इराकमधील अमेरिकी तळावर इराणचे हवाई हल्ले

इराकमधील अमेरिकी तळावर इराणचे हवाई हल्ले

बगदाद/वॉशिंग्टन : इराणचे सर्वोच्च कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला म्हणून बुधवारी पहाटे इराणने इराकमधील ऐन अल-असाद येथील अमेरिकेच्या दोन तळांवर २२ रॉकेट डागण्यात आले. या हल्ल्यात अमेरिकेचा एकही सैनिक ठार झाला नसल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी बुधवारी स्पष्ट केले. पण इराणने आपला हल्ला अमेरिकेच्या अहंकाराला थप्पड असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आमचा हा हल्ला म्हणजे युद्ध नव्हे तर अमेरिकेला धडा शिकवण्याची गरज होती असे इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान या हल्ल्याचे वृत्त पसरल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट करून ‘ऑल इज वेल’ असा संदेश दिला होता. तर बुधवारी भारतीय वेळेनुसार रात्री १० च्या सुमारास प्रसारमाध्यमांना संबोधित करताना ट्रम्प यांनी जोपर्यंत आपण अमेरिकेचे अध्यक्ष आहोत तोपर्यंत इराणला अण्वस्त्र वापरू देणार नाही असे वक्तव्य केले. पण त्यांच्या देहबोलीत आक्रमकता कमी दिसत होती. सीएनएन या वृत्तवाहिनीने ट्रम्प थोडे नरम झाल्याचे म्हटले आहे.

बुधवारी इराणचा अमेरिकी तळांवरील हल्ला अत्यंत अनपेक्षित घटना होती. या हल्ल्याबाबत स्पष्टीकरण देताना इराणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जावेद झरीफ यांनी संयुक्त राष्ट्राच्या सनदेमधील कलम ५१ नुसार इराणने स्वसंरक्षणार्थ अमेरिकेच्या तळांवर हल्ला केला असे त्याचे समर्थन केले.

प. आशियावरील हवाई मार्गांची दिशा बदलली

अनेक देशांनी या हल्ल्यानंतर आपापल्या हवाई सेवांना प. आशियावरील हवाई मार्ग टाळण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेने इराक, इराण, आखाती देश, ओमानच्या आखातावरून अमेरिकेची जाणारी सर्व हवाई सेवा अन्य मार्गाकडे वळवली आहे.

इराणमध्ये युक्रेनचे विमान कोसळून १७९ प्रवासी ठार

एकीकडे इराणने अमेरिकेवर केलेले हल्ले घडत असताना युक्रेन एअरलाइन्सचे विमान उड्‌डाण घेत असतानाच तेहरान येथील इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. या अपघातात विमानातील १७९ प्रवासी ठार झाले. हा अपघात तांत्रिक कारणाने घडल्याचे इराणचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS