उद्योजक राहुल बजाज यांचे निधन

उद्योजक राहुल बजाज यांचे निधन

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे आज दुपारी पुण्यात निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. गेले काही दिवस ते आजारी होते आणि त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते. वय आणि हृदयाच्या आजारामुळे त्यांच्यावर उपचार करण्यास डॉक्टरांना मर्यादा येत होत्या. अखेर आज दुपारी अडीचच्या सुमारास त्यांचे मल्टी ॲार्गन फेल्यूअरमुळे निधन झाले.

राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ साली झाला होता.ते स्वातंत्र्यसैनिक जमनालाल बजाज यांचे नातू होते.बजाज उद्योग समूहाला मोठे करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे.१९६८ मध्ये बजाज ऑटोमध्ये ते कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाले होते.

राहुल बजाज यांनी अमेरिकेच्या हार्वर्ड बिझनेस स्कूल, सेंट स्टीफस कॉलेज-दिल्ली, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, मुंबई आणि कैथड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये शिक्षण घेतले होते. २००६ ते २०१० या काळात ते राज्यसभेचे खासदारही होते. १९७९-८० आणि १९९९-२००० या काळात ते उद्योगांची संघटना सीआयआयचे अध्यक्षही होते. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना २०१७ साली सीआय़आय जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.२००१ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

शरद पवार यांनी ट्वीट करत आपल्याला मोठा धक्का बसल्याचं सांगितले. आपल्या ट्वीटमध्ये शरद पवार म्हणतात, “मला मोठा धक्का बसला जेव्हा मला पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल कळलं. स्वातंत्र्य सेनानी जमनालाल बजाज यांचे नातू असलेल्या राहुल यांनी समाजात विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या आयुष्यात त्यांच्या बजाज दुचाकी तंत्रज्ञानामुळे मोठे बदल घडवून आणले. परवडणाऱ्या वाहनामुळे गतिशीलता वाढली, उपजीविकेचे साधन मिळविण्यासाठीचा संघर्ष कमी झाला आणि सामाजिक-आर्थिक बदलाचे साधन बनले! उद्योगातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल आम्ही भारतीय त्यांचे ऋणी आहोत.माझ्या अत्यंत जवळच्या मित्राच्या निधनाने मी दु:खी आहे. भारताने एक उद्योगपती, एक परोपकारी आणि तरुण उद्योजकांसाठी दीपस्तंभ गमावला आहे.”

उपमुख्य मंत्री अजित पवार यांनीही राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे, “बजाज उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला भारतीय उद्योग जगतातील पितामह हरपला आहे. बजाज कंपनीच्या माध्यमातून भारताला ऑटो उद्योगात स्वतंत्र ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचे निधन हे भारतीय सामाजिक, उद्योग क्षेत्राची मोठी हानी आहे”.

 

COMMENTS