वस्ताद कथेकऱ्याने विणलेल्या कथाही कधी ना कधी उसवतातच!

वस्ताद कथेकऱ्याने विणलेल्या कथाही कधी ना कधी उसवतातच!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत नुकत्याच दिलेल्या परफॉर्मन्सनंतर लगेचच, आपला अलीकडील इतिहास कालानुक्रमे लावण्याचे दुसरे करिअर विकसित करू पाहणाऱ

राज्यात १ डिसेंबरपासून शाळा सुरू होणार
कोविड मृत्यूसंख्येबाबतचा डब्ल्यूएचओ अहवाल दडपण्याचा भारत सरकारचा प्रयत्न
भारताच्या सार्वजनिक आरोग्याच्या विषमतेचे वास्तव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत नुकत्याच दिलेल्या परफॉर्मन्सनंतर लगेचच, आपला अलीकडील इतिहास कालानुक्रमे लावण्याचे दुसरे करिअर विकसित करू पाहणाऱ्या जयराम रमेश यांनी एक ट्विट पोस्ट केले:

“आपल्या वैशिष्ट्याला जागत पंतप्रधानांनी आज पुन्हा एकदा इतिहास असत्य स्वरूपात मांडला. नेहरूंवर टीका केल्याप्रकरणी मजरूह सुलतानपुरी यांना १९४९ मध्ये तुरुंगात टाकण्यात आले होते असा दावा त्यांनी केला. प्रत्यक्षात सीपीआयने भारत सरकारविरोधात क्रांतीची घोषणा केल्यामुळे अनेक कम्युनिस्टांसोबत मजरूह साहेबांनाही अटक झाली होती.”

पंतप्रधानांचा खोटेपणा उघड केल्याबद्दल रमेश यांनी स्वत:ची पाठ नक्कीच थोपटून घेतली असेल, पण त्यांच्या ट्विटमुळे मला मात्र टू किल द ट्रुथ या सॅम बॉर्नेच्या थ्रिलरमधील एक संवाद आठवला. स्टीव बॅनॉनसारखी एक व्यक्तीरेखा जयराम रमेश यांच्यासारख्या उदारमतवादी संवादकाला सांगत असते:

तू हे करू शकला नाहीस त्याबद्दल मी तुला दोष नाही देणार, मॅगी. खरंच देणार नाही… अमेरिका नावाच्या भूमित तुम्ही तुमची कहाणी लिहिता, तुझी स्वत:ची कहाणी सांग- तुला तुला जशी हवी असेल तशी सांग. त्या रटाळ, आयव्ही लीग… संयुक्त राष्ट्रांनी पोसलेल्या, आसपासच्या लोकांच्या पसंतीला उतरलेल्या, दुबळ्या युरोपीयन तथ्यांची’ पत्रास बाळगू नकोस. ती तथ्ये राहू दे वास्तवाबिस्तवात जगणाऱ्या कंटाळवाण्या लोकांसाठी. तू तुझी स्वत:ची कहाणी लिही. अमेरिका म्हणजे दुसरंतिसरं काही नाही, हेच आहे. आणि तो नेमकं हेच करतोय. आणि म्हणूनच तो अजून तिथे आहे, ओव्हलच्या मोठ्या डेस्कमागे उभा आहे, त्याला हटवण्यासाठी तू कितीही प्रयत्न केलेस तरीही.”

यातला ‘तो’ अर्थातच डोनाल्ड ट्रम्प आहे. तो आता भले ‘ओव्हल’पासून दूर गेला असेल पण तरीही तो अद्याप बहुमताच्या जवळपास फिरकणाऱ्यांच्या निष्ठांवर हुकूमत गाजवत आहे आणि अनिश्चित लोकशाह्यांवर अदृश्य स्वरूपांत घोंघावणाऱ्या क्षुल्लक हुकूमशहांपुढे वाईट उदाहरण कायम ठेवत आहे.

आणि, नरेंद्र मोदी तर उत्कृष्ट नकलाकार आहेतच. अमेरिकेतील उजव्या विचारसरणीच्या, तथ्ये आणि इतिहासाबद्दल तीव्र घृणा बाळगणाऱ्या वक्तृत्वशैलीतील सगळी कौशल्ये, अभिमुखता आणि मूल्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्तकांमध्ये पद्धतशीर भिनवण्यात आली आहेत. मोदी यांच्या घडवण्यात आलेल्या राजकीय व्यक्तित्वामध्ये देशी असे काहीच नाही.

तात्पर्य, मोदी यांनी स्वत:कडे एका वस्ताद कथेकऱ्याची भूमिका घेतली आहे आणि या भूमिकेतून ते जनतेच्या कल्पनाशक्तीला व भाबडेपणाला मोठ्या कौशल्याने गोंजारत आहेत. बॅनोन-इस्क व्यक्तिरेखा म्हणते त्याप्रमाणे, अमेरिकी मानसिकतेवर ताबा मिळवण्यातील त्यांच्या यशामागे एक ठळक मुद्दा आहे:

सत्य कमकुवत आहे हे त्यांना (ट्रम्प यांना) समजले आहे.

हो, मॅगी. कमकुवत. हे सगळं काही- ऐतिहासिक नोंदी, तथ्ये, सत्य- तुम्ही लोकांनी हे सगळं इतकं मोठं करून ठेवलं की तो एखादा भयंकर शत्रू वाटावा. पण आता, त्याच्यामुळे (ट्रम्प) मला कळतंय की सत्य म्हणजे याची उलटी बाजू आहे. ते अत्यंत नाजूक आहे.”

मी बौद्धिकदृष्ट्या अत्यंत गंभीर युक्तिवाद करण्यासाठी एका पल्प-फिक्शनचा आधार घेत आहे हे काही जणांना आवडणार नाही. कदाचित. मात्र, एका कागदी नेत्याचे अंतरंग उलगडून दाखवण्यासाठी कागदी पुस्तकच गरजेचे आहे.

मोदी यांच्या मनात तथ्ये, आकडेवारी, माहिती आणि इतिहासाबद्दल असलेल्या टोकाच्या तिरस्कारामागील निर्दयपणा समजून घेण्यासाठी ‘टू किल द ट्रुथ’मधील निर्दयी संवादच आपल्याला उपयोगी पडतो. पंतप्रधानांना उघडे पाडण्यासाठी असे अनेक जयराम रमेश, शशी थरुर आणि रामचंद्र गुहा तथ्ये आणि इतिहासाचे हवाले देत राहू शकतात. मोदी यांच्यावर त्याचा काडीचाही परिणाम होणार नाही, ते त्यांनी स्वत: तयार केलेल्या कहाण्या सांगतच राहतील. कट-कारस्थानांच्या, दगलबाजीच्या, लूटमारीच्या, छळाच्या, देशद्रोहाच्या कहाण्या. मोदी यांना बुद्धिजिवी वर्गाच्या मान्यतेची  पर्वा नाही हे तर आत्तापर्यंत स्पष्ट झाले आहे. आधुनिक काळातील एक सम्राट म्हणून, नेहरूवादी अभिजन वर्गातील अनेकांचा पाठिंबा ते विकत घेऊ शकतात, किंबहुना तो त्यांनी विकत घेतलेला आहे. चलाखी आणि संधीसाधूपणा कोणत्याही वर्गापुरते मर्यादित नाहीत. मोदी यांच्या संरक्षणाला कितीतरी जयशंकर आणि हरदीप पुरी हजर आहेत. त्यात विद्यापीठ अनुदान आयोग, नीती आयोग आणि अन्य ज्ञानाधारित प्राधिकरणांवर नियुक्त करण्यासाठी आपल्या विद्यापीठांमध्ये सुमारांची कमतरता नाहीच.

एक वस्ताद कथेकरी म्हणून मोदी यांनी त्यांच्या उच्चारणांच्या किंवा घोषणांच्या “विश्वासार्हते”ची काळजी करणे सोडूनच दिले आहे. त्यांना काही प्राध्यापकांच्या मंडळापुढे आपला डॉक्टरेटचा थिसिस मांडायचा नाही. त्यांचा प्रेक्षकवर्ग वेगळा आहे, ते व्यासपीठाचे नियंत्रण करतात. कोणे एकेकाळी संसदेत तथ्यात्मक माहिती व अचूक विधानांचा आग्रह धरला जात असे; आता या मंचावर दायित्व वगैरे बाबींना किंमत उरलेली नाही. अमुक एक बाब म्हणजे देशाविरोधातील किंवा आपल्या सरकारविरोधातील ‘कट’ आहे संकेत पंतप्रधानांनी राजकीय मेळाव्यात देणे ही गोष्ट वेगळी; आणि कोविड साथीच्या काळात स्थलांतरित मजुरांनी भोगलेल्या वेदना, विस्थापन म्हणजे दिल्ली आणि महाराष्ट्रातील भाजपेतर सरकारांनी रचलेला कट होता असे संसदेत म्हणणे ही वेगळी गोष्ट झाली.

उदारमतवाद्यांना या भीषण असंवेदनशीलतेबद्दल उसासे सोडत बसायचे तर बसू दे पण कथेकरी तर त्याच्या स्वरचित कथेवर अत्यंत खूश आहे. आपल्या सत्तेचे, सत्तेच्या अपयशांचे समर्थन करण्यासाठी, अर्धवट तथ्ये व खोट्या आकडेवारीच्या माध्यमातून राजकीय दंडेलीला अधिकृत स्वरूप देण्याचा परिचित आणि दुहेरी खेळच, मोदी एका अर्थाने खेळत आहेत. याबाबत बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या किंवा ‘भारताची कल्पना’ मांडू पाहणाऱ्यांच्या पायाखाली जमीनच उरलेली नाही किंवा आदर अथवा स्वीकाराची प्रेरणा निर्माण करण्यासाठी आवश्यक व्यक्तिमत्वही त्यांच्याकडे नाही या तथ्यामुळे पंतप्रधानांचे धाडस द्विगुणित झाले आहे.

अर्थात, विरोधी पक्ष असंख्य त्रुटींनी भरलेले असले आणि कमकुवत असले म्हणून जनतेच्या कल्पनाशक्तीचा ताबा घेणाऱ्या मनगढन कहाण्या सांगण्याचा परवाना, पंतप्रधानांना मिळालेला नाही. प्रत्येक कथेला तात्पर्य असते आणि या तात्पर्यामध्ये नायकाच्या चुकांचे व अतिरेकाचे समर्थन आणि वैधता दडलेली असते.  ६ जानेवारी, २०२१ रोजी कॅपिटल हिलवर झालेला हिंसक हल्ला म्हणजे वैध राजकीय चर्चा होती हे सांगण्याचे धैर्य डोनाल्ड ट्रम्प यांचा गट दाखवू शकतो तो याच कारणामुळे. धाकदपटशा आणि जबरदस्ती यांमध्ये सुधारात्मक शक्ती आहे यावर विश्वास ठेवण्यापर्यंत मजल मोदी आणि त्यांच्या चेल्यांनीही मारलीच आहे.

तरीही, दिवसाच्या अखेरीस का होईना कथेकऱ्याला, आदेश आणि अटींनी सुसज्ज असा भारतीय राज्यघटना नावाच्या वास्तवाला, तोंड द्यावेच लागते. आणि आपण अखेरच्या प्रेक्षकाला तर विसरायलाच नको: हा अखेरचा प्रेक्षक म्हणजे मतदार. कथेकऱ्याने विणलेल्या कथांची तुलना तो त्याच्या स्वत:च्या वास्तवाधारित गोष्टींशी केल्याशिवाय राहणार नाही आणि मग या कथांची वीण उसवल्याशिवाय राहणार नाही.

मूळ लेख: 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0