प्रश्न ‘कोविड विधवांचे’

प्रश्न ‘कोविड विधवांचे’

२२ जून रोजी एकल महिला धोरणाचा प्राथमिक मसुदा राज्य सरकारकडे सादर करून दोन वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने राज्य सरकारने ह्या मसुद्यावर आवश्यक कार्यवाही करून राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकारणासाठी पाऊले उचलणे गरजेचे आहे.

राज्यात १ डिसेंबरपासून शाळा सुरू होणार
आपत्कालिन लस म्हणून कोवॅक्सिनला मंजुरी
‘निर्बंध नको असतील तर लसीकरण अपरिहार्य, मास्क वापरा’

कोविड महासाथ हे मानव जातीवरील सर्वात मोठे संकट असल्याचे सिद्ध झाले आहे. कोविडच्या दुसर्‍या लाटेचा सर्वाधिक परिणाम स्त्रिया आणि लहान मुलांवर झालेला दिसून येतो आहे. देशात ३० हजार बालके अनाथ झाली आहेत अनेक स्त्रिया विधवा झाल्या असल्याचे आकडे समोर येत आहे. केंद्र सरकारकडून किती स्त्रिया विधवा झाल्या आहेत किंवा किती लोकांनी कोविड महासाथीत त्यांचे जीवनाचे जोडीदार गमावले याची संपूर्ण आकडेवारी अजून समोर आलेली नाहीये. पण आपल्या आजूबाजूला अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तिला अकाली गमावले असल्याची विदारकता दिसत आहे.

१७ जून २०२१ रोजी Commission on status of Women ची Beyond the Loss : Widow’s Resilience या विषयावर एक बैठक झाली.

१७ जून २०२१ रोजी Commission on status of Women ची Beyond the Loss : Widow’s Resilience या विषयावर एक बैठक झाली.

आजपर्यंत देशात शेतकर्‍यांच्या विधवा, सैनिकांच्या विधवा याखालोखाल एचआयव्ही एड्स रोगामुळे विधवा झालेल्या स्त्रियांचे  अनुभव, त्यांचे मानवीहक्क यावर काम होत होते. विधवा स्त्रियांच्या संदर्भात राज्यनिहाय वापरल्या जाणार्‍या टर्मनुसार जर मांडणी केली तर महाराष्ट्र शेतकर्‍यांच्या विधवा, उत्तर प्रदेश वृंदावनमधील विधवा, पश्चिम बंगालमधील वाघ विधवा, कश्मीरमधील हाफविडो आणि आता यात कोविडमुळे नवरा मरण पावला म्हणून ‘कोविड विधवा’ ह्या वर्गवारीची  भर पडली आहे.

आपल्या देशाची सामाजिक-सांस्कृतिक संरचना पाहता एखाद्या व्यक्तीचा सामाजिक स्तर काय आहे यावर आधारित सामाजिक आणि कौटुंबिक व्यवहार आणि दर्जा त्या व्यक्तीला प्राप्त होत असतो. स्त्रियांच्या बाबतीत त्यांचा वैवाहिक दर्जा काय आहे यानुसार कुटुंब आणि समाजात स्त्रियांचे स्थान, दर्जा आणि मान प्राप्त होत असतो. हे वास्तव उलगडून सांगायचे  झाल्यास एचआयव्ही एड्समुळे ज्या स्त्रियांनी जोडीदार गमावला त्या स्त्रियांना सासरच्या कुटुंबातून बेदखल केले जात होते आणि त्याचा सगळं दोष स्त्रीच्या माथी मारला  जात होता. आताही परिस्थिती काही फारशी वेगळी नाही.

या लॉकडाऊनच्या दरम्यान औरंगाबाद, जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात रिलीफ वर्कच्या निमित्ताने गेले असता असेच अनुभव कोविडमुळे विधवा झालेल्या स्त्रियांनी मांडले. यात मला एकूण १७ स्त्रिया भेटल्या. ज्यांनी कोविडमुळे त्यांचा जोडीदार गमावल्यानंतर अनुभवलेल्या वेदना व्यक्त केल्या. (१७ हा आकडा निश्चितपणे छोटा आहे.  पण परिस्थितीचे गांभीर्य समजून घेणे आवश्यक आहे. यासाठी  प्रातिनिधिक स्वरुपात हे अनुभव मांडण्याचा हा प्रयास )

या १७ स्त्रियांमध्ये २५-४५ वयोगटातील एकूण १५ स्त्रिया होत्या तर ४५ वयोगटाच्या पुढील २ स्त्रिया होत्या. या सगळ्या स्त्रियांचे शिक्षण जेमतेम झालेली. केवळ दोनजणीच पदवीपर्यंत शिकलेल्या होत्या.  कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी घरगुती काम, शेतमजुरी आणि खासगी क्षेत्रात काम करणार्‍या होत्या. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये घरेलू काम बंद झाले ते काम या स्त्रियांना पुन्हा परत मिळाले नाही.

या स्त्रियामधील पहिली स्त्री भेटली ती वर्षा. एप्रिल महिन्यात ‘वर्षा’चा पती कोविडमुळे गेला. लग्नाला १५ वर्ष झाली होती. सासू-सासरे, एक मुलगा असे तिचे कुटुंब. पती कंपनीमध्ये कामगार होता. वर्षाही खासगी क्षेत्रात काम करत होती. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये तिचे काम बंद पडले ते पुन्हा सुरूच झाले नाही. पाच वर्षापूर्वी फ्लॅट खरेदी केला होता. घराचा हफ्ता, मुलाचं शिक्षण ऑनलाइन सुरू झालं म्हणून त्याच्यासाठी मोबाईल खर्च, आजारी असलेले सासरे यांचा खर्च अशा सगळ्या जबाबदारीतून संसार सुरू होता. लॉकडाऊनमुळे कंपनीने पगार कपात केली होती. त्यामुळे आर्थिक ताण सोसावा लागत होता. नवर्‍याला ताप आला म्हणून टेस्ट करून घेतली. टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव आला.  हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्यासाठी दोन दिवस लागले. प्रयत्न करून बेड मिळाला पण दुसर्‍याच दिवशी त्यांची प्राण ज्योत मालवली. वर्षा सांगत होती इथून खरी माझी परीक्षा सुरू झाली. महानगर पालिकेतून फोन आला मी आणि मुलगा अंत्यविधीला गेलो. माझी आणि मुलाची टेस्ट निगेटिव आली होती. सासू-सासर्‍याचा रिपोर्ट येईपर्यंत चिंता वाटत होती पण सुदैवाने त्यांची टेस्टही निगेटिव आली. स्मशानभूमीतील  परिस्थिती कधीही विसरू शकणार नाही. स्मशानभूमीतून आम्ही घरी आलो. शेजार्‍यांनी आम्हाला सर्व मदत केली. मला धीर देत होते.  या काळात आमचे कोणीही नातेवाईक आमच्या घरी आले नाही. फक्त फोन करून विचारपूस करायचे. पंधरा तीन आठवड्यानंतर माझे दीर आले. त्यावेळी एखादा जोरदार झटका बसावा तसा झटका मला बसला. माझा दीर घरात आला नाही. दारातूनच मला बोलतं होते. माझे सासू-सासरे त्याचं सामान भरून दिरासोबत जायला निघाले. मी हे काय करता म्हणून विचारले तेव्हा ‘तुझ्यामुळे आमचा मुलगा गेला. ‘त्याला काही कोरोना नव्हता. त्याला दवाखान्यात पाठवलं त्यामुळेच त्याचा जीव गेला. आम्ही तुझ्याकडं राहू शकत  नाही असं म्हणून दिरासोबत निघून गेले. मुळात वर्षाचा पती कंपनी कामगार होता. कंपनीमध्ये टेस्ट करण्यात आली होती. मी सासू-सासरे आधार म्हणून पाहत होते. नवरा गेल्यामुळे मला नोकरी शोधण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मुलगा आता दहावीला गेला.

१७ जून २०२१ रोजी Commission on status of Women ची Beyond the Loss : Widow’s Resilience या विषयावर एक बैठक झाली.

१७ जून २०२१ रोजी Commission on status of Women ची Beyond the Loss : Widow’s Resilience या विषयावर एक बैठक झाली.

त्याचं पुढचं शिक्षण आहे. मी घराबाहेर पडले की घरात सासू-सासरे मुलाकड लक्षं देतील. हा माझा विचार होता. सासू-सासरे घर सोडून गेले. मी आणि मुलगा दोघेच घरात होतो. शेजारी अधूनमधून येणं-जाणं करायचे. पुन्हा ८ दिवसांनी पुन्हा माझे दीर घरी आले.  मनातल्या मनात विचार केला बरं झाले निदान भेटायला तरी आले पण तो माझा भ्रम होता. त्यांनी मला हे आमच्या भावाच घरं आहे. आता तो हयात नाही म्हणून त्यावर आमच्या आई-वडिलांचा हक्क आहे. म्हणून तुम्ही हे घर लवकर खाली करा. वास्तविक पतीच्या मृत्यूनंतर घरावर वर्षाचा हक्क आहे. तरीही वर्षाचे घर ताब्यात घेण्याचा प्रयत्न तिचा दीर करत आहे. ह्या सगळ्या घटना माझे पती गेल्यानंतर एका महिन्याच्या आतच घडल्या होत्या. माझ्यापुढे मुलाचं शिक्षण, घरावरच कर्ज आणि मला नोकरी कशी आणि कधी मिळेल ह्या चिंता. जगावं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न. ही वर्षाची स्थिती  होती.

रमाबाई वय वर्ष ७०. पाच मुली, पाच जावई, तीन नात जावई एक मुलगा-सून आणि नातू आणि नात सून इतका मोठा परिवार एकाच शहरात राहणारा. रमाचे पती वय ८० वर्ष. वृद्धत्व आणि शुगर यासोबत त्याचं आयुष्य चाललं होतं. मार्च महिन्यात त्यांना कोविड होऊन आठच दिवसात त्यांची प्राण ज्योत मालवली. घरात मुलगा आणि सूनही पॉजिटिव आले. आजी आणि नातू यांनी शेवटचे संस्कार केले. रमाबाईंनी मनातील खदखद व्यक्त केली. आमचं कुटुंब म्हणजे एका लग्नाला शे-दीडशे माणस जमतात इतक मोठं. पण ‘हे’ करोनानं गेल्याच कळलं तेव्हापासून आमच्याकडे तीन महिने झाले तरी कोणी भेटायला आलं नाही. जे नातेवाईक भेटायला आले त्यांनी पाणी पिणं ही टाळलं. दारात ओट्यावर बसून भेटून गेले. पोरींचा तेवढा फोन येतो. जावई घेऊन आले तर त्या येणार. चांगले दिवस असलेले की, सगळे येतात. माणसाचं काही खरं नाही.

३५ वर्षाची सोनाली. कोविडमुळे तिचा पती गेला. ती, मुलगा आणि पती भाड्याच्या घरात राहत होते. घर मालकाने एक महिना घर भाडे मागितले नाही पण दुसर्‍या महिन्यात तगादा लावला. घर भाडे दिले नाही म्हणून तिचे सामान ठेऊन घेतले आणि मुलासहित तिला घर सोडायला भाग पाडले. घरभाड्याचे पैसे दिल्यावर सामान घेऊ जा म्हणून तिला सांगितले. सोनाली दुसर्‍या राज्यातील. रोजगाराच्या शोधात मूळ गाव सोडून आलेली. सध्या तिच्या मैत्रिणीच्या घरी तात्पुरता आश्रय मिळाला असला तरी  सोनाली पुढे अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा कशा भागवायच्या हा मुख्य प्रश्न आहे.

३० वर्षीय मानसीने तिचा पती  कोविडमध्ये गमावला. घरी सासू-सासरे आणि एक वर्षाचा तिचा मुलगा. मानसीच्या सासूने तिला खंबीरपणे  आधार दिला पण मानसी नैराश्याने ग्रासली आहे. पती गमावल्याचे दु:ख, लहान बाळाचे पालनपोषण आणि कामधंदा काय करावा, कोठे काम मिळेल या चिंतेने त्रस्त असतानाच सासर्‍याकडून विचित्र छळ सुरू झाला. येत-जाता अश्लिल टोमणे मारणं, तिचे कपडे विशिष्ट जागी कात्रीने फाडून टाकणं. तिने दुसरे कपडे घातले की, तिला फाडलेले कपडे घालण्यासाठी जबरदस्ती करायची. अतिशय अश्लील भाषेत बोलायचं.   सासू काही बोलली की, तिला मारायचं आणि त्रास द्यायचा. शेजारचे कोणी आले की, एकदम चांगलं वागायचं. तिचा सासरा विक्षिप्त स्वभावाचा आहे. आपण हे सहन केलं आता सुनेला हा त्रास नको म्हणून सासूने पतीविरुद्ध पोलिस तक्रार करायची ठरवली. मानसीने आणि सासू पोलिस स्टेशनला तक्रार करायला गेल्या तेव्हा या वयात नवरा कसा त्रास देईल म्हणून त्यांनाच पोलिसांच बोलणं ऐकून घ्यावं लागलं. सुनेने तिला होणारा त्रास सांगण्याचा प्रयत्न केला तर तुझी सासू असतांना तुझ्यासोबत सासरा असं कसं वागू शकतो यावर तिला ऐकवलं. शेवटी एका संघटनेच्या माध्यमातून त्यांची तक्रार नोंदवली गेली.

ग्रामीण भागातील स्त्रियांचेही असेच काहीसे अनुभव समोर आले.    आशाबाई वय वर्ष ६५. पती कोविड पॉजिटिव आले आणि १५ दिवसात त्यांचे निधन झाले. तीन मुलं-सुना आणि नातवंड असलेलं मोठं कुटुंब.  त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली. संपर्कात असलेल्या इतर व्यक्तीच्या टेस्टही निगेटिव्ह आल्या. आशाबाई सांगत होत्या, माझ्या नवर्‍याला कोरोना झाल्यानंतर घरातील वातावरण पार विस्कटून गेलं. मला एका खोलीत ठेवलं गेलं. अण्णांमुळं आम्हाला पण कोरोना होईल. तुमचं झालं गेलं आमचं अजून आयुष्य जायचं हे पोरांचे बोल होते. (त्याची मुलं वडिलांना अण्णा म्हणायचे ) नातवंडांना माझ्याजवळ येण्याची परवानगी नव्हती.  माझा नवर्‍या गेल्यानंतर कसाबसा एक महिना गेला. दुसर्‍या महिन्यात मला आमच्या पोरांनी शेतावर राहण्यासाठी नेऊन सोडलं. मला शेतातलं  जे काम करता येईल ते काम करत इथंच राहा म्हणून सांगितलं. गेल्या सहा महिन्यापासून एकटी राहते म्हणत पदरानी पाणवलेले डोळे पुसले.

अरुणा वय वर्ष ३२. सहा वर्षाचा एक मुलगा आहे. गावात नुकतंच दोन खोल्यांच घर बांधून झालं होतं. अरुणा सांगत होती, सुरूवातीला ताप आला म्हणून आम्ही टेस्ट केली. चार दिवसांनी रिपोर्ट पॉजिटिव असल्याचा फोन आला. गावातील दवाखान्यात गेलो. तिथं अॅडमिट होण्याची सोय नव्हती. तालुक्याच्या गावी माझ्या दिराने खासगी हॉस्पिटलमध्ये बेड मिळवला. तिथं त्यांना अॅडमिट केलं यात दोन दिवस गेले. माझ्या मुलाला मी माझ्या माहेरी आईकडे पाठवून दिलं. सासूबाईं घरी होत्या. माझीही टेस्ट करण्यात आली. मला काही त्रास होत नव्हता पण माझाही रिपोर्ट पॉजिटिव आला. मग आम्ही पुरत कोलमडून गेलो.  उपचारासाठी दवाखान्यात बेड मिळणं खूप कठीण होतं. मला घरातच क्वारंटाईन करून उपचार सुरू केले. माझे दीर माझ्या नवर्‍यासाठी धावपळ करत होते. त्यांच्या प्रकृतीत काही सुधारणा होत नव्हती.  ऑक्सिजन कमी होत होता. त्यांना औरंगाबादला हलवण्यात आलं.  तिथेही बेड मिळवण्यासाठी फार हाल झाले. रात्री उशिरा बेड मिळाला पण दुसर्‍या दिवशी सकाळी पती गेल्याचाच फोन आला. हा माझ्यासाठी मोठा आघात होता. माझ्यापुढे मुलाच्या भविष्याची चिंता आहे. माझे पती ज्या आयुर्वेदिक उपचार केंद्रात काम करत होते त्यांनी मला तिथे नोकरी दिली आहे. त्यामुळे सध्याची काळजी जरा कमी झाली आहे.  आमच्या गावात या आजाराबद्दल खूप गैरसमज आहेत. शेजारी आमच्या बोलणं टाळतात. नातेवाईक दुरावले आहेत. जीव नकोसा झालाय पण मुलाकडे बघून पुन्हा कामाला लागते.

कोविड महासाथीने मानव जातीवर आघाताची दस्तक देऊ दोन वर्ष होत आहे. कोविडच्या दुसर्‍या लाटेत मृत्यूचे तांडव आपण पाहत आहोत.  जेव्हा जेव्हा अशी संकट येतात तेव्हा याचा सर्वाधिक परिणाम स्त्रिया आणि लहान मुलांवर होताना दिसून येत आहे. कोविडमुळे देशात ३०  हजारपेक्षा अधिक बालके अनाथ झाल्याचे राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने म्हटले  आहे. अनेक लोकांनी त्यांचे जोडीदार गमावले आहेत. यात ज्या स्त्रिया विधवा झाल्या आहेत त्याच्या पुढे जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला आहे. मानव जातीवर यापूर्वी आलेल्या एचआयव्ही एड्स, इबोला व्हायरससारख्या महामारीच्या मागोवा घेतला. महामारीने स्त्रिया-मुली, लहान मुलांना संकटाच्या घाईत लोटले आहे. भारतात एचआयव्ही एड्समुळे जोडीदार गमावणार्‍या स्त्रियांकडे कुटुंब आणि समाज दोघांनी पूर्वग्रह दूषित नजरेनेच पाहिले. सासर आणि माहेर दोन्ही कुटुंबातून स्त्रियांना स्वीकारले जाण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. २०१४मध्ये आफ्रिका खंडातील देशात इबोला व्हायरसने थैमान घातले. यात अनेक स्त्रिया विधवा झाल्या. या स्त्रियांना ‘इबोला विधवा’ म्हटले गेले.  कोविडमुळे विधवा झालेल्या स्त्रियांना ‘कोविड विधवा’ हा शब्द प्रयोग केला जात आहे.

कोविडमुळे गरीब आणि विकसनशील देशांना मोठा फटका बसला आहे.  परिणामी स्त्रिया आणि लहान मुलांची परिस्थिती दयनीय आहे. १७ जून रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या एनजीओ अॅक्टिविस्ट कमिशन ऑन द स्टेट्स ऑफ वुमन फोरमच्यावतीने Beyond the Loss : Widow’s Resilience आयोजित केलेल्या बैठकीत जगभरातील कोविड विधवाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या वेळी डोमेशियन रिपब्लिक, इजिप्त, मालावी, नेपाळ, भारत, कॅमेरुन, नायजेरिया, केनया, टांझानिया येथील स्त्रियांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतील स्त्रियांना आधी इबोला व्हायरसशी झगडाव लागलं आणि आता कोविडशी. त्यांचा संघर्ष हा जगण्याचा, जमिनीचा आणि पाण्याचा असा बनला आहे. ज्या स्त्रियांनी कोविडमध्ये त्यांचा पती गमावला आहे त्यांना जबरदस्ती घरातून बेदखल केले जात असल्याच्या घटनात वाढ झाली आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कोंगोमध्ये राहणारी डेबोराहच्या पतीचे  कोविडमुळे निधन झाले. तिला एक मुलगा आहे. ती आणि तिचा ११ वर्षाचा मुलगा दोघे भाड्याच्या घरात राहतात. घरमालकाने तिच्या रूमचे लाईट आणि पाण्याचे कनेक्शन तोडू टाकले आहे. डेबोराह ही जुने कपडे विकून तिचा व मुलाचा उदरनिर्वाह करते. कोविड लॉकडाऊनमुळे तिचे काम पूर्णपणे बंद पडले आहे. मुलाचे संगोपन कसे करायचे हा प्रश्न तिच्या समोर आहे. अशीच परिस्थिती आशिया, आफ्रिका खंडातील स्त्रियांची असल्याचे निदर्शनास येत आहे. या सोबतच विधवा स्त्रियांना पारंपरिक रूढी, छुप्या पद्धतीने होणारे अनैतिक मानवी वाहतूक, लैंगिक शोषण, विधवा स्त्रियांच्या मुलींना बळजबरी बालविवाह लावून देणे, मुलीची होणारी खतना प्रथा अशा अनेक संकटांची झळ विधवा स्त्रियांना सोसावी लागत आहे.

कोणत्याही स्त्रीचे मानवी हक्क नाकारले जावू नये, त्यांच्या मानवी हक्काचे संरक्षण व्हावे या साठी कोविडमुळे विधवा झालेल्या स्त्रियांकरिता  रोजगार, अन्न सुरक्षा योजनेचा लाभ, मुलांचे संगोपन करण्यासाठी सरकारच्या मदतीची गरज आहे. या सोबतच स्त्रियांच्या माहेर आणि सासरचा जो काही संपत्तीचा अधिकार आहे तोही त्यांना निर्विवादपणे मिळणे अनिवार्य आहे. कोविडमुळे विधवा झालेल्या स्त्रियांना रोजगार मिळावा यासाठीचे एक पाऊल लिंक्डइन कंपनीने covidwidows.in ही वेबसाइट सुरू केली आहे. काही वॉलंटियर्सच्या मदतीने कोविड विधवा  स्त्रियांना रोजगार मिळवून देण्यासाठीचे मदत कार्य करत आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी मुख्यमंत्री रिलीफ फंडमधून कोविड विधवा स्त्रियांना अडीच लाख रु.ची आर्थिक मदत करणार असल्याचे म्हटले आहे. तसेच अरुणोदय विधवा पेंशन योजनेतून दरमहा आर्थिक मदत दिली जाईल असे जाहीर केले आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कोविड विधवांना समाज कल्याण योजनेअंतर्गत मधु बाबू पेंशन योजना येत्या १५ दिवसात लागू करणार असल्याचे म्हटले आहे.  बिहार राज्याने १८-४० वयोगटातील कोविडमुळे विधवा झालेल्या स्त्रियांसाठी लक्ष्मीबाई पेंशन योजनेअंतर्गत दरमहा मदत आणि ४ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. या पाठोपाठ राजस्थान राज्य सरकारनेही ४ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली आहे. देशातील आसाम, ओडिशा, बिहार आणि राजस्थान राज्यांनी हा निर्णय घेतला आहे. येणार्‍या काळात संपूर्ण देशात अशा ठोस निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेणे आवश्यक आहे. मात्र कोविड विधवा स्त्रियांना केवळ सरकारी मदत देऊन चालणार नाही तर स्त्रियांना सासर आणि माहेरच्या कुटुंबातून संपत्तीचा वाटा मिळणे आवश्यक आहे. यासोबतच स्त्रियांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे गरजेचे आहे.

राज्यात कोविडमुळे ३००० स्त्रिया विधवा झाल्याची प्राथमिक माहिती आहे.  यातील  काही जिल्ह्याची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

अनू क्रं जिल्हा कोविड विधवांची संख्या
औरंगाबाद २६५
जालना ६१
परभणी १३४
हिंगोली ३९
बीड २७४
नांदेड २५४
उस्मानाबाद ९४
लातूर १७८
सिंधुदुर्ग १५३
१० सोलापूर १३३
११ कोल्हापूर १२६
१२ सांगली २७४
१३ नागपूर ३५०

 

ही माहिती अगदीच प्राथमिक आहे. मार्च २०२० ते जानेवारी २०२१ पर्यंत राज्यात ३५,४९१ पुरुष, १५,१७२ स्त्रिया कोविडमुळे मृत्यूमुखी पडले आहेत तर १ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२१ पर्यंत ६२७ स्त्रिया तर १६१६ पुरुषांचा मृत्यू झाला.  मार्चपासून कोविडच्या केसेसमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत होते.  यात अनेक लोक मृत्यूमुखी पडले.  देशात तीन लाख ऐक्यांशी हजार कोविडमुळे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या आहे. राज्यात एक लाख पंधरा हजार लोक मृत्यूमुखी पडल्याची नोंद आहे.   या आकडेवारीनुसार मांडणी केल्यास राज्यात पुरुषांच्या मृत्युचे प्रमाण अधिक आहे.  यानुसार किती स्त्रिया विधवा झाल्या आहेत यावर काम होणे आवश्यक आहे.

२३ जून हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्यावतीने  आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून पाळला जातो. या वर्षी “Invisible Women, Invisible Problems” हा विषय जाहीर करण्यात आला आहे. स्त्रियांच्या न दिसणार्‍या समस्यामध्ये लैंगिक छळ, मानसिक त्रास अशा समस्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने देशांनी स्त्रियांसाठी धोरण आखताना, धोरणात्मक निर्णय घेतांना आणि बदल करतांना स्त्रिया आणि प्रामुख्याने विधवा स्त्रियांना केंद्रस्थानी ठेऊन स्त्रियांच्या मानवी हक्काचे संरक्षण होईल असे बदल करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या देशात मुलीच्या शिक्षणाचे कमी प्रमाण, ग्रामीण आणि आदिवासी भागात शिक्षणाचा अभाव, रूढीपरंपरांचा मोठा पगडा, अज्ञान, लिंगभेद, पुरुषप्रधान संस्कृती अशा परिस्थितीत समाजात ‌स्त्रियांच्या प्रश्नांचं स्वरूप आणि कोविडमुळे विधवा झालेल्या स्त्रियांचे प्रश्न चिंताजनक आहेत. त्यात प्रामुख्याने जाणवलेल्या समस्या म्हणजे महामारीत  एखाद्या विधवा स्त्रीला आजही समाजातील पुरुषी व्यवस्थेशी द्यावा लागणारा लढा हा भयावह आहे. त्यांच्या शारीरिक-मानसिक आरोग्याची होणारी हेळसांड, त्यांच्या मुलांचे प्रश्न, त्यांची आर्थिक, सामाजिक, भावनिक, लैंगिक शोषण यामुळे होणारी कुचंबणा आणि या साऱ्याला तोंड देत त्यांच मन मारून जगणं हे वास्तव समजून घ्यावे लागेल. स्त्रियांना सासरी आणि माहेरी मिळणारी वागणूक, घरी-दारी मारले जाणारे टोमणे, घर आणि जमिनीचा नाकारला जाणारा हक्क, कुटुंब व्यवस्थेपर्यंत सगळीकडेच नाकारलं जाणारं स्थान, मुले असूनही निराधार जिणे जगणाऱ्या, वृद्धपकाळातील असह्य वेदना सहन करत जगणार्‍या स्त्रियाचं जगणं कोविडमुळे अजूनच वेदनादायी आणि अंधकारमय होतांना दिसत आहे. स्त्रियांच्या प्रश्नांचं वास्तव भेदक होतं. स्त्रिया आपल्या घरांमध्येही सुरक्षित नाहीत. २२ जून रोजी एकल महिला धोरणाचा प्राथमिक मसुदा राज्य सरकारकडे सादर करून दोन वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने राज्य सरकारने ह्या मसुद्यावर आवश्यक कार्यवाही करून राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकारणासाठी पाऊले उचलणे गरजेचे  आहे.

टीप : लेखातील स्त्रियांची नावे बदलली आहेत.

रेणुका कड, एकल महिला धोरण समितीच्या राज्य समन्वयक आहेत.

संदर्भ :

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0