा प्रवास एक-दोन दिवसानंतर सुरू होईल. त्याआधी ज्या काही वैद्यकीय तपासण्या करायच्या असतील त्या सर्व करण्यात येतील.

अंटार्क्टिकावर विषाणू कोणी नेला?

पण इतकी काळजी घेऊनसुद्धा अंटार्क्टिकावर कोवीड-१९ पोहोचलाच आहे. या खंडावर सुमारे ६० संशोधन केंद्र उभारण्यात आलेली आहेत. त्यात काही देशांचे २ किंवा अधिकही केंद्र आहेत. भारताचे सुद्धा २ स्टेशन आहेत – भारती आणि मैत्री. सर्वात आधी १९९१ साली स्थापलेले दक्षिण गंगोत्री हे स्टेशन होते पण तिथे फार मोठ्या प्रमाणावर बर्फ साठत राहिल्या कारणाने ते स्टेशन पूर्णपणे बर्फाखाली गाडले गेले होते. त्यासाठीच १९९८ साली मैत्रीची स्थापना करण्यात आली होती. प्रयोगांची संख्या वाढत राहिल्याने काही वर्षानंतर, २०१२ साली, भारती केंद्र स्थापण्यात आले. कोवीड-१९ चिली देशाच्या प्रयोगकेंद्रावर प्रवेशला आहे. हे स्टेशन अंटार्क्टिकाच्या शेवटच्या उत्तर बिंदूवर स्थित आहे जिथे चिली देशाचा समुद्रकिनारा समोर दिसतो. तिथल्या स्टेशनच्या वैज्ञानिकांसाठी सामुग्री पोहोचवण्यासाठी चिली देशाने एक जहाज पाठवले होते. या जहाजातील नाविक किंवा सामानाच्या आवरणातून हा विषाणू तिथे पोहोचला असावा असा जाणकारांचा कयास आहे. जेव्हा हे नाविक परत आपल्या देशी पोहोचले व त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, तेव्हा दोघांना संसर्ग झाल्याचे समोर आले. पण नंतर इतर २१ जणांना पण संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.

भारतीय पथकासाठी काही धोका आहे का?

भारती व मैत्री हे दोन भारतीय संशोधन केंद्र एकमेकांपासून सुमारे ३००० किमी दूर आहेत. एका केंद्रातून दुसऱ्या ठिकाणी जाणे साधारणपणे घडत नसते. दळणवळणाचे मर्यादित साधने असल्याकारणाने नेहमीची ये-जा करणे शक्य होत नसते. तिथे सुमारे ६० संशोधन केंद्र कार्यरत जरी असले तरी ते एकमेकांपासून फार दूरवर स्थापण्यात आले आहेत. आपल्या मैत्री जवळ रशियाचे केंद्र आहे व त्यांच्यामधील अंतर फक्त १० किमी इतकी आहे. पण साऱ्या देशांनी आधीच कुठेही व कुठलाही संशोधक कोणत्याही कारणासाठी आपले स्टेशन सोडून दुसरीकडे जाणार नाही ही अट मान्य केलेली आहे. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता टाळणे शक्य होणार आहे. तसेच, चिली स्टेशन हे आपल्या दोन्ही केंद्रापासून हजारो किमी दूर आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला लागण होण्याची शक्यता अतिशय धूसर आहे.

कोवीड-१९ ने साऱ्या जगाला हादरवून सोडले आहे. साऱ्या जगाचे लक्ष या जिवाणूकडे आहे व त्याचा बिमोड करण्यासाठी हरप्रकारचे प्रयोग केले जात आहेत. पण इतर विषयातील वैज्ञानिक जगत हातावर हात ठेऊन गप्प बसलेले नाही. ते आपल्यापरीने विश्वाला अधिक योग्य प्रकारे जाणून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्या प्रयत्नांना सुद्धा सन्मान देणे आवश्यक आहे.

(लेखक, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधीन नवी मुंबई येथील भारतीय भूचुंबकत्व संस्थेत, वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0