नवी दिल्ली: निवडणूक व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तसेच देशातील ज्येष्ठ राजकीय नेते शरद पव
नवी दिल्ली: निवडणूक व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तसेच देशातील ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी मंगळवारी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने पवार यांनी कंबर कसली आहे अशी चर्चा यामुळे राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विरोधी पक्षांची आघाडी ही २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी तर असेलच पण त्यापूर्वी २०२२ साली होणाऱ्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीतही भाजपला एकत्रित आव्हान निर्माण करण्यासाठी पवार प्रयत्नशील आहेत, असे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.
एकेकाळी भाजपप्रणित सरकारमध्ये मंत्रिपद भूषवणारे पण नंतरच्या काळात भाजपच्या विरोधात गेलेले यशवंत सिन्हा हे पवार यांच्यासोबत या बैठकीचे सहनिमंत्रक आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांपूर्वी सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पवार आणि सिन्हा यांच्या वतीने अनेक पक्षांच्या नेत्यांना या बैठकीचे निमंत्रण रवाना झाले आहे. सध्याच्या राष्ट्रीय स्तरावरील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शरद पवार आणि यशवंत सिन्हा यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली बैठक घेतली जाणार आहे. सर्वांनी या चर्चेला कृपया उपस्थित राहावे, असे सिन्हा यांच्या राष्ट्रमंच या संघटनेतर्फे पाठवण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकांमध्ये म्हटले आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा, आम आदमी पक्षाचे संजय सिंग, काँग्रेस नेते विवेक तनखा आणि कपिल सिबल, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांचा निमंत्रितांमध्ये समावेश आहे, असे समजते. सिबल आणि झा यांनी बैठकीस उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली आहे, तर तमीळनाडूतील सत्ताधारी डीएमकेचे प्रतिनिधित्व तिरुची शिवा करणार आहेत, असे एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तसेच महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून निमंत्रितांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात यशवंत सिन्हा, पवन वर्मा, खासदार वंदना चव्हाण, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा, सुधींद्र कुलकर्णी, कोलिन गोन्साल्विस, अॅडव्होकेट मजीद मेमन, निवडणूक आयोगाचे माजी प्रमुख एस. वाय. कुरेशी, निवृत्त न्यायमूर्ती ए. पी. सिंग, कवी-गीतकार जावेद अख्तर, अर्थतज्ज्ञ अरुण कुमार, पत्रकार आशुतोष, करण थापर, प्रीतिश नंदी, भारत वाहिनी पार्टीचे घन:श्याम तिवारी यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवार, २२ जून २०२१ रोजी त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली आहे आणि यासाठी अनेक राजकीय पक्षांतील नेते तसेच अन्य क्षेत्रांतील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. यशवंत सिन्हा यांनीही त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून बैठकीची घोषणा केली आहे.
काँग्रेसनेत्यांनी बैठकीस येण्यास नकार दिल्यासारखे प्रथमदर्शनी वाटत आहे. याबद्दल महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांना विचारले असता, आमंत्रण नाकारण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. मात्र, काँग्रेसखेरीज तिसरी आघाडी होऊ शकत नाही, असे विधान पटोले यांनी केल्याचेही एनडीटीव्हीच्या बातमीत नमूद करण्यात आले आहे. नाना पटोले गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त विधाने केल्याबद्दल चर्चेत आहेत. पवारसाहेबांनी यापूर्वीही तिसरी आघाडी निर्माण करण्याचे प्रयत्न केले आहेत, असेही पटोले म्हणाले. भाजपला टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीची गरज आहे आणि यासंदर्भात आपण पवार यांच्याशी बोललो आहे, असे विधान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही यापूर्वी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या बैठकीची घोषणा केली जाण्यापूर्वी पवार यांनी निवडणूक व्यूहरचनातज्ज्ञ प्रशांत किशोर यांच्याशी दिल्लीत चर्चा केली. यापूर्वीही ११ जून रोजी पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांनी किशोर यांच्याशी सुमारे तीन तास चर्चा केली होती. दहा दिवसांच्या अंतरात दोघांमध्ये दुसऱ्यांदा दीर्घ चर्चा झाल्यामुळे भाजपविरोधात लढण्यासाठी “मिशन ट्वेंटीट्वेंटीफोर” आखले जात असावे अशा अटकळी बांधल्या जात आहेत.
पंतप्रधान मोदी यांना पर्याय म्हणून संयुक्त विरोधी आघाडीतून एक उमेदवार निश्चिती करण्याबाबत पवार व किशोर यांच्यात चर्चा झाली. त्याबरोबरच उत्तरप्रदेशात सध्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत जनतेत असंतोष निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर तेथेही भाजपला दमदार पर्याय उभा करण्यावरही विचार सुरू आहे.
भाजपमधील काही घटक पवारांच्या बाजूने आहेत. कारण, मोदी यांच्या वेगाने घटत असलेल्या लोकप्रियतेची त्यांना कल्पना आहे, असेही सूत्रांनी सांगितल्याचे समजते. पवार हे देशातील अत्यंत धूर्त राजकारण्यांपैकी एक समजले जातात. त्यांच्या गटात सामील होण्यास देशातील अनेक पक्ष उत्सुक आहेत, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. फारशी कोणी कल्पनाही केली नसेल अशा प्रकारचे आघाडी सरकार तयार करण्यासाठी पवार यांनी कंबर कसली आहे, अशीही चर्चा आहे.
दरम्यान, प्रशांत किशोर यांच्याकडे सोमवारच्या बैठकीविषयी विचारणा केली असता ही ‘रुटीन’ भेट होती, असे उत्तर त्यांनी दिले.
भाजपच्या लाटेला अटकाव केला जाऊ शकतो हे पटवून देणारे उदाहरण म्हणून पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील तृणमूल काँग्रेसच्या विजयाकडे बघितले जात आहे, असेही सूत्रांनी सांगितले. भाजपने पश्चिम बंगालमध्ये सत्ता प्राप्त करण्यासाठी पूर्ण जोर लावला होता, सर्व यंत्रणा कामाला लावल्या होत्या, स्वत: पंतप्रधान मोदी यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक प्रचारसभा घेतल्या होत्या. मात्र, या सर्वांवर मात करत ममता बॅनर्जी यांनी सलग तिसऱ्यांदा पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन केली. ममता यांनी या निवडणुकीच्या नियोजनामध्ये प्रशांत किशोर यांची मदत घेतली होती. या फॉर्म्युलाची पुनरावृत्ती २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकांमध्येही केली जाऊ शकते, असे विधानही ममता यांनी नुकतेच केले होते. तमीळनाडूत डीएमकेला सत्ता प्राप्त करून देण्यातही प्रशांत किशोर यांचे योगदान आहे. त्यामुळे आता पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते प्रशांत किशोर यांच्या मदतीने भाजपपुढे कोणते आव्हान निर्माण करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
COMMENTS